मुंबई-ठाण्यातील पुनर्विकसित इमारतींमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना ज्या अडचणी व वाढीव खर्च अनुभवाला येत आहेत त्याची कल्पना जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास उत्सुक असलेल्या सर्व सभासदांना यावी, या उद्देशाने लिहिलेला लेख.
आमच्या सहकारी संस्थेच्या जुन्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सर्व सभासदांना जुन्या इमारतीमधील सदनिकांमधून भाडेतत्त्वावर घेतलेल्या सदनिकांमध्ये स्थलांतरित व्हावे लागले होते. चार महिन्यांपूर्वी नवीन इमारतीचे ‘ऑक्युपेशन प्रमाणपत्र’ व महानगरपालिकेच्या पाणीपुरवठय़ाची नळजोडणी होताच सर्वच सभासदांची नवीन इमारतीतल्या प्रशस्त सदनिकांमध्ये येण्याची लगबग सुरू झाली. याला विकासकाने विकास करारातील अटीप्रमाणे सभासदांना भाडे देणे बंद केले होते हे कारण होते. तसेच गुरुजींनी ‘अधिक’ महिन्यात गृहप्रवेश करणे हितावह नाही असे सांगितले, त्यामुळे ‘अधिक’ महिना सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच सभासदांनी ‘गृहप्रवेश’ केला होता. नवी सदनिका ताब्यात घेऊन त्यात राहावयास आल्यावर प्रत्येक सभासद सदनिकेत गृहसजावट, फर्निचर व अन्य बारीक-सारीक कामे करून घेण्यात व घरातील सामान योग्य जागी ठेवण्यात व्यस्त होते. सगळेच सभासद या कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात दैनंदिन जीवनाशी निगडित कोणत्या समस्या उभ्या राहणार आहेत त्याची कल्पनाच सभासदांना नव्हती.
सदनिकेत काही ना काही काम सुरू असल्यामुळे बहुतेक सभासद खानावळीतून जेवणाचे डबे मागवत होते वा हॉटेलमध्येच जेवत होते. त्यामुळे सदनिकेत कामे सुरू असताना महिना-दीड महिना कोणालाही स्वयंपाक करणाऱ्या ताईंची व घरकाम करणाऱ्या बाईंची तीव्रतेने आठवण झाली नाही. परंतु घरातील कामे संपताच व घरातच स्वयंपाक करायला सुरुवात केल्यावर त्या ताई-बाईंचा ‘शोध’ सर्वच घरांनी सुरू केला. कारण तीन वर्षांपूर्वी सदनिका सोडून गेल्यावर त्या घरांचा ताई-बाईंशी संपर्क नव्हता. ‘आजूबाजूच्या इमारतींमध्ये या ताई-बाई कामाला येत असतील’ या समजुतीने परिचितांकडे त्यांची चौकशी सुरू झाली. परंतु एखाद-दुसरा अपवाद वगळता अन्य बावीस सभासदांना जुन्या ताई-बाई मिळाल्या नाहीत. या जुन्या बावीस सभासदांना व नवीन सोळा सभासदांना ताई-बाई शोधण्याची मोठी मोहीमच राबवावी लागली. सहकारी संस्थेच्या मूळ सभासदांपैकी असलेले एक वयोवृद्ध सदस्य अण्णा कदमही अन्य सभासदांप्रमाणे घरकाम म्हणजे, धुणी-भांडी-झाडू-पोता करण्यासाठी कोणी बाई मिळते का याचा शोध घेत होते. अण्णांची पत्नी आजारपणामुळे फारसे काम करू शकत नसल्यामुळे घरकामासाठी बाईची नितांत गरज होती. अण्णांनी अशी घरकामे करणाऱ्या दोन-तीन कामवाल्या बाईंना त्याबद्दल विचारलेही होते. त्या सगळ्याच कामकरणींना तीन वर्षांपूर्वी मिळत असलेल्या पगाराच्या दुप्पट पगार हवा होता. अण्णांना पगार दुप्पट करणे शक्य नव्हते. कारण अण्णांना तीन वर्षांपूर्वी मिळत असलेल्या अकरा हजार रु. रकमेच्या पेन्शनमध्ये फक्त चार हजार रुपयांचीच वाढ झाली होती. अण्णांनी त्या सर्वाना पगारात एवढी वाढ मागण्याचे कारण विचारताच त्यांनी जुन्या जागेच्या दुप्पट जागेची साफ-सफाई करावी लागण्याच्या कारणाबरोबर महागाईत झालेल्या प्रचंड वाढीचेही कारण पुढे केले. त्या सर्व कामकरणींची पगारवाढीची मागणी व्यवहार्य असूनही अण्णांना ती मान्य करता आली नाही. या कटू सत्याला सामोरे जाऊन सध्या अण्णा जमेल तेवढय़ा जागेचा व जमेल त्या दिवशी झाडू-पोता करत आहेत. अण्णा हे काम स्वत: आणखी किती वर्षे करू शकतील व त्यानंतर हे काम कसे होणार या विचारानेच माझे मन चिंताग्रस्त झालं. ही कथा अण्णांनी स्वत:च मला सांगितल्याने कळली.
