महाराष्ट्रात मंदिर स्थापत्यकलेत मराठवाडा, विदर्भ, कोकणभूमी तसेच नाशिक-खांदेश प्रदेशांनी आपला लौकिक सांभाळला आहे. धार्मिक पर्यटनासाठी येथील मंदिर शिल्पकलेचे योगदान वाखाणण्यासारखे आहे.
आपल्या देशात एकही ठिकाण असं सापडणार नाही जिथे मंदिर नाही. कुठे ग्रामदेवतेची, कुठे सापडलेल्या स्वयंभूमूर्तीची तर कुठे काही समाज तसेच कुटुंबांची कुलदैवतांची मंदिरे आहेतच. तर दीड हजार वर्षांच्या सत्ता संघर्षांच्या काळातील काही सत्ताधाऱ्यांनी उभारलेली मंदिरे त्यांच्या संस्कृती वैभवाची मुद्रा उमटवताहेत.
मंदिरे उभारणीचा इतिहास तसा प्राचीन आहे. प्राथमिक अवस्थेतील मानवी जीवनात विश्वाच्या निर्मितीचे आणि सभोवतालच्या अफाट निसर्गाचे सहस्य न समजल्याने कोणीतरी अज्ञात-अगाध शक्तीच्या प्रभावाने निसर्गाचा बरा-वाईट चमत्कार अनुभवायला येतो. यावर त्या भाबडय़ा माणसांची श्रद्धा बसणं तसं स्वाभाविक होतं, जोडीला अजस्त्र पृथ्वीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे नियंत्रण अदृष्य शक्तीच्या हाती आहे, ही श्रद्धा! या शक्तीलाच कालांतराने परमेश्वराचे रूप देत, तोच आपला पालनकर्ता आहे ही भावना दृढ झाली. पाठोपाठ हे निर्गुण-निराकार सूत्र मान्य करता-करता त्याला मूर्ती स्वरुपात आपल्या घरी स्थापना करून पूजा-अर्चा सुरू झाली. या अगाध शक्तीच्या प्रतिकाला निवास द्यायला हवा याच भावनेतून मंदिर-देऊळ या वास्तूची निर्मिती झाली.
मंदिर स्थापत्य कलेच्या उगमकाळात गाभाऱ्यातच मूर्तीची स्थापना होत असे. त्याला ‘गर्भगृह’ असे संबोधले जाते. मंदिराचा रेखीव आकर्षकपणा वाढवणारी शिखर बांधकामं कालांतराने आली. मंदिरासमोरील मोकळी जागा मुख मंडप म्हणून असायची. मंदिरे उभारणीतील कोरीव काम मुखमंडपातून गर्भागृहाकडे जाताना आजही आपण पहातो. गाभारा आणि मंडपाच्या मधल्याजागेतून प्रदक्षिणा पथ व्यवस्था आजही आढळते. मंदिरसुरक्षेसह पावित्र्य आणि सौंदर्य साधण्यासाठी कालांतराने उंच, भक्कम चौथऱ्यावर मंदिर उभारणी व्हायला लागली, यालाच अधिष्ठान असे म्हणतात.
आपल्याकडे इ.स. तिसऱ्या शतकापासूनच्या मंदिर शिल्पाचे अवशेष सापडतात. ही मंदिरवास्तू संकल्पना अस्तित्वात येण्याआधी छोटेखानी घरात किंवा खाजगी वाडय़ात मंदिरांची उभारणी झाली. कालांतराने सार्वजनिकरणाने देवालयाची प्रतिष्ठापना होत होत त्याला भव्यतेसह कलेची जोड देत मंदिर स्थापत्यकलेचा उगम झाला.
आपल्याकडे मंदिर स्थापत्य शैलीत काळानुरूप बदल झाला. वाढत्या भाविक पर्यटकांना सामावून घेण्यासाठी मंदिर प्रांगणात अधिकाधिक सभामंडप बांधले गेले. काही मंदिरात प्रदक्षिणा पथ मंदिराच्या आतील भागातून आहे तर काही ठिकाणी गर्भगृह सभामंडपाच्या मधोमध प्रदक्षिणा मार्ग असतो. महाराष्ट्रात मंदिर स्थापत्यकलेत मराठवाडा, विदर्भ, कोकणभूमी तसेच नाशिक-खांदेश प्रदेशांनी आपला लौकिक सांभाळला आहे. धार्मिक पर्यटनासाठी येथील मंदिर शिल्पकलेचे योगदान वाखाणण्यासारखे आहे. यातील काही मंदिरांची प्रारंभीची बांधणी विटांची होती. संरक्षण, टिकाऊपणासाठी नंतर दगडी बांधकाम आले.
११ ते १३ व्या शतकातील मंदिरं आजही आपलं शिल्पवैभव सांभाळून आहेत. यात कलेची जाण असलेल्या शिलाहार-यादव सत्ताधिशांची कामगिरी स्पृहणीय आहे. भव्यता आणि कलात्मकतेच्या मंदिर शिल्पाचा मिलाफ याच काळात झाला. मराठवाडय़ातील औंढानागनाथ, कोल्हापूरचे महालक्ष्मीमंदिर त्याच्या नजीकचे खिद्रापूरचे विलोभनीय मंदिर या त्याच्या पाऊलखुणा आहेत. धार्मिक ठिकाणांसह तेथील चित्ताकर्षक मंदिरवास्तू उभारणीत महाराष्ट्र तसा भाग्यवान! देशातील १२ ज्योतिर्लिगापैकी पाच महाराष्ट्र भूमीवर आहेत. तर आठ पैकी साडेतीन शक्तिपीठांनी महाराष्ट्राचे नाव अधिक ठळक केले आहे. या सर्वच मंदिरांना काही भव्यता लाभलेली नाही, पण ही मंदिरे उभारताना अज्ञात शिल्पकारांनी त्यावर चढवलेला अनमोल, कलापूर्ण साज म्हणजे सत्यम्-शिवम्-सुंदरम्चा देखणा कलाविष्कार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा