महाराष्ट्रात मंदिर स्थापत्यकलेत मराठवाडा, विदर्भ, कोकणभूमी तसेच नाशिक-खांदेश प्रदेशांनी आपला लौकिक सांभाळला आहे. धार्मिक पर्यटनासाठी येथील मंदिर शिल्पकलेचे योगदान वाखाणण्यासारखे आहे.
आपल्या देशात एकही ठिकाण असं सापडणार नाही जिथे मंदिर नाही. कुठे ग्रामदेवतेची, कुठे सापडलेल्या स्वयंभूमूर्तीची तर कुठे काही समाज तसेच कुटुंबांची कुलदैवतांची मंदिरे आहेतच. तर दीड हजार वर्षांच्या सत्ता संघर्षांच्या काळातील काही सत्ताधाऱ्यांनी उभारलेली मंदिरे त्यांच्या संस्कृती वैभवाची मुद्रा उमटवताहेत.
मंदिरे उभारणीचा इतिहास तसा प्राचीन आहे. प्राथमिक अवस्थेतील मानवी जीवनात विश्वाच्या निर्मितीचे आणि सभोवतालच्या अफाट निसर्गाचे सहस्य न समजल्याने कोणीतरी अज्ञात-अगाध शक्तीच्या प्रभावाने निसर्गाचा बरा-वाईट चमत्कार अनुभवायला येतो. यावर त्या भाबडय़ा माणसांची श्रद्धा बसणं तसं स्वाभाविक होतं, जोडीला अजस्त्र पृथ्वीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे नियंत्रण अदृष्य शक्तीच्या हाती आहे, ही श्रद्धा! या शक्तीलाच कालांतराने परमेश्वराचे रूप देत, तोच आपला पालनकर्ता आहे ही भावना दृढ झाली. पाठोपाठ हे निर्गुण-निराकार सूत्र मान्य करता-करता त्याला मूर्ती स्वरुपात आपल्या घरी स्थापना करून पूजा-अर्चा सुरू झाली. या अगाध शक्तीच्या प्रतिकाला निवास द्यायला हवा याच भावनेतून मंदिर-देऊळ या वास्तूची निर्मिती झाली.
मंदिर स्थापत्य कलेच्या उगमकाळात गाभाऱ्यातच मूर्तीची स्थापना होत असे. त्याला ‘गर्भगृह’ असे संबोधले जाते. मंदिराचा रेखीव आकर्षकपणा वाढवणारी शिखर बांधकामं कालांतराने आली. मंदिरासमोरील मोकळी जागा मुख मंडप म्हणून असायची. मंदिरे उभारणीतील कोरीव काम मुखमंडपातून गर्भागृहाकडे जाताना आजही आपण पहातो. गाभारा आणि मंडपाच्या मधल्याजागेतून प्रदक्षिणा पथ व्यवस्था आजही आढळते. मंदिरसुरक्षेसह पावित्र्य आणि सौंदर्य साधण्यासाठी कालांतराने उंच, भक्कम चौथऱ्यावर मंदिर उभारणी व्हायला लागली, यालाच अधिष्ठान असे म्हणतात.
आपल्याकडे इ.स. तिसऱ्या शतकापासूनच्या मंदिर शिल्पाचे अवशेष सापडतात. ही मंदिरवास्तू संकल्पना अस्तित्वात येण्याआधी छोटेखानी घरात किंवा खाजगी वाडय़ात मंदिरांची उभारणी झाली. कालांतराने सार्वजनिकरणाने देवालयाची प्रतिष्ठापना होत होत त्याला भव्यतेसह कलेची जोड देत मंदिर स्थापत्यकलेचा उगम झाला.
आपल्याकडे मंदिर स्थापत्य शैलीत काळानुरूप बदल झाला. वाढत्या भाविक पर्यटकांना सामावून घेण्यासाठी मंदिर प्रांगणात अधिकाधिक सभामंडप बांधले गेले. काही मंदिरात प्रदक्षिणा पथ मंदिराच्या आतील भागातून आहे तर काही ठिकाणी गर्भगृह सभामंडपाच्या मधोमध प्रदक्षिणा मार्ग असतो. महाराष्ट्रात मंदिर स्थापत्यकलेत मराठवाडा, विदर्भ, कोकणभूमी तसेच नाशिक-खांदेश प्रदेशांनी आपला लौकिक सांभाळला आहे. धार्मिक पर्यटनासाठी येथील मंदिर शिल्पकलेचे योगदान वाखाणण्यासारखे आहे. यातील काही मंदिरांची प्रारंभीची बांधणी विटांची होती. संरक्षण, टिकाऊपणासाठी नंतर दगडी बांधकाम आले.
११ ते १३ व्या शतकातील मंदिरं आजही आपलं शिल्पवैभव सांभाळून आहेत. यात कलेची जाण असलेल्या शिलाहार-यादव सत्ताधिशांची कामगिरी स्पृहणीय आहे. भव्यता आणि कलात्मकतेच्या मंदिर शिल्पाचा मिलाफ याच काळात झाला. मराठवाडय़ातील औंढानागनाथ, कोल्हापूरचे महालक्ष्मीमंदिर त्याच्या नजीकचे खिद्रापूरचे विलोभनीय मंदिर या त्याच्या पाऊलखुणा आहेत. धार्मिक ठिकाणांसह तेथील चित्ताकर्षक मंदिरवास्तू उभारणीत महाराष्ट्र तसा भाग्यवान! देशातील १२ ज्योतिर्लिगापैकी पाच महाराष्ट्र भूमीवर आहेत. तर आठ पैकी साडेतीन शक्तिपीठांनी महाराष्ट्राचे नाव अधिक ठळक केले आहे. या सर्वच मंदिरांना काही भव्यता लाभलेली नाही, पण ही मंदिरे उभारताना अज्ञात शिल्पकारांनी त्यावर चढवलेला अनमोल, कलापूर्ण साज म्हणजे सत्यम्-शिवम्-सुंदरम्चा देखणा कलाविष्कार आहे.
मंदिर म्हणजे फक्त देवदर्शन नव्हे तर उपेक्षित, गरजुंसाठी माझ्या हाताला काहीतरी देण्याची स्वयंप्रेरणा होण्याचं पवित्र स्थळ आहे. त्यासाठी मंदिराची दानपेटी असू दे किंवा रसाळ वाणीने आख्यान लावणारा किर्तनकार बुवा असू दे. आणि कोणतेही मंदिर म्हणजे वाद घालून संवाद साधण्याचं तसेच विचारांची देवाण-घेवाण करणार विनामूल्य व्यासपीठ आणि माहिती केंद्रही आहे. लोक उपजीवीकेसाठी शहराकडे गेले तरी गावच्या मंदिरामार्फत आयोजित उपक्रम, धार्मिक सोहळ्यासाठी त्यांचे पाय आपल्या गावाकडे वळतात. या त्यांच्या माहेर ओढीला ‘मागे वळून पहा’ ही मंदिराची हाक असते. आपल्या जन्मभूमीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपली पुरातन मंदिरं देताहेत.
महाराष्ट्रात सर्वत्र हेमांडपंती शैलीची अनेक मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच ‘भूमिज’ स्थापत्य शैली असेही संबोधतात. मात्र सर्वच पुरातन मंदिरांना ‘हेमांडपंती’ शैलीची मंदिरे म्हणण्याचा प्रघात सुरू झाला आहे. जाणकार-इतिहासकारांत याबद्दल मतभेद आहेतच. महाराष्ट्रातील निलंगे, आंबेजोगाई, लोनाड, रामटेक, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर येथील मंदिरांच्या शिल्पकलेत विविधतेसह चित्ताकर्षकपणाही आहे. यातील काहींची शिखरे दगडात तर काहींच्या शिखरबांधणीसाठी विटांचा उपयोग केला आहे. मात्र सर्वच शिखरांची कलाकृती साधताना ‘भूमिज’ शैलीचा आधार घेतल्याचे जाणवते.
कोकणातील अनेक मंदिरांची निर्मिती शिलाहार -यादव काळात झाली आहे. अंबरनाथचे शिवमंदिर, चिपळूणचे परशुराम मंदिर, आंबवचे सूर्यनारायण मंदिर, राजापूरचे धुतपापेश्वर मंदिर, वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजे कोकणच्या धार्मिक वैभवाची निशाणी आहे. पण आज या जुन्या मंदिरवास्तूंचे पुनरुज्जीवन-नुतनीकरण करताना त्याला आधुनिक चेहरा देण्याच्या मोहापायी त्याचा मुळचा बाज मागे पडतोय.
मंदिरवास्तू : एक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व्यासपीठ अनेक स्थित्यंतरे झाली तरी मंदिरवास्तू म्हणजे सभोवतालच्या समाजजीवनाच्या धार्मिकतेसह सामाजिक-नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमाचे ते व्यासपीठ ठरले आहे. आमच्याकडची काही मंदिरे म्हणजे सभोवतालच्या सामाजिक जीवनप्रवाहाचा आरसा आहे. इतकच नव्हे तर काही मंदिरे म्हणजे सामाजिक स्थित्यंतराचा आरसा आहे. शांत-प्रसन्न वातावरणात नतमस्तक होण्यासाठी निसर्ग वैभवातील मंदिरासारखी जागा नाही. या शिवाय मंदिरवास्तू आणि सभोवतालच्या समाजजीवनाचे अनोखे नाते आहे. ग्रामसभा, संमेलनं, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमासाठी मंदिराचा पूर्वापार उपयोग होत आहे.
मंदिर म्हणजे सर्वाचे श्रद्धास्थान. या पाश्र्वभूमीवर परिसरातील सामाजिक-कौटुंबिक न्यायनिवाडे करण्यासाठी मंदिर म्हणचे नैतिक अधिष्ठानाचे न्यायालयही आहे. कथा, किर्तन, भारूड, ग्रंथोत्सव असे कार्यक्रम मंदिरात होत असून, त्याद्वारे सामाजिक प्रबोधन झकास साधले जातेय. तसेच गायन, नर्तन, उत्सव शोभायात्रा आयोजन असल्या कार्यक्रमातून कलाकारांना आपली अंगभूत कला सादर करण्यासाठी वाव मिळतो. आजही यात्रा-आठवडय़ाचा बाजार काही ठिकाणी भरतो त्याला बऱ्याच ठिकाणी मंदिराची पाश्र्वभूमी आहेच.
मंदिर म्हणजे फक्त देवदर्शन नव्हे तर उपेक्षित, गरजुंसाठी माझ्या हाताला काहीतरी देण्याची स्वयंप्रेरणा होण्याचं पवित्र स्थळ आहे. त्यासाठी मंदिराची दानपेटी असू दे किंवा रसाळ वाणीने आख्यान लावणारा किर्तनकार बुवा असू दे. आणि कोणतेही मंदिर म्हणजे वाद घालून संवाद साधण्याचं तसेच विचारांची देवाण-घेवाण करणार विनामूल्य व्यासपीठ आणि माहिती केंद्रही आहे. आमच्या मंदिरवास्तूंनी सभोवतालचा समाज एकसंघ राखत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश रुजवला आहे. लोक उपजीवीकेसाठी शहराकडे गेले तरी गावच्या मंदिरामार्फत आयोजित उपक्रम, धार्मिक सोहळ्यासाठी त्यांचे पाय आपल्या गावाकडे वळतात. या त्यांच्या माहेर ओढीला ‘मागे वळून पहा’ ही मंदिराची हाक असते. आपल्या
जन्मभूमीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपली पुरातन मंदिरं देताहेत.
बरीच पुरातन मंदिरे केंद्र शासन अखत्यारातील पुरातत्व खात्याच्या नियंत्रणाखाली आहेत. आज महाराष्ट्रातील काही मंदिरांकडे भाविक-पर्यटकांचा ओघ असल्याने त्यांना निधीची कमतरता नाही म्हणून त्यांची देखभाल, संवर्धन करणं त्यांच्या विश्वस्तांना शक्य आहे. पण अनेक ठिकाणच्या मंदिरांची अवस्था निराशाजनक-दयनीय आहे. जागतिक वारसा यादीत समाविष्ठ होण्यालायक काही मंदिरवास्तू कशाबशा आपलं अस्तित्त्व टिकवून उभ्या आहेत. भौगोलिक परिस्थितीत आणि पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनाने काही मंदिरांची पडझड बघून अस्वस्थ व्हायला होतं. एक हजार वर्ष पार केलेल्या अंबरनाथ येथील शिवमंदिराची आजही अवस्था काय आहे! कलात्मक वास्तूच्या ओढीसह भक्तीभावाने येथे येणाऱ्यांना गलिच्छपणा, बेजबाबदारपणासह बेफिकीरी अनुभावायला येते. इतक्या प्राचीन मंदिराची माहिती देणारा मार्गदर्शक तसेच सचित्र माहिती पुस्तिकाही उपलब्ध नाही.
ऐतिहासित पाश्र्वभूमीच्या कलापूर्ण मंदिरवास्तूचं सवर्धन व त्याचं मूळचं रूप टिकवायला शासनाकडे सकारात्मक दृष्टी वा इच्छाशक्ती नाही. आपलं अस्तित्व दाखवत ‘व्होट बँक’ जपण्यासाठी मंदिर व्यवस्थापन आयोजित एखाद्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहायला मात्र वेळ आहे.