नाना हे असेच एक संस्थेचे आरंभापासून असलेले सभासद. पंधरा वर्षांपूर्वी नाना राष्ट्रीयीकृत बँकेतून निवृत्त झाले. त्यांची एकुलती एक मुलगी व जावई अमेरिकेत राहतात. घरून रेल्वेस्टेशनवर जाताना वा रेल्वे स्टेशनवरून घरी परतताना ‘बेस्ट’ बसने नाना प्रवास करतात. घरापासून दोन स्टॉप चालत गेल्यास व तिथे ‘बेस्ट’ बस पकडल्यास ‘स्टेज’ बदलल्यामुळे प्रत्येक वेळी बसचे तिकीट एक रु. कमी पडत असे. (आता दोन रु.) म्हणून नाना घरून जाता-येताना दोन स्टॉप चालत. वृद्धापकाळामुळे हे चालण्याचे श्रम व रेल्वे प्रवास नानांना करावा लागू नये म्हणून जावई बापूंनी नानांना नव्या इमारतीत ‘स्टिल्ट कार पार्किंग’ व कारही विकत घेऊन दिली. ड्रायव्हरचा वर्षभराचा पगारही नानांच्या बँक खात्यात जमा केला. नवीन सदनिकेत स्थिरस्थावर होताच नानांनी गाडी चालविण्यास ‘ड्रायव्हर’चा शोध सुरू केला. तीन-चार उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या. परंतु या सर्वच उमेदवारांची त्यांना सोसायटीच्या आवारातच (म्हणजे टेरेस वा लिफ्टरूमखालील मोकळ्या जागेत) राहण्याची परवानगी हवी होती. सोसायटी अशी परवानगी देणार नाही याची नानांना कल्पना होती. नाना या अटीमुळे ड्रायव्हर मिळवू शकले नाहीत. नानांना स्वत:ला ड्रायव्हिंग येत नसल्यामुळे नानांची कार विकत घेतल्या दिवसापासून आजपर्यंत ‘कार पार्किंग’मधून बाहेर आलेली नाही.
सोसायटीच्या जुन्या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून उमाशंकर नावाचा तरुण चोवीस तास डय़ुटी करत होता, पगार होता फक्त रु. ३०००/-. तीन वर्षांपूर्वी सोसायटीची जुनी इमारत पुनर्विकास करण्यासाठी पाडताच उमाशंकरची नोकरीही गेली. उमाशंकरला नवी नोकरी विरारला मिळाली. सोसायटीच्या सचिवांनी नवीन इमारत तयार झाल्यावर पुन्हा नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. नवीन इमारतीचा ताबा सोसायटीला देताना विकासकाने त्याचे सुरक्षारक्षक काढून घेतले. त्यामुळे सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीची सुरक्षा-रक्षक शोधण्याची लगबग सुरू झाली. जुन्या इमारतीत फक्त एकच सुरक्षा रक्षक होता. नवीन इमारतीला दोन गेटस् असल्यामुळे बारा तासांच्या दोन शिफ्टसाठी चार सुरक्षा रक्षक व अन्य कामे करण्यासाठी म्हणजे गेटवरील सुरक्षा रक्षकांना जेवण करण्यासाठी रिलीव्ह करणे, सभासदांकडे येणाऱ्या पाहुण्यांना सदनिकेपर्यंत पोहोचवणे, पाणी इमारतीवरील टाक्यांमध्ये चढविणे, सामायिक जागेतील लाइटस् चालू-बंद करणे, सोसायटी ऑफिस उघडणे-बंद करणे, कार पार्किंग करणाऱ्यांना आवश्यक मदत करणे, म्युनिसिपल बिले, लाइट बिले भरणे, बँकेमध्ये जा-ये करणे वगैरे कामांसाठी एक असे एकूण पाच सुरक्षा रक्षक नेमावेत व त्यांची तजवीज उमाशंकरलाच करण्यास सांगावे असे सर्वानुमते ठरले. सोसायटीच्या सचिवांकडे उमाशंकरचा मोबाइल क्रमांक होता. त्यांनी उमाशंकरला तातडीने बोलावून घेतले. उमाशंकरही सचिवांना त्वरित येऊन भेटला. उमाशंकरने प्रत्येक सुरक्षा रक्षकाला दरमहा सात हजार रु. पगाराची मागणी केली. मध्यंतरीच्या काळात उमाशंकरचे लग्न होऊन त्याला पुत्ररत्नही झाले होते. त्याने पत्नी-मुलासहित सोसायटीच्या आवारातच वास्तव्य करू देण्याची मागणी केली. पगाराच्या रकमेची मागणी सोसायटीला मान्य झाली. परंतु सोसायटीच्या आवारातच कुटुंबासहित राहावयास परवानगी देण्याची अट मान्य झाली नाही. परिणामी उमाशंकरने नोकरीची ‘ऑफर’ स्वीकारली नाही व अन्य चार सुरक्षा रक्षकांची व्यवस्थाही केली नाही. शेवटी सोसायटीला प्रत्येकी आठ हजार दरमहा पगाराचे चार सुरक्षा-रक्षक सिक्युरिटी एजन्सीमार्फत नेमावे लागले. वर उल्लेखलेल्या कामांपैकी काही कामे या चार सुरक्षा रक्षकांकडूनच करून घेण्यात येत आहेत.
