दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञात ऋत्वीजत्व स्वीकारलेल्या ऋष्यशृंग ऋषींचा आश्रम शृंगवेरपुरात होता. रामायणातील या संदर्भावरून पुरातत्त्व विभागाने तेथे उत्खनन केले असता इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील पाण्याचे एक मोठे टाके सापडले. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने प्राचीन काळातील हे टाके म्हणजे एक आश्चर्यच आहे. नसíगक साधनसंपत्तीचा तोल ढळू न देता उभे केलेले हे टाके प्राचीन वास्तुविशारदांचा उच्चतम दर्जा दाखवून देते..
ऋषिप्रणीत रामायण आणि महाभारत ही भारतीयांची आर्ष महाकाव्ये! अथांग सागरासारख्या पसरलेल्या या महाकाव्यांचा भारतीयांच्या सांस्कृतिक व कला जीवनावर फार मोठा प्रभाव आहे. प्राचीन काळापासून अगदी आजपर्यंत अनेक कथा, महाकाव्यं, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपटांचा ही काव्यं मूलस्रोत आहेत. या काव्यांतील अनेक प्रसंगांवर आधारित उत्तमोत्तम शिल्पं उभी आहेत. प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक चित्रकारांना यातील कथा प्रेरणादायी ठरल्या आहेत. ही काव्यं जशी आमची सांस्कृतिक परंपरा आहे तशी ती आमचा इतिहास आहेत. आमचा आदर्श आहेत. त्यामुळेच या इतिहासात उल्लेखिलेल्या अनेक ठिकाणी पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन केले गेले.
यापकी रामायणातील रामजन्मभूमी, कौसल्याघाट, हनुमान गढी, शृंगवेरपूर अशा अनेक ठिकाणी उत्खनन करण्यात आले. या उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा काळ व भारतीयांच्या मनात असलेला इतिहासाचा काळ या काळाच्या वादविवादात न पडता शृंगवेरपूर येथील उत्खननात सापडलेल्या पाण्याच्या टाकीचा स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. शृंगवेरपूर उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या सोराओन तहसीलात आहे. गंगेच्या डाव्या तटावर वसलेल्या या शृंगवेरपुराचा रामायणातील संदर्भ प्रथम पाहू या.
दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञात ऋत्वीजत्व स्वीकारलेल्या ऋष्यशृंग ऋषींचा आश्रम शृंगवेरपुरात होता. रामायणातील या संदर्भावरून पुरातत्त्व विभागाने तेथे उत्खनन केले असता इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील पाण्याचे एक मोठे टाके सापडले. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने प्राचीन काळातील हे टाके म्हणजे एक आश्चर्यच आहे. नसíगक साधनसंपत्तीचा तोल ढळू न देता उभे केलेले हे टाके प्राचीन वास्तुविशारदांचा उच्चतम दर्जा दाखवून देते.
तीन टाक्यांनी युक्त असे हे टाके आहे. उत्खननकर्त्यांनी त्यांना ए, बी, सी अशी नावे दिली आहेत. या लेखात या टाक्यांना अनुक्रमे साठवणीचे टाके हे पहिले, मुख्य टाके दुसरे व धर्मकृत्याचे टाके तिसरे अशी नावे दिली आहेत.
साठवणीचे टाके
हे टाके जिथे मिळाले त्याच्या उत्तरेला एक कालवा आहे. या कालव्यातून उंचावरून पाणी गंगेत येते. पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा नदीतील पाणी कालव्यात उलटे शिरत असल्याचे त्या
गाळाचा खड्डा व साठवणीचे टाके यांच्यामध्ये एक छोटा पायऱ्या असलेला अरुंद मार्ग आहे. या पायऱ्यांमुळे पाण्याची गती रोखली जाते. गाळाच्या खड्डय़ापेक्षा या मार्गाची उंची २.३२ मीटर उंच असल्याने पाण्याची गती रोखण्याबरोबर पुन्हा एकदा गाळ मागे राहतो. यानंतर हे पाणी साठवणीच्या टाक्यात पडते.
साठवणीच्या टाक्याला एकामागे एक अशा दोन भिंती आहेत. काही ठिकाणी सापडलेल्या पुराव्यांवरून तिसरीही भिंत असावीशी वाटते. या िभती गच्चीच्या कठडय़ाप्रमाणे उंच व एकमेकींवर बाहेरच्या दिशेने कललेल्या आहेत. अशा रचनेमुळे पुराच्या पाण्याचा ओघ झेलायला या भिंती सिद्ध झाल्या आहेत. या दोन किंवा तीन भिंतींऐवजी एकच भिंत असती तर काय झाले असते याची कल्पना आपण सहज करू शकतो. या ठिकाणी लखनऊ व अलाहाबाद येथील हायड्रोलिक इंजिनीअरनी भेट दिली असता अशा एकापुढे एक भिंतीच्या रचनेला वास्तुशास्त्रीय परिभाषेत ‘व्हर्टिकल रँपिंग’ असे म्हणतात व आजही टाकी बांधण्यासाठी अशा प्रकारची रचना केली जाते, असे सांगितले. हे साठवणीचे टाके मुख्य टाक्याच्या दिशेला थोडेसे रुंदावत नेले आहे. अशा प्रकारची रचना ‘हॉरीझाँटल रँपिंग’ म्हणून ओळखली जाते. याशिवाय मुख्य टाक्याच्या दिशेला याचा तळ उतरत गेला आहे. त्यामुळे गाळाचा खड्डा व त्यानंतरचा मार्ग यातून प्रवास करून आलेला व पाण्यात अजूनही शिल्लक राहिलेला गाळ या उतारावर जमा होईल. साठवणीच्या या टाक्याच्या दक्षिणेकडील टोकाला एका कोपऱ्यात पायऱ्या केल्या आहेत. पावसाळ्यात नवीन चिखल जमा होण्यापूर्वी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे उघडय़ा पडलेल्या या पायऱ्यांवरून टाक्यात जमलेला गाळ काढून टाकणे सोपे होईल. अशा प्रकारे क्रमाक्रमाने पाण्यातील गाळ व पाण्याची गती दोन्हीही कमी करत आणले असले तरी अजून हे पाणी मुख्य टाक्यात लगेच जाऊ दिलेले नाही. साठवणीचे टाके व मुख्य टाके यांच्यामध्ये पुन्हा एक मार्ग केलेला आहे व त्याची उंची साठवणीच्या टाक्यापेक्षा पुन्हा १.२० मीटर अधिक ठेवलेली आहे. स्वाभाविकपणे अधिक स्वच्छ पाणी मुख्य टाक्यात येईल. येथे देखील मुख्य टाकीत पाणी पडण्यापूर्वी या मार्गात पाण्याची गती कमी करण्यासाठी अपरिहार्यपणे पायऱ्यांची योजना आहे. या टाकीत पडणाऱ्या पाण्यामुळे टाकीच्या तळाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी टाक्याच्या मूळ तळावर एकेरी विटांचा तळ केला आहे. याच मुख्य टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाई. पावसाळ्यात पूर आलेला असताना पाण्याची कमतरता नाही, पण पावसाळ्यानंतरसुद्धा पाण्याची कमतरता पडू नये यासाठी आधीच्या टाकीपेक्षा या टाक्याचा तळ एक मीटर खोल आहे. या टाक्यात ६.५ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. पहिल्या साठवणीच्या टाक्यात ८८,००,०० लिटर पाणी साठते. त्याव्यतिरिक्त दुसरे व तिसरे टाके यांना जोडणाऱ्या कालव्यामध्ये ३४,००,०० लिटर पाणी साठवले जाते. तिसरे ११६००० लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले एक छोटे टाके केले आहे. हे सर्व पाणी पावसाळ्याव्यतिरिक्तच्या महिन्यात उपयोगात येणार. ही सारी व्यवस्था तंत्रज्ञांना पुरेशी वाटणारी नाही. शिवाय पावसाळ्यानंतर पाण्याचे पाष्पीभवन होणार या सगळ्याचा विचार करून पावसाळ्यात येणाऱ्या जास्तीच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी टाक्यांमध्ये विहिरी खणल्या. मुख्य टाक्यात अशा चार विहिरी सापडल्या आहेत. काही पुराव्यांवरून विहिरींची ही संख्या त्याहून जास्त असण्याची शक्यता आहे. मुख्य टाक्यातील पाणी लोकांना सहज घेता यावे म्हणून अंतरा अंतरावर पायऱ्यांची व्यवस्था केली आहे.
धार्मिक टाके
येथे अनेक मूर्ती सापडल्या असल्यामुळे त्याचा धार्मिक टाके असा उल्लेख केला आहे. सततच्या चौकोनी आकाराने येणारा तोच तोपणा टाळण्यासाठी शेवटचे टाके गोलाकार आहे. आधीच्या दोन टाक्यांप्रमाणे यालाही तीन एकापुढे एक असलेल्या िभती आहेत. त्यांच्या काँक्रिटिंगसाठी मातीचा उपयोग केला आहे. सामान्य पुरात १.१८ मीटर पाण्याची पातळी वाढते. प्राचीन काळी पुराची पातळी याहून जास्त असण्याची शक्यता आहे. सामान्य पुरापेक्षा मोठा पूर आल्यास पाणी तीन मीटरपेक्षा जास्त वाढत असावे. अशा परिस्थितीत पहिले दोन टाके पूर्ण भरल्यानंतर उरलेले पाणी वाहून जाणे गरजेचे आहे. अन्यथा इतक्या वेगाने आलेले पाणी संपूर्ण टाके उद्ध्वस्त करणार, हे नक्कीच. गंगा टाक्याच्या दक्षिणेला आहे म्हणून या अभियंत्यांनी धार्मिक टाक्याच्या दक्षिणेला सहा कालवे काढले. होयड्रोलिक इंजिनीअरिंगच्या भाषेत त्याला ‘स्पिल चॅनल’ असे म्हणतात. हे कालवे एकसारखे नाहीत. वरच्या बाजूला त्यांची रुंदी ५० सेमी ते १.०२ मीटर इतकी आहे तर तळाकडे ती ३२ ते ८० सेमी इतकी आहे.
हे टाके साधारण पहिल्या शतकाच्या सुरुवातीला प्रचंड पुराने नष्ट झाले असावे. कारण या टाक्याच्या वर संपूर्ण गाळ साचलेला होता.
पावसाळ्यात अनेक नद्यांना पूर येतात. पाऊस संपला की हे सारे पाणी समुद्राला जाऊन मिळते आणि पुढे चार-पाच महिन्यांत आपल्याला पाण्याची चणचण जाणवू लागते. या पाश्र्वभूमीवर प्राचीन काळी पुराच्या पाण्याचा उपयोग करून टाकी बांधण्याची पद्धत अगदी चंद्रगुप्त मौर्य काळापासून दिसून येते. चंद्रगुप्ताने गिरनारच्या सभोवताली असलेल्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी तलाव बांधला होता. या तलावात पलासिनी व सुवर्णसिकता या दोन नद्यांच्या पुराचे पाणी सोडले जाई. पुढे चक्रीवादळात या तलावाला तडे गेल्याने रुद्रदामनने तो दुरुस्त केल्याचा उल्लेख रुद्रदामनच्या शिलालेखात आहे. खारवेल, कारिकाल, पल्लव राजे अशा कितीतरी राजांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या अनेक यशस्वी प्रयत्नांचे संदर्भ उपलब्ध आहेत. हेही टाके निश्चितच कुणा एका प्रजाहित दक्ष राजाच्या उदार आश्रयाने बांधले गेले आहे. या टाक्याच्या ठिकाणी सापडलेल्या वस्तू व टेराकोटाच्या नाण्यांवर राजा वसू तिसरा याचा उल्लेख आहे. त्यामुळे सध्यातरी शृंगवेरपूरच्या या टाक्याचा करविता वसू तिसरा आहे.
सध्या महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाचे चटके आपण अनुभवत आहोत. दुष्काळ आला म्हणजे राजकीय नेते व अभियंते परदेशात जाऊन पाणी समस्येवर मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या समस्येचं उत्तर हे त्या भूमीत, त्या संस्कृतीत शोधणेच योग्य असते. दुसऱ्या देशातील, संस्कृतीतील लोक त्यांच्याकडील परिस्थितीनुसार तो प्रश्न हाताळण्याची शक्यता जास्त असते. यासाठी शृंगवेरपूरसारख्या आपल्याकडील प्राचीन जलव्यवस्थापनाचा अभ्यास केला तर काही प्रश्न निश्चितच सुटू शकतील, असा विश्वास वाटल्याने हा लेखप्रपंच!
डॉ. आसावरी (पद्मा) बापट-bapat.asawari@gmail.com
संदर्भ : Excavation of Sringverpura – Arcaelolgical Survey of India, Vol. I 1977-86, B. B. Lal, 1993.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा