आजकाल गावकडच्या मामाच्या घराचा अनुभव घेणं हे दुरापास्तच झालंय! गावाकडची घरं शिल्लक असलीच तर बऱ्याचदा ती कुलपातच असतात. वर्षां-दोन वर्षांनी गावाला जाऊन माणसं घर स्वच्छ करून थोडे दिवस राहून येतात किंवा कोणी तरी गडीमाणसं घराची देखभाल करतात. म्हणूनच मामाच्या घराचा खराखुरा अनुभव, आनंद, आस्वाद घेण्यासाठी ‘मामाचं गाव’ ही अभिनव संकल्पना कार्यवाहीत आणून मुलांचं अनुभवविश्व, भावविश्व समृद्ध करण्याचा स्तुत्य प्रयत्न काही व्यक्ती, संस्था करीत असताना दिसतात. अर्थात, दुधाची तहान ताकावर भागवली जाते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
पण या बाबतीत मी तरी नशीबवान आहे. आज मी जवळजवळ साठीला पोहोचले आहे. पण माझ्या मामाचं घर आजही त्यातील प्रेमळ माणसांना नांदवीत स्वत:चं अस्तित्व मोठय़ा दिमाखाने टिकवून आहे.
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी येथे सालईवाडय़ात एकशे पंचवीस वर्षांचा इतिहास असलेले माझ्या मामाचे म्हणजे आजगावकरांचे घर नवा इतिहास घडवीत मोठय़ा थाटात उभे आहे.
आजगावकरांची चौथी-पाचवी पिढी आज तिथे सुखाने नांदते आहे. हे घर आणि त्यात राहणारी माणसं म्हणजे माझे मामा, मामी, मावशी व मामेभाऊ ही मंडळी सदैव हसतमुखाने व आग्रहाने तुमचे स्वागत करायला तत्पर असतात.
या घरांचं वैशिष्टय़ म्हणजे हे एका छोटय़ा टेकडीवर बांधलेले आहे. रस्त्यापासून जवळजवळ तीस-चाळीस फूट उंचीवर असणाऱ्या या घरापर्यंत पोहोचायला रस्त्यापासूनच पायऱ्या बांधलेल्या आहेत. मात्र पाच-सहा पायऱ्यांनंतर थोडी सपाट जागा व पुन्हा पायऱ्या अशी रचना असल्याने चढणाऱ्याला मजेत चढता येते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना विविध प्रकारची रंगीबेरंगी व सुगंधी फुलझाडे लावलेली आहेत. वाऱ्याची मंद झुळूक आली की, विविध फुलांच्या सुगंधाने मन अतिशय उल्हसित होते.
घराभोवतालच्या जागेत नारळ, फणस, आंबे व इतर फळझाडे लावलेली आहेत. यात सोनचाफ्याचेही एक मोठे झाड आहे. सदा पिवळ्याधम्मक फुलांनी डवरलेला, मोहक सुगंधाच्या मुखाने बोलणारा चाफा. फुलांचा राजाच जणू! या मोठय़ा झाडांच्या गर्द सावलीत बसून, आंबे, फणसाचे गरे, जांभळे खाता खाता गप्पा मारणे यासारखा दुसरा आनंद नाही.
या वृक्षवल्लींच्या सहवासातून पुढे चालत असताना घराच्या अंगणात पाऊल केव्हा पडते हे समजतच नाही. अंगणाच्या कडेलाही खूप फुलझाडे लावलेली आहेत. पण लक्ष वेधून घेते ते सुरेख असे तुळशीवृंदावन. या वृंदावनातील मंजिऱ्यांनी डवरलेली तुळस, एक विशिष्ट सुवास तर देतेच, पण हवा शुद्ध करणारी ही तुळस माणसांची मनेही शुद्ध व प्रसन्न राखते. सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावून मनोभावे तिला नमस्कार करणाऱ्या माझ्या आजीची ती सात्त्विक मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर आजही तितक्याच उत्कटतेने उभी राहते.
आजही माझी मामी, मावशी, मनोभावे तुळशीची पूजा करतात. तुळशीच्या लग्नादिवशी तर धमालच असते. मोठय़ा थाटात व भक्तिभावाने तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीला वधूसारखे सजविले जाते. तुळशीकडे पाहत असतानाच दृष्टी जाते ती ‘मामाच्या घराकडे.’
हे घर पूर्णपणे चिऱ्यांच्या दगडांनी बांधलेले आहे. जमिनीच्या वर दिसणारा त्याच्या पायाचा भाग जवळजवळ तीन फूट उंच आहे. घरातील दारे, खिडक्या, चौकटी, जिना, ओटीचा कठडा, फडताळे इत्यादी सर्व ठिकाणी सागवान लाकडाचा उपयोग केलला असल्याने इतक्या वर्षांनंतरही लाकूड जसेच्या तसे आहे. म्हणूनच हे घर ऊन, पाऊस, थंडी व इतर नैसर्गिक आपत्ती यांना यशस्वीपणे तोंड देत खंबीरपणे उभे आहे. घराची माडी तर संपूर्णपणे लाकडाने बांधलेली आहे. जमीन, भिंती व जिनाही लाकडाचाच आहे. हिवाळ्यात व पावसाळ्यातही तिथे खूप उबदार वाटते. माडीच्या जिन्याच्या पायऱ्या आजपर्यंत उत्तमपणे टिकून आहेत. त्यांना एकही तडा पडलेला नाही.
अंगणातून ओटीवर गेल्यावर लक्ष जाते ते एका मोठय़ा तुकतुकीत सागवानी लाकडाच्या बाकावर. हा बाक अखंड लाकडापासून केलेला आहे. त्याला कुठेही सांधा नाही, आला गेला तर या बाकावर विसावतोच. पण बाहेर गेललं घरातलं माणूसही तेथे पाच मिनिटे विसावल्याशिवाय आत जातच नाही. या ओटीवर तीन दारे आहेत. एक उघडते माजघरात, दुसरे देवघरात व तिसरे पाहुण्यांच्या खोलीत. अगदी परका पाहुणाही या खोलीत निवांतपणे राहू शकतो.
देवघराची खोली अत्यंत शांत, पवित्र आहे. वर्षांचे सर्व सणवार येथे साजरे होतात. दरसाल पाच दिवस गणपती आणला जातो. त्या वेळी पूजाअर्चा, आरत्या, भजने, प्रसाद, भोजन यांची लयलूटच असते. दररोज वेगवेगळी भजनीमंडळे भजनांसाठी येतात. माझी ८३ वर्षांची मावशी उत्तम गायिका असून, अजूनही उत्तमरीतीने गाणी व भजने म्हणते.
घरात माजघर, स्वयंपाकघर, देवघर, इतर चार खोल्या, माडी इत्यादी मिळून एकूण दहा खोल्या आहेत. स्वयंपाकघरात मामीने अलीकडे उंच ओटा व थोडय़ा आधुनिक सोयी करून घेतल्या आहेत. पण जुन्या पारंपरिक वस्तूही तेवढय़ाच जपून ठेवल्या आहेत. पाटा, वरवंटा, जाते, मुसळ, सुपे इत्यादी वस्तूंचा वापर मामी करत असते. नव्या-जुन्याचा सुंदर मिलाफ मामाच्या घरात झालेला दिसून येतो.
घरात माणसांइतकीच मांजरेही राहतात. मासे हा आमच्या घरातील आवडता पदार्थ. मासे आणले की मांजरांची गंमत पाहण्यासारखी असते. घरातल्या माशांवरच ती पोसली जातात. मासे साफ करणाऱ्याच्या आजूबाजूला उडय़ा मारत म्यँव म्यँव करीत असतात. अर्थातच माशांतील टाकाऊ पदार्थही ती सफाचट करीत असतात. काही वेळा बाजारातून त्यांच्यासाठी स्वतंत्र मासेही आणले जातात. माणसांबरोबर मांजरांच्या पिढय़ाही तेथे आनंदाने नांदतात व कृतज्ञतेने उंदरांपासून संरक्षणही करतात.
मामाच्या घराची माडी ही माझी सर्वात आवडती खोली. माडी खूप उंचावर असल्यामुळे खूप उजेडाची व हवेशीर आहे. माडीवरून आसपासचा सुंदर देखावा दिसतो. आजूबाजूचे डोंगर, झाडी व डोंगरातून उगवणारा सूर्य या देखाव्याचे अवलोकन करणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव असतो. त्यासाठीच बरेचदा लवकर उठणे होते. एरवी पांघरुणात गुरफटून पडलेल्या आम्हाला उठवणे हे मोठय़ा मुश्किलीचेच काम असते.
घराची ओढ लागण्यासाठी घराइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक घरातली माणसेच कारणीभूत असतात. घराला चैतन्य व सौंदर्य देण्याचे काम तर घरातील माणसेच करतात. माझे मामा, मामी, मावशी व भाऊ सर्वच जण घरातील चैतन्य व आपुलकी टिकविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आल्यागेल्याचे मनापासून उत्तम स्वागत करतात. त्यांच्या प्रेमामुळे घराच्या मूळ देखणेपणात भरच पडते. यांच्या रूपानेच जणू हे घर तुम्हाला सारखे सारखे ‘या, या’ करून खुणावीत असते. म्हणूनच तेथे परत परत जावेसे वाटते.
घरात जाताना डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन जाणारी मी येताना ते घर व माणसे यांना डोळे भरून
पाहताना, डोळ्यांतील विरहाश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत मामा-मामीला परत येण्याचे आश्वासन देत बाय् बाय् करते.
डॉ. अपर्णा नाडकर्णी – shakun.nadkarni@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawantwadi salivada ajgaonkar house
Show comments