‘स्क ल्पचर इन्स्टॉलेशन’, ‘व्हिडीओ इन्स्टॉलेशन’ या अभिनव कलाप्रकारचे अस्तित्व मुंबईत १९८० च्या सुमारास आढळू लागले. मात्र अभिव्यक्ती करणाऱ्या कलाकारांची संख्या इतर माध्यमांच्या तुलनेत बरीच कमी आहे. ‘इन्स्टॉलेशन’द्वारे आपली अभिव्यक्ती करणाऱ्या शिल्पा नावाच्या शिल्पकर्तीच्या स्टुडिओचा परिचय व तेथील घडामोडींची माहिती या वेळी आपण करून घेणार आहोत.
‘इन्स्टॉलेशन’द्वारे त्या विविध राजकीय व सामाजिक घटनांमुळे उद्भवलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात. यात जातिभेद, वांशिक भेद, दोन देशातील सीमारेषेवरचा तणाव, दहशतवाद, धार्मिक चिथावण्या यांसारखे विषय असतात. यामागे असलेल्या काही हिणकस मानवी प्रवृत्तींचा निर्देश त्या काहीवेळा करतात. मानवी हक्क, अन्याय, सुरक्षितता याबाबत एखादी नेमकी टिप्पणी अथवा प्रश्न उभा करतात. त्यांच्या परीने एखादा विधायक संदेश काहीवेळा या आपल्या ‘इन्स्टॉलेशन’द्वारे प्रसृत करतात. त्यासाठी ‘त्रिमीत’ किंवा ‘व्हिडिओ’ इन्स्टॉलेशनला पूरक अशी शब्द योजना, प्रकाशयोजना अथवा ध्वनी यांचाही वापर केलेला असतो. शिल्पकलेतील पारंपरिक माध्यमे म्हणजे माती, लाकूड, पाषाण, फायबर इत्यादींचा चाकोरीबद्ध वापर त्या करीत नाहीत. त्यामागील त्यांचा हेतू मानवी जीवन आणि कलामाध्यमे यातील अंतर कमी करण्याचा आहे. त्यासाठी अनेकदा दैनंदिन वापरातील वस्तू उदा. साबणाचे मोठय़ा आकाराचे ठोकळे, धागेदोरे, मायक्रोफोन, टेप इत्यादींचा नावीन्यपूर्ण उपयोग आशयच्या संदर्भात करतात. मानवी जीवनाशी संबंधित विषय असूनही मानवी शरीराकृतींचा, भावमुद्रांचा वापर अपवादानेच असतो. फोटोग्राफी व व्हिडिओद्वारे केलेल्या इन्स्टॉलेशनमध्ये मात्र प्रत्यक्ष मानवी देह, हालचाली, भाव यातून त्यांनी अभिव्यक्ती केली आहे. देश-परदेशातील समकालीन कलेत इन्स्टॉलेशन संदर्भात स्वत:ची ओळख निर्माण होण्याचा मोठा पल्ला त्यांनी केवळ पस्तीशीतच गाठला आहे.
एका स्त्री शिल्पकर्तीचा स्टुडिओ! त्यातही विज्ञान, तंत्र, मंत्र अशांचा अंतर्भाव असलेल्या साधनांचा, अपारंपरिक माध्यमांचा संवेदनशील उपयोग करणाऱ्या शिल्पकर्तीचा स्टुडिओ तेथील तिचा वावर बघण्याची उत्सुकता मला होती. कारण आपल्याकडे एकंदरीतच चित्र-शिल्प क्षेत्रात कलाकार म्हणून नावलौकिक होण्यात स्त्रियांचे प्रमाण अगदीच कमी. त्यात शिल्पकार स्त्रिया तर अपवादानेच. पण गेल्या बारा-पंधरा वर्षांत यात नक्कीच फरक झाला आहे. स्त्रियांच्या वाढत्या सहभागाचे प्रत्यंतर प्रदर्शने, कॅटलॉग्ज, आर्टिस्ट कॅम्प यामधून येते.
