घराबद्दल सर्वानाच एक अतीव ओढ असते. अनेक भावबंधांनी त्याने बांधून घेतलेलं असतं, पण त्याच वेळी स्वैर सोडून मुक्त व्हायला आकाश दिलेलं असतं, एक विश्वासही दिलेला असतो. भटकून परत आलात की, मी इथेच पाय रोवून आहे.. तुमची वाट पाहत.
अशा या घराबद्दल अनेक कवी आपलं बोट धरून वाचकाला त्यांच्या घरभर फिरवितात. माधव जुलियनांची ही कविता पाहा-
‘आमुचे घर छान शेजारी वाहे ओढा
कागदी होडय़ा सोडा दूर जाती।।’
घराबरोबर कवीचं बालपणही सामोरं येऊ लागतं. लांब-रुंद परसू, घरातल्या जिन्याखाली रंगलेली ताईची भातुकली, अंगणातली तऱ्हेतऱ्हेची फुलझाडं, झेंडूच्या फुलातले खोबरे मागणारा भाऊ.
‘म्हणती आम्हा द्वाड करिती परी लाड बाबा आई।।’
असे ते ‘सानुलं घर, ते बाल्य’ हरपलं म्हणून थोडी हुरहुर आहे.
‘केशवसुत’ही ‘गोष्टी घराकडील’मध्ये अगदी चार पायऱ्या चढण्यापासून सुरुवात करून पडवी, परसू, तिथलं टकटक करणारं घडय़ाळ, माजघर- तिथे झोपलेली भावंडं, आई आणि विरहिणी पत्नी, दाराचा ‘थोर आडसर’ मागील दारचं तुळशीवृंदावन, गोठय़ातली हळुवार रवंथ करणारी म्हैसही ते आपल्याला दाखवितात.
तर आपलं घर कसं असावं याची कल्पना  बा. भ. बोरकर कवितेतून मांडतात –
‘बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर..
मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड..
फुलपाखरांसाठी पुढे फुलझाडे चार..’
कलमी आंबाही त्यांना हवा आहे, तो खार यावी म्हणून. पोफळी, पानवेली, मिऱ्यांची वेल यांना ते विसरत नाहीत, पण ‘वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे’ असं म्हणून लिहिण्या-वाचण्याचे महत्त्वही जीवनात आहे, असं दाखवून देतात. या घरात बसून पारव्यांची कुजबुज, समुद्राची गाज, पानांची सळसळ त्यांना ऐकायची आहे. जाई-जुईच्या कळ्यांसारखा शुभ्र मोकळा भात ते मासळीबरोबर खाणार, चहाची लज्जत घेणार, गीतं लिहिणार, नातवंडांना गोष्टी सांगणार अशी शांतनिवांत आयुष्याची स्वप्नेही त्यांना घराच्या साहाय्याने पूर्ण करायची आहेत. असं तृप्त-समाधानी ‘हवे-हवे’चा हव्यास नसलेलं जीवन हेच आपलंही स्वप्न बनून जातं.
वडिलांचं लिहिण्याचं टेबल, पाळण्यात निजलेला छोटा मधू, दादाची आणि स्वत:ची मित्र-मैत्रिणींबरोबरची गप्पाष्टकांची जागा, गोठय़ातल्या सदा घंटानाद करणाऱ्या गायी असा समृद्ध, आनंदी, मधुर हसणारा वाडा..
‘आहे शून्य अता कसा चहुंकडे अंधार हा माजला
खुंटय़ांना वटवाघळे लटकलीं भेडावती अंतरा’
त्याचं हे असं रूप बघून कापरं भरून रडणारी ‘ती’ आपल्याला इंदिरा संतांच्या ‘पूर्वस्मृती’ कवितेत दिसते.
या कवितेत घराचे विदीर्ण करणारे का होईना अवशेष आहेत. पण ‘दिलीप चित्रे’ यांच्या ‘चित्रे यांचा वाडा’ या कवितेत वेगळंच घडलंय. ज्या जागेत त्यांचा आणि त्यांच्या पाठच्या पाच
भावंडांचा जन्म झाला; पणजी, चुलत आजी यांचे मृत्यू  ज्या घराने पाहिले, त्या ठिकाणी प्रचंड दरवाज्यात छोटा दिंडी-दरवाजा, सनई-चौघडय़ांचे थोरले कोनाडे, मोठमोठे वड, निंब, औदुंबर असे वृक्ष, तिथली देवळं, त्या बाजूची फुलझाडं, फळझाडं, प्रशस्त विहीर.. असं सगळं ते घर, तो परिसर त्यांच्या
स्मृतीत रेखीवपणे अस्तित्वात आहे. पण आता तिथे वेगळंच काही आहे.
‘देवळं नाहीतच, यातलं काहीच
आता नाही, टेकाडावरली झाडं तोडली
तिथल्या चाळी पाडल्या, प्लॉट पाडून विकले,
तिथं नव्या बिल्डिंगा आल्या’
त्या भागाला अजूनही ‘चित्र्यांचा वाडा’ म्हणतात, ‘जरी तिथे एकही चित्रे राहत नाही.’
‘वस्त्या कायम थोडय़ाच असतात?
अरे, पन्नास वर्षांत जगाचा नकाशासुद्धा बदलतो
तर चित्र्यांच्या वाडय़ाचं काय मोठं घेऊन बसलात!’
अशी कोणी वाटसरू मनाची समजूत काढतो, पण ते वेडं मन आतमध्ये दुखावतंच.
घराचे फक्त ‘दार’ हाच कवितेचा विषय पु. शि. रेगे यांनी केला आहे आणि त्यातून एक गंमत आणली आहे.
‘दारात उभे राहू नये- उगाच;
पण दारापर्यंत पोचवायला जावे
दारातून टा-टा करावे’
असं सांगत असतानाच,
दारावरून जावे, टाळण्यासाठी आणि टेहळण्यासाठीही. अशी मजा करतातच. पण –
‘दार लावतात ते भित्रे,
उघडतात ते आपले मित्र,
उघडून देतात ते फितूर,
दार धाडकन बंद करून बाहेर ठेवतात
ते आपले मालक’
असं एक सत्यही सांगून जातात. दाराचाही एक मूड असतो आणि तो पाहूनच दारावर टक्टक् करायचे की टिचकी मारायची ते ठरते. अनेक दारांचे संदर्भ देता देता दारालाही मानवी भावभावना प्राप्त होतात. पत्नीला ‘दारा’ म्हणतात त्याचा संदर्भ ते मजेदारपणे घराच्या दाराशी लावतात.
‘ग्रेस’ यांच्या ‘आई’ कवितेमध्येही ‘तशी सांजही आमुच्या दारी, येऊन थबकली होती’ म्हणून दारापाशी येतात तेव्हा हेच ‘दार’ खिन्न करून टाकते. ‘ती गेली तेव्हा रिमझिम निनादणारा पाऊस’, ‘मेघात मिसळलेली किरणे सोडवणारा सूर्य’, ‘हलकेच पाचोळा उडवणारा वारा’ आणि अशा त्या सांजवेळी आणखीच विषण्ण करून टाकणारा ‘खिडकीवर टांगलेला धुरकट काचांचा मिणमिणता एकाकी ‘कंदील’!’
‘ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो’ आणि ते अंगण जेव्हा तिने पार केलं त्या क्षणी ‘आई गेली आणि बरोबरच माझं बालपणही घेऊन गेली’ ही जहरी जाणीव काळजात गेली. नाद, गती, प्रकाशासह पाषाणावर लेणं कोरावं तसा हृदयावर छिन्नी चालवून तो क्षण, ती भावावस्था कोरली गेली आहे आणि त्यामुळे ते दु:ख चिरंजीव/ चिरंतन झाले आहे.
या सर्व भोवतालासह ते खिन्न, उदास घर, घराचे दार, ते अंगण, कंदील टांगलेली खिडकी आणि आपलं संपलेलं बालपण पाहत घनव्याकुळ उभा ‘तो’.. असं वाचकाच्याही नजरेसमोर साकारलं जातं.
‘ग्रेस’ यांच्याच ‘सोन्याच्या मोहरा’मध्ये मात्र घराची अवस्था दयनीय असली तरी दोघांच्या प्रीतीमुळे एक अनोखा उत्साह, उल्हास भरून राहिला आहे.
‘गेले ते उकरून घर, नाही भिंतींना ओलावा’ असं असलं तरी हरकत नाही. तू आणि मी आहोत ना मग ‘भर ओंजळी चांदणे, करूं पांचूचा गिलावा.’ आढय़ाला छप्पर नाही तर नाही, लिंबोणीची सावली आणू आणि वळचणीच्या धारांना ‘चंद्राची झाल्लर’ लावू. घरं दगडा-विटांची नसतात, तर ती बांधली जातात त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या प्रेमाने. म्हणूनच सगळे अभाव असताही ‘चंद्राची झाल्लर’ लावण्याचा हुरूप त्या दोघांत आहे.
नाटय़गृह-रंगमंच-नाटक आणि आपलं आयुष्य यांची सरमिसळ झालेली दिसते ती ‘सौमित्र’ यांच्या ‘बिटवीन द लाइन्स’ या कवितेत. तालमी करून करून प्रेम जडलेली संहिता.. पण शेवटच्या प्रयोगानंतर त्या शब्दांचं काय होतं? ग्रीनरूममधून निघताना व्यक्तिरेखेचे प्राणच जणू तिथून बाहेर पडतात- प्रेमाचे भावबंद तटकन तोडावेत तसं. रंगमंच एकदम भकास होतो.
‘विझलेले दिवे, मनात रडणाऱ्या बापासारखे’- वाटतात. ‘सतत आपल्यात कुणीतरी असावं’ असं वाटणाऱ्या, पण आता रिकाम्या झालेल्या खुच्र्या! नाटय़गृहाचा अविभाज्य भाग असलेला प्रेक्षक आता शांत झोपलेला, पण थिएटरला मात्र जवळचं कुणी गेल्यावर लागते तशी दाट झोप लागलेली. आता उद्या दुसरे नाटक! मग नाटय़गृहातल्या दिव्यांना पेटावं लागतंच! जसं माणूस गेल्यावरही प्रेमाची माणसं जगतच राहतात. नवा सेट रंगमंचावर रांगू लागेल.
