मनोज अणावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॐकार हा विश्वातला आद्यनाद म्हणून ओळखला जातो. कोणत्याही प्रकारचा आवाज हा नाद नसतो, तर ज्या आजावाने संगीताची निर्मिती होते, तो नाद असतो. नादाला कंपनं असतात आणि या कंपनांचा आणि त्यातून होणाऱ्या नादनिर्मितीचा तसंच एकूणच संगीताचा मनावर आणि त्यायोगे शरीरावर सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनाअंती सिद्ध झालं आहे. नाहीतर नुसत्याच गोंगाटातून निर्माण होणाऱ्या आवाजामुळे केवळ आरोग्याला घातक असलेलं ध्वनिप्रदूषण होऊ शकतं. त्यामुळेच नादावर आधारित असलेल्या शुद्ध संगीताला आणि त्यातल्या सात स्वरांना जात, धर्म, राज्य इतकंच काय, पण राष्ट्रांच्याही सीमारेषा विभागू शकत नाहीत. खरं तर कधी कधी संगीत हे या सगळ्या सीमारेषा पुसून माणसं जोडायचं काम करतं. ज्याप्रमाणे भगवंताच्या ठायी हे भेदाभेद नाहीत, त्याप्रमाणेच संगीताच्याही ठायी ते नाहीत, त्यामुळेच संगीत हे एका अर्थी परब्रह्माचंच स्वरूप आहे. म्हणूनच वेदांमधल्या ऋचांच्या गायनाशी निगडित असलेल्या सामवेदाचा उल्लेख करताना श्रीमद्भगवत् गीतेतल्या दहाव्या अध्यातल्या २२व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘वेदानां सामेदोऽस्मि’’ अर्थात, चार वेदांमधला सामवेद मी आहे.  पण असं असलं, तरीही या सदराचा जो मुख्य गाभा आहे तो म्हणजे विविध उद्योग क्षेत्रे आणि त्यांचा राष्ट्रविकासात असलेला वाटा. या सर्वाचा विचार करायचा झाल, तर असं दिसून येतं की, इतकी वर्ष भारतात संगीताला खऱ्या अर्थाने म्हणावं तसा स्वतंत्र उद्योग क्षेत्राचा दर्जा नव्हता. संगीताचं हे क्षेत्र प्रामुख्याने माध्यमं आणि मनोरंजन उद्योगक्षेत्राच्या अखत्यारीतच मानलं जायचं. आता मात्र, डिजिटल स्ट्रिमिंग अर्थात, इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्प्युटर आणि अगदी मोबाइलवरही संगीत उपलब्ध होऊ लागलं आहे. केवळ संगीतच नाही तर आवाजाच्या माध्यमाचा वापर करून ‘ऑडिओ बुक्स’ अर्थात, ऐकू येणारी पुस्तकंही आता उपलब्ध होऊ लागली आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि नोकरी-व्यवसायाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसांपाशी वेळ असतो, तो फक्त घर ते ऑफिस आणि परतीच्या प्रवासात. त्यामुळे लोकांपाशी पुस्तक हातात घेऊन वाचायला वेळ नसल्यानं अख्खी पिढीच्या पिढी चांगल्या साहित्याला मुकते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी हा ऑडिओ बुक्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याशिवाय ज्या ज्येष्ठांना उतारवयात डोळ्यांच्या तक्रारींमुळे वाचणं शक्य होत नाही त्यांना किंवा अगदी दृष्टिबाधितांनाही ऑडिओ बुक्स हे वरदान ठरतंय. तेव्हा संगीतासाठी, त्यातही शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्डिंगसाठी आपला स्टुडिओ उपलब्ध करून देण्याबरोबरच संत साहित्य, बाल साहित्य इतकंच काय, पण सावरकर साहित्यासारखं जुनं, पण कधीही कालातीत न होणारं साहित्यही आजच्या साहित्याच्या जोडीला ऑडिओ बुक्स आणि यूटय़ूबवरच्या अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ गोष्टींच्या चॅनल्सच्या माध्यमातून आबालवृद्धांपर्यंत पोहोचवणाऱ्या राजेंद्र वैशंपायन आणि मयंक परमार यांच्या स्टुडिओविषयी आणि त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाविषयी आपण आजच्या  भागात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत..

राजेंद्र वैशंपायन : संगीताची आवड मला लहानपणापासूनच होती. पण बारावीनंतर चांगले गुण असले की, इंजिनीअिरग किंवा मेडिकलला जायच्या त्या वेळी रूढ असलेल्या पद्धतीप्रमाणे मळलेल्या वाटेने इंजिनीअिरगला जायचा निर्णय घेऊन १९९४ साली मी कॉम्प्युटर इंजिनीअर झालो. मग अगदी प्रोग्रॅमरच्या पदापासून ते सिनिअर मॅनेजरच्या पदापर्यंत आयटी क्षेत्रात १४ वर्ष नोकरी केली. त्यातली नंतरची ६ वर्ष तर अमेरिकेत होतो. पण त्याआधी पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडे संवादिनी शिकलो होतो आणि पंडित जसराज, वीणाताई सहस्रबुद्धे, पंडित राजन-साजन मिश्रा यांना साथही केली होती. त्यामुळे पूर्णवेळ संगीताच्या क्षेत्रात काम करायची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्यापुढे दोन पर्याय होते. गाडी-बंगला वगैरे सुखसोयींनीयुक्त असलेलं अमेरिकेतला आयटी इंजिनीअर म्हणून मान देणारं, पण मनातून मात्र, आयुष्यात हवं ते करायला मिळालं नाही, याची खंत असलेलं आयुष्य जगायचं; नाहीतर या सगळ्या मानमरातबांचा आणि सुखसोयींचा निदान काही काळासाठी तरी त्याग करून भारतात परतायचं आणि संगीत क्षेत्राला मनाप्रमाणे पूर्णवेळ आयुष्य वाहायचं. मी याबाबत माझ्या पत्नीशी, घरच्यांशी चर्चा केली. इतर मानसन्मान आणि सुखसोयी लगेच मिळतील याची शाश्वती नव्हतीच. पण किमान दोन वेळचा वरणभात मिळेल, इतकी खात्री मी देऊ शकतो, हे मी घरच्यांना सांगितलं. माझ्या या निर्णयाला त्यांचा पाठिंबा मिळाल्यावर मी पूर्णवेळ या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला. पण पूर्णवेळ संगीतात नेमकं काय करायचं, हे मला ठरवायचं होतं. केवळ परफॉर्मर म्हणून काम करण्यापेक्षा मला क्रिएटिव्ह काहीतरी करावं अशी आवड होती. त्यामुळे मग माझ्या कॉम्प्युटर-इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्ञानाचा आणि संगीतातल्या तोपर्यंत मिळवलेल्या ज्ञानाचा असा दोन्हीचा वापर होऊ शकेल, असा पर्याय निवडायचं मी ठरवलं आणि या दोन्हीचा वापर ज्यात करता येईल, असा म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ काढायचं ठरवलं. त्यासाठी मी साउंड इंजिनीअिरगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मग २००८ साली घरातल्याच दोन खोल्यांमध्ये स्टुडिओच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून त्यांना साउंडप्रूफ करून स्टुडिओ तयार केला. त्या वेळी मला मयंक योगायोगाने भेटला..

 

मयंक परमार  :  मी त्या वेळी कांदिवलीतच आयटी इंजिनीअिरगच्या शेवटच्या वर्षांला शिकत होतो. आमचा मित्रामित्रांचा बँड ग्रुप होता. आम्हाला प्रॅक्टिससाठी स्टुडिओची गरज होती. त्यामुळे आम्ही राजेंद्र दादांच्या स्टुडिओत यायचो.

राजेंद्र वैशंपायन :  मलाही रेकॉर्डिंग करून बघण्यासाठी कोणाची तरी मदत हवीच होती. त्यामुळे मी यांच्या बँडला स्टुडिओ वापरायची परवानगी दिली. पुढल्या वर्षी या ग्रुपचं ग्रॅज्युएशन झाल्यावर इतर सगळे त्यांच्या त्यांच्या करिअरच्या वाटांनी निघून गेले. मात्र, मयंकने सुरुवातीला घरच्यांचा असलेला काहीसा विरोध पत्करूनही माझ्याबरोबरच या क्षेत्रात पूर्णवेळ वाहून घ्यायचा निर्णय घेतला आणि मग सोनिक ऑक्टेव्ह्ज् या आमच्या कंपनीच्या कामाला जोमात सुरुवात झाली. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण गायक-वादकांना या स्टुडिओत त्यांच्या गाण्याची रेकॉर्डिंग करून व्यासपीठ उपलब्ध करून देत असतानाच याच स्टुडिओत ऑडिओ बुक्सचं रेकॉर्डिंगही सुरू केलं. कागदांचा आणि छपाईचा वाढता खर्च आणि छापील पुस्तकं वाचण्यासाठी नसलेला वेळ यामुळे चांगलं साहित्य रसिकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ऑडिओ बुक्स तयार करायचं ठरवलं. यासाठी आधी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, दासबोध, गुरुचरित्र अशा संत साहित्याची ऑडिओ बुक्स तयार केलीत. याबरोबरच विवेकानंदांचं कर्मयोग, सावरकर साहित्याचीही ऑडिओ बुक्स  या आमच्या स्टडिओत रेकॉर्ड करून घेतलीत.

मयंक परमार : ही सगळी पुस्तकं मोबाइलवरही वाचता यावीत यासाठी अँड्रॉइड आणि अ‍ॅपल अशा दोन्ही फोन्ससाठी अ‍ॅप तयार केलीत तिथे आम्हाला आमच्या सॉफ्टवेअरच्या ज्ञानाचा उपयोग झाला.

राजेंद्र वैशंपायन : माझी पत्नी गायत्री हिने लहान मुलांसाठी श्लोक आणि गोष्टींच्या ऑडिओ सीडीज्ची एक नवी संकल्पना मांडली. माझा मुलगा चतन्य लहान असताना त्याला माझे वडील गोष्टी सांगायचे. त्यांच्याकडे गोष्टीही पुष्कळ होत्या आणि त्या सांगण्याची त्यांची एक वेगळी हातोटी होती. त्यामुळे या ऑडिओ गोष्टींसाठी मला माझ्या याच स्टुडिओचा पुन्हा एकदा फायदा झाला. या गोष्टी आधी ऑडिओ आणि मग अ‍ॅनिमेशनसह व्हिडीओच्या माध्यमातूनपण यूटय़ूब चॅनल्सवर आणल्या त्यांना आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खरं तर ती आमची ओळख बनली. स्टुडिओव्यतिरिक्त या सगळ्या इतर कामांसाठी जी जागा लागते, ती या स्टुडिओच्या जागेत बसणं शक्य नव्हतं. पण बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे आमच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम आणि मुलांच्या गोष्टींसाठीची अ‍ॅनिमेशन टीम या बाहेरून काम करतात. कामाचा ताण कमी व्हावा, ऑफिसमध्ये एक प्रकारचं कौटुंबिक वातावरण जपलं जावं याची आम्ही काळजी घेतो. या सगळ्यांसोबत आम्ही कधीतरी बाहेर फिरायला जातो. अवाजवी अपेक्षा किंवा कधी काम आटोपलेलं असलं तर ऑफिसची वेळ झाली नाही, म्हणून काटेकोरपणा दाखवत नाही. पण आलेलं काम ग्राहकाला सांगितलेल्या वेळेत पूर्ण करून देण्याकडे आमचा कटाक्ष असतो. कारण वेळेवर आणि चांगल्या दर्जाची सेवा देणं हेच ग्राहकांना अपेक्षित असतं.

या स्टुडिओच्या उभारणीत मला सुरुवातीच्या काळात माझ्या मित्राची मदत झाली. रेडिओसाठी स्टुडिओ उभारायचा अनुभव त्याच्यापाशी असल्यामुळे त्याने मला स्टुडिओ डिझाइिनगसाठी मार्गदर्शन केलं. जास्तीचा आवाज शोषून घेण्यासाठी फ्लोअिरगवर काप्रेट्स घालावी लागतात. प्रत्यक्ष रेकॉर्डिंग रूममध्ये भिंतीवर ६ इंच जाडीची लाकडी चौकट मारून घेतली. त्यामुळे या चौकटीचा पृष्ठभाग आणि भिंत यांच्यात तयार झालेली मोकळी जागा ग्लासवुलने भरून घेतली. त्यावर निळ्या रंगाचे प्रेसबोर्ड्स बसवले. (छायाचित्र १ पाहा) या प्रेसबोर्ड्समुळे आवाज स्टुडिओच्या जागेत सर्व ठिकाणी व्यवस्थित परावर्तित होतो. या प्रेसबोर्डवर पाइन लाकडाच्या उभ्या पट्टय़ा बसवल्या आहेत. या लाकडी पट्टय़ांमुळे जास्तीचा आवाज उत्तम पद्धतीने शोषून घेतला जातो. त्यामुळे प्रतिध्वनी टाळला जातो. जिथे थेट मफिलीसारख्या आवाजाची गरज असेल आणि बंद जागेतला रेकॉर्डेड आवाज येऊ नये असं वाटत असेल, तर त्यासाठी आवश्यक असेल तेव्हा काचांचा वापर केला जातो. यामुळे लाइव्ह मफिलीचा फील येतो. रेकॉर्डिंग रूमबरोबरच चांगल्या दर्जाच्या रेकॉर्डिंगसाठी महत्त्वाची असते, ती कॉम्प्युटर आणि साउंड सिस्टीम. यासाठीची व्यवस्था या रेकॉर्डिंग रूमबाहेर केली आहे. चांगल्या दर्जाच्या माइक्ससोबतच, आठ चॅनल्सची व्यवस्था असणारं पॅनेल, डिजिटल ऑडिओ वर्कस्टेशन, फ्रिक्वेन्सी क्रॉसओव्हर्स, सबवुफर्स या सगळ्यांच्या वापरामुळे रेकॉर्डिंगची साउंड क्वलिटी उत्तम मिळते. (छायाचित्र २)

प्रेसबोर्ड्सप्रमाणेच पडदे आणि छताच्या तळाशीही एलईडी दिव्यांसाठी निळ्या रंगाचा वापर केला आहे. कारण हा रंग मनाला शांत करणारा आहे आणि आमच्या कंपनीच्या लोगोतही निळा रंग आहे. मात्र, मुख्य प्रकाशव्यवस्थेसाठी पिवळ्या प्रकाशाचा वापर केला आहे.

सोनिक ऑक्टेव्ह्ज्च्या स्टुडिओत जाणवलेले इतर मुद्दे असे आहेत :-

पिवळ्या प्रकाशामुळे स्टुडिओत एक प्रकारचा रिच, पण वॉर्म फील येतो. प्रकाश डोळ्यांवर येऊ नये यासाठी दिवे न दिसणाऱ्या अप्रत्यक्ष प्रकाशव्यवस्थेसारख्या लॅम्पशेड्सचा वापर केल्यामुळे पिवळा प्रकाश असूनही डोळ्यांवर ताण येत नाही. प्रवेशद्वारातून आत शिरतानाच समोरच असलेल्या सिद्धिविनायकाच्या तांबडय़ा रंगातल्या मूर्तीचा फोटो आणि त्याखाली असलेली गुलाबी फुलांची मोठी फुलदाणी मनाला एक प्रकारची ऊर्जा देऊन जातात. (छायाचित्र ३) त्याशेजारीच असलेल्या शोकेसमध्ये ठेवलेल्या सोनिक ऑक्टेव्ह्ज्निर्मित अनेक सीडीज् आणि पुरस्कारार्थ मिळालेली स्मृतिचिन्हं या कंपनीच्या कार्याची साक्षच देतात. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला लागूनच असलेला संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांच्या स्मृती जपणारा छायाचित्रांचा कोलाज लक्ष वेधून घेतो. (छायाचित्र ४) त्यामागून मंदपणे फाकणारी पिवळ्या रंगातल्या एलईडी दिव्यांची प्रभा ही सरस्वतीच्या वरदानामुळे या दिग्गज कलाकारांना लाभलेलं त्याच्या चेहऱ्यावरचे तेज द्विगुणित करते.

थोडक्यात, संधीची वाट पाहण्यात अर्थ नसतो, तर बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन नवसंधींची निर्मिती करायला हवी, असा या स्टुडिओनं दिलेला अप्रत्यक्ष संदेश जर विविध क्षेत्रांमधल्या सर्वच उद्योगांनी धोरण म्हणून आत्मसात केला, तर भारतीय उद्योग क्षेत्राची आणि देशाच्या अर्थकारणाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही.

इंटिरिअर डिझाइनर

anaokarm@yahoo.co.in

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recording studio with the source of the novel concept