सॅनसिव्हेरिया आणि सेंटपाऊलिया ही दोन्हीही झाडं घराला सौंदर्य प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मनाला प्रसन्नताही देतात.
घरातल्या हॉलमधली सजावट करताना एखादी थीम ठरवून सजावट केली जाते. हॉलमधल्या भिंतीचा रंग, त्याला साजेसा सोफा-सेटचा आणि पडद्याचा रंग, त्या सर्वाला मिळतेजुळते असे फर्निचर ह्य़ा सर्वाचा विचार हॉल सजवताना बहुतांशी केला जातो. हल्ली बऱ्याच फ्लॅटमध्ये खोलीची उंची कमी असते. पण घरातल्या पडद्यांवरचं, फर्निचरचं डिझाइन जर उभट ‘सिलेक्ट’ केलं, तर खोली थोडी उंच असल्याचा भास होतो. हॉलमध्ये कुंडय़ातून उभ्या पानांची झाडं लावली. तर चांगला ताळमेळ जुळून येईल. ह्य़ासाठी गवताच्या पातीपेक्षा रुंद, तलवारीसारखी उभट आणि कडक पानं असणारा ‘सॅनसिव्हेरिया’ अगदीच योग्य आहे.
‘सॅनसिव्हेरिया’ हे ‘इनडोअर प्लॅन्ट’ खिडकीच्या जवळ उजेड असेल त्या ठिकाणी चांगलं वाढतं. सतत सूर्यप्रकाशात हे झाड राहिलं तर फारसं चांगलं राहत नाही. ह्य़ा झाडाचं खोड मातीत असतं आणि फक्त पानं आणि फुलं मातीच्या वर असतात. पोपटी, हिरव्या पानांच्या कडा पिवळ्या सोनेरी असतात, आणि पानांवर काळपट आडव्या तुटक रेघा असल्यामुळे ‘सॅनसिव्हेरिया’ खूप छान दिसतो. एक कुंडीत दोनतीन झाडं लावली की कुंडी भरगच्च दिसते. ह्य़ाच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी ‘सॅनसिव्हेरिया ट्रायफॅसिकाटा’ ही जात सर्वात जास्त ‘पॉप्युलर’ आहे. ही जात ‘मदर-इन-लॉ टंग’ ह्य़ा नावाने जास्त प्रसिद्ध आहे. ह्य़ा जातीतली ‘लाऊरेनशिया’ अधिक लोकप्रिय आहे. हिच्या पानांचा पोत मार्बल सारखा दिसतो. पानं सरळसोट, उंच वाढणारी असली, तरी पानं थोडी वरच्या बाजूला वळतात, गिरकी घेतल्यासारखी दिसतात, त्यामुळे त्याचा डौल काही वेगळाच दिसतो. ही व्हरायटी ‘स्नेक प्लॅन्ट,’ ‘लकी प्लॅन्ट,’ ‘गुड लक प्लॅन्ट,’ ‘डेव्हिल्स टंग’ या नावांनीही ओळखली जाते. सॅनसिव्हेरिया ट्रायफॅसिकाटा’च्या ‘गोल्डन हाहनी’ ह्य़ा व्हरायटीच्या पानांची रचना गुलाबाच्या पाकळ्यांसारखी असते. पानं लांब, रुंद, हिरव्या रंगाची असली, तरी त्याच्या कडा सोनेरी पिवळ्या असल्यामुळे ह्य़ात वेगळेपण जाणवतं. फिकट रंगाच्या भिंतीसमोर आपल्या डोळ्याच्या कक्षेत येईल इतक्या उंचीवर ह्य़ा झाडाची कुंडी ठेवली तर जास्त विलोभनीय दिसेल. ‘सॅनसिव्हेरिया झिलॅनिका’ ह्य़ा जातीतली पानं हिरवट – करडय़ा रंगाची आणि त्यावर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात. ह्य़ाच्याही पानांची रचना गुलाबाच्या पाकळ्यांसारखी असली तरी त्यांची पानं विरळ वाढतात. सॅनसिव्हेरियाच्या सगळ्याच जाती स्वच्छ सूर्यप्रकाशात वाढतात. तशाच त्या सावलीतही वाढतात. पण सावलीत थोडी वाढ खुंटते, त्यामुळे काही दिवसांनी सॅनसिव्हेरियाची कुंडी उन्हात ठेवायला लागते. ह्य़ा झाडाला अति पाणी घातलं की त्याची मुळं कुजतात. कुंडीतल्या मातीचा वरचा थर कोरडा झाल्याशिवाय पाणी घालू नये. महिन्यातून एकदा पातळ खत खूप पाणी घालून थोडे थोडे घालावे. झाड वाढलं तरी कुंडी सारखी बदलायला लागत नाही, त्याच कुंडीमध्ये बरेच वर्ष झाड टिकतं. कुंडीतून झाड बाहेर काढून मुळं वेगळी करता येतात. पानांचा थोडा भाग मुळांबरोबरच ठेवून बाकीचा पानांचा भाग काढून त्याचे योग्य तुकडे करून ते ‘रुटिंग मिडियम’मध्ये थोडा काळ बुडवून मातीच्या मिश्रणात लावून ती कुंडी काही काळ सावलीत ठेवून त्यावर रोज थोडे पाणी शिंपावे काही दिवसांनी मुळं फुटून नवीन झाड तयार होते.
हॉलची भिंत, पडदे, फर्निचर सगळेच फिकट रंगाचे असतील, तर हॉलची शोभा वाढवायला ‘आफ्रिकन व्हायोलेट’ म्हणजेच ‘सेंटपाऊलिया’ ची फुलं आलेली कुंडी ठेवावी. जांभळा, गडद निळसर असणाऱ्या फुलांच्या अनेक जाती घरात चांगल्या वाढतात, प्रत्येक पानाच्या बेचक्यातून फुलं येतात त्यामुळे झाडाच्या मध्यभागी फुलांचा गुच्छ ठेवल्यासारखा दिसतो. प्रत्येक फुलाच्या मध्यभागी पिवळे धमक पुंकेसर हळदीचा टिळा लावल्यासारखे दिसतात. देठांचा गुलबट हिरवा रंग, पानांचा पोपटी हिरवा रंग, फुलांचा आणि पुंकेसराचा रंग यांची रंगसंगती खूप सुरेख दिसते, त्यामुळे हॉलमधल्या फिकट रंगावर आपोआपच मात केली जाते. ‘विंटर्स ड्रीम’ ही जांभळ्या रंगाची जात विशेष लोकप्रिय आहे. ह्य़ाशिवाय ‘व्हीनस,’ ‘गिगि’, ‘बॅलेट इव्हा,’ ‘ब्लू निम्बस’ ह्य़ा विविध रंग फुलं येणाऱ्या जातीही प्रसिद्ध आहेत. या झाडांना प्रखर सूर्यप्रकाश मानवत नाही, पण उजेडात मात्र ह्य़ा चांगल्या वाढतात. पाणी अगदी थोडं थोडं घालावं, जास्त पाणी घातल्यास पूर्ण झाड कुजून जातं. प्रत्येक वेळेस पाणी घालताना पातळ, द्रव खत चमचाभर घालावं. त्याचबरोबर नत्र, फॉस्फेट आणि पोटॅशही (सर्व मिळून एक-दोन चमचे) घातल्यास झाड चांगलं वाढतं, फुलं ही तजेलदार, टवटवीत दिसतात. ‘सेंटपाऊलिया’ ची मुळं फार खोलवर जात नाहीत म्हणून हे झाड लावताना कुंडी थोडी उथळ असली तरी त्यात झाडं चांगलं वाढतं.
ही कुंडी दुसऱ्या शोभेच्या कुंडीत ठेवली तर झाडाचं सौंदर्य जास्त खुलून दिसतं! नवीन झाड तयार करताना, झाडाच्या मध्यभागाजवळची पानं खुडून घ्यावीत, नंतर धारदार चाकूने देठाच्या टोकाकडचा भाग कापल्यानंतर राहिलेले पान दुसऱ्या कुंडीत लावावं, ह्य़ा कुंडीत स्फॅगनम् पिट् मॉस, परलाईट, व्हर्मीक्युलाईट आणि डोलोमाईट यांचं मिश्रण घातल्यास ७-१० आठवडय़ांनी नवीन फूट येते. हे मिश्रण ओलं करून घेतल्यास तीन-चार दिवसांनी अगदी थोडं पाणी शिंपावं म्हणजे मुळं लवकर येतात. ‘सॅनसिव्हेरिया’ आणि ‘सेंटपाऊलिया’ घरात तयार होणारे विषारी वायू शोषून तर घेतातच, पण घराला वेगळाच ‘लुक’ देतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा