आपल्याकडे सध्या जो विकास चालू आहे तो फक्त जास्तीत जास्त चटई क्षेत्रफळ कसे वापरायचे आणि फायदा कमवायचा एवढाच दिसतो. कुठेही त्या जागेचा, परिसराचा, उत्तम वास्तुशास्त्रीय संकल्पनांचा, मानवी सहजीवनाचा, निसर्गाचा, वारसा जपणुकीचा विचार दिसत नाही. अत्यंत कृत्रिम आणि कसलाही आगापीछा नसलेला आढळतो.
केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनेही येत्या काही वर्षांत ठिकठिकाणी स्मार्ट सिटी निर्माण केल्या जातील, अशी घोषणा केली आहे. परंतु या स्मार्ट सिटींबाबतची संकल्पना संदिग्धच आहे.
एखादी सिटी, शहर, गाव अगदी खेडंसुद्धा निर्माण होणे, वसवणे ही एक दिर्घ प्रक्रिया असते. शिक्षण, व्यवसाय, व्यापारपेठ, तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र इत्यादी कारणांनुसार तसेच जागेची, पाण्याची, मानवी जीवनास पूरक अशा नैसर्गिक, कृत्रिम साधनसामग्रीची उपलब्धता पाहून तिथे वस्ती, गाव, शहर वसते. एकदा ही बाब स्पष्ट झाल्यावर त्याची सध्याची स्थिती आणि भविष्यातील वाढ यांचा विचार करून र्सवकष नगररचना, नियम, अधिनियम (BYE LAWS) बनविले जातात. आणि त्या अनुषंगाने त्या नगराची वाढ नियोजित केली जाते. नगररचना खात्यामार्फत अशा सर्व शहरांचे आसपासच्या परिसराचे पूर्वनियोजन करण्यात येते आणि त्यानुसारच पालिका, महापालिका, महानगरपालिका शहर नियोजनावर नियंत्रण ठेवतात.
परंतु असे दिसून येते, की मुंबईच्या पूर्व पश्चिमेचा संपूर्ण परिसर, उपनगरे थेट कसारा, कर्जत, विरार, वसईपर्यंत निसर्गसौंदर्याने, डोंगरदऱ्यांनी, जंगलाने, तलावांनी, तीर्थस्थळांनी, पर्यटनस्थळांनी नटलेला असून, जुन्या गावांची पाश्र्वभूमी असूनही त्याचा विकास मात्र या कशाशीही ताळमेळ न ठेवता होत असलेला दिसतो. मुंबईत जागेची टंचाई हे कारण एकवेळ मान्य केले तरी उर्वरित पूर्व-पश्चिम पसरलेल्या भागातही उंच उंच इमारतींचे पेव फुटल्याचे दिसते. वास्तविक हा सर्व परिसर आणि नवोदित गावे, शहरे यांचा विकास अत्यंत सुंदर, टुमदार परिसरात होणे आवश्यक असताना तिथे सिमेंटच्या ठोकळेवजा उंच उंच इमारती बांधल्या जात आहेत. हा परिसर म्हणजे काही मुंबई, सिंगापूर, न्यूयॉर्क असा नाही. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असा हा परिसर विकसित करताना काही सौंदर्यदृष्टी, सौंदर्य नियोजन (AESTHETICAL CONTROL) असणे हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. उदाहरणादाखल युरोपमधील बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समधील निवासी परिसराचा एक फोटो पाहण्यासारखा आहे. आपले गाव आणि परिसराचे सौंदर्य, अभिमान कसा जपला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडे सध्या जो विकास चालू आहे तो फक्त जास्तीत जास्त चटई क्षेत्रफळ कसे वापरायचे आणि फायदा कमवायचा एवढाच दिसतो. कुठेही त्या जागेचा, परिसराचा, उत्तम वास्तुशास्त्रीय संकल्पनांचा, मानवी सहजीवनाचा, निसर्गाचा, वारसा जपणुकीचा विचार दिसत नाही. अत्यंत कृत्रिम आणि कसलाही आगापिछा नसलेला आढळतो.
या परिसरात खरे तर अत्यंत टुमदार, १, २, ३ मजली इमारतींची संकुले निर्माण होणे गरजेचे आहे. जी तेथील वातावरणाशी शोभून दिसतील. तसेच उपनगरीय निवासी वातावरणनिर्मिती करतील. खुराडीसदृश उंच उंच इमारतींच्या खोक्यांपेक्षा ही घरकुलसदृश घरे खचितच जास्त मानवी वाटतील. कारखाने, कार्यालये इ. ठिकाणी उंच उंच इमारतींच्या अनैसर्गिक, कृत्रिम वातावरणातून थकूनभागून आलेल्या मंडळींस ही घरकुले निश्चितच ‘आपली’ वाटतील. हा परिसर ‘आपला’ वाटेल. ऊठसूट वीज वाचवा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा असा उद्घोष करीत असता भरमसाट वीज, पाणी, पर्यावरणाचा नाश करणारी ही उंच उंच अमानवी घरे आपण का निर्माण करीत आहोत? छोटी छोटी घरे (इथे कमी उंचीची संकुले), छोटे छोटे रस्ते, शहराला, गावाला, वस्तीला एक मानवी चेहरा देत असतात. ती आपली वाटतात. आठवणींच्या कुपीत एखाद्या खजिन्यासारखी जपली जातात. एक तर अशी उंच उंच घरे ही घरकुले तर वाटत नाहीतच परंतु कारखाने, आजूबाजूच्या वातावरणाशी, परिसराशी काहीही घेणंदेणं नसल्यासारखी उपटसुंभ वाटतात. जी स्थळकाळाचा विचार न करता सापडला भूखंड की त्यावर बांधता येतील अशी असतात. त्यांना औद्योगिक निर्मिती FACTORY PRODUCT यापेक्षा कुठलाही मानवी स्पर्ष नसतो. इथे राहणारी माणसेही जणू एखाद्या यंत्राचे भाग असावेत असे वाटते. याव्यतिरिक्त अशी संकुले त्यांच्या उंचीमुळे अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी भरमसाट वीज आणि पाण्याचा वापर करतात. नियमानुसार करावाच लागतो. एकावर एक ठोकळे रचणे यात कंत्राटदाराचा फायदा असला तरी त्याला तिथे राहावयाचे नसते. तो फक्त माल विकण्याचा धनी असतो. मोठमोठय़ा महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे, औद्योगिक अपरिहार्यतेमुळे उंच इमारतींना पर्याय नसतो आणि तो व्यापारी उद्देश असतो. परंतु जेव्हा नगर, शहर, गाव म्हणून विकास करावयाचा असतो तिथे वेगळा विचार होणे जरूर आहे.
मानवी प्रमाणाचा (SCALE) विचार करता कमी उंचीची २, ३, मजल्यांपर्यंतची घरे ‘आपली’ वाटतात. ‘वास्तुरंग’मध्ये जुन्या वाडय़ांच्या आठवणींतून अनेकांनी आता हा अनुभव मिळत नाही याची खंत व्यक्त केलेली आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की आपण नवीन घरे, वस्ती निर्माण करीत आहोत ती माणसांना राहण्यासाठी माणसांचे कारखाने निर्मिण्यासाठी नाही. सध्या चालू आहे तो विकास मानवी मूल्ये, सौंदर्याची जाणीव (AESTHETICS), मानसशास्त्र, मानवी भावभावना या मूलभूत गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त व्यापारीकरण या एकमेव उद्देशाने करीत आहोत. नगरपालिका, महापालिका, महानगरपालिका क्षेत्र झाले म्हणजे उंच उंच इमारतींचे निवासी कारखाने बांधावयाचा परवानाच मिळाला, अशा पद्धतीने पूर्वीची सुंदर सुंदर उपनगरे, निसर्गपूर्ण परिसर यांचा काडीचाही विचार न करता राक्षसी संकुलांनी भरून टाकणे नव्हे. नवीन स्मार्ट सिटी निर्माण करण्याची अनैसर्गिक, फसवी स्वप्ने दाखविण्याऐवजी ही नवी गावे, वस्त्या, शहरेच नव्या सौंदर्यपूर्ण मानवी, नमुनेदार पद्धतीने निर्माण केली, विकसित केली तर खरोखरच दृष्ट लागावी अशी स्मार्ट शहरे, सिटी निर्माण होतील.
अलीकडे पर्यटनाच्या वाढत्या व्यवसायामुळे अनेकांनी पाश्चात्त्य, पौर्वात्य देशांच्या सहली केल्या आहेत. तिथे किती सुंदर सुंदर शहरे, गावे, पर्यटनस्थळे आहेत याची रसभरीत वर्णनेही ऐकावयास, वाचावयास, पाहावयास मिळतात. राजकीय पुढारी, ज्यांच्या हाती विकासाची सूत्रे असतात ती तर सततच या ना त्या कारणाने असे परदेश दौरे करीत असतात. परंतु तिकडचे चांगले आपल्याकडे व्हावे असे प्रयत्न दिसत नाहीत, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.
मला मध्यंतरी अमेरिका आणि युरोपचा एक छोटा प्रवास करावयाचा योग आला होता. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेटमध्ये काही दिवस राहिलो होतो. तिथे मी काही अत्यंत सुंदर गृह संकुलांच्या वसाहती पाहिल्या. प्रथम तर मला ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलांची संकुले आहेत असे वाटले. पण चौकशी करता असे आढळले की ती १, २, ३ मजल्यांची (लिफ्ट नाही) काही डुप्लेक्स पद्धतीची, काही बंगलेसदृश अशा गृहसंकुलांची, ज्यात आवश्यक दुकाने, करमणुकीची स्थाने, साधने, इ. सर्व सुखसोयी असून, विशेष म्हणजे ही सर्व घरे भाडेतत्त्वावर उपलब्ध होती. संकुलाचे एक मध्यवर्ती देखरेख गृह (ESTATE OFFICE) असून तेथून सर्व देखभाल होते असे कळले. दुसरी गोष्ट म्हणजे येथील सगळा पाण्याचा (पिण्याचे सोडून) वापर पावसाच्या पाण्याचा वापर करून केला जात होता. त्यासाठी संकुलात एक तलाव बांधला होता व त्यामध्ये संकुलातील सर्व इमारतींवरून पावसाचे पाणी जमा केले जात होते. सर्व संकुल परिसरामध्ये अत्यंत चपखलपणे मिसळून गेले होते. अमेरिकेसारख्या सधन देशात जिथे वीज, पाण्याची कमतरता नाही, तिथे ही समज पाहून आश्चर्य वाटले. यालाच उच्च निर्मितीमूल्ये, शहर, गावाप्रती आस्था आणि आदर्श निर्माण म्हणतात. या सर्व परिसरावर ARCHITECTURAL CONTROL असल्याचे जाणवले.
आपल्याकडेही गृहसंकुलांचे नियोजन करताना मोठमोठय़ा गृहसंकुलांमध्ये विविध उत्पन्न गटांसाठी स्वतंत्र नियोजन असले पाहिजे (जसे नोकऱ्यांमध्ये आरक्षण) कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट, अति उच्च उत्पन्न गट. जेणेकरून समाजातील सर्व स्तरांतील लोकांना गृहपर्याय उपलब्ध होईल.
आपला देश विकसित नव्हे तर विकसनशील अवस्थेत आहे. अशा वेळी इतर विकसित देशांनी काय केले आणि कशा तऱ्हेने आपला विकास साधला याचा अभ्यास आपल्या राजकारण्यांनी, तज्ज्ञांनी, विकासकांनी केला पाहिजे आणि आपण एक नवनिर्माण करत आहोत, करणार आहोत याचे भान ठेवून समर्पित वृत्तीने काम केले तर ‘स्मार्ट सिटी’चे नुसते गाजर दाखविण्याची वेळ येणार नाही.
आज गरज आहे ती देश घडविण्याची. आणि त्यासाठी गरज आहे ती भव्य, सुंदर भारत घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राज्यकर्त्यांची. प्रशासनाची, जनतेची, भ्रष्ट, लुटारू वृत्तीच्या गल्लाभरूंची नाही. दुर्दैवाने आज सर्वच क्षेत्रांत असे पेंढाऱ्यांचे पेव फुटलेले दिसते. त्याला नगररचनाही अपवाद नाही. अच्छे दिन आने वाले है, येईल तो सुदिन असे, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ म्हणून चालणार नाही. काय चांगले काय वाईट, याचे प्रबोधन होणे जरूर आहे.
केंद्र आणि राज्य सरकारनेही अलीकडे येत्या काही वर्षांत दहा/बारा स्मार्ट सिटींची घोषणा केली आहे. कोणतीही सिटी/शहर/गाव/वस्ती ही निर्माण होण्याची प्रक्रिया फार दीर्घ असते. ती अशी २/५ वर्षांत होणारी गोष्ट नसते. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई ही अत्यंत सुंदर वसलेली शहरे बकालपणाकडे चालली आहेत. त्यांच्या आसपासचा परिसर, उपनगरेही झपाटय़ाने अधिकृत/अनधिकृत बांधकामे/गलिच्छ वस्त्यांचा बुजबुजाट यांनी ओसंडून चालली आहेत. अशा परिस्थितीत गरज आहे ती या अनिष्ट वाढीस आळा घालण्याची आणि नव्या विकासावर कठोर नियंत्रणाची. परंतु ते न करता ‘स्मार्ट सिटी’चे गाजर दाखविणे सोपे वाटते आहे, हे खरोखरच दुर्दैवी आहे.