माधुरी साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळ्यात सुट्टी असल्यामुळे माहेरवाशिणींना माहेरची, मायेची माणसे भेटायची. सुट्टीत नातवंडे आजी, आजोबांकडे राहायला गेल्यावर ते पण खूप खुशीत असायचे. आजी, आजोबांना आपले घर भरल्यासारखे वाटायचे.

उन्हाळा आला की आपल्याला आठवतो तो रखरखाट, घामाच्या धारा. करोनाकाळापूर्वी बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळे मस्त कार्यक्रम चालू असायचे. घरातील लहान मुलांच्या परीक्षा संपल्या की ती उंडारायला मोकळी व्हायची. एप्रिल महिन्याच्या शेवटी निकालाचे वेध लागायचे आणि तो एकदा लागला की त्यांचे उद्योग सुरू व्हायचे. मग वह्यंची कोरी पाने काढणे, जुनी अभ्यासाची पुस्तके बाजूला काढून नवीन पुस्तके आणली जायची. थोडे दिवस बाहेर फिरायला जाण्याचे मनसुबे चालू व्हायचे. घरी मुलांसाठी नसतील, तर त्यांच्या आवडीचे खेळ म्हणजे कॅरम, पत्ते वगैरे आणले जायचे. मुले मजा, मस्ती, खेळ, हुंदडणे यात दंग असायची. मग मुलांच्या आवडीचे पदार्थ घरी बनविले जायचे. बर्फाचा गोळा, पेप्सी खाऊन मुले सतावायची. घरातील मोठी माणसे मुलांना गाणे, चित्रकला, हस्तकला वगैरेंचे छंदवर्ग  शोधायचे. मुले वाचनालयातून पुस्तके आणून ती वाचायची. त्यामुळे घरातील एक कोपरा या वाचणाऱ्या मुलांचा असायचा. सिनेमा, नाटकाला जायची तिकिटे घरी यायची. कॉटनच्या कपडयांची खरेदी केली जायची.

हेही वाचा >>> पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!

घरातल्या गृहिणी वर्षभराची बेगमी करायला सज्ज व्हायच्या. टिकविण्याचे पदार्थ करण्याची त्यांची लगबग सुरू व्हायची. लाल मिरच्या, धणे, तमालपत्र, दगडफूल वगैरे मसाल्याचे पदार्थ आणून, घरी मसाला बनविला जायचा. त्या मसाल्याचा वास नाकात जाऊन घरातील सर्व शिंकांनी हैराण व्हायचे. उडीद, पोहा, बटाटयाचे पापड, कुरडया, फेण्या केल्या जायच्या व उन्हात वाळत घातल्या जायच्या. वाळवणे पक्ष्यांपासून जपायला लागायची. पापड लाटताना कधी शेजारणी मदत करायला यायच्या तेव्हा गप्पा मारीत, हास्यविनोद करीत आनंदाने ते व्हायचे. मग मधे किंवा शेवटी उसाचा रस, सरबत यांनी श्रमपरिहार केला जायचा. काहीजण आवळकट्टी, फणसपोळी, आंबापोळी करायचे. लोणची, मुरांबे घातले जायचे. काही घरांमध्ये वर्षभराचे वाल, तांदूळ आणून ते निवडून, त्यांना कीड लागू नये म्हणून कडुिनबाची सुकलेली पाने कुस्करून लावून व्यवस्थित जतन करून ठेवले जायचे.

उन्हाळयाच्या काळात ताक तसेच आईसक्रीम, कुल्फी, कोकम, आवळा,करवंद वगैरे सरबते, कैरीचे पन्हे बनविली जायची व घरातल्या सदस्यांना थंडावा देण्यासाठी व घरी येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी ती वापरली जायची. कधीकधी माठातले पाणी उन्हाळ्यात चांगले म्हणून माठ कोपऱ्यात स्थानापन्न असायचा. बाजारातून जांभळे, करवंदे, जाम असा उन्हाळी रानमेवा घरात आणला जायचा. जेवताना खाण्यासाठी पांढरा कांदा आणला जायचा. घरात थंडाव्यासाठी कलिंगड कापले जायचे. घरात फळांचा राजा असलेल्या आंब्याची पेटी दिमाखात उभी असायची तर काही ठिकाणी फणस मिरवित उभा असायचा आणि फणसाचे गरे काढले की शेजारीपाजारी त्याची बातमी समजायची. घरात मोगऱ्याचे गजरे कधीकधी आणले जायचे व त्या सुवासाने मन प्रफुल्लित व्हायचे.

उन्हाळ्यात सुट्टी असल्यामुळे जिकडे तिकडे कार्यक्रमांची आखणी केली जायची. घरात लग्नसोहळे, मुंजी व्हायच्या. यानिमित्ताने नातलग, मित्रमैत्रिणी भेटायचे. माहेरवाशिणींना माहेरची, मायेची माणसे भेटायची. सुट्टीत नातवंडे आजी, आजोबांकडे राहायला गेल्यावर ते पण खूप खुशीत असायचे. आजी, आजोबांना आपले घर भरल्यासारखे वाटायचे.

उन्हाळ्यात अंगणातील आंब्याच्या झाडावरील कोकीळेचे कुहूकुहू ऐकून फार छान वाटायचे. गुलमोहोर बहरलेला असायचा. मोगरा वगैर फुलांची झाडे त्यांच्या फुलांच्या सुवासाने आपल्याला प्रसन्न करायचे. कुत्रे, मांजरी वगैरे प्राणी झाडांच्या सावलीला येऊन बसायचे.

हळूहळू मळभ दाटून यायचे. कावळा आपल्या घरासाठी काडया गोळा करायला लागायचा. आणि मग पावसाची चाहूल लागायची. घरातल्या गृहिणी आपली उन्हाळ्याची कामे आटोपती घ्यायच्या. आणि उन्हाळ्यातील वेगवेगळ्या घरांचे चित्र रूप पालटायला लागायचे.

madhurisathe1@yahoo.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer vacation at home summer vacation home vacation home for summer zws