शिल्पा गुप्ता यांचा आठशे चौ.फुटांचा स्टुडिओ वांद्रे (पश्चिम) येथील टर्नर रोडजवळील इमारतीत चौथ्या मजल्यावर आहे. सामान्यपणे एक-दोन भिंती पाडून जागा मोकळी करणे, व्यवस्थित उजेडासाठी खिडक्या, पडदे, वेगवेगळे लाइट्स या सोयी त्यांच्याकडे आहेतच; शिवाय दोन कॉम्प्युटर, कॅमेरा, प्रोजेक्टर अशी साधनेही आहेत. हॉलमध्ये सोफा, टीपॉय व जरूर पडल्यास तेथेही काम करण्यासाठी एक टेबल-खुर्ची असे माफक फर्निचर आहे. लहानग्या स्वयंपाक खोलीतील ओटा फक्त चहा, कॉफी करण्यापुरताच उपयोगात येतो. तेथील ओटय़ाखेरीजची जागा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोअरेजने भरून गेली आहे. स्टुडिओतील बाकीची सुमारे पाचशे चौ. फुटांची जागा इन्स्टॉलेशनचा वेगवेगळ्या टप्प्यांतील कामांसाठी वापरली जाते. ही वास्तू ‘स्टुडिओ’ आणि ‘ऑफिस’ अशा दुहेरी स्वरूपाची आहे. स्टुडिओत स्वत:च्या काही मोजक्या कलाकृती लावल्या आहेत. पुस्तकांचे कपाट आहे. शिल्पा यांच्याबरोबर अन्य चार सहकारीही आहेत.
एकावेळी वेगवेगळ्या संकल्पना असलेली, वेगवेगळ्या आकारमानांची, निरनिराळ्या माध्यमातील तीन-चार इन्स्टॉलेशन्सची कामे वेगवेगळ्या टप्प्यात स्टुडिओत सुरू असतात. ती हाताळू शकणारे कारागिर अथवा कामगारांची ये-जाही असते. ते आपापली कामे करून जातात. उदा.- रंगारी, सुतार इत्यादी. सतत वेगवेगळ्या माध्यमात कामे सुरू असल्याने विशिष्ट असे भरपूर स्टोरेज तेथे नाही. एखाद्या विषयाची मांडणी आपल्या कल्पनेनुसार करण्यासाठी प्रथम त्या अर्धवाही आकार तयार करतात. मग त्यासाठीच्या माध्यमाचा (मटेरिअल) विचार करतात. मनातील कल्पना कागदावर किंवा कॉम्प्युटरवर उतरते. शिवाय कॉम्प्युटरद्वारे त्याचे त्रिमीत रूप, मापे इत्यादी तपशीलवार निश्चिती केली जाते. एखाद्या संकल्पनेचे मूर्तरूप निश्चित करण्यासाठी आवश्यकतेनुसार वर्तमानपत्रे, पुस्तके, इंटरनेट यातून संदर्भ गोळा केले जातात. या वैचारिक बैठकीवर त्यांची इन्स्टॉलेशन्स उभारली असतात. माध्यम ठरले की मार्केटमधून योग्य दर्जाचे मटेरिअल विकत घेणे, ते संबंधित वर्कशॉप्समध्ये नेऊन ड्रॉइंगनुसार त्याला आकार- रंग- टेक्सचर देणे अशी कामे पार पाडली जातात. तयार करून घेतलेल्या विशिष्ट आकाराच्या अनेक घटकांच्या जोडणीतून शिल्पाकृती तयार होते. इन्स्टॉलेशनचे आकारमान, पॅकिंगच्या सुविधा, यानुसार ही जोडणी स्टुडिओत किंवा कधी प्रत्यक्ष लोकेशनवरच केली जाते. या सर्व पायऱ्यांवर सतत जागरूक रहावे लागते. दुसऱ्या बाजूला प्रदर्शनात भाग घेण्यासंबंधीचा पत्रव्यवहार अर्थात इमेलने सुरू असतो. इन्स्टॉलेशन्सचे खर्च, तसेच ते प्रदर्शित होण्यासाठी करावी लागणारी देश-विदेशातील वाहतूक यांचे खर्च प्रचंड असतात. व्हिडिओ इन्स्टॉलेशन्सचा खर्चही मोठा असतो. त्यासाठी पैसे उभे करण्याचे महत्त्वाचे कामही असते. त्यासाठी काही संस्था, प्रायोजक, आर्ट गॅलरीजचे चालक यांच्याशी संपर्क साधून चाचपणी, बोलणी पत्रव्यवहार चालू असतात. या स्टुडिओत कामाशिवाय तिथे