अलकनंदा पाध्ये
परवा बाजारात जाताना रस्त्यात अंतराअंतरावर असलेल्या खांबांवरच्या एका जाहिरातीने लक्ष वेधून घेतल- ‘नाही म्हणा लहान घराला..’ अशी त्या जाहिरातीची शब्दरचना आणि पाश्र्वभागी अर्थातच मोठय़ा घराचे अत्यंत आकर्षक चित्र. अद्ययावत, भारी सजावट असलेल्या एका मोठय़ा दिवाणखान्यात शुभ्र गुबगुबीत सोफ्यावर विसावून ६० इंची टी.व्ही.वरचा कार्यक्रम बघणारे राजबिंडे जोडपं. खाली पसरलेल्या भारी कारपेटवर खेळणारे त्यांचे बाळ.. त्याच्याभोवती घुटमळणारे गुबगुबित पामेरिअनचे पिल्लू आणि दिवाणखान्याला साजेशाच प्रशस्त बाल्कनीत वेताच्या खुर्च्यावर विसावून अमृततुल्य चहा/ कॉफीचा आस्वाद घेणारे आनंदी आजीआजोबा.. थोडक्यात, लहान घराला नाही म्हणून जाहिरातीत दाखवलेल्या देखण्या ऐसपैस घराची निवड केल्यास या कुटुंबाप्रमाणेच गृहसौख्य मिळण्याची शक्यता ती जाहिरात दर्शवीत असावी. बाजारात शिरेपर्यंत संपूर्ण रस्ताभर ते आलिशान सजावटीचे घर माझा पिच्छा सोडत नव्हतं.
त्या सुंदर गृहसजावटीकडे बघून मनाशी म्हटलं, ‘‘हॅट एवढी मोठी जागा मिळाल्यावर असं घर सजवणं काय कठीण आहे? त्यात काय मोठंसं कौतुक? त्यापेक्षा तुटपुंज्या जागेचा बागुलबुवा न करता कल्पनाशक्तीला आव्हान देत त्या जागेत अनेक सोयीसुविधा करून ज्यांचे संसार मुंबई- पुण्यातल्या चाळी-वाडय़ातल्या दोन-तीन खोल्यांत फुलले, बहरले अशा सामान्य माणसांचे कौतुक करायला पाहिजे. आयुष्याच्या मध्यावर आलेल्या किंवा उताराकडे लागलेल्या; ज्यांचे बालपण किंवा तारुण्य अशा लहान घरात झालेले असेल त्यांना माझ्या विधानाची सत्यता नक्कीच पटेल. काळानुसार माणसाच्या राहणीमानाच्या कल्पना बदलत चालल्यात, राहत्या घरांचे स्वरूपही बदलतंय. त्यातल्या योग्य-अयोग्यतेचा इथे मुद्दा नाहीच. जाहिरातीतल्या लहान घराबाबत काढलेल्या नकारात्मक सुराने माझ्या विचारांची गाडी भूतकाळात गेली.
एकेकाळी दोन किंवा तीन खोल्यांच्या लहान घरात राहणाऱ्या माणसांचे प्रमाण मात्र बरेचदा जागेच्या व्यस्त असायचे, कारण हम दो हमारा एक किंवा डिंक (Double Income No Kid) चा जमाना नसल्याने आई-वडील त्यांची दोन-तीन मुले शिवाय वृद्ध आई-वडील, अविवाहित भाऊ-बहीण यांच्याशिवाय गावाहून कुणी नोकरी शिक्षणासाठी आलेला अशी गर्दी.. पण मुळात असं घर कुणाला लहान वाटतच नसे आणि जरी कधी वाटलं, तरी त्यासाठी आप्तांना सोडून राहती जागा सोडून मोठय़ा ऐसपैस घरात जाण्याची कल्पनाच तोवर कुणाच्या मनात रुजली नव्हती किंवा बिल्डर मंडळींनी रुजवली नव्हती. गृहकर्जाची संकल्पनाही फारशी रुजली नव्हती. कारण डोक्यावर एक पैचेही कर्ज असणे मग ते घरासाठी का असेना. कमीपणाचे समजण्याची मानसिकता त्यामुळे घरकर्जाचा विचारही दूरच. तेव्हा आहे त्या जागेलाच कल्पकतेने सोयीसुविधांनी सज्ज करण्याच्या एकेकाच्या प्रयत्नाला सलाम करायलाच हवा.
जाहिरातीतल्या त्या गुबगुबीत सोफ्याला चाळीतल्या खोलीत ठेवायची कल्पनासुद्धा करवत नाही, कारण खोलीतली किमान एकतृतीयांश जागा त्या सोफ्याने व्यापल्यावर घरातल्या माणसांना दिवसभर आटय़ापाटय़ाच खेळाव्या लागल्या असत्या. शिवाय त्यावर जेमतेम तीन माणसांनी आरामात बसायची सोय- तेव्हा आलिशान सोफ्याला पर्याय होता. फोल्डिंगच्या खुर्च्या.. फोल्डिंगचा दिवाण किंवा सोफा कम बेडचा. काम नसेल तेव्हा हातापायाची घडी घालून खुर्च्यानी भिंतीला टेकून उभे राहणे सक्तीचे होते. तसंच ‘दिवसा बसा आणि रात्री आडवे व्हा’ हा नियम फक्त माणसांनाच नाहीतर फर्निचरलाही होता. रात्री सोफ्याच्या पाठीला विश्रांती देऊन म्हणजे आडवं करून आणि पोटात भरपूर सामान सामावून घेतलेल्या फोल्डिंग दिवाणाच्या उभ्या फळीलासुद्धा रात्री दोन टेकूंवर आडवे करून तयार झालेल्या पलंगावर माणसांच्या आडवं होण्याची, झोपण्याची मस्त सोय झालीच की! कारण त्या जाहिरातीतल्या किंगसाईज पलंगाची चैन चाळीतल्या खोल्यांना थोडीच परवडणार होती. बहुतेक घरात गाद्यांचा डोंगर पेलणारी लोखंडी कॉट मात्र हमखास असायची आणि त्यावरच्या मोठय़ा चादरीवर फक्त गाद्याच नाहीतर कॉटखालचं भरपूर सामान झाकायचीही जबाबदारी होती. आमच्या एका शेजाऱ्यांकडे तर घरात वावरायला जागा मोकळी असावी म्हणून त्यांनी भिंतीवरच ६ बाय ३च्या लाकडी चौकटीवर दोन टेकू जोडलेली त्याच आकाराची एक मजबूत लाकडी फळी बसवली होती. रात्री फक्त झोपतेवेळी टेकूच्या आधाराने ती फळी आडवी पाडली की त्याचा झकास पलंग तयार होई. अशाच प्रकारच्या थोडय़ा छोटय़ा फळय़ांचा उपयोग करून बऱ्याच ठिकाणी मुलांचे स्टडी टेबल बनायचे.. कारण मुलांची खोली.. त्यांचं कपाट.. बेड वगैरे कल्पनांवर तेव्हा ‘नसती थेरं’ असा शिक्का लागण्याची शक्यताच अधिक होती. त्यामुळे सर्व भावंडांची पुस्तकेही त्या भावंडांप्रमाणेच गळय़ात गळे घालून एकाच कपाटात विसावलेली असायची. जी परिस्थिती पुस्तकांची तीच घरातल्या सर्वाच्या कपडय़ांची- नातवंडांपासून आजीआजोबांपर्यंत सर्वाचे कपडे ठेवण्यासाठी एकच एक कपाट. ज्याची दारे पूर्णाकृती आरसे लावलेली असायची.. आपसूकच ड्रेसिंग टेबलची जागा वाचली. कारण इतर प्रसाधनं वगैरे ठेवायच्या छोटय़ाशा कपाटाची जागासुद्धा भिंतीवरच. कपडय़ांच्या कपाटाच्या वरची जागा तरी रिकामी का ठेवायची म्हणून जास्तीच्या सामानाने भरलेल्या बॅगा.. ट्रंकांसाठी तो वरचा बर्थ आरक्षित असायचा. जाहिरातीतला ६० इंची सपाट टी.व्ही. भिंतीला चिकटलेला होता, पण त्या काळचे टी.व्ही. मात्र सडपातळ नाहीतर चांगले धष्टपुष्ट.. यथास्थित जागा अडवणारे होते. घरात जागा अपुरी, पण टी.व्ही.वरच्या कार्यक्रमाचे आकर्षण अपार अशा द्विधा मन:स्थितीतही लोकांनी कल्पकतेने टी.व्ही.ला खास कॅबिनेटमध्ये बसवून त्याच्या अवतीभोवती शोकेस.. पुस्तके.. तर सामानाची सोय केली आणि काही घरात चक्क मध्यम उंचीच्या कपाटावरही त्याची सोय झाली. पण जिथे टी.व्ही.चा मोठा उंट लहान तंबूत घरात शिरणे अशक्य होते, तिथे छोटा म्हणजे अगदी १० इंचीसुद्धा टी.व्ही. आणून लोकांनी आपल्या मनोरंजनाची सोय केली.
डायिनग टेबलने स्वयंपाकघरात प्रवेश केल्यावर त्यालाही सदासर्वकाळ हातपाय पसरायची परवानगी नव्हतीच, म्हणूनच फोल्डिंगच्या डायिनग टेबलची कल्पना पुढे आली. भिंतीवर डबे-बरण्या किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी काही ठरावीक लांबी रुंदीचे कपाट करून त्याच्या दाराचा उपयोग डायिनग टेबलसारखा होऊ लागला. कपाटाचे दार खाली पाडून त्याचे पाय जमिनीला टेकले की झाले डायिनग टेबल. जेवण झाले की कपाटाचे दार बंद म्हणजेच डायिनग टेबल गडप. एरवी वावरायला जागा मोकळी. यासाठी सुद्धा जागा नसली तर ओटय़ाच्या शेजारीच भिंतीला समांतर किमान १-२ ताट ठेवण्याइतपत जोडलेली फळी जेवणाच्या वेळी उचलून खालच्या २ खिळय़ांवर दोन उचलून धरली की छोटेसे डायिनग टेबल तय्यार.
लहान घरातल्या मोरीभोवतीच लाकडी प्लायच्या साहाय्याने तयार झालेल्या कामचलाऊ बाथरूमने स्वतंत्र बाथरूमची गरजही पूर्ण केली. घरांची लांबी-रुंदी बेताची असली तरी उंची मात्र भरपूर. तिचाही उपयोग करायच्या कल्पनेतून पोटमाळय़ाची उत्पत्ती झाली आणि लोकांची राहती जागा किमान दीडपट मोठी झाली. पोटमाळाही आपल्या नावाला जागणारा ठरला. त्याने आपल्या पोटात काय सामावले म्हणण्यापेक्षा काय नाही सामावले सांगणे सोपे जाईल. घरातल्या जास्तीच्या सामानासोबतच मुलामाणसांना झोपण्यासाठी अभ्यासासाठी जागा पुरवायची जबाबदारी पोटमाळय़ाने उचलली. त्यावर चढ-उतार करण्यासाठी लागणाऱ्या शिडीलाही जागेअभावी एकाच पायावर भिंतीला खेटून राहायची शिक्षा असायची. माळय़ावर चढउतार करतेवेळीच फक्त तिला दोन्ही पाय जमिनीवर टेकायची संधी मिळे.
गरज ही शोधाची जननी असते किंवा इच्छा तिथे मार्ग या उक्तीचा प्रत्यय देणाऱ्या लहान घरातल्या सामान्य माणसांच्या कल्पकतेच्या स्मृती जागल्या त्यालासुद्धा निमित्त ठरली.. ‘नाही म्हणा लहान घराला’.. अशी जाहिरातच!
alaknanda263@yahoo.com