सरकारी सक्तीमुळे म्हणा किंवा जागरूकतेमुळे म्हणा, पण सध्या सौरऊर्जेचा वापर अनेक ठिकाणी होताना दिसतो. नव्या इमारतींमध्ये तर सौरऊर्जा सक्तीचीच करण्यात आली आहे. पण आपले संपूर्ण घरच सौरऊर्जेवर चालणारे असेल तर विजेसाठी पसे मोजणे सोडाच; आपण वीज विकून पसे कमावू शकू. हे स्वप्न नसून ते लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. मुंबईतील आयआयटीअन्स आणि रचना संसद महाविद्यालयातील मुलांनी मिळून असेच एक सौरऊर्जेवर चालणारे घर तयार केले आहे. हे घर केवळ स्पर्धा आणि प्रकल्पापुरतेच मर्यादित न ठेवता त्याआधारे मोठय़ा सौर-वसाहती बांधण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे.
वीजबिल किती येते, यावरून तुमच्या घरात दर महिन्याला चर्चा होत असेलच. वीजबिलाचे सतत वाढत जाणारे आकडे पाहून घराचा अर्थसंकल्पही कोलमडत असेल. पण लवकरच तुम्ही तुमच्या घरात तयार होणारी अतिरिक्त वीज विकून नफा कमावू शकणार आहात. आश्चर्य वाटलं ना हे वाचून! पण वीज निर्मिती करू शकणारे अनोखे सौर घर आयआयटी मुंबई आणि रचना संसदमधील विद्यार्थ्यांनी साकारले आहे. त्यांच्या या घराची कसोटी येत्या ऑगस्ट महिन्यात फ्रान्स येथे होणाऱ्या अमेरिकन ऊर्जा विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या डेक्लोथॉन या स्पध्रेत लागणार आहे. यानंतर अशा घरांचे संकुल भारतात उभारण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे.
‘घर माझे कौलारू’ ही संकल्पना आता शहरं, निमशहरं इतकेच काय तर गावातही बाद होऊ लागली आहे. कौलारू घरांची जागा सिमेंट कॉंक्रीटच्या छतांनी घेतली. आता ही जागा सौरऊर्जेचे पॅनेल्स घेऊ लागली आहेत, पण तरीही सौरऊर्जेचा वापर म्हणावा इतका केला जात नाही. आपलं संपूर्ण घर सौरऊर्जेवर आधारित असेल तर आपण आपली विजेची क्षमता पुरवून काही प्रमाणात ही वीज सरकारला विकूही शकतो आणि नफाही कमावू शकतो, अशी अनोखी शक्कल लढवून सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आर्किटेक्चर अशा विविध क्षेत्रातील ७८ जणांच्या टीमने संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारे घर तयार केले आहे.
अमेरिकेतील ऊर्जा विभागातर्फे दोन वर्षांतून एकदा सौरऊर्जेच्या घरांची स्पर्धा घेतली जाते. या स्पध्रेसाठी म्हणून या ७८ जणांच्या ‘टीम शून्य’ने सन २०१२मध्ये पेपर सादर केले होते. यावरून जगभरातील २० अंतिम संघांमध्ये त्यांची निवड झाली आणि त्यांनी स्पध्रेच्या निकषांप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली.
घराची रचना
स्पध्रेच्या निकषांनुसार घराची रचना करणं आवश्यक होतं. यामुळे त्यांनी ते निकष आणि भारतीय गरज यानुसार काम करण्यास सुरुवात केली. हे घर ७०० चौरस फुटांमध्येच बांधावयाचं होतं. याचबरोबर हे घर फोल्डिंगचं करावयाचं होतं. कारण फ्रान्समध्ये स्पध्रेच्या ठिकाणी नेऊन ते पुन्हा त्यांना सेट करावयाचं होतं. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी संगणकाच्या मदतीनं घराची प्रतिकृती तयार केली. ही करत असताना वास्तुशास्त्राचाही विचार केला गेला. याचबरोबर काही रचना या वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून करण्यात आल्या. या घरात हॉल, स्वयंपाक घर आणि बेडरूम अशा तीन खोल्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये आकर्षक फíनचरही आहे.
