संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची राहण्याची सोय केली.  समाजप्रबोधनाबरोबरच त्यांची नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक ‘वास्तुनिर्मितीकार’ म्हणून नवी ओळख करून देणारा लेख-
म हाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले. संत गाडगेबाबा हे त्यापकी एक. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत- ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन  ‘स्वच्छते’चा  महामंत्र संपूर्ण देशाला दिला. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना अस्वछता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे प्रथम झाडू मागवून घेत आणि गाडगेबाबा व त्यांचे अनुयायी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करीत. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य-शासनाला घ्यावी लागली.  त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’  राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे. आपल्या संपूर्ण जीवनात तत्कालीन धर्ममरतडांकडून हेटाळणी व अपमान सहन केले. भोवतालच्या समाजासाठी आध्यात्मिक कीर्तनातून ज्ञानगंगा गावोगावी पोहोचविणारे संत गाडगेबाबा ही एक बाजू आत्तापर्यंत आपल्या सर्वाना माहीत आहे. परंतु नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक  ‘वास्तुनिर्मितीकार संत गाडगेबाबा’ यांची ही अज्ञात बाजू जाणून घेऊ.
हल्लीच्या युगात, गावोगावी व शहरातून ठिकठिकाणी, विशेषकरून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. परंतु गाडगेबाबांनी तसे न करता राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते.
 त्या काळात अनेक शहरांतून / गावांतून राहण्यासाठी लॉज / हॉटेल्सची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे कामानिमित्त किंवा तीर्थयात्रेच्या निमित्त बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य जनतेची गरसोय होत असे. नेमकी हीच अडचण आणि भविष्यातील जाणीव याचे भान गाडगेबाबांना होते आणि म्हणूनच गोरगरीब व सामान्य जनतेसाठी त्यांनी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर, आळंदी, देहू, त्रंबकेश्वर व महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी अंदाजे १५ धर्मशाळा व त्याच्या दुप्पट आश्रमशाळा बांधल्या. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळा / आश्रमशाळा बांधल्या त्यामागची संपूर्ण संकल्पना, जागेची निवड व बांधकामाचे संपूर्ण नियोजन त्यांचे स्वत:चेच होते. स्वत: निरक्षर असून तसेच बांधकाम क्षेत्राशी कुठल्याही प्रकारचा संबंध व पाश्र्वभूमी नसूनदेखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली बांधल्या गेलेल्या सर्वच्या सर्व धर्मशाळा / आश्रमशाळा वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून आजही पाहिले जाते.
जागेची निवड करण्यापासून ते सर्व इमारतींचे संपूर्ण बांधकाम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. संपूर्ण बांधकाम आखीव-रेखीव व दगडाचा जास्तीतजास्त वापर करण्यात आला आहे. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर ते एखाद्या कुशल स्थापत्यविशारदाप्रमाणे संबंधित बांधकाम कंत्राटदारास / मजुरास अगदी बारीकसरिक सूचना देत असत. म्हणूनच धर्मशाळा / आश्रमशाळेच्या प्रत्येक खोलीमध्ये भरपूर प्रकाश व खेळती हवा सतत राहील याची काळजी घेण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी विहीर बांधलेली आहे. आध्यात्मिक वातावरणनिर्मितीचा एक भाग म्हणून प्रत्येक ठिकाणी तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या जोडीला बागबगीचे व मुलांना खेळण्यासाठी पटांगणही आहे. त्यांच्या गळ्यात एक बारीक उभट पिशवी असे. त्या पिशवीत एक वही सदैव बरोबर  बाळगीत. गाडगेबाबा स्वत: निरक्षर होते, पण एखाद्या चांगल्या अक्षर असलेल्या भक्ताकडून बांधकामाबाबतचा संपूर्ण तपशील त्या वहीत व्यवस्थित लिहून घेत. उदाहरणार्थ, चुन्याचा, सिमेंटचा व ऑइलपेंटचा भाव, धर्मशाळांच्या दारांची व खिडक्यांची मोजमापे तसेच बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांची मोजमापे इत्यादी.    
विश्वासराव सकपाळ

Story img Loader