सोसायटीच्या जुन्या इमारती एकूण चार मजल्यांच्या दोन विंग असलेल्या होत्या. प्रत्येक विंगमध्ये प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी एक, टेरेसवर एकूण चार व कंपाऊंड वॉलवर एकूण १२ अशा सामायिक जागेत एकूण सत्तावीस टय़ूब-लाइटस होत्या. नवीन इमारत व सोसायटीचे आवार प्रकाशमय व्हावे यासाठी विकासकाने खाली नमूद केल्याप्रमाणे टय़ूब-लाइट्स वा बल्ब बसविले आहेत.
० १३ मजली िवगमध्ये असलेल्या पॅसेज + जिन्यात- दिव्यांची संख्या ४२
० ७ मजली विंगमध्ये असलेल्या पॅसेज + जिन्यात- २४
० सर्व्हटस् टॉयलेटमध्ये-२
० सोसायटी ऑफिसमध्ये लाइटस् व पंखे- ६
० दोन विंगच्या टेरेसवर- ८
० इमारतीच्या कम्पाऊंड वॉलवर- ३५
० इमारतीच्या तळमजल्यावर बाहेरून व पूर्ण इमारतीभोवती- २८
० चार लिफ्टमध्ये पंखे व लाइटस्- ८
० दोन विंगच्या लिफ्ट लॉबीमध्ये- ५०
० रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या दोन सोसायटी गेटस्वर- २
एकूण- २०५.
या व्यतिरिक्त पाणी इमारतीवरील टाक्यांवर चढविण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या पंपालाही मोठय़ा प्रमाणावर वीज लागणार. तसेच लिफ्टही विजेवरच चालणार. या व्यतिरिक्त ३० कार पार्किंगमध्ये लावलेल्या टय़ूब लाइटस्चा समावेश नाही. पहिल्याच महिन्याचे समायिक वीज बिल रु. २००००/-चे येताच सोसायटीतील सगळेच सभासद- विशेषत: जुने सभासद हादरले आहेत. आता इतक्या दिव्यांची गरजच काय अशी ‘कुजबुज’ सोसायटीत सुरू झाली आहे.
सोसायटीच्या जुन्या इमारतीत सामायिक वापराच्या बांधकाम केलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ चार हजार चौरस फूट एवढेच होते. ते नवीन इमारतीत वीस हजार चौरस फुटांएवढे असावे म्हणजे रिपेअर्स फंड व सिंकिंग फंडात बहुधा जुन्या दराच्या पाच-सहा पट वाढ होईल. प्रॉपर्टी टॅक्स (टॅक्सचा दर वाढल्यामुळे व जागेचे आकारमान वाढल्याने) पूर्वीच्या पंधरापट होईल. सुरक्षा रक्षकांची संख्या व त्यांचे पगार वाढल्याने त्याही खर्चात वाढ होणार आहे. सोसायटीचे जमा-खर्चाचे हिशेब ठेवण्यासाठी पार्ट-टाइम अकाऊंटंट नेमावा लागेल. त्याच्या पगाराचा बोजाही सभासदांनाच उचलावयाचा आहे.
सोसायटीत जुनी लहान-मोठी पन्नास झाडे-वृक्ष आहेत. सोसायटीच्या आवारात आणि टेरेसवर एकूण १५० मोठय़ा कुंडय़ांमध्ये फुलझाडे लावायचे ठरवून त्या कामास सुरुवातही झाली आहे. या सर्व जुन्या-नव्या झाडांची निगा राखण्यासाठी व त्यांना खत-पाणी घालण्यासाठी माळ्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्याला रु. ३२००/- पगार ठरविण्यात आला आहे.
वर उल्लेख केलेल्या खर्चाच्या सर्वच बाबींमध्ये वाढ झाल्यामुळे मेंटेनन्स, टॅक्सेस व विविध फंडाच्या कॉन्ट्रिब्युशनसाठी प्रत्येक सदनिकाधारकाला किमान रुपये ३५००/- दरमहा द्यावे लागतील. जुन्या इमारतीतल्या सदनिकेसाठी ते फक्त
रु. ५०० होते. या व्यतिरिक्त प्रत्येक बेडरूममध्ये व हॉलमध्ये टी.व्ही. बसवावा लागला आहे. त्यासाठी ‘केबल’ची दोन वाढीव कनेक्शन्स् सेट टॉप बॉक्सेस्सहित घ्यावी लागली आहेत. यासाठीही प्रत्येक सदनिकाधारकाचे सुमारे रु. ७००००/- खर्च झाले आहेत व ‘केबल’ चार्जेस्चा मासिक खर्च रु. २५०/-वरून रु. ५०० झाला आहे. ‘एका मजल्यावर दोनच सदनिका’ अशा रचनेची इमारत असल्यामुळे प्रत्येक सदनिकेला तीन बाजूंनी एकूण सहा ड्राय बाल्कनी व फ्लॉवर बेडस् आहेत. त्या सर्व ठिकाणी असलेल्या फ्रेंच विंडोज्ना पडदे लावणे आवश्यकच होते. त्यासाठी प्रत्येक सदनिकाधारकाला एकूण २२५ फूट लांबीचे पडदे लावण्यासाठी रु. ३५०००/- एवढा खर्च आला.
वर नमूद केलेल्या अडचणी व वाढीव खर्चाच्या बाबी या प्रतिनिधिक समजावयास हव्या. अन्य सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अनेक सभासदांना या पेक्षा वेगळ्या अडचणींना व खर्चाच्या बाबींना तोंड द्यावे लागत असेल. खर्चात अमाप वाढ होण्याला मुख्यत्वे सरकारी धोरणे कारणीभूत असली तरीही या वाढीला गरजेखातर करावे लागणारे खर्च, अधिक सुखसोयी प्राप्त करण्यासाठी करावे लागणारे खर्च, सामाजिक दडपणाखाली अनिच्छेने करावे लागणारे खर्च व खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी करावे लागणारे खर्चही काही अंशी कारणीभूत आहेत. परंतु हा वाढीव खर्चाचा बोजा अल्प उत्पन्न असणारे सभासद कसा सहन करू शकतील हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न आहे.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास-विशेषत: मुंबई-ठाणे-पुणे यांसारख्या जागांची चणचण असणाऱ्या शहरांमध्ये अटळ आहे. या योजनेत अद्ययावत, नवीन मोठे घर मिळण्याच्या फायद्यासोबत वाढीव (न परवडणाऱ्या) खर्चाच्या झळाही लागणार. अशा झळा लागू नयेत यासाठी सध्याच्या (जुन्या सदनिकेतील) आकारमानाच्या जागेपेक्षा खूप जास्त आकारमानाच्या फुकट मिळणाऱ्या जागेतील ५०-५५ स्क्वे. फूट जागा कमी घेतल्यास विकासकाकडून त्या बदल्यात सहा-सात लाख रुपये मिळतील. ती रक्कम खर्च न करता पोस्ट ऑफिस अथवा बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवल्यास नियमित मिळणाऱ्या व्याजातून वाढीव खर्च भागवून या आर्थिकबोजातून सोडवणूक करता येईल. हा व्यवहारवादी विचार अमलात आणला तरच मुंबई-ठाणे-पुणे यांसारख्या शहरांमध्ये तग धरून राहता येईल. तसे न केल्यास या शहरांमधून स्थलांतर करून विरार-पालघर, टिटवाळा, बदलापूरला जावे लागण्याचा दिवस अल्प उत्पन्नधारकांसाठी फार दूर नाही.
रंग ‘नव्या’ वास्तूचे
मुंबई-ठाण्यातील पुनर्विकसित इमारतींमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना ज्या अडचणी व वाढीव खर्च अनुभवाला येत आहेत त्याची कल्पना जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास उत्सुक असलेल्या सर्व सभासदांना यावी, या उद्देशाने लिहिलेला लेख.
First published on: 02-02-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redevelopment of housing societies