स्मारके, पुतळे उभारताना वास्तुशास्त्र आणि नगररचना यांचाही प्रामुख्याने विचार होणे गरजेचे असते, पण नेमक्या याच गोष्टींचा आपल्याला विसर पडला आहे.
स ध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांवरून आणि जमिनीच्या वादावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व वादविवादांतून त्या महान विभूतींबद्दलच्या आदर भावनेपेक्षा लोकांच्या भावनांना हात घालून आपापल्या पक्षाची, विचारांची, सामाजिक प्रतिष्ठेची पोळी भाजून घेण्याची भावना प्रकर्षांने जाणवते.
बाळासाहेबांच्या दहनस्थळीच त्यांचे भव्य स्मारक करावे, असे मत प्रदर्शित करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावाशी वाटते. आधीच तेथे शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. मैदानही खेळांसाठी राखीव आहे. आता तिथे भव्य स्मारक करावयाचे म्हणजे काय? पुन्हा एखादा पुतळा?
जेव्हा आपण भव्य-दिव्य स्मारके, पुतळे यांचा विचार करतो तेव्हा ते कोणासाठी आहेत? त्यांची जागा कुठे असावी? याचा वास्तुशास्त्र आणि नगररचनेच्या दृष्टिकोनातून विचार होणे फार गरजेचे आहे. असा विचार करणे किती महत्त्वाचे आहे याची उदाहरणे पाहण्यासाठी आपल्याला फार लांब जाण्याची गरज नाही. आपल्या आसपासच अशी अनेक उदाहरणे आहेत. फक्त डोळे उघडे ठेवून पाहण्याची आणि जबर इच्छाशक्ती आणि सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा जागृत असण्याची गरज आहे.
आपल्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे इंग्रजांनी भारतात जागोजागी आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्मारके फार भव्य स्वरूपात करून ठेवली आहेत. जी अजूनही शेकडो वर्षे मार्गदर्शक ठरू शकतात. उत्तम वास्तुकला, शिल्पकला, नगररचना यांची ती जितीजागती स्मारके आहेत. उदाहरण द्यायचे तर उत्तर मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (आता छत्रपती शिवाजी म्युझियम), व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन (आताचे सी.एस.टी.), मुंबई विद्यापीठ, गेटवे ऑफ इंडिया, काळा घोडा अशी उत्तम उदाहरणे देता येतील. त्यांच्याजवळपास जाईल असे एखादे तरी स्मारक आपण उभारले आहे का? कारण महापुरुषांची नावे घेऊन पुतळे उभे करणे आणि विशेष प्रसंगी त्यांना हारतुरे घालणे यापलीकडे आपली धाव जात नाही. गावोगावी छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ पुतळे उभे आहेत, पण ना कसली नगररचना दृष्टी, ना परिसर सुधारणा, ना कुठली सौंदर्यदृष्टी! एक उदाहरण सांगतो. ठाण्याच्या तलावपाळीच्या तलावात शिवरायांचा पुतळा आहे. त्याच्या बाजूलाच एक जिनासदृश शिडी कायमची उभी आहे. वेळप्रसंगी महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्यापुरता तिचा उपयोग असावा. परंतु पुढाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून महाराजांना ती सांभाळावी लागते, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. असाच आणखी एक नमुना माझ्या पाहण्यात आला. महात्मा गांधींचा काठी घेऊन चाललेत असा उभा पुतळा आहे. तो ज्या चौथऱ्यावर आहे त्याला एक कायमची शिडी लावली आहे. असे वाटते की, बापू आता लवकरच ती शिडी उतरून खाली येतात की काय? असो.
पुतळे, स्मारके उभी करताना शहर रचनेच्या दृष्टीने फार विचार करावा लागतो. कारण ही स्मरके, पुतळे त्या शहराचे, इतिहासाचे, संस्कृतीचे, अस्मितेचे मानबिंदू असतात. शहराची शोभा आणि दर्जा दाखविणारी असतात. असे पुतळे, स्मारके देशोदेशी पाहावयास मिळतात आणि ती स्थळे पर्यटकांची आकर्षण स्थळे होतात. त्या त्या देशाच्या, संस्कृतीच्या, इतिहासाच्या, सन्मानाच्या स्मृती म्हणून त्या अजरामर होतात. इथे फक्त भव्यतेचाच विचार नसतो तर त्या परिसराचा, शहराचा, कलेचा, कलाकाराच्या अलौकिक कलेचा, इतिहासाचा, दंतकथांचा, विद्वत्तेचा त्या आविष्कार स्वरूप असतात. त्या त्या देशाचा वारसा जपत असतात. त्यात अनेक पदर गुंफलेले असतात. मग एखादे छोटेसे स्मारकही अजरामर होऊन जाते. उदाहरण द्यायचे तर नेदरलँड येथील कोपेनहेगेनच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका खडकावर साकारलेले जलपरीचे शिल्प! फार छोटेसे असे हे शिल्प अजरामर होऊन पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाले आहे!
पुतळा किंवा शिल्प साकारताना ज्या व्यक्तिमत्त्वाचे शिल्प साकारावयाचे त्याच्या व्यक्तिमत्त्व मूल्याचा विचार करावा लागतो. जसे ग्रीक रोमन शिल्पकारांनी साकारलेली अजरामर शिल्पे त्यातील अत्यंत प्रमाणबद्ध आखीव-रेखवी शरीरसौंदर्याचे उदात्त नमुने म्हणून साकार झाले आहेत. दैवी वाटावे असे ते सौंदर्य वाटते किंवा एखादे राक्षसी व्यक्तिमत्त्वही कलाकाराला आव्हानात्मक वाढू शकते-जसे नरसिंहाचे रुद्रभीषण रूप! सांगायचा मुद्दा पुतळ्याच्या शिल्पात त्या व्यक्तिमत्त्वाचे शिल्प मूल्य महत्त्वाचे असते. यावरून हे लक्षात येईल की, पुतळे आणि स्मारके ही नगररचना, वास्तुशास्त्र, शिल्पकला यांतील फार महत्त्वाची अंगे आहेत. ती फार काळजीपूर्वक हाताळावी लागतात.
प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, व्हिक्टोरिया टर्मिनस, मुंबई विद्यापीठ, गेटवे ऑफ इंडिया अशा एक ना अनेक उपयुक्त आणि भव्य-दिव्य स्मारकांनी आपल्या वास्तुकलेचा, नगररचनेचा, उच्च अभिरुचीचा, परंपरेचा, शैक्षणिक, राजकीय योगदानाचा ठसा देशात जागोजागी मागे ठेवून गेलेल्या परकीय राजवटीचा ठसा पुसता म्हटले तरी पुसता येईल का? नाही ना? कारण ही स्मारके क्षुद्र भावना शमविण्यापुरती नव्हती आणि नाहीत, तर आपल्या राजकीय राजवटीचा, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ठसा आणि दरारा बसविणारी आहेत. उत्तम कारभार आणि दर्जा दर्शविणारी आहेत. आपण त्यातून वाईटाचा त्याग करून चांगले ते स्वीकारायला तयार व्हायला हवे. एवढे जरी आपण शिकलो तरी खूप झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा