नरेंद्र जोशी
कला संस्कृती- जी तुमच्या- आमच्यासारखे अनेक जण म्हणजे त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या आचार-विचारापासून बनते. आणि त्यातून त्या शहराची, एखाद्या शहराची ओळख बनते. पुणे शैक्षणिक, ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचे शहर. ते सामाजिक बदलांचे शहर, कला-संस्कृ तीची वैभवशाली परंपरा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. अगदी ८० च्या दशकापर्यंत पुणे हे खूप आवाक्यात असलेले, तुलनेने शांत आणि निवांत शहर होते. भरपूर पाणी, स्वच्छ हवा आणि संतुलित ऋतुमान ही पुण्याची वैशिष्ट्ये आजही कमी-अधिक प्रमाणात कायम असून, स्थलांतरितांना आकर्षित करतात. काळानुरूप बदललेल्या पुण्याकडे आकर्षित होण्यासाठी अनेक नवी कारणेही आहेत, आणि बहुसंख्येने असलेले ग्रोथ इंजिन्स हा एक महत्त्वाचा मुद्दा यासोबत निश्चितच जोडता येईल.
आठव्या महानगराचा वाढता विस्तार
शिक्षण, व्यवसाय, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान, व्यवसाय-रोजगाराचे प्रमुख केंद्र व देशातील आठवे महानगर म्हणून सुपरिचित आहेच; सोबतच आता नवे स्टार्ट अप हब म्हणून या महानगराकडे पाहिले जाते. काळाच्या बदलाची गती खूप अधिक आहे. पुणे शहरातील बदलांचा विस्तार व व्यापकता प्र्रचंड आहे. या बदलांचा दुसऱ्या बाजूने विचार करताना लक्षात येईल की, केवळ घर, बांधकाम क्षेत्राशी हे बदल निगडित राहिलेले नाहीत. हे बदल सर्वव्यापी झाले आहेत, होत आहेत. वेगाने त्यांच्यात बदल होतो आहे. भविष्यातील त्यांची गती अशीच असणार आहे यात दुमत नाही. विशेष म्हणजे पीएमआरडीए नव्या पुणे महानगराच्या वैशिष्ट्यांचा विचार करता ६ हजार ९०० चौरस किलोमीटर एवढ्या भव्य क्षेत्रासाठी सुमारे पुढील वीस वर्षांसाठी म्हणजे २०४१ पर्यंतसाठीचा हा आराखडा बनवला गेला आहे. आजच्या नियोजनाप्रमाणे ८१४ गावांचा समावेश असलेला व सुमारे ७३ लाख लोकसंख्येसाठी हा आराखडा असणार आहे.
घर खरेदीदारांची वाढती संख्या
नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना मागील अकरा महिन्यांचा आढावा घेता मागील ११ महिन्यांत पुण्याच्या निवासी क्षेत्राने उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. मालमत्ता विक्री नोंदणी जवळपास १.७५ लाख सदनिकांच्या जवळ गेली आहे. मागील दोन वर्षांतील ही सर्वांत वेगवान वाढ आहे. शहरात १ लाख ७२ हजार ६७७ मालमत्तेची नोंदणी झाली आहे, २०२३ मध्ये याच कालावधीशी याची तुलना केली असता, २५ वाढ नोंदली गेली आहे.
तसेच मुद्रांक शुल्क संकलनातही लक्षणीय वाढ झाली आहे, जी ६ हजार ४७९ कोटींहून अधिक आहे, जी वार्षिक ३५ पेक्षा अधिकची वाढ दर्शवते. या आकडेवारीवरून पुणे महानगराला निवासासाठी मिळणारा प्राधान्यक्रम आपसूकच लक्षात येतो.
वाढता कॉस्मो ग्राहकवर्ग
पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या किंवा पुणे महानगर परिसरात घर घेणाऱ्या व घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता दोन नवे बदल मागील काही वर्षांत झालेले दिसून येतात. पुणे महानगरात घर घेऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरितांमध्ये सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक आजही स्थलांतरित मुंबई व पुणे वगळता उर्वरित महाराष्ट्रातून येणारी मंडळी आहेत. सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांचे प्रमाण हे कॉस्मॉपॉलिटन स्थलांतरितांचे आहे. त्यातला मोठा ग्राहक वर्ग हा देशभरातून शिक्षण, नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या निमित्ताने येणारा आहे.
एक ग्राहक वर्ग असा आहे की तो संख्येने कमी असला तरी त्याचे अस्तित्व जाणवावे. दुसरा मोठा ग्राहक वर्ग मुंबईचा आहे. जो मुंबईतून ये- जा करतो किंवा काम व निवासासाठी मुंबई- पुणे- मुंबई असा त्याचा प्राधान्यक्रम असलेला दिसतो.
पश्चिमेकडील उपनगरे- सर्वार्थाने मुंबईशी कनेक्टिव्हिटी
मुंबईहून पुण्यात गुंतवणूक व निवासासाठी, कामासाठी येणाऱ्या ग्राहक वर्गाचा प्राधान्यक्रम हा नेहमीच पुणे शहरातील पश्चिमेकडील म्हणजे बंगळूरू- मुंबई द्रुतगती महामार्गावरील व या महामार्गामुळे ठळक ओळख मिळवलेल्या उपनगरांना मिळाला असल्याचा दिसून येतो. या उपनगरांची लिस्ट साधारणपणे वारजे- बावधन- वाकड- बाणेर- बालेवाडी- हिंजवडी- रावेत- किवळे या व अशा द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेला दिसून येतो.
हा गुंतवणूकदार किंवा ग्राहक वर्ग प्राधान्याने कामासाठी मुंबईतून पुण्यात येणे किंवा पुण्यातून कामासाठी मुंबईत जाऊन पुण्यात परतणे असा प्रवास करतो. यासाठी पुण्यात वरील उपनगरांमध्ये मुंबईच्या तुलनेत खूपच कमी किमतीत सदनिकांची उपलब्धता व त्यापेक्षाही विशेष म्हणजे मुंबईपेक्षा अधिक आकाराची ही घरे असलेली दिसून येतील. म्हणजेच मुंबईत जागेच्या अभावी उंच इमारती असल्या तरीही तुलनेने कमी आकाराच्या सदनिका तीदेखील पुण्याच्या तुलनेने अधिक किमतीची… हा पर्याय निवडण्यापेक्षा ग्राहक मुंबईपेक्षा मोठ्या आकाराची सदनिका तीदेखील योग्य किमतीत पुण्यात उपलब्ध होत असल्याने ग्राहक पुण्याला अधिक पसंती देतान दिसतो. त्यातही ज्यांना दोन ते तीन तासांचा प्रवास करणे सहजशक्य आहे. आता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गात नव्याने बनविण्यात आलेल्या मिसिंग लिंकमुळे हा कालावधी आणखी कमी होणार आहे. अशा ग्राहकांसाठी मागील काही वर्षांमध्ये स्टुडिओ फ्लॅट म्हणजेच मर्यादित जागा व सुविधांसह असलेल्या या निवासाच्या व्यवस्थेला प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय करोनानंतर जे काही आमूलाग्र बदल घडले किंवा घडत आहेत, त्यामध्ये वर्क फ्रॉम होम कल्चर, डिजिटलायझेशन, ऑनलाइन शिक्षण, ऑफिस आणि अशा सर्व नव्या गोष्टींमुळेदेखील मुंबईपेक्षा पुणे महानगरात निवासासाठी प्राधान्य मिळताना दिसतेे.
पुणे सर्वार्थाने योग्य शहर
दुसरीकडे विविध सर्वेक्षण व अभ्यासांमध्ये समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार बंगलोर, हैदराबादच्या तुलनेत निवासी इमारतींची मागणी वाढते आहे. पुणे महानगराची हद्द लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. या शहरांमध्ये स्थलांतर वाढते आहे. त्यातही पुणे हे भारतातील निवासासाठी सर्वात योग्य असे शहर म्हणून शिक्कामोर्तब याआधी झालेले आहेच.
पुण्यामध्ये ग्राहक निवासासाठी, गुंतवणूक म्हणून, वीकेंड होम किंवा निवृत्तीनंतर राहण्यासाठी घर या चारही उद्देशांसाठी घर घेऊ शकता. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला यामध्ये चांगला परतावासुद्धा मिळू शकेल यात शंका नाही. विशेष म्हणजे निवासासाठी घरांसोबत सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या निसर्गरम्य पुणे परिसरातील सेकंड होम, प्लॉट खरेदीकरून त्यावर स्वत:चा टुमदार बंगला उभारणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. रिअल इस्टेटमधील अशा विविध पर्यायांचे अनेक प्रकल्प आज चांगल्या प्रतिसादासह सुरू आहेत.
भारतातील सर्वाधिक वेगाने वाढ होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याची गणना होण्यासोबतच, पुण्यातील पायाभूत सुविधांचा गतीने विस्तार होत आहे. तसेच रिंग रोड, मेट्रो, चांदणी चौकामधील बहुमजली उड्डाणपूल, प्रस्तावित विमानतळ या गोष्टी पुण्यातील विकास प्रक्रियेला आणि पुण्यातील बांधकाम क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या आहेत, यात शंका नाही.
नवीन वर्ष, गुढीपाडवा व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर घर खरेदीसाठी सद्या:स्थितीचा आढावा घ्यायचा झाला, तर ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद नोंदवला गेला आहे. करोनाकाळानंतर तुलनेने अधिक चांगल्या गतीने रिअल इस्टेट क्षेत्राला सूर गवसला आहे. त्या अनुषंगाने अनेक गृह प्रकल्पदेखील येत आहेत. तेव्हा आपणही आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी साधायला हवी.
(लेखक रिअल इस्टेट क्षेत्राचे अभ्यासक व गुंतवणूकतज्ज्ञ आहेत.)
● naj.pune@gmail.com vasturang@expressindia.com