प्रत्येक विवाहित जोडप्याला आपले स्वत:चे हक्काचे घर असावे असे वाटते. त्या दिशेने ते प्रयत्न करतात. काहींना त्यांच्या आई-वडिलांमुळे आयतेच घर मिळते, तर काहींना पिढय़ान् पिढय़ा राहात असलेली एखादी गावची वास्तू मिळते. हा तर सर्वसामान्य नियमच आहे. पण मला वाटते, फारच थोडय़ा कुटुंबांकडे पिढय़ान् पिढय़ा एखादे देवस्थान किंवा मंदिर असू शकते आणि हे भाग्य आमच्या सासरच्या कुटुंबाला लाभलं आहे.
आमचे हे मंदिर पेण तालुक्यातील वडखळ नाक्याच्या उजव्या हाताला दीड ते दोन किलोमीटर अंतरावर डोलवी गाव आहे. ह्य़ा गावाच्या बाजूलाच ‘इस्पात’ ही मोठी कंपनी आहे, तर गावाच्या आत आमचे घर आहे. मंदिर हायवेला आहे. मंदिर रस्त्याला अगदी लागूनच आहे. आधी मंदिर मग समोर रस्ता. या रस्त्यावरून सुसाट गाडय़ाची ये-जा असते. रस्त्याला लागून पलीकडे रेल्वे लाइन आहे. तेथून दिवा-रोहा गाडी पास होते. रेल्वे लाइनपुढचा डोंगर पूर्वी हिरव्या झाडांनी नटलेला असायचा आणि या डोंगराच्या वर जणू आकाशाची गोलाकार छत्री त्या डोंगराच्या डोक्यावर ठेवलेली दिसते.
‘श्रीसोमेश्वर मंदिर’ बांधून १०३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. मंदिराच्या बाजूलाच असलेल्या धर्मशाळेत एका मार्बलच्या लादीवर मंदिर ७ जून १९०९ अशा अक्षरात कोरलेले आहे. त्यामुळेच मंदिर १०० वर्षांपूर्वीचे आहे हे आम्ही सांगू शकतो. आमचे कुटुंबच देवळाची व धर्मशाळेची देखरेख करून दरवर्षी देवळात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतात. आम्ही सर्व मुंबईला राहात असल्यामुळे आमची गावची नणंद विजया रमेश पाटील आणि गावातील माणसं या मंदिराची देखरेख करतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवळात दिवाबत्ती केली जाते. श्रावणी सोमवारी इथे खूप लोक दर्शनाला येत असतात.
श्रीसोमेश्वर मंदिर आतून छोटेच आहे. मंदिराला लागूनच धर्मशाळा आहे. धर्मशाळा म्हणजे एका घरासारखीच लांबच्या लांब खोली. त्यामध्येच एक छोटी खोली आहे. धर्मशाळेचे छत कौलारू आहे. पूर्वी तिथे एक चूल होती. पूर्वी महाशिवरात्रीच्या उत्सवात त्यावर पाणी गरम करण्यापासून चहा व दुसऱ्या दिवशीचे गावजेवण होत असे. फार पूर्वी इथे एक बैरागी राहात असे. तेव्हा तो तेथील व देवळाची काळजी घेई.
मंदिर बघताचक्षणी एकदम नवे कोरे वाटेल. कारण माझे मिस्टर प्रभाकर पाटील हे दरवर्षी जातीने मंदिराची डागडुजी व कलर काम करवून घेतात. मंदिराला दिलेल्या रंगछटामुळे व उठावदार रंगामुळे लांबूनच मंदिराकडे बघताक्षणी एक प्रसन्न लहर अंगावर आल्यासारखी होते आणि डोळे, मन सुखावतात. उत्सवाच्या दिवशी फुलांचे तोरण लावून मंदिर सजवतात. मंदिर बघताक्षणी मंदिराच्या दरवाजाच्या वर दोन्ही बाजूला साधूंच्या मूर्ती बसलेल्या दिसतात. जणू ते दोन्ही साधू अहोरात्र मंदिराचे रक्षण करत आहेत. मंदिराच्या वर गोल घुमट व त्यावर कळस आहे. त्यावर झेंडा लावलेला आहे. भगव्या रंगाचा झेंडा अगदी डौलाने फडकत असतो. मंदिराच्या आत गाभाऱ्यात मार्बलची शंकराची पिंडी आहे. वर दोन खोपे आहेत. त्यामध्ये एका खोप्यात गणपती तर दुसऱ्या खोप्यात पार्वतीची मार्बलची मूर्ती आहे. बाहेरच्या बाजूला बसलेल्या काळ्या दगडाचा नंदी आहे…
गाभाऱ्यातून वर नजर टाकली तर गोलाकार (छत्रीसारखा) खूप वपर्यंत खोलगट भाग दिसतो. देवळातील घंटा वाजवताच सर्व बाजूंनी आवाज घुमतो. मंदिर बाहेरून बंद असले तरी बाहेरून ग्रीलमधून बघितले तरी शंकराच्या पिंडीचे छान दर्शन होते. नंदीही शांत, पुढे पाय करून बसलेला दिसतो. देवळासमोर तुळशीवृंदावन आहे. बाजूलाच पांढऱ्या चाफ्याचे झाड आहे. मंदिराच्या बाजूला एक उभा बुरूज आहे. पूर्वी त्यावर दिवा लावत असत. आता महाशिवरात्रीच्या उत्सवादिवशी त्यावर दिवा लावतात. धर्मशाळेच्या बाजूलाच उंबराचे झाड आहे. बाजूलाच विहीर आहे. तिला बारा महिने पाणी असते. या पाण्याचा उपयोग गावकरी करतात. तसेच रस्ता, रेल्वे लाइनच्या कामाच्या वेळी सतत उपयोग होत असतो. पूर्वी महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या रात्री कंदील लावून उत्सव साजरा करीत. उत्सवाच्या रात्री गाभाऱ्यात शंकराच्या (शेष नाग) पिंडीवर शंकराचा मुखवटा व फणा असलेला नागाचा चांदीसारखा मुखवटा लावतात व वरून कलशातून शंकरावर अभिषेक केला जातो. रात्री भजनाचा कार्यक्रम असतो.
‘मुंबई-गोवा हायवे’ रस्ता होणार आहे. त्यामुळे मंदिर हलवून दुसरीकडे बांधण्याची सोय सरकारच करणार आहे. अशा या मंदिरातील आमचा देव सतत आमच्या पाठीशी उभा असतो आणि आमचे रक्षण करत असतो. पुढची पिढीसुद्धा मंदिराची देखभाल व उत्सव साजरा करतील हीच इच्छा.

Story img Loader