कोणी जात नाही. घरचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी सहज म्हणून तेथे डोकावत नाही. इन्स्टॉलेशन बघण्यासाठी किंवा काही कामानिमित्त चित्रकार- शिल्पकार मंडळी कधी तरी कळवून तेथे जातात. काही वेळा क्यूरेटर्स एखादी भेट देतात. अलीकडेच इन्स्टॉलेशन्सची कामे बघण्यासाठी पंधरा-वीस जणांचा ग्रुप एकत्रच आला होता. इन्स्टॉलेशन्सची कामे स्टुडिओमध्ये ठेवणे शक्य नसते म्हणून त्यांना प्रोजेक्टरद्वारे भिंतीवर सर्व कामे दाखविली. सध्या त्यांच्या स्टुडिओत दिल्लीतील एका गॅलरीचे, केमॉल्ड, वढेरा गॅलरी, कोपेनहेगन फाऊंडेशन, शारजा निडानाले, अशा देश-परदेशातील सात-आठ ठिकाणचे काम एकाच वेळी सुरू आहे. युरोपमधील प्रदर्शनांची सुरुवात सप्टेंबरला होते. त्यासाठी जानेवारी-फेब्रुवारीपासून त्या कामांची सुरुवात केली जाते. पॅरीस, इटलीतील आर्ट गॅलरीशी आता व्यवस्थित संधान प्रस्थापित झाले आहे. तेथेही त्यांच्या कलाकृती पाठविल्या जातात.
शिल्पा गुप्ता यांच्या स्टुडिओत इन्स्टॉलेशन या अभिनव कलाप्रकारातील पेपरवर्क ते पॅकेजिंग आणि वर्कशॉप्स ते आर्ट गॅलरीज संदर्भातील व्यवस्थापन व प्रत्यक्ष कामे दिवसभर सुरू असतात. संध्याकाळचे साडेसहा झाले की कामकाजाची वेळ संपते. अधूनमधून एकटीला त्या निवांतपणाचीही खूप गरज असते. अशा निवांत वेळीच त्यांना आपल्या सर्तकतेला वाट करून देता येते. कधी तेही जमत नाही. मग घरात रात्री सर्वाची नीजानीज झाली की त्या स्वस्थ बसतात. त्या निवांत वेळी कधी तरी त्यांच्यातील सर्जकता हलकेच प्रकट होऊ लागते आणि कागदावर पेन्सिल सरसरू लागते.
शिल्पा गुप्ता माहेरच्या अगरवाले. ही दोन्ही कुटंबे सुशिक्षित व सुस्थितीतल! १९९२ ते ९७ या काळात त्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या ‘स्कल्पचर अँड मॉडेलिंग’ डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनी होत्या. ते शिक्षण सुरू असतानाच शेवटच्या दोन वर्षांत त्यांनी आर्थिक स्वावलंबन, तंत्रज्ञानातील रस आणि शिल्पकला क्षेत्रातील भवितव्याची अनिश्चितता यामुळे कॉम्प्युटर कोर्सेस केले होते. त्यामुळे शिक्षणानंतर लगेच नोकरी मिळाली. चार वर्षांत दोन-तीन ठिकाणी नोकऱ्या केल्या. कॉम्प्युटर, इंटरनेटमुळे झालेली आर्थिक स्थित्यंतरे तसेच इंटरनेटच्या तंत्रसुविधेमुळे वेगाने होऊ शकणाऱ्या विकासाचे लोकांपुढे उभे केलेले  चित्र, यांचे जाणवलेले भले-बुरे परिणाम, त्या संदर्भात त्यांच्या आजूबाजूला घडलेल्या घटना किंवा एखादी सार्वत्रिक घटना त्यांच्या बोलण्यात सहजतेने येतात.
सुरुवातीच्या काळात इन्स्टॉलेशन्सबद्दल फारशी कोणाला उत्सुकता नव्हती. पण त्यांना त्याच पद्धतीचे काम करायचे होते. शिल्पा यांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘कला किंवा तंत्रज्ञानातील स्किल by default माझ्यात आहे.’ शिवाय जोडीला धडाडी, जिद्द, मेहनत असल्याचे त्यांच्या कॅटलॉग्जमधून व स्टुडिओत झालेल्या भेटीत मला जाणवले.

Story img Loader