‘जवळचं कुणी गेल्यावर, बळेबळे हसत आजी
नातवंडाला खेळवत राहते तसं..’
दोन ब्लॅक-आऊटच्या मध्ये प्रवेश असावा तसं आयुष्य! नाटक, प्रेक्षक, प्रेक्षागृह, उघडे-बंद दिवे, प्रकाशझोत, रंगमंच असं थिएटर नजरेसमोर राहतानाच त्याबरोबरीनं आयुष्याच्या घडणीची जाणीव, भोवताल, माणसं त्यांच्या भावभावना, जगण्याची, हसण्याची अपरिहार्यता असा सगळा दोन ओळींच्यामध्ये अदृश्य असणारा; पण न सांगितलेला अर्थ समजत जाणं त्यामुळे हरवणारी माणसाची कोवळीक आणि आलेली जाण असं बरंच काही सांगणारी ही कविता!
जीवनात घुसलेलं थिएटर पाहिलं. तसं कुणा एकाचं सारं जीवनच व्यापलंय हॉस्टेलनं. खरं तर आयुष्याच्या तुलनेत किती कमी काळ जातो हॉस्टेलमध्ये! पण तरीही ती खोली मनात घर करून राहते आणि आठवते बारीक-बारीक तपशिलांसह.
‘या टेम्पररी रूमच्या हँगर्सवर लटकलेले
सगळे बिनधास्त शर्ट्स माझे नाहीत’..
‘एक डबा आहे अ‍ॅल्युमिनियमचा कळकट
ज्यात आहे चिवडा, लाडू आणि शंकरपाळ्यांचा अमर्याद चुरा’
चहा-सिगारेटच्या बदल्यात डायग्राम्स काढून देणाऱ्या मित्राची वाट पाहणारी अपूर्ण जर्नल्स, चहा, जामचे डाग पडलेला बेड, त्या खाली लपवलेली अश्लील पुस्तकं, रूममेटच्या कपाटावरचं धास्तावरणारं फुलसाइझ पोस्टर, ज्यामुळे तो आई-वडिलांना रूमवर आणत नाही; तारेवर वाळणारे कपडे.
अशा त्या रूमचं वर्णन करून संपूर्ण हॉस्टेल लाइफ चित्रित करणारी ‘हेमंत दिवटे’ यांची ही कविता- ‘रिवाइण्ड-२’. सगळ्या जगण्यावर त्या रूमनं आपला परिणाम केला आहे, पण थिएटर काय, हॉस्टेल काय, वास्तू आपल्यावर थेंबा-थेंबानं परिणाम करीत राहतात याची जाणीवही नसते. पण ती होते ‘वसंत पाटणकरां’ना, जेव्हा आपण घर बदलतो.
‘घर बदलून जाताना सापडतात अनेक जुन्या वस्तू
पिवळलेले जुने कागद, कपडय़ांचं बिल,
कुणाचं तरी पत्र किंवा मोडकी पेनं-’
मग गतकाल पुन्हा चाळला जातो. नवीन आयुष्याला सुरुवात होणार याचा अपार आनंद आहे; पण ही जुनी पाश्र्वभूमी या धूळभरल्या खोलीतून आता स्पष्ट दिसते. या घरात काढलेले ते क्षण-क्षण डोळ्यांसमोर फेर धरतात आणि मग अपार आनंद असूनही तो झाकोळला जातो या व्याकुळतेमुळे, याही वास्तूने आनंदाचे क्षण दिले होते ते आठवून. या अशा स्मरणरमणीयतेमुळे सदानंद रेग्यांना अडगळीची खोलीही आकर्षून घेते. अगदी नवनव्या प्रतिमा वापरूनही सगळ्या प्राणिमात्रांची वर्णी ते अचूक लावतात.
‘अडगळीच्या खोलीत येते;
कणीदार धूळ, माहेरवासाला-
वाळवीचे पांढुरके बिऱ्हाड बरोबर घेऊन’
एकदा ही खोली साकारायला सुरुवात झाली डोळ्यांसमोर की मग ‘चुकचुक पालींची गुलाबी अंडी’, ‘झुरळांची फौज’, ‘कोळिष्टकांचे स्वेटर’, ‘बाजाची पेटी’ कुरतडणारी उंदरीण आणि टेलिफोनच्या डायलसारखे डोळे फिरविणारा अलबुखारी उंदीर यांचा सिनेमा पाहण्यावरून होणारा संवाद अशी प्राण्यांची झलक दाखविल्यावर मग जरीची टोपी, आखूड चड्डी घातलेला, रंग उडालेला फोटो, सदऱ्याची बटणे, नको असणाऱ्या, पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या वस्तूंची ही खोली समोर येते. तिला ते ‘अडगळीची-वेडगळीची खोली’ म्हणतात.
अशा या तऱ्हेतऱ्हेच्या वास्तू! अनेक भरजरी क्षण आठवायला लावणाऱ्या!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा