अशा सूत्रग्रंथांमधे प्राचीन भारतीयांच्या आचारविचारांचे नियम ज्या ग्रंथात समाविष्ट आहेत त्यांना ‘कल्पसूत्र’ किंवा ‘कल्प’ अशी संज्ञा आहे. या कल्पसूत्रांतर्गत ‘श्रौत्रसूत्र’, ‘गृह्य़सूत्र’ व ‘धर्मसूत्र’ असे तीन भाग पडतात. यापकी श्रौत्रसूत्रात यज्ञासंबंधीचे नियम, गृह्य़सूत्रात कौटुंबिक धर्मकर्तव्यांचा विचार तर धर्मसूत्रांत गृह्य़सूत्रातील काही विषयांबरोबर समाजातील एक घटक या नात्याने व्यक्तीची कर्तव्ये सांगितली आहेत. थोडक्यात, गृह्य़सूत्रांपेक्षा धर्मसूत्रांचा विषय व्यापक आहे. या तीनही सूत्रांपकी धर्मसूत्र व श्रौत्रसूत्रांत वास्तुशास्त्राचा उल्लेख येतो. त्यातसुद्धा धर्मसूत्रात तो अगदी अल्प प्रमाणात आहे. आपण प्रथम त्याचाच विचार करू या.
धर्मसूत्र: धर्मसूत्र ही व्यक्तिगत आणि कौटुंबिक कर्तव्यांचा विचार मांडतात. धर्म म्हणजे कर्तव्य असा धर्माचा व्यापक अर्थ होत असल्याने साऱ्याच धर्मसूत्रांतून राजधर्माची चर्चा येते. त्यातील आपस्तंब धर्मसूत्रात राजप्रासाद कुठे, कसा असावा त्याचे वर्णन आहे. त्यानुसार प्रासादाची दारे दक्षिण दिशेला असावीत. प्रासादासमोर ‘आमंत्रणम्’ म्हणजे एक चौक असावा. तर दक्षिणेला दक्षिणोत्तर दार असणारी ‘पुरसभा’ असावी. त्यामुळे आत व बाहेर दोन्हीकडे काय चालले आहे ते कळेल. प्रासादासमोरील ‘आमंत्रणम् चौक’ व ‘पुरसभा’ या दोन्ही सभा मोगलकाळातील ‘दिवाण ए आम’ व ‘दिवाण ए खास दरबारा’ची अती प्राचीन िहदू संकल्पना आहे. आमंत्रणम् हे विशेष सल्लामसलतीचे ठिकाण व पुरसभा ही सर्वसामान्यांना राजाची भेट घेता यावी म्हणून केलेली व्यवस्था असावी.
आजकालच्या काळातील गेस्टरूमचा स्पष्ट उल्लेख आपस्तंबात येतो. त्यानुसार राजानी आपल्या प्रासादात सर्वाची नाही तरी विद्वान ब्राह्मणांच्या राहाण्याची व्यवस्था करणे अगत्याचे मानले आहे. त्यात त्या अतिथीच्या क्षमतेनुसार अंथरूण-पांघरूण, जेवण व पाण्याची योग्य ती व्यवस्था केलेली असावी. या ठिकाणी राजाच्या मनोरंजनासाठी एका खास व्यवस्थेचा संदर्भ येतो. राजा व मंत्री परिषदेच्या मनोरंजनासाठी द्युत क्रीडेची संमती हे धर्मशास्त्र देते. त्यासाठी पूरसभेमध्ये द्युत क्रीडेची सोय करण्यास सांगितली आहे. द्युताचा हा मंच उत्तम फाशांच्या जोडीने सज्ज असावा असे सूत्रकार सांगतात. त्याच वेळी सच्छिल व सद्वर्तनी आर्यानाच द्युत खेळण्यास संमती आहे, सर्वाना नाही अशी महत्त्वाची सूचना केली आहे. या शिवाय शस्त्रस्पर्धा, नृत्य व संगीताचे जलसे योग्य व्यक्तींच्या देखरेखीखाली घेण्यासाठी योग्य ती व्यवस्था थोडक्यात एखादे उत्तम ऑडिटोरियम उभे करण्यास सांगितले आहे.
