काष्ठ, संगमरवर, माती, प्लॅस्टर, ब्राँझ अशा  विविध माध्यमांतून शिल्प साकारणाऱ्या सचिन चौधरी यांच्या ‘सृजन’ या स्टुडिओविषयी..
शिल्पकार सचिन चौधरी आज समकालीन आधुनिक शिल्पकलेच्या क्षेत्रात नावारूपाला आले आहेत. जे काही करायचे ते शिल्पकलेसाठी आणि शिल्पकलेतूनच या ध्येयाने त्यांची वाटचाल सुरू आहे. चित्र-शिल्पकलेच्या क्षेत्रात नावारूपाला येणे, आर्थिकदृष्टय़ा स्थिरावणे सहज सोपे नाही. ही वाट बिकट आहे, हे माहिती असूनही त्या वाटेवर पावले टाकीत काही प्रतिभावंत आपला ठसा तेथे उमटवतात. कलानिर्मितीची प्रबळ ओढ त्यांना त्या बिकट वाटेवर नेत राहते आणि त्यांची सर्जकता व ध्यास कलेचे क्षेत्र समृद्ध करीत जाते. अशा कलाकारांपैकी सचिन चौधरी हे एक हुन्नरी शिल्पकार.
जहाँगीर आर्ट गॅलरीजवळील मुख्य रस्त्यावर त्यांचे शिल्प प्रदर्शित झाले होते. शुभ्र संगमरवरातील ती आगळी वेगळी कासवाची शिल्पाकृती अनेकांच्या स्मरणात असेल. त्यासाठी विशिष्ट आकार दिलेले संगमरवराचे फरशी सारखे तुकडे एकत्र जोडले होते. त्या ‘धन-ऋण’ आकारातून निर्माण केलेली लय व सूचित केलेला आशय त्यांच्या कल्पकतेची झलक देणारे होते. काष्ठ (लाकूड), संगमरवर, माती- प्लॅस्टर, ब्राँझ अशी विविध माध्यमे वापरण्यात ते निष्णात आहेत. जहाँगीर आर्ट गॅलरीत भरविलेले त्यांचे ब्राँझमधील शिल्पाकृतीचे प्रदर्शन रसिकांनी वाखाणले होते. त्यांचे नाव प्रामुख्याने काष्ठ माध्यमाशी जोडले गेले आहे. त्यांनीही या माध्यमाच्या वेगवेगळ्या शक्यता आजमावित अनेक प्रयोग केले. या माध्यमात आत्तापर्यंत त्यांनी सुमारे दोनशे पंचाहत्तर शिल्पाकृती घडविल्या आहेत.
चौधरी यांचा स्टुडिओ मुंबईजवळील वसईतील निर्मळ येथे शांत, निसर्गरम्य परिसरात आहे. स्टुडिओ व घर एकाच छपराखाली वडिलोपार्जित जमिनीवर उभारले आहे. पुढची बाजू घराची आणि स्टुडिओचा पसारा मागील बाजूस आहे. १९९७ पासून ते या स्टुडिओत काम करीत आहेत. स्टुडिओची उंची पहिल्या मजल्यापर्यंत म्हणजे १७ फूट ठेवली आहे. काम करण्यासाठी २०x१८ फू. ची जागा मोकळी मिळते. व्यक्तिशिल्पासारख्या वास्तववादी कामासाठी भरपूर प्रकाशाची गरज असते. त्यासाठी येथे भिंतीऐवजी बरीच उघडी मोकळी जागा ठेवली आहे. सध्या तरी तीन बाजूंनी प्रकाश आत येण्याची सोय आहे. कामाच्या गरजेनुसार प्रकाशाची तीव्रता काही वेळा कमी करावी लागते. अशावेळी त्या बाजूला पडदा लावून, त्या बाजूने येणारा प्रकाश सौम्य केला जातो. दरवाजातून आत शिरले की समोर दिसणारी लाल विटांची भिंत आणि तिची दणदणीत उंची नजरेत भरते. एका बाजूला साहित्य, हत्यारे ठेवण्याचे कपाट आहे. एक आडवे टेबल आहे. बसायला दोन-तीन खुच्र्या असे माफक फर्निचर आहे. बसल्या जागेवर तेथून बाहेरचा निसर्ग दिसतो. एका वेळी तिथे तीन – चार जण काम करू शकतात. सकाळी नऊच्या दरम्यान ते स्टुडिओत येऊन कामाला सुरुवात करतात. सृजनशील कलाकृती निर्माण करीत असताना वेळेचे कोणतेच गणित किंवा बंधन नसते. तथापि ही कामे शारीरिक श्रमांची असल्यामुळे दिवसभराच्या कामाने संध्याकाळी शीण येतो. साधारणपणे संध्याकाळी सहा-सात नंतर काम बंद केले जाते. लाकडाच्या ओंडक्यावर काम करताना  बसून काम करण्याची त्यांची सवय आहे. आवश्यक ती हत्यारे जवळ पसरून ठेवलेली असतात. कामासाठी लागणारे लाकूड सुतारांप्रमाणेच लिलावात विकत घेतात. पोकळ वेडीवाकडी लाकडे सुतारांना फर्निचरसाठी नको असतात. ती किंवा कोणत्याही लाकडाचा साठा ते करून ठेवतात. एकावेळी तीस पस्तीस हजार रुपयांचे लाकूड सहज घेतले जाते.
 लाकडाला कीड लागू नये व ते अधिक टिकावू व्हावे म्हणून त्या लाकडांवर स्टुडिओत प्रक्रिया केली जाते. पॉलिश लावून त्याची छिद्र बंद केली जातात. अशा प्रक्रिया केलेल्या लाकडातून कलाकृती घडविली जाते. सुरुवातीला वसईमध्ये त्यांना सहजपणे लाकूड मिळे. पूर्वीच्या जुन्या घरांत जमीन, छत अशा अनेक ठिकाणी लाकडाचा वापर असे. वसईत अशी जुनी मोडकी घरे होती. ती लाकडे उपयोगात यावीत म्हणून काहीजण त्यांना स्वत:हून लाकडं आणून देत. लाकडाच्या विविध नैसर्गिक आकारांचा, रंगछटांचा कल्पक वापर ते कलाकृती घडविताना करतात. लाकडाशी त्यांचा सूर असा काही जुळला आहे की ओबडधोबड आकारातले लाकूड जरी समोर आले तरी त्यात त्यांना कलाकृतीचा घाट दिसू लागतो. लाकूड निरखता निरखता कधीतरी हलकेच हत्यारे हातात घेतली जातात व त्यावर कामाला सुरुवात केली जाते. मनात चोहोबाजूंनी तो आकार कसा विकसित होईल असा विचार घोळत राहतो. काहीवेळा त्यावर त्यासाठी खुणा केल्या जातात. अशा प्रकारे कधी कधी एकाच वेळी चारपाच शिल्पांवरही ते काम करतात. रंगछटेसाठी कधीतरी पॉलिश पावडरचा किंवा कारच्या डिकोपेंटचा वापर करतात.
शिल्पकार चौधरी यांच्या निर्मितीच्या प्रेरणा त्यांच्या परिसरातच आहेत. अवती भोवतीच्या विविध वनस्पती, झाडे त्यांच्या पाहण्यात येतात. कळत नकळत त्यांचे निरीक्षण केले जाते. वनस्पतींच्या सृजनाच्या घडामोडीतील आकारवर्तनाचा वेध ते घेतात. वनस्पतींच्या कठीण खोडापासून कोवळ्या कोंबापर्यंत विविध आकार, पोत, वनस्पतींच्या वाढीत असलेली गती, सृजनाच्या लीला त्यांच्या सर्जकतेला साद घालतात. स्वत:च्या निरीक्षणाला, कुतूहलाला त्यांच्या चिंतनाचीही जोड असते. या सृजनात त्यांना एका आकारातून तसाच किंवा वेगळा आकार जन्म घेत असल्याचे प्रतीत झाले. उदा. केळफूल, मशरूम, कठीण खोडावरचे कोवळे कोंब इत्यादी. यातून त्यांना उमगलेले तत्त्व म्हणजे- ‘जीवन प्रेरणा’. एखाद्या सशक्त घटकाने लहान कोवळ्या घटकाची निगा राखण्याची, त्यांचे संरक्षण करण्याची सोय निसर्गात आहे. एक घटक दुसऱ्या घटकाला आधारभूत होतो. एकाच्या आधाराने दुसरा फळतो, फुलतो. हे त्यांना जाणवलेले तत्त्व ते आपल्या शिल्पात संक्रमित करतात. त्यांच्या शिल्पाकृती मुख्यत्वे लांबट, उभट, वरती प्रकाशाकडे झेपावणाऱ्या आहेत. त्यात आकाराचा साधेपणा व अलंकारिकता यांचा मेळ आहे. काहीवेळा दोन-चार वेगवेगळ्या आकारांच्या एकत्रीकरणातून त्यांचे शिल्प घडते. एकाच जागी खिळलेल्या वनस्पतींचीही वाढ असते. त्यात एक गती असते. ती देखील त्यांच्या हाताळणीतून तरलतेने व्यक्त होते. शिल्पकार वापरत असलेले लाकूड हे माध्यम वनस्पतीशी निगडित आणि वनस्पती सृष्टीत त्यांना जाणवणारी वैशिष्टय़े यात असणारा अतूट बंध त्यांच्या स्टुडिओच्या भेटीत मला जाणवला. शिल्प-चित्रकारांच्या प्रेरणा, त्यांची सर्जकता, त्यासाठी वापरली जाणारी माध्यमे, साहित्य या सर्वाना स्टुडिओ हा एक मूक साक्षीदार असतो.
शालेय शिक्षणानंतर कलेच्या आवडीमुळे चौधरी एकदा जे. जे. स्कूल ऑफ आर्ट केवळ बघण्यासाठी म्हणून गेले होते. तेथील शिल्पकला विभागाचा स्टुडिओ बघितला आणि ते भारावून गेले. तत्क्षणी त्यांनी शिल्पकार होण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये त्यांचे कलाशिक्षण पूर्ण झाले तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांची चार वैयक्तिक आणि बारा समूह प्रदर्शने झाली. आठ पारितोषिके मिळाली. महाराष्ट्र व भारतीय पातळीवरील आर्टिस्ट कॅम्प, वर्कशॉपसाठी त्यांना बोलाविले जाते.
चौधरी मूळचे वसईच्या शेतकरी कुटुंबातील. तेथे त्यांचे पंधरा गुंठय़ाचे लहानसे शेत आहे. कौटुंबिक आणि कलेच्या प्रपंचाचा निर्वाह होण्यासाठी चौधरींनी या स्टुडिओत व्यावसायिक शिल्पकामे करण्याचे धोरण ठेवले आहे. पत्नी वैशाली यांच्या आयुर्विम्याच्या कामांमुळेही उत्पन्नास स्थिरता आहे, याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला. कलाशिक्षणासाठी आई-वडील भाऊ यांनी दिलेले प्रोत्साहन त्यांनी अभिमानाने सांगितले.
कला-कलाक्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले की, उच्चतम कलाकृती घडण्यासाठी त्यात भूतकाळाच्या स्मृती, वर्तमानाचे भान व भविष्याची झेप दर्शविता आली पाहिजे. तथापि आदर्श व वास्तव यात बऱ्याचदा तफावत असते. त्यामुळे जीवनसंघर्षही तीव्रतम बनतो.
आजही भारतात सृजनशील शिल्पकलेच्या क्षेत्रात शिल्पे विकली जाणे व त्यावर जगणे फार कठीण आहे. लिहिताना मनात आले, येथेही चौधरींना जाणवलेले तत्त्व लागू आहे. बाह्य परिस्थितीत तग धरण्यासाठी शिल्पकलेचाच एक घटक दुसऱ्या घटकासाठी आधारभूत होत आहे आणि सृजनाचा आविष्कार अविरत सुरू आहे. चौधरींच्या वास्तूचे नाव ‘सृजन’ आहे.  www.sachinchaudhari.com या वेबसाइटवर त्यांच्या कलाकृतींची झलक पहायला मिळते.