आपल्या स्थावर मिळकतीचे/ सदनिकेचे हस्तांतरण व नोंदणी आपण धडधाकट व आरोग्यसंपन्न असताना होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मृत्युपत्रदेखील आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित असताना करणे गरजेचे आहे. मृत्युपत्र हे वय वष्रे ३५ ते ४० पर्यंत करणे सद्यस्थितीत उचित ठरेल. परदेशात प्रत्येक सज्ञान नागरिकाने मृत्युपत्र करणे बंधनकारक आहे. त्यांच्या मृत्युपत्राची सुरुवातच मुळी ‘हे माझे शेवटचे मृत्युपत्र’ या वाक्याने होते. याला कारण म्हणजे मृत्युपत्र हवे तेव्हा बदलता येते. आपल्याकडे मात्र ‘मृत्युपत्र’ करणे ही एक अभद्र कल्पना किंवा आपल्या मरणाची वाट पाहात आहेत, अशी पारंपरिक विचारसरणी अजूनही अस्तित्वात आहे. परंतु अशा पारंपरिक विचारांच्या किंवा भावनेच्या आहारी न जाता आपल्या पश्चात मालमत्तेच्या वाटणीवरून निर्माण होणारे वाद-विवाद व मनस्ताप टाळण्यासाठी ‘मृत्युपत्र’ करणे हा एक प्रस्थापित सुरक्षित मार्ग आहे.
बऱ्याचदा आपण याबाबत एवढी घाई कशाला, योग्य वेळ आल्यावर बघू, असे म्हणून वेळ मारून नेतो आणि मग नकळतपणे आयुष्याचा बराच काळ निघून जातो. सध्याच्या ताण-तणावाच्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे विविध गंभीर आजार, हृदयरोग, अपघात, बॉम्बस्फोट तसेच वाढत्या वयामुळे आपण कधी विकलांग व परावलंबी होऊ याचा भरवसा देता येत नाही. अशा रीतीने एकदा का वाढत्या वयोमानाबरोबर शरीर साथ देईनासे झाले आणि विकलांग होऊन आपण अंथरुणाला खिळल्यानंतर दस्तऐवज / मृत्युपत्र नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन पुढील सोपस्कार पार पाडणे शक्य होत नाही. त्यामुळे मनात इच्छा असूनही मालमत्तेच्या योग्य वाटपासाठी हस्तांतरण / मृत्युपत्र नोंदणी करणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून वरिष्ठ नागरिक, अपंग व आजारी व्यक्तींच्या सोयीसाठी त्यांनी विशेष कारण दाखविल्यावर संबंधित दुय्यम निबंधक स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन दस्तऐवज किंवा मृत्युपत्र नोंदणी करण्याची सुविधा महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्रमांक : का.४/ प्र.क्र.२६९८ (भाग-५) / १३/११८० दिनांक १२ जून २०१३ मधील अटी व तरतुदींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :–
परिपत्रक प्रस्तावना : नोंदणी अधिनियम १९०८ मधील तरतुदींच्या अनुषंगाने दस्तऐवज नोंदणीसाठी सर्वसाधारणपणे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर केले जातात.
तथापि कलम ३१ मधील तरतूद खालीलप्रमाणे आहे :–
सर्वसाधारण प्रकरणात या अधिनियमान्वये दस्तऐवजांची नोंदणी किंवा निक्षेप, नोंदणी किंवा निक्षेपित करण्यासाठी, त्याचा स्वीकार करण्याचा प्राधिकार असलेल्या अधिकाराच्या कार्यालयामध्येच केवळ करता येईल. परंतु अशा अधिकाऱ्यास विशेष कारण दाखविल्यावर नोंदणी करण्यासाठी दस्तऐवज सादर करण्याची किंवा मृत्युपत्र निक्षेपित करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या निवासस्थानी हजर राहता येईल, असा दस्तऐवज किंवा मृत्युपत्र नोंदणीकरण्यासाठी किंवा निक्षेपित करण्यासाठी स्वीकार करता येईल. या तरतुदीनुसार विशेष कारण असल्यावर, दुय्यम निबंधक दस्ताचे निष्पादन करणाऱ्या व्यक्तीच्या विनंती अर्जानुसार, दस्त निष्पाद्काच्या निवासस्थानी उपस्थित राहून दस्त नोंदणीसाठी स्वीकारू शकतात / कबुलीजबाब घेऊ शकतात. एखाद्या दस्तऐवजाची नोंदणी गृहभेटीद्वारे करण्यात यावी असा विनंती अर्ज संबंधित दुय्यम निबंधक यांच्याकडे आल्यानंतर अर्जामध्ये नमूद कारणाची योग्य ती शहानिशा करून गृहभेटीद्वारे दस्तऐवज नोंदविण्याबाबतचा निर्णय घेण्याचा स्वेच्छाधिकार दुय्यम निबंधक यांना आहे. त्याअनुषंगाने गृहभेटीद्वारे दस्तऐवजाची नोंदणी करताना दस्ताबाबत किंवा गृहभेटीच्या कार्यवाहीबाबत खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यपद्धती अनुसरणेबाबतच्या सूचना सर्व दुय्यम निबंधक यांना देण्यात येत आहेत :-
सूचना :
१) एखाद्या दस्तऐवजाच्या नोंदणीकरिता गृहभेटीच्या अर्जावर अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो चिकटविलेला असावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दुय्यम निबंधकांनी त्यामध्ये नमूद विशेष कारणांची शहानिशा करूनच गृहभेटीची विनंती मान्य करावी.
२) गृहभेटीच्या कार्यवाही दरम्यान नोंदणीविषयक कार्यवाहीचे संपूर्ण चित्रीकरण दृक्-श्राव्य (अ४्िर श््र२४ं’ ) करण्यात यावे.
३) या चित्रीकरणाची व्यवस्था गृहभेटीची विनंती करणाऱ्या पक्षकाराने स्वखर्चाने करावयाची आहे.
४) सदर चित्रीकरणामध्ये गृहभेटीचे ठिकाणाचे तसेच दस्तऐवजाचे सादरीकरण / कबुलीजबाब / ओळख पटविणे व अनुषंगिक बाबींचा अंतर्भाव असावा. विशेषत: दस्त निष्पाद्काचा कबुलीजबाब व ओळख पटविणाऱ्याचे कथन यांचे द्रुक्श्राव्य चित्रीकरण स्पष्ट असावे.
५) भवितव्यात सदर सर्व चित्रीकरणांच्या फिती (ू’्रस्र्२ ) मध्यवर्ती सव्र्हरवर जतन करण्याचा विचार आहे. सबब चित्रीकरण करताना वर क्रमांक ४ मध्ये नमूद महत्त्वपूर्ण बाबींखेरीज अनावश्यक बाबींचे चित्रीकरण होऊ नये. तसेच फितीची लांबी कमीत कमी असण्याकरिता दस्त नोंदणीसंबंधातील कार्यवाही अनावश्यक वेळ न घालविता पूर्ण करावी.
६) संबंधित पक्षकाराने चित्रीकरणाची एक चांगल्या दर्जाची ‘सीडी’ दुय्यम निबंधकांना घ्यावयाची आहे. तसेच संबंधित पक्षकाराने आवश्यकतेनुसार ‘सीडी’ तयार करून दस्तातील इतर पक्षकारांना द्यावयाच्या आहेत. दुय्यम निबंधक यांनी उक्त सीडीवर नोंदणीबाबतचा तपशील सीडी क्रमांक/ दस्तक्रमांक/ तारीख/ पक्षकाराचे नाव/ गृहभेटीचे ठिकाण इत्यादी नमूद करावा आणि उक्त सीडी सीलबंद करून अभिलेखात कायमस्वरूपी अभिलेख म्हणून जतन करून ठेवावी.
(७) गृहभेटीचे इतिवृत्त मिनीटबुकामध्ये लिहिताना, त्यामध्ये या चित्रीकरणाचाही विशेषत्वाने उल्लेख करावा. तसेच गृहभेटीच्या अर्जावरच चित्रीकरण करणाऱ्याचे नाव, पत्ता, इत्यादी तपशील नमूद करून त्याचा संक्षिप्त जबाब नोंदवून ठेवावा.
मृत्युपत्र नोंदणी आपल्या घरी
आपल्या स्थावर मिळकतीचे/ सदनिकेचे हस्तांतरण व नोंदणी आपण धडधाकट व आरोग्यसंपन्न असताना होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मृत्युपत्रदेखील आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित...
आणखी वाचा
First published on: 30-11-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Register testament at residence