शुल्बसूत्रे – धर्मसूत्रातील या त्रोटक उल्लेखानंतर आपण कल्पसूत्रांत येणाऱ्या श्रौतसूत्रांकडे वळणार आहोत. या श्रौतसूत्रांचाच एक भाग म्हणजे शुल्बसूत्रे होत. शुल्बसूत्रांत यज्ञाशी संबंधित वेदी, अग्निचिती, यूप अशा विविध रचना कशा कराव्यात त्याची माहिती येते. बौधायन, आपस्तंब, सत्याषाढ, वाधुल, मानव अशी विविध सूत्रं आहेत. यातील बौधायन, मानव आणि आपस्तंब ही प्रमुख आहेत. या तीघांपकी पुन्हा बौधायनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वात मोठे, सर्वात व्यवस्थित आणि सर्वात प्राचीन आहे. याचा काळ साधारणपणे इ.स. पूर्व ८०० ते ५०० मानला जातो. शुल्बसूत्रांची रचना म्हणजे प्राचीन भारतीयांची भौमितिक प्रगती आहे. शुल्बसूत्रांचा मुख्य हेतू यज्ञाशी संबंधित निरनिराळ्या धिष्ण्या, वेदी, मंडप व चिती निर्माण करणे हा आहे.
धिष्ण्या – यज्ञातील ऋत्विजांच्या होमहवनासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान चौरस किंवा वर्तुळाकृती वेदी असतात त्यांना धिष्ण्या म्हणतात. या धिष्ण्या तयार करताना विटांचा एकच थर असतो.
वेदी – वेदी व चिती मात्र विटांच्या अनेक थरांच्या बनतात. वेदी यजमानवेदी, उत्तरवेदी व महावेदी अशा तीन प्रकारच्या असतात.
यजमान वेदी – यज्ञाच्या प्रकाराप्रमाणे या वेदीचा आकार बदलत असतो. पशुबंध यज्ञातील वेदी रथाच्या मापाप्रमाणे असते. या वेदीला रथाच्या नावावरून चारक्य अशीही संज्ञा आहे. कारण चारक्य हा एक प्रकारचा रथ आहे. तर पितृमेथ यज्ञातील वेदीचे कोपरे मुख्य दिशांना असतात व ती चौरस असते.
उत्तरवेदी – उत्तरवेदी शम्यामात्री, वितृतीया, अपरिमिता, युगमात्री, दशपदा व चाळीस चौरसपद क्षेत्रफळाची अशा सहा प्रकारच्या असतात. या सर्व वेदी चौरस असतात. त्यांच्या निरनिराळ्या मापावरून त्यांची नावे व प्रकार पडलेले आहेत.
महावेदी – याही वेगवेगळ्या असतात. यातील शिखंडिनी नावाची वेदी यज्ञासाठी जेव्हा अकरा यूप म्हणजे खांब लागतात तेव्हा केली जाते. यूप हे लाकडाचे किंवा बांबूचे असतात.
अग्निचिती – विविध यज्ञांत निरनिराळ्या इच्छांप्रमाणे ज्या प्रमुख वेदीवरती हव्यकव्य केले जाते तिला अग्निचिती म्हणतात. या अनेक आकारांच्या असतात. पण त्यातील श्येनचिती, कंकचिती व अलजचिती या प्रमुख आहेत. यातील श्येनचिती ही ससाण्याच्या आकाराची असते. कंक व अलज हेही ससाण्याच्या जातीतील पक्षी आहेत. यातील चौरसाकृती श्येनचिती विटांचे पाच व मातीचे सहा थर यांनी बनलेली असते. याशिवाय स्मशानचिती, रथचक्रचिती, द्रोणचिती, कूर्मचिती, छन्दचिती इत्यादी चितींचे असंख्य प्रकार आहेत.
मंडप – विविध कार्यासाठी प्राग्वंश, उदग् वंश किंवा सदस, हविर्धान, आग्नीध्रीय, व मार्जालीय असे विविध मंडप येतात. मंडपाचे बांधकाम बांबू व कापड यांचे असते. विविध रचनांमधे उत्कर या रचनेचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो. उत्कर म्हणजे यज्ञात तयार होणारा केरकचरा टाकण्याची वर्तुळाकृती जागा. आज सार्वजनिक गणेशोत्सवासारखे उत्सव झाल्यावर त्याचे निर्माल्य टाकण्यासाठी पर्यावरणीय जागरुकतेसाठी मुद्दाम जागा केली जाते. इसवीसनापूर्वीही हा विचार भारतीय करत होते याचे संस्मरण आपण केले पाहिजे. यज्ञवेदींच्या या विविध रचनांच्या निमित्ताने फार मोठय़ा प्रमाणात वास्तुशास्त्राचे संदर्भ येतात. हे संदर्भ आपण समजून घेणार आहोत.
धर्मग्रंथातील धिष्ण्या, वेदी, मंडप, चिती अशा विविध रचना आपण या भागात पाहिल्या. धर्मग्रंथांतील पुढील भागात आपण इंजिनीयरिंग ड्रॉइंगचा प्राचीन आविष्कार बघणार आहोत. धर्मग्रंथातील धिष्ण्या, वेदी, मंडप, चिती अशा विविध रचना आपण या भागांत पाहिल्या. धर्मग्रंथांतील पुढील भागात आपण इंजिनीयरिंग ड्रॉइंगचा प्राचीन आविष्कार बघणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा