संपदा वागळे

पुण्यामधील डेक्कन जिमखाना या सुखवस्तू  लोकवस्तीतील सुशीला कृष्ण मोडक स्मृती :

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती

गुरुकुल प्रतिष्ठान म्हणजे एका गुरुशिष्य जोडीतील विलक्षण भावबंधाचे स्मारक होय. गुरुवर्य श्री. कृष्ण वामन मोडक, गुरुपत्नी सुशीलाबाई यांच्या शिष्योत्तमाने म्हणजे डॉ. अशोक कामत यांनी या उभयतांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या घरकुलाचं गुरुकुलात रूपांतर करून त्यांना अनोखी मानवंदनाच दिली आहे.

मोडक गुरुजी मूळचे मालवण परिसरातील हडी या लहानशा गावचे. चरितार्थासाठी पुण्यात आल्यावर नूतन मराठी विद्यालयात अध्यापन करताना त्यांनी अनेक गुणवंत, भाषाभ्यासू  विद्यार्थी आणि उत्कृष्ट क्रीडापटू घडवले. सुशीलाबाईंनीही टंकलेखन शिकून राष्ट्रभाषा सभेत अल्पवेतनावर काम स्वीकारले. त्या वेळी टिळक रोडवरील दीड खोल्यांच्या टीचभर जागेत हे जोडपं भाडय़ाने राहात होतं.

या छोटय़शा घरात जो आला तो रमला. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आतिथ्य या गुणांनी अनेकांना या घराशी बांधून ठेवलं. मोडक पती-पत्नीला मूलबाळ झालं नाही. पण नात्यातील, ओळखीतील ज्याला कुणाला शिकायचं होतं, त्याला या घरात हक्काचा आधार मिळत राहिला. अशी असंख्य पाखरं या घरात आली आणि पंखात बळ आल्यावर आवडीनुसार कुठे कुठे स्थिरावली. पोरका अशोक (डॉ. कामत) तर ९ व्या वर्षीच या मातापित्याच्या सहवासात आला. त्यांच्या आशीर्वादाने अध्यापन, लेखन, संशोधन आणि समाजप्रबोधन यामध्ये आभाळाएवढी उंची गाठता झाला. (५४ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केल्याचं राज्यस्तरीय रेकॉर्ड डॉ. कामत यांच्या नावावर आहे)

या वाटचालीत मोडक दाम्पत्याने एकच स्वप्न उराशी बाळगलं. स्वत:ची छोटी का होईना वास्तू उभारायची! सुशीलाबाईंचं म्हणणं, ‘कितीतरी मुलंमुली आपल्याकडे वाढली. त्यांना हक्काचं माहेर, त्यांच्या मुलांना आजोळ नको का?’ ही आस पूर्ण व्हावी म्हणून सुशीलाबाईंनी कोंडय़ाचा मांडा करून पैसे साठवले. १९६१ मध्ये एका परिचितांनी डेक्कन जिमखान्याकडून पौड भागात जाणाऱ्या रस्त्यालगत- जिथे त्या वेळी कुणीही जायला तयार नव्हतं, तिथे एक छोटासा भूखंड त्यांना स्वस्तात देऊ केला. ते पैसेदेखील ताईंनी आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून हळूहळू फेडले.

पुढच्यां दोन वर्षांत या जागी सहा खोल्यांचं घर उभं राहिलं. अशोकने घराची पाटी करून आणली.. ‘सुकृत’.  सुशीला आणि कृष्ण मोडक यांचं घरकुल.. एका सत्त्वशील दाम्पत्याची पुण्याई! ही अक्षरं आजही घरावर तशीच आहेत. या सहा खोल्यांतील दोनच खोल्यांत मोडक पती-पत्नी राहिले आणि उर्वरित जागा कोणत्या ना कोणत्या सत्कार्याला देत राहिले.

मास्तर पती-पत्नींनी आपलं जे इच्छापत्र लिहिलंय ते मोठं विलक्षण आहे.. आपल्या वास्तूचा उपयोग सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यासाठी व्हावा.. तिथे सर्व जातीजमातीचे लोक यावेत. त्यांची प्रगती व्हावी. त्यांच्यामधील विनम्रता, स्नेहभाव वाढावा. त्यांची शाश्वत जीवनमूल्यांवर श्रद्धा जडावी ही त्यांची इच्छा. ईश्वरकृपेने अगदी तस्संच घडलं.

डॉ. कामतांनी निवृत्तीनंतर जानेवारी २००२ मध्ये आपल्या राहत्या घरात ‘गुरुकुल’ या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचा शुभारंभ केला. दुर्मीळ प्रकाशनांचं आणि संदर्भग्रंथांचं उत्तम प्रकारे जतन करत, दर्जेदार संदर्भ ग्रंथालय आणि अभ्यासिका सिद्ध करण्याचं पहिलं आव्हान होतं.

मोडक गुरुजींनी जेव्हा गुरुकुलाचा संकल्प ध्यानी घेतला, तेव्हा ते सहज म्हणाले, ‘अशोक, तुझ्या ध्येयपूर्तीसाठी तू आता तुझ्या खऱ्या गुरुकुलातच राहायला ये. आम्हालाही तुझी सोबत होईल.’

दीर्घ आजारानंतर सुशीलाबाई २००२ च्या ऑगस्टमध्ये गेल्या. शेवटची काही र्वष कामत पती-पत्नीने त्यांची अथक सेवा केली. त्यांच्या जाण्याने मास्तर एकाकी झाले. त्यांना सोबत देण्याच्या निमित्ताने ‘गुरुकुल’चा बाडबिस्तरा ‘सुकृत’मध्ये आला. ‘सुशीला कृष्ण मोडक स्मृती : गुरुकुल प्रतिष्ठान’ अशी ३५ फुटी पाटी ‘सुकृत’वर झळकली. ती पाहून मास्तरांचा आनंद गगनात मावेना. ते ज्याला त्याला सांगू लागले, ‘अशोकने माझे आणि सुशीलेचे नाव कायमचे मोठे केले..’

आज गुरुकुलातील सर्व खोल्या हिंदी-मराठी संत साहित्याने काठोकाठ भरल्या आहेत. जिन्याची वाटही पुस्तकांच्या कपाटांनी व्यापली आहे. (कपाटांची संख्या ७५ आणि पुस्तकांची १६०००) यातील ‘गुरुकुल’ने केलेली प्रकाशने पावणेदोनशे तर कामतांची वैयक्तिक संपदा दीडशे पुसतकांची. बाकी श्रीमंती अन्य मान्यवर लेखकांची.

उत्तम कागद, उत्कृष्ट छपाई आणि देखणं बाइंडिंग केलेलं संतसाहित्य माफक दरात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे गुरुकुलचं एक ध्येय. उदाहरणच द्यायचं झालं तर साडेसातशे पानांची नामदेव गाथा केवळ शंभर रुपयांत तर साडेचारशे पानांची ज्ञानेश्वरी फक्त चाळीस रुपयांमध्ये गुरुकुल प्रकाशनने उपलब्ध केली आहे. यासाठी निधी जमवताना डॉ. कामतांच्या सुपीक मेंदूतून नाना (सन्मार्गी) क्लृप्त्या जन्म घेत असतात. याबरोबर सत्त्वसंपन्न दानशुरांच्या मदतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या दोन लाख रुपयांच्या १५ वैशिष्टय़पूर्ण पुरस्कारांमुळे गुरुकुलच्या प्रतिष्ठेत अधिकच भर पडली आहे.

गुरुकुलातील खजिन्याचं वर्णन करताना शब्द थिटे पडतील. कोशकार, इतिहासकार, अनुवादक पं. श्रीपाद जोशी हे कामतांच्या विद्यार्थीदशेपासूनच परिचयाचे. त्यांच्या संग्रहातील अनेक मौलिक चिजा त्यांच्या डायऱ्या हे सारं गुरुकुल ग्रंथालयात जपून ठेवलं आहे. याशिवाय वि. द. घाटे, वसंत देसाई, बाबुराव जगताप.. अशा अनेक दिग्गजांचे दुर्मीळ ग्रंथ इथे पाहायला मिळतात. तसेच हस्तलिखिते, कात्रणे, जुनी दुर्मीळ नियतकालिके.. यांनी गुरुकुल समृद्ध झाले आहे. इथल्या संदर्भसाधनांचा उपयोग करणारी (केवळ पदवीसाठीच नव्हे तर समाजप्रबोधनासाठीही) मंडळी इथे सतत येत-जात असतात.

संत नामदेव अध्यासन प्रमुख म्हणून डॉ. कामतांनी महाराष्ट्रात आणि बाहेर हजारांवर संतविषयक व्याख्याने दिली. त्या संदर्भ नोंदींची पद्धतशीर कार्ड्स केली. या आधारावर व्याख्यान पुस्तिका तयार केल्या. गुरुकुलातील या ऐवजाचा अनेक वक्ते लाभ घेत आहेत.

गुरुकुलचं वैभव म्हणजे इथली विद्यासने, इथल्या संदर्भ ग्रंथालयात नियमितपणे बसून योजनापूर्वक समाजोपयोगी लेखन, संशोधन करण्यासाठी असलेल्या खास जागा म्हणजे विद्यासने. विद्वान, व्यासंगी व्यक्तींच्या नावे अढळपद प्राप्त झालेल्या या आसनांवर सध्या डॉ. कामतांबरोबर डॉ. भालचंद्र कापरेकर, डॉ. छाया यार्दी, चंद्रकांत उदावंत, प्रणव गोखले, श्री. मो. प्र. परळीकर, शुभदा वर्तक.. इ. अभ्यासक विविध शोध प्रकल्प हाती घेऊन कार्यरत आहेत.

संतसाहित्याला वाहिलेली दैनंदिनी (डायरी) हेदेखील गुरुकुलचं एक वैशिष्टय़. संतांच्या निवडक वचनांची मांडणी केलेल्या अठरा दैनंदिनी आजवर गुरुकुलातून प्रकाशित झाल्या आहेत.

गुरुकुलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर छत घातल्याने ५० खुच्र्या मावतील एवढं सभागृह तयार झालं आहे. या ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक आणि संत साहित्यविषयक उपक्रम, पुस्तक प्रकाशने, चर्चासत्र.. इ. कार्यक्रम नियमित आयोजिले जातात. या सभागृहाच्या बाजूने हिरवाई राखली आहे. तसंच मोडक गुरुजींनी लावलेल्या आंबा, जांभूळ, नारळ.. इ. झाडांनी गुरुकुलवर छत्रछाया धरली आहे.

मास्तरांनी अखेरच्या दिवसांत गुरुकुलचं स्वप्न साकार होताना पाहिलं. ते आल्यागेल्याला समाधानाने म्हणत. आमच्या मुलाने आमचं नाव कायम राहिलं असं काही केलं आहे. घरकुल ते गुरुकुल हा प्रवास पाहिल्यावर संत कबीर यांच्या वचनात थोडा बदल करून म्हणावंसं वाटतं-

गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य को सब कुछ देय।

शिष्य तो ऐसा चाहिए, गुरू को सब कुछ देय॥

या शिष्याने तर त्या पुढे जाऊन गुरुकुलच्या रूपात आपल्या गुरूंना अमर केलंय.

waglesampada@gmail.com

Story img Loader