सुचित्रा साठे
ध्यानीमनी नसताना अचानक करोनाचं संकट जगावर आलं. सुरुवाती सुरुवातीला त्याचं गांभीर्य जाणवलं नाही. दृक्श्राव्य माध्यमातल्या, वर्तमानपत्रातल्या करोनाविषयीच्या बातम्या वाचायच्या आणि ‘हे काय बाई नवीन’ असं मनातल्या मनात पुटपुटायचं, इतकाच करोनाशी संबंध होता. बघता बघता करोनाच्या बातम्यांच्या जागा आणि वेग वाढला आणि स्वच्छतेचे नियम कानीकपाळी ऐकू येऊ लागले. सगळे खडबडून जागे झाले आणि संपर्क टाळण्याचे उपाय युद्धपातळीवर जाहीर होऊ लागले. परस्परविरोधी मत ऐकून सामान्य माणूस गोंधळून जाऊ लागला. खरं तर आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसभर घरं जवळजवळ रिकामीच असायची. झोपण्यापुरतं घर अशी जणू घराची व्याख्या झाली होती. त्या घराचे दिवस पालटले. भरली घरं हे वर्तमान झालं. सतत माणसांचा वावर त्यामुळे जिवंतपणा आला.
कुठलंही संकट आलं तरी काळ त्याच्या गतीनं पुढे जातच राहतो. ठरावीक वेळी ठराविक गोष्टी होतच राहतात. त्याच नियमाने गौरीगणपती येऊन राहून गेले. आवाजाचं, सजावटीचं प्रदूषण थोडं कमी झालं. सगळे घरातच, त्यामुळे बाप्पाही खूष झाले. नाही म्हणायला दारातही चपलांची संख्या कमी झाली. कोणालाही ‘या..’ म्हणायचा धीर नव्हता. ‘येऊ का?’ असं म्हणत कोणी दत्त उभं राहिलं तर भीतीच वाटत होती. पाठोपाठ नवरात्र आलं. परिसर नेहमी इतका सजला नाही तरीपण सणाची चाहूल लागत होती. घरं मात्र स्वच्छ झाली, नीटनेटकी झाली. त्याचं अंतरंग सजलं. त्यासाठी घरच्या गृहिणीला मुद्दाम सगळ्यांच्या मागे लागावं लागलं नाही. कारण कामवालीच्या नसण्याची थोडी सवय झाली होती. घरातल्या तरुणाईला साफसफाईचं काम अंगवळणी पडलं होतं. प्रवासातला, इकडेतिकडे बागडण्यातला वाचलेला वेळ सार्थकी लागत होता.
घटस्थापनेला नवरात्र बसलं. आत्तापर्यंत घरात नवरात्रं असलं की तरी शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाणारे पटापट दिवस उजाडला की बाहेर पडायचे. घरातली गृहिणी, ज्येष्ठ व्यक्ती सगळी तयारी करायचे. या वर्षी करोनामुळे ‘काय काय, कसं कसं करायचं असतं’ याविषयी सगळ्यांनाच थोडी माहिती झाली. लुडबुडही झाली. रांगोळी कुठे काढायची? माळ कशी करायची? ती कुठे अडकवायची? दिव्याची काळजी कशी घ्यायची? याकडे जास्त लक्ष वेधलं गेलं. अधूनमधून जातीने दिव्यात तेल घालण्यासाठी काही जण जागरूक राहिले. आरतीच्यावेळी सगळेच हजर असायचे. काहींनी आरतीच्या पुस्तकात बघून आरत्या म्हटल्यामुळे त्या पाठ झाल्या म्हणजे कडव्यांचा नेमका क्रम लक्षात राहिला नाही तर नेमकी तिथेच गडबड व्हायची.
काही घरांत नवरात्र म्हणून आजी, आई यांना उपास होता. शिवाय नैवेद्याला काही तरी गोड केलं जायचं. पण काहीही मेनू ठरवताना ‘मिळून सारे जण’ हा कायदा अस्तित्वात आला आणि त्याला झटपट मान्यता मिळाली. गरम गरम पदार्थ थेट पोटाची वाट शोधू लागले. भांडी घासण्याचं काम करावं लागत असल्यामुळे त्यात काटछाट कशी करायची याची खमंग शाब्दिक चर्चाही अधूनमधून रंगू लागली. ‘आई कुठे काय करते!’ असं म्हणायला मात्र कोणाचीच जीभ धजावली नाही.
एरवी नवरात्र म्हणजे महिलावर्गाचे स्तोत्र पठणाचे भजनाचे कार्यक्रम घराघरातून व्हायचे. घरं कशी नादावलेली असायची, चैतन्याने सळसळायची. परंतु एक दार बंद झालं की दुसरं आपोआप उघडतं. तसंच झालं. घरात एकत्र जमणं शक्य नव्हतं म्हणून मोबाइलच्या चिमुकल्या पडद्यावर सगळ्या भेटू लागल्या. मोबाईलच्या नादाला न लागणाऱ्या मोबाईल साक्षर झाल्या. सगळे घरातच असल्यामुळे योग्य व्यक्तीला त्यासाठी पकडणे सोपे जाऊ लागले. न विसरता त्या त्या दिवशीच्या रंगाच्या साडय़ा कपाटातून बाहेर आल्यामुळे त्यांनाही जरा हवा लागली. स्तोत्रपठण आपापल्या घरात झालं, पण गूगल मीट किंवा झूमच्या पडद्यावर किंवा त्या स्तोत्राची ऑडिओ क्लिप पाठविण्यासाठी म्हणून! म्हणजे नादवलये घरात निर्माण होण्याचा उद्देश साध्य झाला. त्याचबरोबर छोटे कंपनीवर नवरात्रात असं करायचं असतं, हा संस्कारही झाला. शिवाय मंडळाचा कार्यक्रम घरातील इतर सगळ्यांनाही ऐकता आला. यामध्ये वेगवेगळे विषय होते. करोनायोद्धा म्हणून जी स्त्रीशक्ती जीवाची पर्वा न करता निरनिराळ्या वस्त्यांमधून सर्वेक्षण करून आली होती, त्यांचा कौतुक समारंभ ठेवला होता. त्यामुळे उमलत्या पिढीपुढे आदर्श ठेवता आला. काहींनी कर्तृत्ववान, धाडसी महिलांची ओळख करून दिली. काहींनी रामायण, महाभारत, स्वातंत्र्य संग्रामातील वीरांगनांची माहिती दिली. काही मुलींनी जोगवा, दंडवत नृत्यातून सादर केले. अर्थात हे सगळं गूगल मीट, झूमच्या माध्यमातून ‘हातांत’ आलं. व्हिडीओ शूटिंगसाठी तरुणाईची पकडापकडीही यशस्वी झाली.
आज खंडेनवमी असल्यामुळे माळ्यावरून हातोडा, कोयता, कुऱ्हाड, करवत अशी छोटीमोठी अवजारं फुलं माळून बसली. वाहनांची पूजा झाली. सध्याच्या काळांत तर बिचारी क्षमतेपेक्षा जास्त धावत आहेत आणि आपल्याला सगळं आणून हातात देत आहेत. सायकलचा खप दुपटीने वाढला ही आनंदाची बाब आहे.
उद्या दसरा.. आनंदाचा उत्कर्षबिंदू. साडेतीन मुहूर्तापैकी एक. सगळ्या आप्तेष्टांनी घरी किंवा बाहेर एकत्र येऊन साजरा करण्याचा सण. पण यंदा आपापल्या घरातच तो साजरा होणार आहे. मिठाईची, हलवायाची दुकानं उघडली असली तरी पक्वान्न घरातच केलं जाणार आहे. कारण करोनाच्या वटारलेल्या डोळ्यांची सगळ्यांनी धास्ती घेतली आहे. ते पदार्थ करण्यातही आनंद, मजा असते याचा अनुभव तरुणाई टाळेबंदीच्या काळात घेत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पदार्थाचे दर्शनसुख घडवले जात आहे. कौतुकाचे अंगठे दाखवले जात आहेत. नैवेद्याच्या पानांचे फोटो घराघरांत मेनू पोहोचवणार आहेत. कपाटातल्या कपडय़ांच्या घडय़ा विस्कटल्याच नाहीयेत त्यामुळे खरेदीचा विचार तूर्तास तरी बारगळला आहे. आहार आणि योग यांच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढवा.. या विचारांचं सोनं वाटलं जाणार आहे. घरबसल्या पडद्यावर महाराष्ट्रातील देवीदर्शन घडणार आहे. त्याचबरोबर गृहलक्ष्मीचंही ‘शक्ती’ दर्शन होणार आहे. गूगल मीट, झूम अशा माध्यमांवर भेटीसाठी मात्र गर्दी होणार आहे. पाटीपूजनाच्या ऐवजी गं्रथाचे किंवा ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरची पूजा होणार आहे. माणसांच्या किलबिलाटामुळे घराची वास्तू मात्र कृतकृत्य होणार आहे.
जे होतं ते चांगल्यासाठीच यावर विश्वास ठेवून आपण आनंदातच दसरा साजरा करणार आहोत. ते आपल्या हातात आहे. वाढदिवस किंवा सण असला की छोटय़ांना आपण सांगतो की आज सण किंवा वाढदिवस आहे. वेडय़ासारखं वागायचं नाही. हट्ट करायचा नाही. खरं तर तो दिवस रोजच्या दिवसासारखाच असतो. पण आपण मनाने ठरवलेलं असतं की आज आनंदात राहायचं, तसंच ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे आपण प्रत्यक्षात आणणार आहोत. करोनाची पार्श्वभूमी आहे हे खरं आहे; पण प्रत्येक वाईट गोष्टीत काही तरी चांगलं असतंच ना! बंद पडलेलं घडय़ाळसुद्धा दोनदा बरोबर वेळ दाखवतंच की! कदाचित काळचक्र गोल फिरवण्यासाठी होणारा अतिरेक टाळण्यासाठी, कुठे तरी लगाम घालण्यासाठी, निसर्गानेच तर हा उपाय केला असेल का?
suchitrasathe52@gmail.com