‘वास्तुरंग’ (१६ ऑगस्ट)मध्ये सुचित्रा साठे यांनी लिहिलेला ‘जात्याची घरघर नव्हे जात्याला घरघर’ हा लेख भूतकाळात घेऊन गेला. आईसोबत जात्यावर दळतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. आईसोबत आळीपाळीने जातं ओढताना आम्हा भावंडांमध्ये लागलेली चुरस, गमतीजमती, तर कधी जातं ओढायचा आलेला कंटाळा व त्यासाठी केलेली टाळाटाळ.. हे सारं आठवून मन भूतकाळात रमून गेलं. जातं कसं ओढायचं, खुटा कसा लावायचा, तो कशा प्रकारे ओढायचा याचं प्रशिक्षण आई देई. जातं ओढताना कधी कधी ती ओव्याही म्हणे. कधी तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगे.. हा लेख वाचून आईने अजूनही वर्षांनुवर्षांचं निगुतीने ठेवलेलं जातं पुन्हा पाहण्याची ओढ निर्माण झाली.
-ज्योती नार्वेकर

अनिवासी सभासद ही डोकेदुखी
‘वास्तुरंग’ (१६ ऑगस्ट) ‘अनिवासी सभासद : चिंतेचा विषय’ हा  लेख खूपच माहितीपूर्ण होता. सध्या अनेक सोसायटय़ांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा घर खरेदी केले वा भाडोत्री ठेवला की आपले काम संपले, अशीच भूमिका हे सभासद घेतात. त्यांना सोसायटीतील कोणत्याही समस्येशी काहीही घेणेदेणे नसते. त्यांचे हे बेताल वागणे खूपच त्रासदायक ठरते. त्यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण झाली व त्यासाठी त्यांना फोन केले वा बोलावणे पाठविले तरीही सोसायटीच्या सदस्यांना ते दाद देत नाहीत. उलटपक्षी सोसायटीच्या सदस्यांनाच नावे ठेवत राहतात.
निरंजन कामत

माहितीपूर्ण ‘सज्जा’
‘वास्तुरंग’ (१६ ऑगस्ट) मधील स्वाती दामले यांचा ‘सज्जा’ हा लेख माहितीपूर्ण होता. हा लेख वाचताना सज्जाशी संबंधित जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला. आता अशाप्रकारे सज्जे फारसे पाहण्यात येत नाहीत. याला कारणीभूत आहे ती जागेची टंचाई.
कालिंदी .

Story img Loader