vr14मी श्री स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पवित्र झालेलं रत्नागिरी जिल्ह्यातील पावस हे गाव. आज तेथील ‘श्रीमत स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिर, पावस’ ही माध्यमिक शाळेची प्रशस्त इमारत पावस एसटी स्टॅण्डच्या बाजूलाच मोठय़ा दिमाखात उभी आहे. ६० वर्षांपूर्वी विद्या मंदिर, पावस या शाळेची स्थापना झाली आणि प्रत्यक्ष शाळेचा वर्ग सुरू झाला तो मात्र नदीपलीकडल्या सामंतवाडय़ात. तो दिवस होता ८ जून १९५५. त्या काळी, म्हणजे ५०च्या दशकात तेथील परिस्थिती फारच वेगळी होती. वीज नाही, रस्ते नाहीतच; होत्या त्या फक्त पायवाटा. अर्थातच वाहनांची सोय नाहीच. त्यातच गरिबी, अंधश्रद्धा. मुलांनाच शिक्षण घेणं अशक्य होतं, तिथे मुलींच्या शिकण्याचं काय घेऊन बसलात? अशा परिस्थितीत ‘आपल्या मुलांना शाळेत पाठवा,’ असा आग्रह धरत शाळेचे संस्थापक पांडुरंग रामचंद्र सामंत तथा तात्या सामंत व त्यांचे सहकारी गावोगावी, घराघरापर्यंत जाऊन पालकांना भेटत असत. अखेर १८ मुलांचा पहिला आठवीचा वर्ग तयार झाला. विशेष म्हणजे, या पहिल्या वर्गात पाच मुली होत्या. तो काळ पाहता या मुली शाळेत याव्यात म्हणून तात्यांनी किती प्रयत्न केले असतील याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. शाळेची स्थापना झाली व तात्या सामंत आणि बंधूंनी आपल्याच वाडय़ात म्हणजेच सामंतवाडय़ा पहिला वर्ग भरवून हायस्कूलची सुरुवात केली व हायस्कूलची खरी निकड असलेल्या या भागातील भाग्यवान मुलांचं विद्यार्जनाचं स्वप्न साकार व्हायला सुरुवात झाली. या पहिल्या वर्गाबरोबरच या वाडय़ाच्या आयुष्यातही एक वेगळं अनोखं पर्व येऊ घातलं होतं. त्या वेळी वाडय़ात एक-दोन कटुंबंच वास्तव्याला होती. वाडय़ाचा बराचसा भाग रिकामाच होता, पण आता तेथे शाळा भरू लागल्यावर वाडय़ाचा नूर बदलून गेला. वाडा उत्साही दिसू लागला. हळूहळू विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडत होती. आता विद्यार्थ्यांचा सतत वावर असल्याने वाडा अगदी गजबजून जाऊ लागला. त्यातच विद्यादानाचं पवित्र कार्य तेथे सुरू झाल्याने वाडा कृतार्थ झाला होता. सामंतवाडय़ाचं हे केवढं भाग्य होतं.
पावस गावात नदीच्या पलीकडे हा वाडा उभा आहे. तंबाखूचे व्यापारी असलेल्या सामंतांच्या स्वप्नात दत्तगुरूंनी दिलेल्या दृष्टांतानुसार सामंतांनी तेथे दत्त मंदिर बांधले आणि त्यानंतर काही काळातच, म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मंदिराच्या लगत हा प्रशस्त चिरेबंदी वाडा उभा राहिला.
वाडय़ाच्या एका बाजूला तेलीवाडी, दुसऱ्या बाजूला थोडय़ा अंतरावर डॉ देवधर यांचं घर. त्याच्या थोडं पलीकडे देसाई बंधूंची घरं, अर्थातच स्वामी स्वरूपानंदांचं निवासस्थान. वाडय़ाच्या मागच्या बाजूला डोंगर उतार, तर समोर रस्त्याच्या पलीकडे, काठावरील छोटीछोटी शेतं, वाडय़ा सांभाळत वाहणारी गौतमी नदी. उन्हाळ्यात रोडावणारी गौतमी पावसाळ्यात मात्र आपलं रौद्र रूप धारण करत असे आणि त्या वेळी नदी ओलांडताना होडय़ांचा वापर करावा लागे. आता नदीवर मोठा पूल असल्याने खूपच सोय झाली आहे.
हा वाडा चिरेबंदी असून एल शेपचा आहे. वाडय़ासमोर मोठ अंगण. अंगणाला लागूनच दत्त मंदिर. वाडय़ात प्रवेश करताना तीन-चार पायऱ्या चढून गेलं की मोठी पडवी. पडवीच्या डावीकडे सामंतांपकी एक कुटुंब राहायचं. उजव्या बाजूला स्टाफ रूम व हेड मास्तरांची केबिन. अजून तीन पायऱ्या चढल्या की प्रशस्त ओटी. ओटीच्या एका बाजूला पाच-सहा खोल्या. ओटीच्या पुढे माजघर किंवा मोठा हॉल. सगळीकडे लहान-मोठे वर्ग भरत असत. माडीवरही दोन वर्ग भरत. त्या वेळी माडीची घरं अभावानेच दिसून येत, त्यामुळे या माडीवरच्या वर्गाचं आम्हाला मोठ अप्रूप असायचं. वाडय़ाच्या आतील बाजूला असलेल्या िभतीतील कपाटात अनेक चोरकप्पे आहेत. त्यांची बाहेरून कल्पनाही करता येणार नाही.
vr11वाडय़ाच्या बाजूचं दत्त मंदिर ही आम्हा शाळेतल्या मुलींची शिळोप्याची जागा होती. गप्पा मारत आम्ही तिथे डबा खायचो. देवळात, शाळेतील कार्यक्रमात होणाऱ्या नाटकांच्या तालमीतच नाचाची प्रॅक्टीस चालायची. देवळात मुलांपेक्षा आम्हा मुलींचाच वावर जास्त असायचा. १९५६मध्ये नववीचा वर्ग सुरू झालं. वाडय़ातील एका खोलीत प्रयोगशाळेची निर्मिती झाली. हळूहळू विद्यार्थी वाढले, तुकडय़ा वाढल्या व शाळेला जागा अपुरी पडू लागली. तसे शाळेच्या नव्या इमारतीचे स्वप्न विश्वस्थांच्या डोळ्यासमोर दिसू लागले. पण शाळेची स्वत:ची इमारत होईपर्यंत काही काळ जाणार होता. तोपर्यंत सामंतवाडय़ाने शाळेला सामावून घेतले व भक्कम आधार दिला. १९५५ ते १९६६ ही ११ वष्रे आमचं हायस्कूल या सामंतवाडय़ात होतं.
त्या काळी आजूबाजूच्या गावांतून फक्त चौथीपर्यंत शाळा होत्या. अगदी मोजक्या ठिकाणी सातवीपर्यंत शिक्षणाची सोय होती, पण हायस्कूल मात्र कुठेच नव्हतं. समाजातील काही धनिक व्यक्ती आपआपल्या मुलांची पुढील शिक्षणाची सोय शहरात करत असत. तसंच शिक्षणाचं महत्त्व जांच्या घरात असायचं त्या घरातील मुलं परिस्थिती नसतानाही मधुकरी मागून अथवा वार लावून शिक्षण घेत, परंतु बहुजन समाज हा जणू शिक्षण हे आपल्यासाठी नाहीच, अशा मानसिकतेत असायचा. त्यामुळे मुलं चौथीतून बाहेर पडली की शेतीत काम करू लागत अथवा मजुरी करू लागत. मुलींचं आयुष्य तर घरकामातच जायचं. अशा मुलांसाठी तात्यांची सामंतवाडय़ातली ही शाळा म्हणजे एक अप्रूप होतं. एक दृश्य स्वरूपातलं भविष्य होतं. कुठल्याही मातापित्याला आपल्या मुलाने चांगलं शिकावं ही आंतरिक इच्छा असतेच. ही इच्छा हायस्कूलच्या रूपाने, पर्यायाने सामंतवाडय़ाच्या रूपाने पूर्ण होत होती. त्यामुळे हा वाडा आता नुसता दगडाविटांचा सामंतवाडा नव्हता, तर पावस व आजूबाजूच्या गावातल्या लोकांना ते खरंखुरं विद्य्ोचे मंदिर वाटत होतं. हायस्कूल म्हणजे सामंतवाडा असं एक गमतीदार समीकरण अनेकांच्या (विशेषत: बाया-बापडय़ांच्या) मनात रुजलं होतं.
शाळेसमोरच्या लांबलचक अंगणात दरवर्षी संक्रांतीचं हळदीकुंकू थाटामाटात होत असे. तात्या सामंत यात जातीने लक्ष घालत. गावात घरोघरी, सगळ्या जातीधर्माच्या स्त्रियांना आमंत्रण असे. यानिमित्ताने गावातील बायका शाळेत येतील, हायस्कूल म्हणजे काय ते पाहतील, आपला मुलगा कुठे शिकायला येतो ते पाहतील व त्यांच्या मनातही शिक्षणाबद्दल आत्मियता निर्माण होईल, हा यामागचा हेतू असे. मुस्लीम महिलासुद्धा या हळदीकुंकू समारंभाला आलेल्या मला आठवतात. विशेषत: अशिक्षित महिलांचा यानिमित्ताने शाळेशी संबंध यावा अशी तात्यांची इच्छा असे.
ज्या काळात मुली पुढे शिकण्याचा विचारही करू शकत नसत, त्या काळात सामंतवाडय़ातील या शाळेच्या आधाराने मी व माझ्यासारख्या अनेक मुली हायस्कूलच शिक्षण घेऊ शकल्या व आपलं भविष्य घडवू शकल्या. आठवीच्या पहिल्या बॅचमधील गुलाब पाथरे शाळेचे दिवस आठवून म्हणतात, ‘‘आम्ही पाचही जणी तर सामंतांच्या घरात बसूनच डबा खायचो, ते आम्हाला अगदी घरातल्यासारखं वागवत.’’ तर हेमलता अभ्यंकर सांगतात की,  ‘‘तहान लागली की आम्ही वाडय़ामागच्या विहिरीचे पाणी रहाटाने काढून प्यायचो. एकदा पावसाळ्यात नदी पार करणे अशक्य झाल्याने शाळेतच राहिलेल्या ८-१० मुलांना सामंत काकूंनी पिठलं-भात करून वाढला होता.’’ अशा अनेक आठवणी आजही अनेकांच्या मनात घर करून आहे.
आता शाळेची स्वत:ची प्रशस्त अशी इमारत आहे, पण आम्हाला मात्र सामंतवाडा हीच आमची शाळा वाटते. आमची एसएससीची ६६ सालची, या वाडय़ातील शेवटची बॅच. त्यानंतर हे हायस्कूल नव्या इमारतीत सुरू झालं.
१९६२ ते ६६ म्हणजे आठवी ते अकरावी ही चार वष्रे मी सामंतवाडय़ातील शाळेत होते. शाळेतील अनेक आठवणी आजही मनात ताज्या आहेत. पावसच्या आसपासच्या गावांतून येणारी सगळीच मुलं तीन-चार मलांचा रस्ता तुडवत येत असत. बहुतेकांना डोंगर घाटय़ा चढून शाळेत यावं लागे. कधीकधी पावसाची संतत धार लागायची तेव्हा मात्र आम्ही आमची दप्तरं शाळेतच ठेवून घरी पळायचो. शाळेतील सगळेच शिक्षक अगदी मनापासून शिकवायचे. त्या शिकवण्यात व्यावसायिकता कधीच नसायची, त्यामुळे अभ्यासाचं अनावश्यक दडपण वगरेही नसायचं. काही सर १०वी-११वीत जास्तीचे वर्ग घेत, परंतु त्याची कधीही फी घेतलेली मला आठवत नाही. (अर्थात ती देणं शक्यच नव्हतं.) त्या काळातील आणखी एक अतिशय आनंददायी आठवण म्हणजे स्वामींचं दर्शन. वाडय़ापासून तीन-चार मिनिटांच्या अंतरावर स्वामींच निवासस्थान होतं याचा उल्लेख वरती आलेलाच आहे. मधल्या सुट्टीत आम्ही अनेक वेळा तेथे जाऊन स्वामी स्वरूपानंदांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्यांनी दिलेला खडीसाखरेचा प्रसाद खात शाळेत परत यायचो. हे भाग्य सामंतवाडय़ातील शाळेमुळेच आम्हाला लाभलेले आहे.
सामंतवाडय़ातील ही शाळा नवीन वास्तूत भरू लागल्यानंतरही अनेक वेळा आवश्यकतेनुसार या वाडय़ाचा उपयोग शाळेच्या कामासाठी होत होता.
माझ्याप्रमाणेच १९५५ ते १९६६ या कालावधीत शेकडो विद्यार्थी सामंतवाडय़ातील या शाळेत शिकून गेले त्या सर्वाच्या मनात असलेला वाडय़ाबद्दलचा आपलेपणा, ‘ही आपली शाळा’ हा मनातील भाव व कृतज्ञता आज या लिखाणातून मला मांडता आली त्याकरिता मी स्वत:ला भाग्यवान समजते. ज्या सामंतवाडय़ाने आम्हाला चार वष्रे आपल्या अंगा-खांद्यावर खेळू दिले त्या वाडय़ाबद्दल, वास्तूबद्दल अपार प्रेम व कृतज्ञता आम्हा सर्वाच्याच मनात आहे.
वर्षांनुर्वष शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी देणारा सामंतांचा हा वाडा, तेथील दत्त मंदिरासह आजही तसाच उभा आहे. गावाला गेल्यावर त्या वाडय़ाचं व मंदिरातील दत्ताचं दर्शन घेऊन आम्हाला जसं बरं वाटतं, तसंच त्या वाडय़ालाही वाटत असणार, यात काय शंका?

 

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
father Thomas d souza
वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम
youth killed in bike accident in pune
बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू
woman was cheated, lure of government job,
पुणे : शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २० लाखांची फसवणूक

– सुनंदा पटवर्धन, अपर्णा नायगावकर