‘वास्तुरंग’ (१० जानेवारी) मध्ये मीना गुर्जर यांचा ‘मुक्काम पोस्ट गिरगाव’ हा लेख वाचला अन् गिरगावातील ‘चाळ संस्कृती’ जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली! त्या वेळी माझे वास्तव्य मुंबई सेंट्रल येथे होते. मात्र गिरगावात वरचेवर जाणे होत असल्याने, तसेच माझ्या मंजू आत्याचेही वास्तव्य गिरगावातील एका चाळीत असल्याने माझी ‘नाळ’ या गिरगावातील अगदी पक्की जुळलेली होती.
त्या वेळच्या गिरगावाच्या अनेक चाळीत मराठी माणसांचे जास्तीत जास्त वास्तव्य असे. सणासुदीच्या दिवसांत मराठमोठय़ा संस्कृतीचे दर्शन होई अन् एकच धमाल उडे! या चाळ संस्कृतीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळीपूर्वी पंचा खोचून वडील मंडळी हातात खराटा घेऊन सारा चाळीचा परिसर, तसेच समोरील डांबरी रस्ते- स्वच्छ करीत व अशा रीतीने मुंबईशी असलेले आपलेपणाचे नाते आवर्जून जपत! आता मात्र हे चित्र बदललेले जाणवते, हे प्रत्येकाला मान्यच करावे लागेल!
गिरगावातील खानावळींना शाकाहारी रुचकर, स्वादिष्ट भोजनामुळे अगदी अनन्यसाधारण महत्त्व होते. साधारणपणे १९६४-६५ साली गिरगावातील शिरोडकरांच्या खानावळीत एक रुपया पंचाहत्तर पैशांना ‘अन्लिमिटेड जेवण’ मिळत असे. एकदा एक गंमत झाली- चांगला धडधाकट धिप्पाड माणूस आमच्या शेजारील टेबलावर जेवावयास बसला. दर वेळेस वेटरने पोळ्या वाढल्या की, तो लगेच फस्त करून दुसऱ्या पोळ्यांची मागणी करीत असे. साधारणपणे असे चार-पाच वेळा झाल्यावर वेटरने काकूळतीला येऊन म्हटले, ‘साब, आप अभी राइस लेओ ना!’ हे ऐकून हसल्यामुळे आम्हाला जेवताना चांगलाच ठसका लागला..
ही चाळ संस्कृती जरी प्रत्येक चाळवासीयांच्या ‘आठवणीतले घर’ असली तरीदेखील आता मात्र बऱ्याचशा अशा चाळी जीर्ण गळक्या, पडक्या झाल्याने त्या केव्हाही कोसळण्याची भीती आहे. त्यांच्या देखभालीकडेही कोणी फारसे लक्ष देताना दिसत नाही तेव्हा अशा चाळीतील मंडळींनी आपापसातील ‘मतभिन्नता’ बाजूला सारून एकवाक्यतेने अशा चाळींच्या पुनर्विकासाचा विचार करणे ही काळाची खरी गरज आहे; जेणेकरून या चाळीतील मराठी माणसांसह साऱ्यांनाच सुखनैव आपापले संसार ऐसपैस थाटता येतील!
– कीर्तीकुमार वर्तक, वसई.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा