एक साधा माठ.. वर्षभर मी वापरतो काय आणि त्यातून माझ्या घरात नव्या गोष्टींचा, संस्कारांचा शिरकाव होतो काय; सारीच मजा. माझ्या घरात सजलेल्या मातीच्या अनेक वस्तूंनी मला तीन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. ही सारी घडणावळ, मातीच्या वस्तूंचा हा सगळा व्यवसाय एक क्राफ्ट आहे.
वर्षभरापूर्वी मी नवं घर घेतलं आणि ती पहिल्यांदा घरी आली. तिच्या ख्यातीला साजेशी एक भेटवस्तू तिने अगदी अपेक्षेप्रमाणे आणली. एक स्टीलची तिपाई आणि त्यावर बसणारा एक झक्कास, गोल गरगरीत पाण्याचा माठ! आमची ही मत्रीण अख्ख्या कंपूत ‘माठ’ या नावानेच फेमस आहे. आमच्या मित्रांची घरं झाली, तेव्हा तिच्या या अजब भेटीची आम्ही सगळ्यांनीच टिंगल केली. अगदी यथेच्छ!
परवाच तिने दिलेला माठ चांगला वर्षभराने फुटला, तेव्हा चक्क रजा घेऊन मी ठाण्यात माठ हुडकत फिरत होतो. इतकंच नाही तर गरज पडली तर असावा म्हणून एक नाही तर दोन माठ विकत घेतले. तिच्या अजब भेटवस्तूने माझ्या घरात आणि एकंदरच आयुष्यात जी गंमत घडवून आणली, त्यामुळे इतर मित्रांप्रमाणेच मीदेखील तिच्या नमुनेदार कल्पकतेचा चाहता झालो आहे, हे मान्य करावंच लागेल.
वाचकहो, जरा घरात एक फेरी मारून पाहा. आपल्या घरात कितीशा गोष्टी मातीच्या आहेत? पूर्वी असणाऱ्या अनेक मातीच्या गोष्टींची जागा आता नव्या गोष्टींनी घेतली आहे. माठाऐवजी आता आम्हाला फ्रिजचंच पाणी लागतं. चिनीमातीच्या लोणच्याच्या बरण्यांची जागा गायबच झाली आहे. अहो इतकंच कशाला, आता घरी येणारे गणपती बाप्पादेखील शाडूच्या मातीऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतात. माझ्या घरी माठ आला आणि या सगळ्या गोष्टी खुपायला लागल्या.
माठातलं गार, वाळ्याचं पाणी पिताना किती तरी वर्षांनी चवीने पाणी प्यायलो. पाणी बाटलीतून थेट घशाऐवजी फुलपात्रातून, जिभेवर थोडंसं रेंगाळत पोटात गेलं, तेव्हाचा अनुभव वेगळा होता. बर्फगार पाण्याच्या झटक्याच्या जागी मातीच्या चवीचं, वाळ्याच्या वासाचं, शीतल पाणी श्रांत करून गेलं. किती वर्षांनी पाणी प्यायल्यासारखं वाटलं. माठ ही फक्त सुरुवात होती. हळूहळू माझ्या घरातल्या अनेक गोष्टी मातीच्या होऊ लागल्यात. सगळ्यात पहिल्या म्हणजे माझ्या अंगणातल्या आणि व्हरांडय़ातल्या रोपांच्या कुंडय़ा मातीच्या झाल्या. मग आली पाळी छोटय़ा छोटय़ा रोजच्या वापरातल्या गोष्टींची. जेवायच्या टेबलावरचं प्लॅस्टिकचं चमचाळं मोडलं तेव्हा त्या जागी मातीची छोटी सुबक कुंडी आणली. माझ्या अभ्यासिकेतल्या मेजावरच्या पेन-पेन्सिलसाठी सुबक सुरईसारखी मातीची भांडी आली. न्हाणीघरात बेसिनशेजारी दात घासायची, दाढीची उपकरणं ठेवण्यासाठी मातीच्या छोटय़ा कुंडय़ा आणल्या. सगळ्यात कमाल केली ती मातीच्या एका अचानक मिळालेल्या डिशने.. ‘माठ’च्या सांगण्यामुळे मी ती घेतली. त्यात घरात असलेल्या १०-१२ काचेच्या गोटय़ा ठेवल्या आणि त्यावर माझा साबण विराजमान झाला. साबणातलं पाणी गोटय़ांमधून पटकन झिरपतं आणि मातीच्या डिशमध्ये शोषलं जाऊन सावकाश वाळतं. साबण नेहमी कोरडा राहतो. एकूणच न्हाणीघराला एक युनिक लूक मिळाला आहे. आता माझ्या घरात अनेक गोष्टी मातीच्या आहेत. रस्त्याकडेला कुंडय़ा, रोपं विकणारी विक्रेती असतात, त्यांच्याकडून मातीची सुबक घडण असलेली, रंगकाम केलेली िवडशाईम्स आणली आहेत. त्यांची मधुर किणकिण मनाला सुखावते. एक मोठ्ठ घंगाळं मिळालं ऐरोलीजवळच्या एका विक्रेत्याकडे. त्यात घरात कांदे-बटाटे ठेवतो. प्लॅस्टिकच्या टोपलीला रामराम. पुण्याच्या कुंभार-बाजारात झक्कास फुलदाण्या मिळाल्या आहेत. लवकरच घरात दोन तीन ठिकाणी त्या फुलदाण्यांतून सुबक फुलं ठेवलेली दिसतील. माझं हे नवं वेड लक्षात घेऊन मावसबहिणीने भीमथडीहून मातीच्या छोटय़ा मूर्ती आणल्या माझ्यासाठी.. गणपतीच्या. खेळणारा, वाद्यं वाजवणारा, संगणकावर काम करणारा, मोबाइलवर बोलणारा.. एक ना अनेक रूपातला गोजिरवाणा बालगणेश. सहा वेगवेगळ्या मूर्त्यां माझ्या घरात सजल्या आहेत. घरी येणाऱ्या मुलांना या सजावटीची मौजच वाटते.
सगळ्यात नवी खरेदी म्हणजे एक मोठ्ठा मातीचा थाळा. हा बनवला असेल उथळ मातीत लीलीवगरेसारखी छोटी रोपं लावायला, मी मात्र वापरतो लॅपटॉप स्टॅण्ड म्हणून. टेबलावर उलटा ठेवून त्यावर माझा लॅपटॉप ठेवला आहे. मातीच्या सच्छिद्र भांडय़ाचा खालच्या पोकळीतली हवा थंड राहते, साहजिकच लॅपटॉप कुिलगचं काम सहज होतं आहे. हं, वापरायला घ्यायच्या आधी चांगला तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतला, जेणेकरून त्यावरची माती, धूळ संपूर्णपणे निघून गेली. माझ्या मित्रांकडच्या सहासात हजारांच्या, वीज वापरणाऱ्या लॅपटॉप कूलर्सपेक्षा माझी ही स्वस्त कल्पना अधिक कूल आहे हे सगळेच बिनदिक्कत मान्य करतात.
एक साधा माठ.. वर्षभर मी वापरतो काय आणि त्यातून माझ्या घरात नव्या गोष्टींचा, संस्कारांचा शिरकाव होतो काय; सारीच मजा. माझ्या घरात सजलेल्या मातीच्या अनेक वस्तूंनी मला तीन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. ही सारी घडणावळ, मातीच्या वस्तूंचा हा सगळा व्यवसाय एक क्राफ्ट आहे. ही मंडळी या मातीतली, या गावची आहेत. या वस्तू बनवण्यासाठी लागणारं कसब, मेहनत सारी माझ्या माणसांची आहे. कुठे चीन-जपानमध्ये बनलेला, भारतात आयात झालेला आणि मॉलमध्ये सजलेला साचेबद्ध पसारा नाही हा. माती ितबवताना एकतान होणारी, चाकावर माठाला आकार देताना एकाग्र होणारी ही मंडळी आहेत. माझ्या घरात असलेली प्रत्येक एक वस्तू एकमेव आहे. अगदी साच्यातले गणपती असले तरी त्या प्रत्येकावर केलेलं रंगकाम एकमेव आहे. प्रत्येक माठ वरवर एकसारखा वाटला तर प्रत्येकाची घडण, पोत, बठक वेगळी आहे. या वस्तू घरात यायला लागल्या आणि जाणवलं घरात एक ऊब आली आहे. या प्रत्येक वस्तूतून मी जिथे वास्तव्य करतो, त्या मातीशी माझी नाळ जोडली गेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक कच्चा माल, स्थानिक कसब आणि स्थानिक पातळीवरच विपणन होत असल्याने यातला बराचसा व्यवसाय पर्यावरणासाठी फारसा घातक नाही. शिवाय यापकी कोणतीही वस्तू तुटली-फुटली तरी त्याचा पुनर्वापर किंवा विल्हेवाट अगदी सहज लावता येते. प्रामुख्याने या मातीच्या रंगकामासाठी पारंपरिक, जैविक रंग वापरले जातात. भडक, टिकाऊ आणि आकर्षक असण्यासोबतच हे रंग पर्यावरणास अनुकूल असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजही छोटय़ा शहरांतून, खेडय़ापाडय़ांतून मातीच्या गोष्टी आठवडी बाजारापासून कुंभारवाडय़ापर्यंत सर्रास मिळतात.
माझ्या घराला एक हटके लुक देण्यात या मातीच्या वस्तूंचा मोठाच वाटा आहे, मात्र फक्त दिखाऊ नाही, या वस्तू नकळत माझ्या घराची संस्कृती घडवताहेत. माझा छोटा भाचा कार्टूनमधल्या बालगणेशापेक्षा माझ्या घरच्या बालगणेशावर अधिक फिदा असतो. श्रीमामाच्या अभ्यासाच्या टेबलसारखाच पेनस्टॅण्ड त्याला हवा असतो आणि माझ्या घरचं पाणी जादूचं आहे यावर त्याचा ठाम विश्वास आहे. कारण आमच्या माठात वाळ्यासोबतच आलटून पालटून पुदिना, धणे, जिरे, ओली हळद, आलं, गवतीचहा अशा अनेक गोष्टींच्या पुरचुंडय़ा सोडल्या जातात. त्यामुळे पाण्याची चव नेहमीच पौष्टिक आणि बदलती राहते.
या वस्तूंचं अनोखं महत्त्व घरचा माठ फुटला तेव्हा अधोरेखित झालं. घरात साठीच्या वर पोहोचलेल्या माझ्या बाबांच्या हातून माठ फुटला. रिकामा माठ धुवून तिपाईवर ठेवताना अंदाज चुकला, पण त्यांनी सांगितलेली गंमत पुढेच आहे. माठ फुटल्यावर बाबाला कसनुसं वाटलं, मात्र काचा गोळा करायचं दिव्य समोर नव्हतं. मातीचे कपचे हाताने गोळा केले. छोटे तुकडे कुंच्याने एकत्र करून कुंडय़ांत टाकून दिले. काम झालं! फ्रिजमधल्या काचेच्या बाटल्यांसारखं दडपण नाही. बाबाला मधुमेहाचा त्रास आहे. अनेकदा घरात काचेची गोष्ट फुटली म्हणजे कुठं काच राहिली नाही ना, त्याच्या पायाला लागून जखम तर होणार नाही ना, याचं दडपण आम्हा साऱ्यांच्या मनावर येतं. मातीच्या वस्तू फुटल्यावर मात्र असं होत नाही. माझ्या घरातल्या या मातीच्या क्रांतीसाठी बाबाच्या पसंतीची पावती म्हणजे त्याने मागल्या आठवडय़ात एक मातीचं नक्षीदार भांडं खास त्यांच्या खोलीसाठी आणलं आहे.. त्यात त्यांच्या खोलीत फळं भरून, ओल्या टॉवेलने झाकून थंड ठेवली आहेत.
थोडी कल्पकता दाखवली तर अनेक प्रयोगांतून, छोटय़ा छोटय़ा बदलांतून आपल्या घरात अंतर्बाह्य बदल आपण घडवून आणू शकतो. घरातल्या वस्तू, सजावट दिखाऊ न राहता, टिकाऊ संस्कार करू शकतात. मायेचे.. संस्कृतीचे.. पर्यावरणस्नेहाचे.. पाण्याचा माठ हे निमित्त, आणि एक सुरुवात असू शकते हे मात्र खरं, तेव्हा एक सुबक घडणीचा माठ घरी आणून पाहा बरं.
चिऊचं घर : माठ : एक सुरुवात
एक साधा माठ.. वर्षभर मी वापरतो काय आणि त्यातून माझ्या घरात नव्या गोष्टींचा, संस्कारांचा शिरकाव होतो काय; सारीच मजा. माझ्या घरात सजलेल्या मातीच्या अनेक वस्तूंनी मला तीन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. ही सारी घडणावळ, मातीच्या वस्तूंचा हा सगळा व्यवसाय एक क्राफ्ट आहे.
First published on: 16-02-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of a clay pot in my house