आईनं आमची वाडी विकासकाला दिली. आपले घर, बाग, तिच्यातील झाडे-झुडपे गेली, ही खंत माझ्या मनाला लागून राहिली होती. ‘गुलमोहर’ ने माझ्या मनातली ही खंत कायमची दूर केली.
अलिबागच्या एस.टी. स्टॅण्डजवळच ब्राह्मण आळीत वडिलांनी १९६७ साली छोटीशी वाडी घेतली होती. तिच्यात एकमजली घर होतं. १९९५च्या सुमारास माझ्या आईनं ती वाडी विकासकाला दिली. आपले घर, बाग, तिच्यातील झाडे-झुडपे गेली, ही खंत माझ्या मनाला लागून राहिली. मग कित्येक रविवार मी अलिबागला जात असे. एखादा छोटासा प्लॉट मिळतो का ते मी पाहात असे. थळ प्रकल्पानंतर तिथल्या जागांच्या किमती गगनाला भिडलेल्या.
एकदा २००५ मध्ये थोरल्या मुलाच्या गाडीने आम्ही कल्याण-मुरबाडमार्गे बदलापूरला जात होतो. माझे झाडा-पानांचे वेड लक्षात घेऊन मुरबाड परिसरातल्या जागांच्या जाहिराती पत्नीने कापून बरोबर घेतल्या होत्या.
पोटगावजवळ गाडी येताच ‘गुलमोहर’ असा भलामोठ्ठा बोर्ड दिसला आणि तिने ड्रायव्हरला त्या दिशेने गाडी न्यायला सांगितली. त्या परिसरात जवळजवळ १५०-२०० बंगले बांधले जात होते. बांधकाम चालू असल्याने कामगारांची, सुपरवायझर्सची, इंजिनीअर्सची लगबग चालू होती. एका शेडवजा ऑफिसात संबंधित बिल्डरचे लोक तिथे येणाऱ्या संभाव्य ग्राहकांशी बोलत होते. ‘बंगला विकत घ्यावा,’ असा विचार केलेले अनेकजण गाडय़ांमधून येत होते. जागा/बंगले पाहात होते; आपल्या शंका संबंधितांना विचारीत होते. उत्सवाचं, घाईगर्दीचं स्वरूप त्या वातावरणाला लाभलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही ‘१३७ गुलमोहर’ या बंगल्यासाठी सर्व चेक देऊन मोकळेही झालो. ही जागा ठाण्यापासून गाडीने सव्वा तासाच्या अंतरावर आहे.
२००७ मध्ये ४२०० चौरस फुटांच्या प्लॉटवर ८५० चौरस फुटांचा बंगला आणि त्याच्या भोवतीने ४ फुटांची दगडा-विटांची भिंत अशी वास्तू आम्हाला मिळाली. आम्ही त्यात आंबे, फणस, चिकू, काजू, पेरू, सीताफळ, रामफळ, आवळा, शेवगा आणि नारळ यांची रोपे वेगवेगळ्या नर्सरींमधून आणून लावली. सुरुवातीला बाजूच्या आदिवासींच्या शेळ्या कम्पाऊंड भिंतीवरून सहज उडय़ा टाकून आत येत आणि वाढणाऱ्या झाडांचा कोवळा पाला खात असत. त्याला प्रतिबंध करण्यासाठी कम्पाऊंड भिंतींवर ४ फुटांचे नेटिंग लावावे लागले. बंगल्यांना सोसायटीने बांधलेल्या टाकीतून दिवसातून दोनदा पाणी सोडले जाते. ते नियमितपणे झाडांना मिळावे म्हणून मी ठिबक सिंचन करून घेतले. आता आम्ही महिना- दोन महिन्यांनी जरी तिथे गेलो तरी फरक पडत नव्हता. ठिबक सिंचनामार्फत झाडांच्या मुळांशी नियमित पाणी जात होते.
दरम्यानच्या काळात पावसाळ्याच्या प्रारंभी प्रत्येक नारळाच्या झाडाच्या मुळांशी आम्ही खडय़ाचे मीठ घालू लागलो. झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी खते मुरबाडहून आणून ती घालू लागलो. त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर झाला. काही वर्षांनी आम्हाला काजू, फणस, शेवग्याच्या शेंगा मिळू लागल्या. आता आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा  चिकू,  पेरू हमखास लगडलेले दिसू लागले. मध्यंतरी ठिकठिकाणांहून आम्ही केळीच्या विविध जाती आणून लावल्या. वेगवेगळ्या जातींची, आकारांची आणि रुचीची केळी आम्ही काढली.
पावसाळ्याच्या सुरुवातीला नर्सरीतून पपयाची रोपे लावली. त्यांना ८/९ महिन्यांत भली मोठी पपई लगडायला लागली. तिथल्या एका आदिवासीच्या मदतीने दुधी, भोपळा, वांगी आणि कारली काढण्याचा प्रयत्न केला, त्यात यशही आले. हिवाळ्याच्या दिवसात तर टोमॅटोच्या बिया पेरल्या आणि माफक प्रमाणात का होईना टोमॅटोही मिळाल्याचा आनंद लाभला. एकदा अलिबागला गेलो असताना तिथून तोंडल्याच्या वेलाचा तुकडा आणला. त्याचे चार-पाच तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी लावले आणि यथावकाश तोंडलीही मिळू लागली. इतकेच नव्हे तर नवलकोल व फ्लॉवरही लावले आणि हे कमी का होईना आम्हाला मिळाले. यावर्षी तर आम्हाला चांगल्या दर्जाचे दोन मोठे हापूस आंबे मिळाले. त्यांचा गोडवा विलक्षण होता. आता माडांची उंची पुरेशी झाली आहे आणि त्यांच्या झावळ्यांमधून कोवळे तुरे बाहेर पडू लागले आहेत. काहींना पोग्या लागल्या आहेत आणि त्यांना छोटी छोटी शहाळी दिसू लागली आहेत. फळझाडांबरोबर जास्वंद, टगर, मोगरा आणि पारिजातही लावलेला असून त्यालाही फुले येतात.
घराच्या व्हरांडय़ात बसून समोरच्या झाडांच्या सावलीत वा फांद्यांमधून लहान-मोठे पक्षी बसलेले आणि आपल्यापरीने सहकाऱ्यांना साद घालताना ऐकताना मजा वाटते. काही झाडांच्या खाली साठलेल्या पाण्यात पंख पसरून स्नान करताना दिसतात. एका झाडावर चिमणीसारख्या छोटय़ा पक्ष्याने सुंदर घरटे केले होते आणि त्यात दोन अंडी असल्याचे पाहिले होते. पुढे त्यातून पिल्ले बाहेर आली आणि ती उडालीदेखील! आम्ही ते घरटे एक सुखद आठवण म्हणून जपून ठेवले आहे.
‘१३७ गुलमोहर’ फार मोठे नाही; त्यावर फक्त वाजवीइतका पैसा खर्च झाला असे नाही; त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास झाला नाही, असे नाही. पण त्यापेक्षा या साऱ्यावर मात करणारा असाधारण आनंद – निसर्गातला निर्भेळ आनंद आम्ही लुटला आणि आजही तो लुटत असतो, ते महत्त्वाचे आहे.

Story img Loader