‘वास्तुरंग’ मधील (१२ एप्रिल) प्रा. उदयकुमार पाध्ये यांचा तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराबद्दलचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. पाध्ये यांनी दिलेली माहिती व आकडेवारी वाचताना माझे मन आपोआप सर जे.जे. कॉलेजमधील विद्यार्थीदशेत जाऊन पोहोचले. ‘हिस्टरी ऑफ आर्किटेक्चर’चे इंडियन व फॉरीन असे दोन वेगळे भाग केलेले होते. भावी आर्किटेक्ट्सनी आपल्या परंपरांबद्दल जागरूक राहावे म्हणून अतिशय तन्मयतेने व आत्मीयतेने शिकविणारे, तसेच कंटाळा येऊ नये म्हणून अभ्यासापलीकडील गोष्टीही रंजकपणाने सांगणारे प्रा. के. बी. गटणे आठवले.
पाध्ये यांना पडलेला एकसंध शिवलिंग किंवा २० फूट लांबीच्या अजस्र नंदीच्या प्रश्नाबद्दल मला फारसे आठवत नाही. मात्र, ८१ टन वजनाचे एकसंध शिखर हे गटणेसरांनी सांगितल्याप्रमाणे खाणीतून दगड हेरून तेथेच घडविले व कोरले, त्यानंतर तेथूनच उचलत नेलेल्या दगडमातीच्या भरीव मजबूत रॅम्पवरून (RAMP) ढकलत मंदिराच्या शिखराकडे नेले. यासाठी मोठमोठय़ा सागवानी वृक्षांचे कापलेले जाड बुंधे ओंडक्यासारखे रॅम्पवर रचून असंख्य हत्ती लावून पुढून ओढणे व मागून ढकलणे हा प्रकार करत ते शिखर कळसापर्यंत पोहोचविले. यात खूपच काळ गेला. उंची २१० फूट व लांबी साडेतीन मैल असल्याने या रॅम्पचा ग्रेडियण्ट (GRADIENT) हा ०.०११६९ इतका उथळ होता. शिखर त्याच्या जागेवर बसवल्यानंतर तेथूनच उलट येत सारा रॅम्प मोडून टाकला. फ्लेचरच्या (FLETCHER) पुस्तकामध्ये या मंदिराचे व रॅम्पचे काल्पनिक रेखाचित्र पाहिल्याचे मला आठवते. मात्र प्रत्यक्ष हे मंदिर पाहिल्यावर लक्षात आले, की मंदिराच्या कंपाउंडच्या सर्व भिंती अशा गणिताने बांधल्या आहेत की शिखराची सावली मंदिराच्या आवारात कधीही पडू नये, उरलेल्या गोपुराची सावली आवारात पडते. त्यामुळे ‘गोपुराची सावली न पडणे’ हा बुद्धिभेद आहे. या लेखाच्या निमित्ताने अनेक वर्षांनी गटणेसरांच्या असंख्य आठवणी आल्या. मी विजापूरला गेले त्याच्या आदल्या दिवशी तेथे झालेल्या वादळात बरीच पडझड झाली होती. त्यातून ‘इब्राहिम रोजा’च्या टेरेस (TERRACE) वरील कठडय़ाचा पडलेला एक मोठा कोरीव दगडी तुकडा मुंबईला आणून कॉलेजात नेऊन सरांना दिला; तेव्हा सरांना जो अवर्णनीय आनंद झाला तो मी अजून विसरू शकत नाही!
– उज्ज्वला आगासकर
बी. आर्क. (मुंबई)
वास्तुप्रतिसाद : बृहदीश्वराचे शिखर त्याच्या जागेवर असे पोहोचले!
‘वास्तुरंग’ मधील (१२ एप्रिल) प्रा. उदयकुमार पाध्ये यांचा तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराबद्दलचा अभ्यासपूर्ण लेख वाचला.
First published on: 10-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Response to article