तांत्रिक बाबी
सौरऊर्जेमुळे घरात उष्णता निर्माण होते असे म्हटले जाते. यासाठी या विद्यार्थ्यांनी घराच्या भिंतींसाठी फायबर सिमेंट बोर्डस्चा वापर करण्यात आला. यामुळे तापमान नियंत्रणात राहते. याशिवाय या घरात सौरऊर्जेवर चालणारे एसी बसविण्यात आले आहेत. यामुळे आपण घरातील तापमान नियंत्रणात ठेवू शकतो. या एसीमधून येणाऱ्या गरम हवेचा वापर करून त्याला जोडून विद्यार्थ्यांनी कपडे वाळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय स्पध्रेच्या नियमांनुसार घरात विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारे डिश वॉशरही तयार केले आहे. याशिवाय या घरातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुर्नवापर घराभोवतीच्या झाडांसाठी करण्यात येऊ शकतो. या घराला टू-वे मीटिरग असणार आहे. म्हणजे सकाळी आपण सौरऊर्जेच्या माध्यमातून घरात वीज वापरू शकतो. तर संध्याकाळी आपण सरकारी वीज वापरू शकतो. सकाळी तयार झालेली अतिरिक्त वीज जर आपण सरकारला विकली तर त्यातून आपल्याला फायदाच होऊ शकतो, असे गणित या विद्यार्थ्यांनी मांडले आहे.
पावसाळ्यात जेव्हा सूर्यप्रकाश कमी असतो त्या कालावधीतही आपण २०टक्के वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करू शकण्याची क्षमता या घरावर लावण्यात आलेल्या पॅनेल्समध्ये असल्याचे विद्यार्थी सांगतात. या घराच्या बाहेर ४.५ चौरस मीटर परिसरात सौरऊर्जा साठविण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. हे घर स्मार्ट घर असून याचे नियंत्रण आपण आपल्या मोबाइलमधूनही करू शकणार आहोत. यासाठी विद्यार्थ्यांनी झिगबीच्या होम ऑटोमेशनचा वापर केला आहे. याच्या मदतीने आपण घरातील सर्व वस्तू ऑपरेट करू शकतो. याचबरोबर यामध्ये आपल्याला घरात सध्या किती वीज वापरली जात आहे, याची माहितीही मिळू शकते.
अन्य उपकरणे
या स्पध्रेच्या नियमांनुसार घरामध्ये सर्व अत्याधुनिक उपकरणे असणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारे ओव्हन, कपडे वाळविण्याचे यंत्र, एसी, डिश वॉशर तयार केले आहेत. या सर्व उपकरणांचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.
घराची किंमत
सध्या या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या संकुलात अशाप्रकारचे एक घर तयार केले आहे. याच घराचे भाग वेगळे करून ते फ्रान्सला स्पध्रेत घेऊन जाणार आहेत. याचबरोबर स्पध्रेच्या नियमांनुसार घरात वापरावी लागणारी उपकरणे, तसेच जास्त (फ्रान्समध्ये सूर्यप्रकाश तसा कमी असल्याने) सौरऊर्जेचे पॅनल्स बसवावे लागले आहेत. या सर्वामुळे या घराची किंमत जमिनीची किंमतवगळता ३५ लाखांपर्यंत झाली आहे. पण भारतीय गरजांच्या दृष्टीने जर हे घर विकसित केले तर याची किंमत २५ लाखांपर्यंत येऊ शकते, असा दावा विद्यार्थी करतात.
भविष्यवेध
सध्या स्पध्रेसाठी तयार करण्यात आलेले घर भविष्यात प्रत्यक्षात उतरवून सौरऊर्जेवर चालणारी घरे भारतात विकसित करण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी तयारीही सुरू केली आहे. पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये देशात अशाप्रकारची घरे उभारली जातील असे या विद्यार्थ्यांना वाटते. सध्या बनविण्यात आलेले घर हे विद्यार्थी फ्रान्समधून परतल्यावर पुन्हा आयआयटीच्या संकुलात उभारतील आणि त्या घरात विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील प्रकल्पासाठी प्रयोगशाळा आणि कार्यालय विकसित केले जाईल, अशी माहिती विद्यार्थी देतात.
हे घर प्रत्यक्षात वापरात येईल की नाही हे आत्ताच सांगणे तसे कठीण आहे, पण या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उपकरणे मात्र नक्कीच उपयोगात येऊ शकतील. तसेच जर या विद्यार्थ्यांचे घराचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेले, तर ते देशाच्या दृष्टीने खूप फायद्याचे ठरेल. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा वापर तसेच वीज बचत या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल.