‘पेंढार वास्तुतज्ज्ञांचे’ हे सार्थ शीर्षक असलेला रजनी देवधर यांचा फसव्या वास्तुतज्ज्ञांवरील लेख वाचला. अत्यंत परखडपणे लिहिलेला लेख वाचून यापुढे तरी तथाकथित वास्तुतज्ज्ञांकडून लोकांची फसवणूक थांबेल का, हा प्रश्न पडतो. समाजप्रबोधनाचा विषय मांडणे म्हणजे समाजप्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे असते. ज्योतिष व वास्तुशास्त्र या सुशिक्षितांच्या ठेवणीतील अंधश्रद्धा आहेत. कुठल्यातरी पाच हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथाची साक्ष काढली की ही मंडळी लगेच बुद्ध्निप्रामाण्यवादाला तिलांजली देऊन शब्दप्रामाण्यापुढे मान तुकवतात.
कालबाह्य झालेल्या वास्तुशास्त्राची ज्यांनी दुकानं उघडली आहेत ते अनेकदा त्या विषयावरचे विनामूल्य व्याख्यान आयोजित करतात. अशा व्याख्यानात ते पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, व्हायब्रेशन्स, रेडिएशन्स असे शास्त्रीय शब्द वापरून उपस्थितांना गुंग करून टाकतात. आणि त्या गुंगीतच अनेकजण दहा-बारा हजार अॅडमिशन फी भरून विद्यार्थीदशेत प्रवेश करतात. (आणि मग स्वत:ची दशा करून घेतात.)  मग पिरॅमिड नावाची अथवा तत्सम वस्तू त्यांच्या गळ्यात मारली जाते. ती वस्तू पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करून तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी नष्ट करून तुमच्या सर्व कौटुंबिक समस्यांचं निराकरण करील, अशी थाप मारली जाते. वास्तविक लाकडाची, लोखंडाची वस्तू आपोआप कसलीही ऊर्जा निर्माण करीत नाही. रजनी देवधर यांच्या लेखावर प्रतिकूल प्रतिक्रिया देताना अरुंधती वैद्य म्हणतात की, त्यांच्या शिक्षकाने त्यांना या विषयाची गोडी लावली. वास्तुशास्त्राबद्दल अशास्त्रीय विषयाची गोडी जर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना लावीत असेल तर वास्तुशास्त्रावरचा विश्वास ही खास सुशिक्षितांची अंधश्रद्धा आहे, हे सिद्ध होते.
– चंद्रसेन टिळेकर, अंधेरी पूर्व.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहितीपूर्ण लेख
‘वास्तुरंग’मधील डॉ. नागेश टेकाळे यांचा ‘हरित मित्र’ व श्रीपाद यांचा ‘चिऊचे घर’ या सदरातील ‘वास्तू म्हणते तथास्तू’ हे दोन्ही लेख खूपच माहितीपूर्ण आहेत. या लेखांमधून अनेक महत्त्वाची आणि नावीन्यपूर्ण माहिती वाचकांच्या हाती लागते.
– संतोष, रूपाली पाटील, जोगेश्वरी.

उपयुक्त लेख
‘वास्तुरंग’मधील (१२ जानेवारी) मनोज अणावकर यांचा गृहवसाहत संस्कृतीबद्दलचा लेख उपयुक्त आणि विचारदर्शक वाटला. त्यातील ‘केअर सेंटर्स’ची संकल्पना उत्तम आहे. असे मॉडेल कोठे आहे का? त्याचा प्रस्ताव बनवता येईल का? अशा पद्धतीने त्या कल्पनेस चालना देता येईल.
– दिनकर गांगल

मार्गदर्शक लेख
‘वास्तुरंग’मधील श्रीपाद यांचा ‘चिऊचे घर’ सदरातील ‘वास्तु म्हणते तथास्तू’ हा लेख खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटला. सदर लेख नवीन घर घेणाऱ्या लोकांसाठी खूपच मार्गदर्शक ठरेल.     – रेवती
बदलत्या गृहवसाहतीचे अचूक विश्लेषण ‘वास्तुरंग’मधील (१२ जानेवारी)मनोज अणावकर यांच्या ‘बदलती शहरं’ या सदरातील बदलत्या गृहवसाहत संस्कृतीचे उत्तम पद्धतीने विवरण केले आहे. या परिस्थितीचा सामाजिक आणि मानसिक परिणाम यांचेही अचूक विश्लेषण यात केले आहे.
 – तन्मय इनामदार

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers letters to editor