मागील लेखात आपण वेद, पुराणं, आर्षकाव्य, आगमग्रंथ यांतील वास्तुशास्त्राचा धावता आढावा घेतला. या लेखात अर्थशास्त्र व इतर वास्तुशास्त्रावरील शास्त्रग्रंथांचा विचार करणार आहोत.आर्यधर्माचे नीतिनियम देणारे अतिप्राचीन ग्रंथ म्हणजे कल्पग्रंथ. यातील धर्मसूत्र व श्रोतसूत्रांत वास्तुशास्त्राचे संदर्भ सापडतात. इसवीसनपूर्व काळातील या धर्मसूत्रांत व मनुस्मृती या ग्रंथात दुर्गबांधणी, नगररचना, नगरांची संरक्षण व्यवस्था या विषयांची चांगली चर्चा आढळते. प्राचीन काळात भारतात वराहमिहिर नावाचा फार मोठा संशोधक होऊन गेला. मूलत: हा ज्योतिर्वदि होता. पण ज्योतिषशास्त्राच्या बरोबरीने भूकंप, जमिनीखालील जलस्रोतांचा शोध, कृषी, वनस्पती शास्त्र अशा विविध विषयांच्या जोडीला त्याचा वास्तुशास्त्राचाही अभ्यास दांडगा होता. त्याच्या बृहत्संहितेमधे इमारतींसाठी योग्य जागेची निवड, जमिनीची प्रतवारी, आरेखन म्हणजे ब्ल्यू िपट्र, मजले आणि दरवाजांची तौलनिक मापं, घरातील बिछाने, आसन व्यवस्था इत्यादी लाकडी सामान (ज्याला आजकाल फíनचर म्हटले जाते), मूर्तीना लागणारे साहित्य व मूíतविज्ञान असे विविध विषय हाताळले आहेत.
धर्मग्रंथात जर वास्तुशास्त्राचा विचार आहे तर राजनीतीत या शास्त्राचे स्थान काय असेल, असा प्रश्न सहज मनात येतो. भारतीय राजनीतीत राष्ट्राची स्वामी, अमात्य, राष्ट्र, दुर्ग, कोश, बल, सहृत् अशी सात अंगे मानली आहेत. याचाच अर्थ दुर्गबांधणी हे एक महत्त्वाचे अंग आहे. ‘दु:खेन गम्यते दुर्ग:’ या शब्दातच जिथे जाणे अवघड अशी वास्तू हा अर्थ स्पष्ट होतो. स्वाभाविकपणे दुर्गाच्या बांधणीचा विस्तृत विचार प्राचीन काळापासून केला आहे. कौटिलीय अर्थशास्त्र या संपूर्णपणे राजनीतीवरील ग्रंथात नगररचना, दुर्गबांधणी, सेतुबांधणी असे स्थापत्याशी संबंधित अनेक विषय येतात. अर्थशास्त्राच्या पहिल्या अधिकरणात राजाचा राजवाडा कसा असावा, सुरक्षा व्यवस्था कशी असावी, याची विस्तृत चर्चा आहे. अधिकरणाची सुरुवातच वास्तुकप्रशस्ते देशे.. वास्तुशास्त्रात प्रवीण असणाऱ्यांनी पसंत केलेल्या जागीच हा राजवाडा बांधावा असे म्हटले आहे. याशिवाय दुसऱ्या अधिकरणात नवीन शहर कसे वसवावे याचे उत्तम मार्गदर्शन कौटिल्याने केले आहे. नवीन नगर म्हटल्यावर त्यात विविध उद्योग, कारखाने, शासकीय कार्यालयं यांच्या उभारणीचीही चर्चा आहे. थोडक्यात, कौटिल्याची नगररचना, प्रासादनिर्मिती हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
शास्त्रग्रंथ: वास्तुशास्त्र हे यजमान, शिल्पी (इंजिनीयर व त्याचे साहाय्यक), भूमी, वास्तोष्पती(धार्मिक कार्य), पदविन्यास (आराखडा तयार करणे), वास्तू (साहित्य), स्थापत्य (स्थापत्य कला आणि तिचा उपयोग), अलंकरण (सजावट आणि पुनरुज्जीवन) अशा आठ अंगांनी युक्त आहे. आठ ह्या अंकाचे काही विशेष महत्त्व आहे. योग हा अष्टांग आहे. वाग्भटाच्या मतानुसार आयुर्वेद हा आठ अंगांचा आहे. दिशा आठ आहेत. त्यामुळे या सर्व दिशांनी थोडक्यात सर्व प्रकारे आपला विकास असे या आठ आकडय़ाचे मानसशास्त्र असावे. केवळ या शास्त्राला वाहिलेले मयमत, मानसार, समरांगण सूत्रधार असे अनेक ग्रंथ आहेत. यातील मयमत, मानसार, समरांगण सूत्रधार या ग्रंथत्रयीला त्रिस्तंभ अशी संज्ञा आहे.
मानसार – वास्तुशास्त्रावरील सर्वात श्रेष्ठ ग्रंथ. ग्रंथात ७६ अध्याय आहेत. मानसार हा ऋषींचा गण होता. काही विद्वानांच्या मते मानसार हे अगस्ती ऋषींचे नाव होते आणि मानसार हा मुळात अगस्ती ऋषींच्या सकलाधार किंवा सर्वाधार या ग्रंथावरील संक्षिप्त ग्रंथ आहे. मानसार हा वास्तुशास्त्राचा आकर ग्रंथ म्हणता येईल. कारण मानसारला समोर ठेवून पुढे वास्तुशास्त्रावरील अनेक ग्रंथांची रचना झाली. कश्यपाचा अंशुमभेद हा ८६ अध्यायांचा ग्रंथ. त्यातील ४७ अध्याय हे शिल्पशास्त्राला वाहिलेले असून ते मानसाराच्या ५० अध्यायांबरोबर जुळतात.
मयमत – मानसारच्या खालोखाल श्रेष्ठ मानला गेलेला ग्रंथ. पण मानसारच्या भक्कम पायावर हा ग्रंथ उभा आहे. ग्रंथातील अध्यायांची नावे, त्यांचा अनुक्रम आणि विषय याचे मानसारशी असलेले साधम्र्य या दृष्टीने पुरेसे बोलके आहे. यात ३६ अध्यायांत ३३०० श्लोक अशी रचना आहे. मयमतानुसार सजीव आणि निर्जीव सर्वाच्या राहण्याचे स्थान म्हणजे वास्तू. या व्याख्येनुसार पृथ्वी, इमारती, यान आणि आसन अशी चार निवासाची स्थानं मानून ग्रंथाचे चार प्रमुख भाग केले आहेत. मयमत हा तामिळ प्रदेशातील असावा असे मानले जाते.
समरांगण सूत्रधार – परमार कुळातील धारच्या भोजराजाने रचलेला स्थापत्यशास्त्रावरील मध्ययुगीन ज्ञानकोश आहे. तुलनेने समरांगण सूत्रधार आणि मंडनाचे शिल्पशास्त्र हे ग्रंथ अर्वाचीन आहेत. समरांगणाचा काळ साधारणपणे इ.स. १००० ते १२०० च्या दरम्यान मानला जातो. ग्रंथात ८३ अध्याय आहेत. ग्रंथनामातील सूत्रधार म्हणजे जो सूत्र धरतो तो अर्थात मुख्य तंत्रज्ञ किंवा इंजिनीयर. यातील पहिल्या समरांगण या शब्दाचे दोन अर्थ आहेत. समर म्हणजे युद्ध किंवा समर म्हणजे सतत मरण बरोबर वागवणारा कोणीही. येथे मनुष्य अभिप्रेत आहे. पहिल्या अर्थानुसार समर हा युद्धभूमीचे नियंत्रण करणारा, सन्याला विजयाकडे घेऊन जाणाऱ्या राजाचा निर्देश करतो. तर दुसरा अर्थ मनुष्याच्या निवासाचा तंत्रज्ञ. एखाद्या राजाला युद्धात ज्या प्रकारे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते, नियोजन करावे लागते त्याचप्रमाणे ह्या तंत्रज्ञालाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे समरांगण सूत्रधार हे नाव सर्वार्थानी योग्य ठरते. या साऱ्या संदर्भाशिवाय काव्य आणि नाटय़ातील संदर्भही वाचनीय आहेत. भासाच्या नाटकातील राजसभा, वसंतसेना हीचा भव्य प्रासाद, कालिदासाच्या मेघदूतातील यक्षाच्या गृहाचे वर्णन, बाणाच्या कादंबरीतील तारापीडाचा प्रासाद याचबरोबर ऋषीमुनींच्या कुटी यांसारखे वास्तुशास्त्रीय संदर्भ मोठे मनोज्ञ आहेत.
अतिप्राचीन काळातील कान्हेरी गुंफा, काल्रे-भाजे लेणी, अजंठा-वेरुळचे मंदिर, कोणार्कचे सूर्यमंदिर, परकीय आक्रमणांपासून रक्षित असलेली, स्थापत्य आणि त्यावरील नाजूक कोरीव कामांसाठी प्रसिद्ध असलेली दक्षिणेतील एकापेक्षा एक सुंदर मंदिरे, अशा श्रेष्ठ, सुंदर आणि सरस वास्तूंनी प्रशस्त झालेल्या देशाचे वास्तुशास्त्रातील तंत्र आणि मंत्र पुढील लेखांतून आपल्यापुढे हळुवारपणे उलगडले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा