सोसायटीचे जे सभासद त्यांच्या ज्ञानाचा उपयोग पदाधिकारी करून घेत नाहीत, कारण ‘हम करें सो कायदा व हम करें सो फायदा’ ही त्यांची वृत्ती असते. शिवाय सभासद जर मोठय़ा पदावर असेल तर ‘तुम्ही मोठे तुमच्या कंपनीत. इथे तुम्हाला धडा शिकवू,’ अशी अरेरावीची भाषा असते. बाय लॉज व अॅक्टमधला फरक समजावून न घेता सर्वसाधारण सभेत झालेले ठराव, जे मूठभर लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जातात, हे कोर्ट किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या वर आहे, असा यांचा खाक्या असतो. यात इतर सभासदांबरोबर ज्यावर चुकीची कारवाई केली तो सभासदसुद्धा भरडला जातो.
जर एखाद्याकडे एकापेक्षा जास्त सदनिका असतील तर तो एकाच वेळी प्रत्येक सदनिकेत कसा राहू शकेल? मग त्याला Bye law 43 (i) (ii) ची भीती दाखवायची व सदनिका भाडय़ाने द्यायला विरोध करायचा.
सरकारी कार्यालयात किंवा कोर्टात हेलपाटे मारण्यात जसा पदाधिकाऱ्यांचा वेळ जातो तसाच चूक न करणाऱ्या, पण कारवाई होते त्या सभासदांचासुद्धा जातो. फरक एवढाच की पदाधिकारी सोसायटीचा पैसा वापरतात. सभासदाला मात्र पदराला खार लावावी लागते.
१ ते ४ वाजण्याच्या सुमारास सुतारकाम व गवंडीकाम न करणे हे अती होतं! कारण हे लोक लांबून येतातच मुळी १०-११ वाजण्याच्या सुमारास. मग यांनी मध्ये तीन तास काम न करता रात्री ९ वाजेपर्यंत काम करायचे? त्यांना त्यांचे कुटुंब व इतर कामे नाहीत? दुपारची वामकुक्षी दीड-दोन तास पुरे होते.
पोटभाडेकरू ठेवण्यास परवानगी मागायला गेले तर काय होते हे सर्वानाच माहीत आहे. वेळकाढूपणा करायचा, बॅचलर चालणार नाहीत. कंपनीला देऊ नका, अशी अरेरावी चालू होते. सुप्रीम कोर्टाने अनेक निकाल सभासदांच्या बाजूने देऊनही आणि ते पदाधिकाऱ्यांना दाखवूनही हे सुप्रीम कोर्टाच्याही वर असल्याच्या थाटात नन्नाचा पाढा लावत असतात.
मनमानी करणारे सभासद व पदाधिकारी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी समजुतीने घेतले तर बरेच प्रश्न सामोपचाराने निकाली निघू शकतात. पण बहुतेक ठिकाणी पुरुषी अहंगंड आडवा येतो व प्रत्येक जण दुसऱ्याला धडा शिकविण्याचा विडा उचलतो. यातून चालू होते फक्त सरकारी ऑफिसेस व कोर्टाच्या चकरा मारण्याचे दुष्टचक्र!
आजकाल सरकारी ऑफिसातसुद्धा काम जास्त व कर्मचारी कमी. त्यांनाही कुणाच्या प्रश्नांत आत्मीयता नाही.
मी एका सोसायटीत पदाधिकारी व दुसऱ्यात सभासद असल्याने लेखनाचा हा प्रपंच!
-डॉ. प्रतिभा महेश्वरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा