दक्षिणी परंपरेत मंदिराचा सर्वात उंच घंटेप्रमाणे असलेला आकार शिखर मानले जाते. हा तळसरीच्या वरील चौकोनी, गोल, अष्टकोनी किंवा दीर्घवर्तुळाकार भाग असतो. उत्तरी परंपरेत सर्वात वरच्या मजल्याच्या भिंतीवरील संपूर्ण रचना शिखर मानली जाते. नागर, वेसर व द्राविड या स्थापत्यातील प्रमुख पद्धतीत नागर पद्धतीतील शीर्ष चौकोनी, द्राविड पद्धतीतील अष्टकोनी व वेसर पद्धतीत गोल असते.
काश्यप शिल्पानुसार शिखराची उंची वरील मजल्याच्या खांबाच्या उंचीइतकी किंवा त्याच्या अर्धी असते. मंदिराच्या केवळ कळसावरून अपराजितपृच्छा या ग्रंथात मंदिरांचे पंधरा प्रकार मानले आहेत.
यातील नागरछंद, द्राविड, भूमिज, वराट, मिश्रक, विमान, सांधार व लतिन हे आठ प्रमुख प्रकार आहेत व त्या आठातून वलभी, फोमस्राकार, सिंहावलोकन, दारुज, विमान नागर छंद, विमान पुष्पक व रथारूढ असे इतर सात प्रकार पडले आहेत.
नागरछंद : शिखराचा पाया शिखरमूळ म्हणून ओळखला जातो. मुख्य शिखर सर्वात उंच असते व त्याच्या भोवती छोटे छोटे मनोरे असतात. शिखराची मुख्य बाजू सोडून इतर तीन दिशांना मधोमध असलेल्या लहान कोनाडय़ांना रथिका म्हणतात. मुख्य बाजूला सिंहमुद्रा असलेला शुकनास असतो. शिखराच्या वरचा भाग अमलसार म्हणून ओळखला जातो व सर्वात वर कळस येतो.
द्राविड : द्राविड प्रासादांचे त्याच्या शिखरावरून नालिका, प्रलिनका, स्वस्तिक, चतुर्मुख, सर्वतोभद्र, हस्तिप्रस्थ समुज्वल, श्रीछंद, वृत्तभद्र, श्रीकांत, शिवभद्र, शिवछंद, अष्टांग, पद्माकृती, विष्णुछंद, सौभद्र, कैलासछंद, रुद्रछंद, ललितभद्रक असे अनेक प्रकार पडतात. द्राविड प्रासादाचे शिखर घंटेच्या आकाराचे असते. या सर्व शिखरांना गोलाकार माíगका असते. शिखराला नासिकांनी म्हणजे उभ्या खिडक्यांनी सुशोभित केले जाते. खालच्या बाजूला हंस असतात.
भूमिज : भूमिज शिखराला अनेक मजले व छोटी वेगवेगळ्या मापांची कूट किंवा शिखरं असतात. या उपकुटांना जंघा असतात. मुख्य सुळक्याच्या चार बाजूंना वेलीची नक्षी काढलेली असते. प्रासादाप्रमाणे शिखराची उंची असते. उदा. त्रयांग प्रासादाचे शिखर तीन किंवा चार मजली, पंचांगाचे पाच मजली, सप्तांगाचे सात मजली, नवांगाचे नऊ मजली शिखर असते.
वराट : याचे शिखर भूमिज शिखराप्रमाणेच असते. फरक फक्त जंघेचा असतो. यात भूमिजप्रमाणे जंघा नसते. कळस मंदार फुलाप्रमाणे असतो. वराट प्रासादाचे पंचवीस प्रकार आहेत.
विमान : भूमिजप्रमाणे विमान प्रासादाला अनेक मजले असतात. यात भद्रावर अतिशय सुंदर अशी वेलबुट्टी असते. हे शिखर चौकोनीच असते व त्याला भद्र, रथ व उपरथ असे पुढे आलेले भाग असतात.
मिश्रक : याचे शिखर विमान, भूमिज, द्राविड किंवा वराट प्रासादापकी कोणतेही असते. याला अनेक शृंग व तिलक असतात व वेलीची नक्षी असते. मिश्रक प्रासादाचे पंचवीस उपप्रकार होतात.
सांधार : यात आच्छादलेली वर्तुळाकार माíगका असते. याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे याचा आकार एखाद्या पर्वताप्रमाणे दिसतो.
लतिन : नागरछंद प्रासादाप्रमाणे याचे शिखर असते पण त्याला उरश्रुंग नसतात.
शिखराच्या सगळ्यात वरच्या भागाचे अमलसार, ग्रीवा व कळस असे तीन मुख्य भाग होतात. शिखरातील काही महत्त्वाच्या पारिभाषिक शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया.
नासिका : नासिका हा शिखरावरील महत्त्वाचा भाग मानला जातो. िभतीवरील नक्षीदार पट्टय़ातील कोनाडा म्हणजे नासिका. या पट्टय़ावर विविध प्राण्यांची मुखं कोरलेली असतात.
नासिकेचे वेगवेगळे प्रकार आहेत. कमी सुशोभित अशा साध्या कोनाडय़ाला क्षुद्र नासिका म्हणतात. अल्पनासी तुलनेने मोठी असते व एखादी छोटी मूर्ती त्यात सहज सामावू शकते. मंदिराच्या पुढे आलेल्या भद्र भागावर बसवलेल्या नासिकेला भद्र नासिका म्हणतात. याच्या विरुद्ध म्हणजे थोडय़ाशा आतल्या भागातील नासिका अभद्र नासिका मानली जाते. बंदुकीच्या नळीसारखे छप्पर असलेल्या आढे व पाखी यांच्या टोकाला जी उंच व मोठय़ा आकाराची नासिका असते ती लटाट नासिका. ललाट नासिका अतिशय सुशोभित असते. तिच्यात सुंदर व मोठय़ा देवी-देवतांच्या मूर्ती किंवा त्यांच्यावरील एखादा नाटय़मय प्रसंग चित्रित केलेला असतो. पंजरावरील मोठय़ा नासिकेला महानासी म्हणतात. मंदिराच्या बाबतीत नासिका ज्या देवाच्या मंदिराच्या शिखरावर असेल त्यानुसार नासिकेतील मूर्ती असते. म्हणजे शंकाराचे देऊळ असेल तर नासिकेत शिवाच्या एखाद्या रूपाची मूर्ती असते.
शक्तिध्वज : नासिकेच्या वर तिच्या उंचीच्या निम्मा शक्तिध्वज असतो. त्याच्या वर पत्र किंवा शूल असतो.
अमलसार : मुख्य कळसाच्या खाली असलेल्या गोलाकार आकाराला अमलसार म्हणतात. अमल म्हणजे आवळा. साधारण आवळ्यासारखा आकार असल्याने अमलसार असे नाव आले. अर्थात प्रत्येक उपशिखरांनाही अमलसार असतात.
ग्रीवा : कळस व अमलसार यांच्यामधील भागाला ग्रीवा म्हणतात.
उरश्रुंग : मुख्य श्रुंगाच्या खालोखाल सर्व दिशांना असलेली उपशिखरे.
प्रत्यंग : उरश्रुंगांच्या खाली असलेली छोटी छोटी शिखरं.
शुकनास : मुख्य शाखराच्या गृहद्वाराच्या दिशेला असलेला व पुढे आलेला भाग.
भारतात जागोजागी दिसणारी प्राचीन मंदिरं स्थापत्यग्रंथात सांगितल्याप्रमाणे घडवलेली दिसतात. म्हणजेच ग्रंथ व वास्तू निर्माणात एकवाक्यता दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा