मुलांच्या सामाजिक जीवनातला पहिला टप्पा म्हणजे शाळा. शाळेतल्या शिक्षकाबरोबरच महत्त्वाची ठरते ती शाळेची वास्तू, तिची मुलांना आपलीशी वाटणारी रचना. पाच सप्टेंबर या शिक्षकदिनानिमित्त मुलांच्या सामाजिक, बौद्धिक आणि मानसिक जडणघडणीत शाळेची वास्तूरचना किती मोलाची भर घालू शकते, हे नमूद करणाऱ्या संकल्पनेविषयी…
लहानपणी शाळेकडे वळणाऱ्या इवल्याशा पावलांना शाळेबद्दल एक प्रकारचं कुतूहल असतं. तोवर घरापर्यंतच मर्यादित असलेला मुलाचा सामाजिक अवकाश विस्तारण्यातील शाळा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. अशी ही मुलं आई-बाबांचं बोट पकडून शाळेत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या मनात किती खळबळ होत असेल! अशा वेळेस शाळेचा एकूणच माहोल त्या लहानग्याच्या अंगावर चाल करून येण्यापेक्षा शाळेचे हे वातावरण त्याला जीव लावणारे करता येऊ शकेल का, याचे उत्तर ‘बिल्डिंग अॅज लर्निग एड- बाला’ यांच्या समृद्ध शाळेची जडणघडण कशी असावी, यासंबंधीच्या अभिनव संकल्पनांतून मिळते.
‘बाला’ची शाळेसंबंधीच्या संकल्पना मनोविकास प्रकाशनने अलीकडेच प्रकाशित केलेल्या कबीर वाजपेयी लिखित ‘एका समृद्ध शाळेचा प्रवास’ या पुस्तकात वाचायला मिळाल्या. पूर्वीच्या मानाने आज पूर्वप्राथमिक शाळांची रचना ही आवर्जून मुलांचं मन रमेल अशी केलेली असते. मात्र, प्राथमिक शाळांची रचना करताना पुन्हा मुलांसाठी म्हणून काही विशेष विचार केलेला दिसतोच, असे नाही. ‘बाला’ने नेमक्या या वयोगटासाठी शाळेची आखणी करताना कुठल्या गोष्टींचे भान ठेवायला हवे, यासंबंधीचे मार्गदर्शन केले आहे. त्यातून खरोखरीच एका समृद्ध शाळेचा प्रवास कसा असतो, हे आपल्याला वाचायला मिळते.
शाळेची इमारत या वास्तूचा शैक्षणिक साधन म्हणून कसा उपयोग होऊ शकतो, याविषयीच्या अत्यंत सृजनशील कल्पना यात मांडल्या आहेत. इमारतीच्या वास्तव स्वरूपात बदल न करता या वास्तूत वातावरणनिर्मिती करण्यासाठी कुठली साधने वापरता येतील, यासंबंधीच्या अफलातून कल्पना या पुस्तकात वाचायला मिळतात.
या सर्व संकल्पनांच्या मुळाशी हा विचार पक्का आहे की, शैक्षणिक साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर काही अनुभवांचा दीर्घकाल ठसा उमटतो तसेच हसत-खेळत शिक्षणासाठीही पोषक वातावरणनिर्मिती आवश्यक असते. हे सारे मुद्दे लक्षात घेत वेगवेगळ्या इयत्तांसाठी विविध संकल्पनांचा समावेश इमारत या वास्तूत कसा करता येईल, याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन या पुस्तकात अधोरेखित केलेला दिसून येतो. यात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे तो शाळेच्या परिसराविषयी मुलांच्या अपेक्षा काय असतात याचा. शाळेच्या परिसरात मुलांचा स्वाभाविक वावर कसा राहील, यावर शाळेच्या इमारतीचा आराखडा बनवताना प्राधान्याने विचार करणे अत्यावश्यक आहे.
मुलांचा शारीरिक, सामाजिक, भावनिक, बौद्धिक विकासासाठी शाळेचा परिसर कसा उपयोगात आणता येईल, यासंबंधीचा सविस्तर विचार ‘बाला’ने मांडला आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शैक्षणिक परिसराची रचना करण्यासंबंधीच्या अत्यावश्यक मुद्दय़ांवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शाळेच्या वास्तूत विविध विषयांसाठी शैक्षणिक साधनांचा अंतर्भाव कसा करण्यात येईल, हेही विषयवार स्पष्ट करण्यात आले आहे. यात गणित, शास्त्र, नकाशे वाचणे, समजणे, भाषा, कलात्मकतेला वाव, पाणी वाचवा, निसर्गाकडून शिक्षण, पर्यावरण आणि ऊर्जेचे शिक्षण, निव्वळ मजेसाठीचे खेळ, मुलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक पाश्र्वभूमीचा विचार करणे, यासंबंधातील या संकल्पना आहेत.
शाळेच्या परिसरात या विविध संकल्पना कशा राबविता येतील, याचाही आराखडा बालाने मांडला आहे. त्यात शाळेतील अंतर्गत जागा व बंदिस्त जागा, वेगवेगळ्या प्रयोगांसाठी आणि शोधांसाठी येण्या-जाण्याचा व्हरांडा, ऊर्जा निर्मिती आणि वापरासाठी स्वयंपाकघर तसेच शाळेच्या आवारातील अॅम्फी थिएटर, माती तसेच वाळूत खेळण्यासाठी जागा, नैसर्गिक वातावरण असलेला बाह्य परिसर, मैदानातील खेळणी यासंबंधीच्या रचनेचाही विचार यात करण्यात आला आहे.
या कल्पनांची निर्मिती आणि विकास यामध्ये शाळेच्या परिसरातील
मुलांचे स्वाभाविक वर्तन कसे राहील, मुलांच्या विकासाच्या टप्प्यातील विशेष गरजा तसेच त्यांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल, शिक्षकांना भेडसावणाऱ्या शिकवण्यातील समस्या, शाळेच्या वास्तूतील घटकांच्या
दुरुस्त्या, वातावरणनिर्मिती, बांधकामाचे प्रश्न, मुलांच्या घरातील, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक परिस्थिती यांसंबंधीच्या सखोल जाणिवा दिसून येतात.
जर शाळा या वास्तूमध्ये अभिनव डिझाइन संकल्पनांचा समावेश करण्यात आला तर या शैक्षणिक साधनांमुळे अनुभवांतून शिक्षण मिळण्याची आगळीवेगळी क्षमता असते. गणितातील अंकांची मोजणी, कोनांची मोजणी, अंतर मोजणे, अपूर्णाक, इ. गोष्टींचे सहज आकलन होणे शक्य होईल. शाळेत त्रिमिती स्वरूपातील नकाशे पाहून मुलांना नकाशातील प्रमाणबद्ध अंतरे, महत्त्वाची ठिकाणे आणि त्यांचे भौगोलिक ज्ञान ठळकपणे होईल. मोजमापाच्या संदर्भातील प्रत्यक्षातील अंतर, लांबी, रुंदी, उंची मोजणे, आकारमान,
‘बाला’ने विद्यार्थीकेंद्रित संकल्पनांमध्ये लिहिण्या-वाचण्यासाठी अनेक पृष्ठभाग, वेगवेगळ्या जागा व त्यांचे नामांकन असलेल्या पाटय़ा लावण्यास सुचवले आहे. भाषा समृद्धीसाठी चित्रं, पुस्तकवाचन कोपरे, भिंतीवर लिहिलेले शब्द, मुलांना वापरण्यासाठी तक्ते, चौकडय़ा आणि शब्दरंजनासाठी ठिपक्यांचे बोर्ड सुचवले आहेत. नामांकन फलक, नकाशा, दिशादर्शक माहिती असेल तिथे ठराविक प्रकारची लिपी व रंग यात सातत्य राखणे गरजेचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
शाळेच्या इमारतीची रूपरेषा ठरविताना इमारतींसाठी नैसर्गिक सावली मिळवता येईल का इथपासून टायरपासून झोके बनवणे, पंख्याचे रंगचक्र बनवणे, लपंडावासाठी जागा अशा विविध गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात मुलांचे वागणे स्वाभाविक कसे होईल, याचा बारीक विचार या विविध संकल्पनांमध्ये केलेला दिसून येतो.
मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच बाहेरच्या रचनेमुळे शारीरिक विकासाला कशी मदत होईल, एकत्रित बसण्याच्या जागेमुळे मुलांचा सामाजिक आणि भावनिक विकास कसा होईल, बौद्धिक वाढीसाठी मुलांच्या उंचीच्या हिशोबाने तक्ते लावणे कसे महत्त्वाचे ठरते, या बाबींचा ऊहापोह करण्यात आला आहे.
‘बाला’च्या या संकल्पनांमधील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब अशी की, यात विशेष गरजा असणाऱ्या मुलांचाही हा शैक्षणिक परिसर आखताना विचार करण्यात आला आहे. यात पायऱ्यांऐवजी चढणीचा रस्ता, नामांकने आणि चिन्हांचे फलक अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.
विषयवार विचार केल्यास गणितासाठी दरवाजातील कोनमापक, अपूर्णाकासाठी साधने, जमिनीवरील ग्रहांच्या भ्रमण कक्षा, घडय़ाळासह वर्गातील दिनदर्शिका, बनवलेले नकाशांचे वाचन, भाषा समृद्धीसाठी शब्दभिंती, खुणांचा माग काढणे, कलात्मकतेच्या जोपासनेसाठी भिंतीचा मुक्त वापर, ठिपक्यांचे फळे अशा विविध गोष्टींचा समावेश करण्यास सुचवले आहे.
‘बाला’तर्फे शाळांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास आणि त्यानुसार नियोजन कसे करण्यात येते, हे या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे. बाला टीमकडे सुमारे दीडशे डिझाइन आयडिया तयार आहेत. भिंती, फरशी, दारे-खिडक्या, खेळाचे मैदान आदी घटकांचे रूपांतर डिझाइन आयडियाच्या समावेशाने शैक्षणिक साधनांमध्ये करणे, स्वयंअध्ययनाला मुलांना प्रवृत्त करून अंतर्गत आणि बाह्य परिसरात बदल घडवणे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.
खरे तर मुलांच्या जिज्ञासेला आणि कल्पनाशक्तीला वाव देणे आणि समभावाने जगणे शिकविण्यात शाळेच्या परिसराचा मोठा वाटा असतो. मात्र शाळेच्या बांधकामाच्या वेळेस या सर्वाचा तितकासा विचार केला जात नाही आणि नेमक्या याच बाबतीत ‘बाला’ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाच्या शाळेसंदर्भातील गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन शाळेची इमारत आणि परिसर यासंदर्भात विविध संकल्पना ‘बाला’ने सुचविल्या आहेत.
या पुस्तकाचे लेखक कबीर वाजपेयी हे वास्तुविशारद आहेत. शिक्षणपद्धतीत नव्या संकल्पना साकारून शाळेचा परिसर आनंददायी बनवणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यांच्या या पुस्तकाद्वारे त्यांचे हे अभिनव विचार अधिक ताकदीने आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.
१९९६-९८ दरम्यान राजस्थानमधील लोक जंबीश या शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान खेडोपाडय़ातील ६० शाळांमध्ये काम करताना शाळांच्या इमारती आणि त्यातील घटकांमध्ये शैक्षणिक साधनांचा अंतर्भाव कसा करता येईल ही कल्पना कबीर वाजपेयी यांना सुचली. त्यातून अनेक संकल्पना तयार झाल्या. यावर आधारित विविध विषय आणि घटकांचा समावेश असलेला प्रकल्प २००० साली त्यांच्या ‘विन्यास’ या संस्थेने सादर केला. या पुस्तकातील अनेक डिझाइन आयडिया या संशोधन कामादरम्यान सुचल्या होत्या. प्रीती वाजपेयी आणि कबीर वाजपेयी यांनी या संदर्भात वास्तुरचनेतील शक्यतांचा विचार केला. यात बालविकासतज्ज्ञ विनी चंदा आणि वास्तुविशारद ध्रुव कुलश्रेष्ठ यांचे बाला समूहात मोठे योगदान होते. बाला समूहाने वेळोवेळी विकसित केलेल्या दीडशे डिझाइन आयडियांचे विश्लेषण या पुस्तकात केले आहे.
शाळा ही एक इमारत न होता शैक्षणिक साधन म्हणून तिचा वापर अधिकाधिक कसा करता येईल, हे या पुस्तकातून नेमकेपणे व्यक्त झाले आहे. शाळेच्या विकासाच्या दृष्टीने मूलभूत ठरतील, अशा संकल्पना पोहोचविण्यास मनोविकास प्रकाशनच्या या पुस्तकाचे योगदान म्हणूनच मोलाचे ठरावे.
एका समृद्ध शाळेचा प्रवास, संकल्पना कबीर वाजपेयी, अनुवाद – विनिता गनबोटे, मनोविकास प्रकाशन, मूल्य ४०० रु., पृष्ठे – ९६
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा