शरद भाटे यांचा लेख वाचून मी पुन्हा एकदा लहान झालो आणि मन वायुवेगाने त्या भूतकाळातल्या घरात पाकोळीसारखे भिरभिरून आले आणि मला काळाच्या उदरात लुप्त झालेले त्या वेळचे काही शब्द आठवले. काही आठवणी मनात रुंजी घालून गेल्या.
प्रत्येक घरात त्या वेळी निदान एकतरी लाल ‘आलवणा’तली केसांचे ‘वपन’ केलेली आजी असायची. ती सकाळी कौलारातून झिरपणाऱ्या कोवळ्या उन्हाच्या तिरप्या कवडशांनी उजळलेल्या आणि चुलीच्या निळसर धुराने भरलेल्या स्वयंपाक खोलीत चकचकीत ‘पितळी’ कपबशीतून (गाळणी नव्हे तर) फडक्याने पिळून पिळून गाळलेला कढत कढत (‘गरम’ शब्दाला ती मजा नाही आणि तो प्रसन्न स्पर्शही नाही) गुळाचा चहा एखादे कटू कर्तव्य एकदाचे पार पडावे तशी ‘पिऊन टाकत’ असे. दिवसभर कामाच्या रामरगाडय़ाला जुंपून घेत असे. दुपारी तिच्यासाठी परंपरेने राखून ठेवलेल्या ‘अंधाऱ्या’ खोलीत उशाला लाकडी पाट घेऊन अंग आखडून घेऊन ती बिचारी उगाच जराशी ‘डुलकी’ काढत असे, त्यानंतर पुन्हा ‘रामरगाडा’ चालू होत असे.
घराच्या मागच्या पडवीमागे आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी एक ‘चुल्हाणे’ असे आणि त्यावर एक मोठे बुडाशी ठार काळे झालेले मोठे ‘तपेले’ असे आणि ‘कढत’ पाणी उपसण्यासाठी बाजूलाच हाताशी एक नारळाच्या एका मोठय़ा करवंटीपासून बनवलेले एक लांब दांडीचे एक ‘ओगराळे’ ठेवलेले असे. घरोघरी पाणी तापविण्यासाठी (‘लाकडे’ नव्हे) ‘फाटी’ आणि ‘पातेरा’ किंवा ‘पालापाचोळा’ जाळण्यात येत असे आणि त्याचा आसमंतात एक मस्त, खमंग, सुगंधी धूर दरवळत आणि रेंगाळत असे. काही सधन घरांत पाणी तापविण्याचा तांब्याचा ‘बंब’ असे. आंघोळी झाल्यानंतर आपल्याच बागेतली जास्वंदी, तगरी, सोनटक्का, अनंत किंवा अशाच उपलब्ध फुलांनी आजोबा किंवा मोठे काका घरच्या देवांची ‘यथासांग’ पूजा करीत असत. त्यानंतर ओंजळीत मिळणाऱ्या तीर्थाचा थंडावा, आनंद आणि समाधान ‘फ्रीज’च्या ‘चिल्ड’ पाण्याला नाही.
‘मागील दारी’ (परसदारी) गुरांचा गोठा असे. मागे विहिरीवर एक बलाचा ‘रहाट’ असे आणि सकाळच्या वेळी सगळ्या वाडय़ांमध्ये सुरू असलेल्या रहाटांचा वेगवेगळ्या पट्टीतला एक खर्जातला मधुर गंभीर ध्वनी गुंजत असे. विहिरीच्या शेजारी पाण्याची एक मोठी दगडी ‘डोण’ असे. माडा-पोफळीच्या खाली पाणी वाया जाऊ नये म्हणून मातीची ‘आळी’ केलेली असत आणि त्यांना आणि एकूणच ‘वाडी’ ला पाणी घालण्याच्या क्रियेला ‘िशपण’ म्हणत असत (त्या वेळी माणसे ‘परसा’कडे जात असत).
स्वयंपाकघरात निरनिराळ्या नावांची भांडी असत. उदा.- ठोक्याचे पातेले, तसराळे, पितळी, वेळणी, बोगणी, ओगराळे, गंज (खापरपोळ्या करण्यासाठी), मातीचे खापर, चीनी मातीचे ‘सट’, कालथे, सांडश्या वगरे.. लोणची, मुरंबे साठविण्यासाठी मोठमोठय़ा चीनी मातीच्या बरण्या असत आणि त्यांना फडक्यांचे ‘दादरे’ बांधलेले असत. मीठ, चिंचा, आमसुले ठेवण्यासाठी ‘रांजण’ असत. गेले ते गाव, गेले ते दिवस, गेल्या त्या वास्तू आणि ते शब्दही..
– सुभाष जोशी, ठाणे
पडसाद : गेल्या त्या वास्तू, ते शब्दही..
‘वास्तुरंग’ (२० जुलै)मधील शरद भाटे यांचा ‘जुनी घरे, जुने शब्द’ हा लेख माझ्या मनातल्या निळ्या पाखराला एक अनामिक अशी हुरहूरच नव्हे तर एक चुटपूटही लावून क्षणार्धात लहानपणीच हरवलेल्या गावी घेऊन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response to article