‘वास्तुरंग’ मधील (३० मार्च) विश्वासराव सकपाळ यांचा ‘सहकारी गृहनिर्माण संस्था : स्वतंत्र कायदा हवा’ याबाबतचा लेख वाचला. त्यात त्यांनी योग्य विचार मांडले आहेत. गृहनिर्माण संस्थांचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी आणखी काही सूचना कराव्याशा वाटतात. बऱ्याच संस्थांतून कार्यकारिणीवर काम करायला कोणीही तयार नसते, पण जे कोणी काम करतात त्यांच्याबद्दल उगाच तक्रारी करणे, क्षुल्लक चुकांना महत्त्व देणे, पदाधिकारी हे आपले नोकर असल्यासारखे त्यांच्याशी वागणे, इ. प्रकार मात्र सभासद हमखास करतात. यासाठी या कायद्यात अशी तरतूद करावी, की ज्यामुळे आळीपाळीने प्रत्येक सभासदाने कार्यकारिणीवर आणि पदाधिकारी म्हणून काम करणे अनिवार्य ठरेल. याला अपवाद फक्त प्रकृती अस्वास्थ्य (केवळ वय नव्हे) आणि सदस्य नोकरी व अन्य कारणाने नेहमी परगावी राहात असणे, ही दोनच कारणे व तीही कार्यकारिणीने स्वीकारल्यानंतरच. असे काम न करणारे सभासद आपले सदस्यत्व आपोआप गमावतील व त्यांना सदनिका सोडाव्या लागतील. असा जालीम उपाय केल्याशिवाय इतरांनी काम करावे, आपण मजा करावी ही वृत्ती जाणार नाही. दुसरे म्हणजे काही सदस्य विनाकारण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयाच्या खेपा करायला भाग पाडतात. एका सोसायटीमधील महिला सदस्याची वकील मुलगी तिच्याबरोबर रहाते. आपण वकील असल्याचा फायदा घेऊन ही मुलगी आईच्या नावाने सतत सहकारी न्यायालय, फौजदारी न्यायालय, ग्राहक न्यायालय इथे खटले गुदरत असते.  ते टिकत नाहीत, पण न्यायालयाचे समन्स आल्यावर वकिलांवर प्रचंड खर्च करून बाजू मांडणे तर आवश्यक होते. परिणामी आपापला उद्योग सोडून पदाधिकाऱ्यांना त्यात खूप वेळ नाहक घालवावा लागतो. यामुळे आता कोणी कार्यकारिणीवर यायलाच तयार होत नाही. सदस्याला निष्कासित करण्याच्या कायद्यातील सध्याच्या कारणांमध्ये हे कारण बसत नसल्याने त्या महिला सदस्याला काढूनही टाकता येत नाही. तेव्हा ३५(१) मध्ये व्यापक कारणे अंतर्भूत करायला हवीत.
– राम गोगटे, (वांद्रे,पू.)

अशी बाग करावीशी वाटली
मी ‘वास्तुरंग’ पुरवणीची नियमित वाचक आहे. पुरवणीतील ‘मैत्र हिरवाईचे’ या सदरातील डॉ. नागेश टेकाळे यांचा बाल्कनीतील बगीचा हा लेख खूपच आवडला. हा लेख वाचून मलाही घराच्या एका कोपऱ्यात अशी हिरवाई तयार करावीशी वाटली.
– मुग्धा फडके

‘रथचक्र’ डोळ्यासमोर उभी राहिली
‘वास्तुरंग’मधील ‘शब्दमहाल’ सदरातील मीना गुर्जर यांचा ‘रथचक्र’ हा रथचक्र कादंबरीतील घराचं वर्णन करणारा लेख वाचला. मी रथचक्र नाटक पाहिले नाही किंवा कादंबरीही वाचली नाही. टीव्हीवरील मुलाखतींमधून किंवा वर्तमानपत्रांमधून या कादंबरीविषयी माहिती मिळाली. या लेखामधून संपूर्ण रथचक्र डोळ्यांसमोर उभी राहिली. खूप छान.
– सुधा कर्वे

मुंबईचा विकास की विनाश?
१९६६ साली एका वक्तृत्व स्पध्रेत ‘मुंबईच्या विकासातच तिचा विनाश आहे’ या विषयावर बोलून पहिले बक्षिस मिळविले होते.
 ‘वास्तुरंग’ मधील ‘बदलती शहरे’ या सदरातला मनोज अणावकर यांचा ‘उभी शहरं’ हा लेख वाचून मला त्यावेळची आठवण झाली. माझ्याच भावना या लेखातून लेखकाने व्यक्त केल्या आहेत, असे वाटले. आज मुंबईत सर्वत्र दिसणारे लोकांचे लोंढे, वाहनांची गर्दी, उत्तुंग इमारती, दोन-चार मजल्यांच्या झोपडय़ांची दाटी हे सर्व मी पहातो त्यावेळी मनावर अनामिक भीतीचे एक दडपण येते. अन्न, पाणी, निवारा, जळण हे सर्व या सर्वाना किती काळ पुरेल? संपेल त्यावेळी काय होईल? संस्कृतीचा तर विचारच करायला नको. १९६६ साली मला जी भीती वाटली होती ती आजही वाटते आहे.
दि. मा. प्रभुदेसाई, कुर्ला

‘वास्तुप्रतिसाद’साठी
लोकसत्ता – ईएल १३८, टी टी सी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई – ४०० ७१०. किंवा vasturang@expessindia.com

Story img Loader