चाळसंस्कृतीचा अध्याय संपला
‘वास्तुरंग’ (२९ ऑगस्ट) मध्ये ‘चाळींतील उत्सवांनी जगायला शिकविले’ हा लेख वाचला. सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाशी जोडणारी चाळ आज काळाच्या ओघात नष्ट होत आहे. ‘वसुधव कुटुंबकम्’ ही संकल्पना मुंबईतील अनेक चाळींनी नकळत जपली आणि जोपासली. चाळीत सर्व काही सार्वजनिक- अगदी सुखापासून दु:खापर्यंत. आमच्याकडे सकाळी ६ वाजता उघडलेले दरवाजे रात्री ११ वाजताच बंद व्हायचे. दरवाज्याप्रमाणे सर्वाच्या मनाचे कवडसेही २४ तास उघडेच असायचे. कोणाच्याही घरातच काय तर त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्येही घुसण्याची परवानगी लागत नसे. कोणी कुठेही जा, कोणाच्याही घरी जाऊन हक्काने काहीही मागा, परकेपणा नव्हताच. चाळी संपल्या आणि एका संस्कृतीचा अध्यायही संपला.
– संजय शेलार.

ही बावडी पाहण्याची इच्छा!
‘वास्तुरंग’ (२९ ऑगस्ट) मधील ‘थळ घाटातली अहिल्याबाईंची बावडी’ हा उज्ज्वला आगासकर यांचा छोटेखानी लेख  वाचला. खरं तर मुंबईहून नाशिकला जाताना अनेकदा या बावडीविषयी मनात कुतूहल जागृत होत असे, परंतु या छोटय़ाशा बावडीशी इतका मोठा इतिहास जोडला गेला आहे याची कल्पनाही केली नव्हती. पुन्हा कधी नाशिकला जाण्याचा योग आला की थोडावेळ या बावडीपाशी निवांत बसण्याची इच्छा हा लेख वाचून झाली आहे.
– मीरा साठे.

वास्तूसोबत समृद्ध जगणं
‘वास्तुरंग’ (२ ऑगस्ट) मध्ये सुलक्षणा महाजन यांचा ‘वास्तुरचना आणि संवेदनशीलता’ हा अप्रतिम लेख वाचला. हा लेख म्हणजे जगण्याचा आदर राखून आपलं आयुष्य अधिक समृद्ध कसं करता येईल याचा उत्तम परिपाठ म्हणावा लागेल.
– अविनाश लकारे.

माझ्या घराची आठवण
‘वास्तुरंग’ (२९ ऑगस्ट) मधील अशोक लोटणकर यांचा ‘घर नव्हे, साक्षात मंदिर’ हा लेख आमच्या गावच्या घराची, मंडळींची आठवण करून देणारा होता. थोडय़ाफार फरकाने आमच्याही घराचे असेच काहीसे चित्र होते. या लेखामुळे जुन्या आठवण्ीांना उजाळा मिळाला.
– श्रीधर मालवणकर

झणझणीत अंजन
‘वास्तुरंग’ (२ ऑगस्ट) मध्ये सुलक्षणा महाजन यांचा ‘वास्तुरचना आणि संवेदनशीलता’ हा लेख म्हणजे बेजबाबदारपणे बांधकाम करणाऱ्या मानसिकतेने पछाडलेल्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे. स्वार्थी राजकारणी आणि समाजाप्रती निष्ठा नसलेले अधिकारी हव्यासापोटी राज्याच्या विकासाचा आराखडाच बदलत आहेत.
– मिलिंद बल्लाळ.

अचूक विश्लेषण
‘वास्तुरंग’मधील सुलक्षणा महाजन यांचे लेख बांधकाम क्षेत्राशी संबंधित बाबींवर अचूकपणे बोट ठेवतात. या लेखांमधून या क्षेत्राशी संबंधित अनेक गोष्टींकडे नव्याने बघण्याचा दृष्टिकोन मिळतो. केवळ नवीन कायदे करून काम होणार नाही, तर त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीही गरजेची आहे, हे त्यांचे म्हणणे तंतोतंत पटते.
– तेजस पाटकर.

Story img Loader