गौरी प्रधान pradhaninteriorsllp@gmail.com

दोनेक वर्षांपूर्वी कोकणात जाऊन स्कुबा डायव्हिंग करण्याची संधी मिळाली होती. यात किनई एका बोटीत घालून समुद्रात आत खोल कुठेतरी आपल्याला नेले जाते. मग तोंडात ऑक्सिजनची नळी घालून खोल समुद्रात उडी मारायची आणि त्यानंतर आपला साथीदार आपल्याला पाण्याखालच्या दुनियेची सफर घडवून आणतो. अद्भुत असते हो ती दुनिया. वरून खळाळणारा समुद्र आत मात्र शांत, खोल आणि गंभीर भासतो. आपल्या आजूबाजूनी फिरणारे रंगीबेरंगी मासे, प्रवाळांची बेटे आपल्याला अक्षरश: थक्क करून सोडतात. आपल्या नजरेत सामावेपर्यंत एखादा सुंदरसा जीव सुळ्ळकन इकडूनतिकडे जात दिसेनासा होतो. ती नयनमनोहर दुनिया पाहताना आपण असे काही गुंग होतो की ना तळ शोधण्याची उत्सुकता राहते, ना वर परत येण्याची ओढ.

मला ही लेखमाला लिहितानाही असाच काहीसा अनुभव येत आहे. इंटिरियर डिझाइन या विषयाचा आवाकाच इतका मोठा आहे की त्याबद्दल लिहावं तितकं कमीच पडतं. अगदी रेती सिमेंट आणि दगड विटांपासून सुरू झालेला हा प्रवास तलम मऊ गाद्यागिरद्या आणि झुळझुळीत पडद्यांपर्यंत येऊन ठेपला तरी मध्ये काही गाळलेल्या जागा या राहिल्याच.

इंटिरियर डिझाइन किंवा शुद्ध मराठीत अंतर्गत सजावटीबद्दल बोलत असताना एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. इंटिरियर डिझायिनगला एक वेगळी कला शाखा म्हणून मान्यता साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मिळाली. परंतु इंटिरियर डिझायिनग मात्र त्यापूर्वीदेखील अस्तित्वात होतेच. अगदी खास अंतर्गत रचना केल्याचे उल्लेख सर्वप्रथम इजिप्तच्या संस्कृतीत सापडतात. तिथून पुढे मग ग्रीक रोमन आणि युरोपात या कलेचा प्रसार झाल्याचे लक्षात येते. आपल्याकडेदेखील भारतात सर्वप्रथम महाभारतातील मयसभेच्या निमित्ताने अंतर्गत सजावट, रचना आणि त्याचे महत्त्व अधोरेखित झालेलेच आहे. शिवाय विश्वकम्र्याला देवत्व बहाल करून वास्तुविशारद, अंतर्गत रचनाकार अशी एक खास जागा आपल्या संस्कृतीने निर्माण करून ठेवलीच आहे.

परंतु साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला याअंतर्गत रचनाकारांची गरज जरा जास्तच भासू लागली. त्यात समाजाचा वाढणारा आर्थिक स्तर आणि त्यापोटी वाढणाऱ्या गरजा हे तर एक कारण होतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे एकोणीस व विसाव्या शतकात झालेली औद्योगिक क्रांती. या क्रांतीने जगाला अनेक आधुनिक उपकरणांची ओळख करून दिली. ज्यामध्ये वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर अशा अनेक रोजच्या वापरातील घरगुती वस्तूंचा समावेश झाला. त्या पाठोपाठ आलं ते या सर्व वस्तू सहज सोप्या रीतीने हाताळता येण्यासारख्या जागा घरात बनवण्याचं आव्हान. त्यामुळेच इंटिरियर डिझायिनग हा आधुनिक काळासाठी केवळ घराचे सौंदर्य वाढवणारे शास्त्र न राहता त्याची वाटचाल सजावटीकडून रचनेकडे झाली. आजचे तर मानवी जीवनच यंत्रांनी नियंत्रित केल्यासारखे झाले आहे, त्यामुळेच तेव्हा सुरू झालेला हा प्रवास आजही अविरत सुरूच आहे.

म्हणूनच मी मघाशी उल्लेख केला तसा खोल खोल समुद्राप्रमाणेच याचाही तळ शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा, आजूबाजूचे रंगीत मासे आणि प्रवाळांची बेटे पाहत पुढचा प्रवास सुरू करूयात. इंटिरियर डिझाइन म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ते फर्निचर. माझ्या दृष्टीने तर फर्निचर हा कोणत्याही अंतर्गत सजावटीचा प्राण आहे. इथून पुढे या लेखमालेतून आपण फर्निचरविषयीच जास्तीतजास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यात फर्निचरच्या निरनिराळ्या प्रकारांविषयी बोललं जाईल, बाजारात फेरफटका मारून नवे काय काय उपलब्ध आहे त्याचा शोध घेतला जाईल. आपलं घर देखणं बनवण्यासाठी अख्खा बाजार सज्ज आहे, पण गृहपाठ मात्र आपलाच पक्का हवा.

बरेच वेळा फर्निचरविषयी लोकांच्या काही ठाम समजुती असतात. उदा. डायनिंग टेबलची लांबी-रुंदी उंची एक ठरावीक इतकीच असावी. टीव्हीच्या पॅनेलची रुंदी किती असावी किंवा अगदी कपडे ठेवण्याच्या कपाटात अमुक इतके ड्रॉवर आणि तमुक इतक्या फळ्या असल्याच पाहिजेत असं काहीसं. पण मलानं या सगळ्याच अंधश्रद्धा वाटतात. मुळातच फर्निचरला किंवा एकंदरीतच कोणत्याही डिझाइनला अशी ही लांबी-रुंदी, आकार-उकार तसेच काय मटेरियल वापरावे याची बंधने नसावीतच. माणसाला या सर्व वस्तू आरामदायकरीत्या वापरता याव्यात इतपतच त्यांना नियमात बांधलेलं बरं. म्हणूनच इथून पुढे आपण पडताळणार आहोत फर्निचरसाठी वापरता येण्याजोगी निरनिराळी मटेरियल. शोधणार आहोत फर्निचरच्या आकार उकारातलं वेगळेपण.

(इंटिरियर डिझायनर)

 

Story img Loader