नारायण धारपांच्या कथांमधून उभं राहतं ते अमंगल प्रवृत्तींनी भरलेलं, भारलेलं घर. पण अखेर या अमंगल प्रवृत्तींवर मंगल प्रवृत्ती मात करते. हा प्रवास शब्दबद्ध करताना घर, गढी यांचं उभं केलंलं शब्दचित्र वाचकाच्या मनाचा ताबा घेतं.
‘आनंद महल’ पाहायला सदानंद सकाळी सकाळी जातो आणि ती वास्तू पाहून तिच्या प्रेमातच पडतो. मवाळ सोनेरी उन्हात ती प्रसन्न, आमंत्रक दिसत होती. वाडय़ाच्या चारही बाजूंना घडीव दगडाची भिंत, प्रत्येकीत कवाडं, त्याच्या आत पाश्चात्त्य लँडस्केप गार्डनरनं केलेली बाग. ठिकठिकाणी पशूंचे आकार तारांनी करून त्यांना वेली-पानांनी मढवलेलं. कुठे हत्ती तर कुठे घोडेस्वार, फाटकाच्या दोन्ही बाजूंना सिंह. पण आता या टोपियरीचं सूचक आकाराखेरीज काही उरलेलं नाही. फक्त अवशेष! दरवाजाचं कुलूपही षटकोनी नक्षीदार. ते भरभक्कम दार उघडताच नाटक-चित्रपटांच्या सेटप्रमाणं सजलेला दिवाणखाना सामोरा आला. भिंतीवर, उंचावर रंगीत काचा बसवल्या होत्या. आणि त्यातून येणारी सकाळची उन्हं रंगीत झोत बनून वास्तूला स्वप्निल स्पर्श देत होती. हॉलच्या अध्र्या उंचीवर चारी बाजूंनी गॅलरी होती. तिथं अनेक बंद खोल्यांची दारं दिसत होती. समोरच्या भिंतीत मध्यभागी हिरव्या बेझचा दरवाजा, त्याच्या मागे स्वयंपाक घर, कोठीची खोली, न्हाणी घर वगैरे असावं. वरच्या गॅलरीकडे कमनीय वळण घेऊन जाणारा रूपगर्वितेच्या अलंकारासारखा जिना, त्याला कोरीव काम केलेले खांब, कठडय़ाला सॅटिनसारखं मऊ पॉलिश आणि या सर्वाकडे मंत्रमुग्ध होऊन पाहाणारा सदानंद! त्या वास्तूच्या दर्शनानं जणू गारुड केलंय! छताला लटकणारी ही ५०/५० झुंबरं रात्री दिव्यांनी पेटून उठली की हाच दिवाणखाना कसा झगमगून उठेल? तो गॅलरीतल्या बंद दारामागच्या खोल्या उघडून पाहतो. खोल्याखोल्यांमधून रईसी झळकते आहे. उंची फर्निचर, पूर्णाकृती आरसे, ऐसपैस पलंग, याच खोल्यांतून आनंदाला उधाण आलं असेल. कधी मोहात घसरलेले मन, कधी शृंगाराचं अधिराज्य, कधी मत्त कामवासना अशा मानवी भावनांचा उत्सर्ग इथेच झाला असेल. पण आता सर्वच थिजलेलं-विझलेलं दिसत होतं. दर्शनी हॉलला लागूनच आणखी एक प्रशस्त दिवाणखाना. दोन्ही भिंतींच्या कडेनं खुच्र्याची रांग, एका भिंतीजवळ रंगमंच! म्हणजे इथे नृत्य-गायनाची मैफल रंगत असावी. त्याला लागून काचेच्या घुमटाखाली ठेवलेलं अनोख्या यांत्रिक करामतींचं, कलाकुसर केलेलं, एखाद्या म्युझियममध्येच शोभेल असं घडय़ाळ. तसाच पुढे तो अगदी वरच्या माळ्यावरच्या खोल्या उघडून पाहतो. त्यात मात्र जुन्या ट्रंका, मोडकी वाद्यं-फर्निचर, गाठोडी असलंच सामान होतं. पण तिथंच खोलीत लपलेला, विलक्षण मोह पाडणारा, ‘ये, ये’ म्हणून खुणावणारा आतला जिना, जिन्याच्या टोकाला असणारी ती बहुरूपीणी खोली! माणसागणिक वेगळं रूप धारण करणारी! सदानंदाला मद्य प्रिय म्हणून समोर येतं मद्यगृह! मद्याच्या बाटल्या किणकिणणारे प्याले, सेंटस्, मद्य, सिगारेटस् यांचा एकत्रित दरवळ. संमिश्र घोळक्याचा मनमोकळा आवाज. या दृश्यानं तो मद्यधुंद व्हावे तसा उत्तेजित होतो. त्या भारलेल्या अवस्थेतच तो वाडय़ाच्या मागचा भाग, जनरेटरची खोली पाहून घेतो.
वाडय़ाच्या प्रथम दर्शनानं वंदनाही चकित झाली आहे. ती सदानंदला अतीव समाधानानं डोळे मिटून बसलेला पाहते. इथं येण्यापूर्वीचे ते दिवस! त्याचं दारू पिणं, नोकऱ्या सुटणं, छोटय़ा अमरनं काल्पनिक मित्रांबरोबर एकाकीपणं खेळणं, वारंवार जागा बदलाव्या लागणं, प्रत्येक गोष्टीची चणचण आणि सरतेशेवटी १२ वर्षांच्या संसाराला सोडण्याचा तिचा निर्णय, तो सांगतानाचा आपला शांत, पण कणखर स्वर अमर आणि आपल्या सामानाच्या बॅगा पायाशीच, भिंतीचे निघालेले पोपडे, भकास वाटणाऱ्या त्या रित्या खोल्या. तो सगळा प्रसंग रेखीव, पण तिच्या नजरेसमोर येतो. पण अगदी अचानक या दूरच्या छोटय़ाशा गावात मिळालेली केअर टेकरची नोकरी! आणि हा इतका आलिशान बंगला. ती आनंदानं खोलवर श्वास भरून घेते. मोठय़ा प्रेमानं डोळे मिटलेल्या सदानंदच्या केसातून हात फिरवते. सदानंदनंही तिला खूप उत्कटतेने प्रतिसाद दिला. त्याचे डोळे चमचमत असतात. एक अनैसर्गिक उतावळेपणा तिला जाणवतो. दोन्ही टोकांकडून जळणाऱ्या मेणबत्तीसारखे. नैसर्गिक मर्यादे बाहेरचे. दुहेरी प्रकाश, पण दुहेरी शक्तिपातही. त्यामुळे मेणबत्ती लवकरच जळून खाक होईल. तिला आनंद महलबद्दल कळलेल्या अफवा आठवतात.
‘त्या वास्तूत पैंजणांचा, वाद्यांचा आवाज येतो.’
‘इथे दरोडेखोरांचे भीषण मृत्यू झालेत’
‘वास्तू जर ओसाड आहे तर केअर टेकर हवाच कशाला?’
‘आणि जर हवाच तर गावातला. आसपासचा कोणीच का तयार नाही?’
अकस्मात वंदनाला ललित नारायण मिश्रांचे डोळे आठवतात, त्यांनीच ही नोकरी दिली होती. त्या डोळ्यांतून एक हिडीस लालसा जाणवते. त्यांच्या अकस्मात आलेल्या श्रीमंतीमागे असलेली कुजबूज, अघोरी अस्तित्वाची त्यांनी पत्करलेली गुलामी आणि नैवेद्य म्हणून दिलेली लहान मुलं-मुली, तरुणी, त्या वास्तूतून आलेल्या जिवाचं पाणी करणाऱ्या किंकाळ्या..
रामधन शंगडा गडी, पण भावाचं उकिरडय़ावर भिरकावलेलं आतली आतडी ओरबाडलेली, रक्त शोषलेलं, अवयव तोडलेलं ‘प्रेत’ नावाची विटंबना बघून हादरला. पण मग नेमकं काय घडलं असावं? कोण आहे तिथं? याची उत्तरे मिळवायचीच म्हणून तर रामधन आपल्याला साथ देतो आहे.
साधीसुधी धुराने काळवंडलेली खोली! एका भिंतीला लांबच लांब टेबल, एका भिंतीत भांडी-कुंडी ठेवायचे फडताळ अशा स्वयंपाक घराचं ती देवघर बनवते. रामधनने विचारलेल्या मूर्ती, देवाचा फोटो, कुंकू यातलं तिच्याकडे काहीच नव्हतं, पण तिला जाणवत होतं, आता निकराच्या प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. तिनं मूठभर तांदळाच्या गोलाकार आसनावर सुपारीएवढा गुळगुळीत दगड ठेवला. त्या पाषाणदेवावर हळद वाहिली आणि सुरीचं धारदार पातं अंगठय़ाला लावून त्यातून आलेल्या रक्ताचा टपोरा थेंब कुंकू म्हणून विलक्षण श्रद्धेनं त्या देवाला लावला आणि आश्चर्य म्हणजे तो त्या देवमूर्तीत शोषला गेला.
सामान्य आयुष्य एका वळणावर येतं. तलवारीच्या धारेवर तोडलं जातं. सर्व परिमाणं बदलतात, अनुभवाच्या सर्वस्वी पल्याडचं जाणवू लागतं. मग उघडय़ा दाराचा काळा चौकोन ‘जनावराच्या वासलेल्या जबडय़ासारखा’ दिसतो. खिडक्या म्हणजे ‘डोळ्यांच्या रिकाम्या खोबणी’ दिसू लागतात.
दाराबाहेर विचित्र, चरचरीत, एकावर एक उमटलेले भेसूर आवाज येत होते. मग दार ठोकलं गेलं. दाराची दोन्ही पाखं भिंतीवर आपटून त्याच्या चिरफळ्या उडाल्या आणि दिसला भारणी लागलेला, हल्ला करण्याच्या पवित्र्यात असलेला सदानंदचा विकृत चेहरा! आणि त्याच्या मागे असलेलं ते भयंकर, अमंगळ अस्तित्व! त्या सर्वाना गिळून टाकायला आलेलं. ते पाहून गोठून गेलेला रामधन! वंदना पुढे होऊन पाषाणदेवाला श्रद्धेने स्पर्श करते आणि ते अमंगळ अस्तित्व झपाटय़ानं मागे फिरतं. पाषाणाच्या गर्भात निळसर प्रकाशबिंदू लखलखतोय आणि त्याकडे पाहता पाहता सदानंदचा क्रौर्याचा आवेश गळून पडतो. चेहरा पुन्हा सौम्य होतो. माणसाचा सर्वात खतरनाक शत्रू तोच असतो, पण मदतनीसही तोच असतो. म्हणूनच श्रद्धेच्या बळानं ती, भयाचा आकार पायरी पायरीने स्पष्ट होत गेला तरी कणखरपणे उभी रहाते. या सर्व थरारक प्रसंगाची साक्षीदार बनते ती स्वयंपाक खोली! जिला आता मंदिराचं मोल प्राप्त झालं आहे.
आता त्या अमंगळाचा मोहरा ललित नारायण मिश्राकडे वळला. बागेतल्या साध्या तारांनी बनलेल्या वेली-पानांच्या निर्जीव जनावरांच्या आकृतीत अनैसर्गिक जान आली. सैतानी शक्ती धुमसत होती. आक्रमणाला सिद्ध होती. मिश्रांनी केलेल्या पापांची सहस्रपटींनी परतफेड होत होती. त्यांचा वेदना-भय यांचा आकांत अमंगळाला तौषवित होता.
वंदनाकडे एकच छोटीशी गोष्ट आहे. मास्तरजींनी दिलेला काळा गोफ, मांगल्याचं-सदिच्छेचं एक प्रतीक, तो पाषाणदेव! रामधनकडे आहे प्रचंड संताप आणि मानवी शक्ती. छोटय़ा अमरकडे आहे त्याचा अमानवी मित्र. अशा या पापभीरू माणसांचंही एक मोल असतं. वेळप्रसंगी तीही एक शक्ती बनू शकते. धातूच्या शस्त्राला लाकडी मूठ लागते, नेट धरण्यासाठी खडकाचा पाया लागतो. सर्व घटक मिळूनच संपूर्ण शस्त्र होतं. कमी-अधिक कुवतीचे ते सगळे एकत्र आले होते. अमानवी हिंस्र शक्तीने लवलवणाऱ्या विकृतीबरोबर लढण्याची एक पूर्ण शस्त्र बनून.
बहिर्गोल भिंगातून सूर्याची किरणे एकत्र केली की गवताला जाळू शकतात त्याप्रमाणेच प्राणाची बाजी लागली, निकराच्या कसोटीचा क्षण आला की माणसाच्या मनाला धार येते.
अशुभाच्या विरोधात या मंगलशक्ती एकत्र येऊन ठाकल्या होत्या आणि मांगल्यच जिंकलं होतं. तुटायला आलेलं सदानंद-वंदनाचं नातं तावूनसुलाखून एका सुखमय प्रदेशात प्रवेश करत होतं.
मी सदानंद वज्रे- एक सर्वसाधारण पन्नाशीचा कारकुनी पेशाचा माणूस, पण काय मनात आले कोण जाणे स्वेच्छानिवृत्ती घेऊन कुलवृत्तान्त लिहायचे ठरविले. पेशवाईच्या आधीपासून मोठय़ा हुद्दय़ावर असलेल्या पराक्रमी सरदार घराण्याची माहिती त्या गावच्या जोशी काकांकडून मिळाली. या वज्रेंची मोठी गढी- किल्ला म्हणावा अशी शहरापासून दूर होती. मी लगेच पाहायला निघालोच. उन्हं कोवळी होती. वातावरण उत्साही होतं. रानझाडं, गवताचा एक वेगळा गंध, मंद वारा.. मस्तच! अचानक गढी सामोरी आली. भोवताली चांगला वावभर रुंदीचा तट, तटाच्या आत माळरानासारखं गवत माजलेलं आणि हे मैदान ओलांडून गेल्यावर काळ्याभोर दगडाची चिरेबंदी चारी बाजूंनी पसरत गेलेली मुख्य इमारत. तिला एकाच वेळी हत्ती-घोडय़ांचं सैन्य जाऊ शकेल असा भला थोरला बुरुजासारखा पुढे आलेला अवाढव्य दरवाजा. वरती खिडक्यांची रांगच्या रांग. तेव्हा ती पहारेकऱ्यांसाठी असावी. मी जसजसा तिच्याजवळ जाऊ लागलो, तसतसा तिचा आकार मनावर दडपण आणू लागला. बाहेरून एक फेरी मारली तरी दमछाक होईल असा, पण आत शिरायचं कसं? तोच एका खोबणीत एक छोटंसं दार दिसलं. नोकरा-चाकरांसाठी असावं. ते ओलांडलं की, समोर फरसबंदी केलेलं प्रशस्त मैदान लख्ख प्रकाशातलं, पण नाटक संपल्यावर रंगमंच उदास व्हावा तशी उदासी वातावरणात. सर्व पात्रं आपापला रोल संपवून निघून गेलेली. पण मनाला वाटत होतं की, आणखी कोणी तरी अकस्मात एण्ट्री घेणार आहे. निर्जन, ओसाड, कुरूप, भुकेला प्रदेश वाटत होता.
गढीच्या दोन्ही बाजूंना दगडी इमारतींच्या रांगा, पहारेकरी, गडी-माणसांसाठी. धान्य-धुन्य वैरणीच्या कोठय़ा, पण सर्व नि:स्तब्ध. मात्र दोनशे र्वष बिनावारसाची पडूनही भक्कमपणे पाय रोवून उभ्या होत्या. मुख्य इमारतीला काळ्या शिसवीचं, पितळी चकत्या मारलेलं, जाडजूड गोल कडय़ा असलेलं दार. दिंडी दरवाजा मात्र उघडा. चार-सहा पायऱ्या चढून गेल्यावर लाकडी कठडा असलेली लांबच लांब पडवी. आता रिकामी. पण माझ्या नजरेसमोर गाद्या-लोड तक्के टाकून रेलून बसलेले सरदार, कारभारी, मुत्सद्दी दिसू लागले. लाल पगडय़ा, जरतारी उपरणी घेतलेले. आत गेल्यावर खूप उंचीवर छत, तुळयांना ओळीने टांगलेल्या हंडय़ा आणि भिंतींवर महिरपदार कोनाडे, भिंतींतून अनेक दारे, त्यामागे खोल्या, पलंग, घडवंच्या आसनं, पण धुळीने भरलेल्या. वज्रे खूप कर्तृत्ववान असणार. माझे पूर्वज! ज्यांनी हा एवढा पसारा उभारला. एका खोलीच्या दारात उत्तम शिसवीचा कोरीव, पण रिकामा देव्हारा! या शेवटच्या वारसाने- दामोदर पंतांनी देवमार्ग सोडला असणार आणि कुणा अमंगलाचा आसरा घेतला असणार. त्यांनी सृष्टीच्या नैसर्गिक कवचाला भेद दिला असणार, पण अज्ञान ही काही सबब होऊ शकत नाही. विजेच्या जिवंत तारेस अजाणतेपणी स्पर्श झाला तरी शॉक हा बसणारच. तेच इथे घडले असावे.
वरच्या मजल्यावर जाणारा काळ्याभोर दगडी पायऱ्यांचा जिना, तिथे थंड गारवा. वरतीही खालच्यासारखा मोठा दिवाणखाना, सर्वत्र अनेक छोटय़ा-मोठय़ा आकाराच्या विविध उपयोगाच्या खोल्या. त्या खोल्यांना जोडणारे पॅसेज. मोठ-मोठी तांब्या-पितळ्याची भांडी असलेलं काळवंडलेलं स्वयंपाकघर, तिसऱ्या मजल्यावर संपूर्ण इमारतीएवढी गच्ची, तिथून लांबवर जाणारा रस्ता आणि भोवतालचा सगळा परिसर नजरेत येत होता. खाली भली थोरली पायऱ्यांची गोडय़ा पाण्याची विहीर. हे सर्व पाहता पाहता अंधार केव्हा कसा साकळत गेला ते कळलंच नाही. मी तंद्रीत होतो, त्यामुळे त्या निर्मनुष्य गढीवर कोणी माणूस दिसेल याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे अकस्मात जोशी काकांना बघून मला धक्काच बसला, पण खरा धक्का पुढेच होता. लालभडक चौरंगावरची धूळ झटकून आम्ही दोघे समोरासमोर बसलो. जोशी काकांनी ‘वज्रे’ या विषयाचा खूप अभ्यास केला होता- कागदपत्रे पाहिली होती. दामोदर वज्रे- त्यांची अघोरी साधना, त्यांनी जागवलेले अशुभ-अमंगल, त्यांची अलोट संपत्ती, जडजवाहीर, सोने-नाणे; त्या संपत्तीला असलेले त्या अमंगल आकाराचे संरक्षण! आणि महत्त्वाचा मुद्दा हा की, ही संपत्ती वज्रे घराण्यातीलच कुणाला तरी मिळणार. तेव्हा मी ही संपत्ती या असल्या भीषण गढीवर एकटं राहून शोधायची आणि जोशी काकांना द्यायची. त्यांनी आपल्याबरोबर दोन दिवसांपुरतं अन्नही आणलेलं आहे आणि एक पहिलवान गडी! मला कळलंच गोड बोलणारे काका संपत्ती घेतल्यानंतरही या गढीतल्या अघोरी शक्तींकडून किंवा अन्न-पाण्यावाचून कोंडून मारणार आहेत. सध्या तरी होकार देण्यावाचून मला गत्यंतर नव्हतं. मुख्य दार बंद करून ते दोघे निघून गेले. आता दोन रात्री या भयंकर ठिकाणी काढायच्या होत्या. कुठे आणि कसा शोधणार होतो मी ती संपत्ती या एवढय़ा मोठय़ा भव्य परिसरात? मग सुरू झाला सत् विरुद्ध असत्चा झगडा. दोनशे वर्षांपूर्वीच्या दामोदरपंतांचे प्रत्यक्ष दर्शन, त्यांनी दाखवून दिलेला अमूल्य खजिना, त्यांच्याशी साधता आलेला प्रत्यक्ष संपर्क, अघोरी शक्तींशी केलेला सामना- केवळ बारा ज्योतिर्लिगाचा ठसे असलेला तांब्याचा पत्रा- विलक्षण श्रद्धा आणि आतापर्यंतचे पापभिरू आयुष्य, कुणाचा कधी हेवा-दावा केला नाही, दुसऱ्याच्या वस्तूचा लोभ धरला नाही की कुणाचं कधीही वाईट चिंतलं नाही, हेही माझ्या बाबतीत पुण्यकर्म ठरलं असेल, पण दामोदरपंतांना मुक्ती मिळाली आणि लालची-मोहवश जोशी काकांना मृत्यूचीच सजा मिळाली.
आणखी एक गोष्ट माझ्या बाबतीत घडली. माझ्यात एक विलक्षण आत्मविश्वास आला, या अशा कसोटीच्या प्रसंगातून गेल्यामुळे काही शक्तींचा उत्सर्ग पोहोचल्यामुळे मला एक देणगी प्राप्त झाली होती. सामान्य माणसांना आगीची धग वा गारवा डोळे बांधले तरी जाणवतो, तसे मला आसपासचा दुष्टपणा, अमंगळाची चाहूल जाणवू लागली. क्ष-किरणांनी त्वचा भेदून अस्थी
दिसू शकतात तर साधना-उपासनांनी क्षमता वाढली असेल
तर समोरच्यातला बरा-वाईट गुणधर्मही जाणवायला हवा.
माझं तसंच झालं होतं आणि आता माझ्या आयुष्याला दिशा मिळाली होती, हेतू मिळाला होता. आता माझं पुढचं आयुष्य इतरांचं जीवन मंगलमय करण्यात घालवणार हे आता निश्चित झालं होतं.
अशी ही वेगळी सृष्टी, वेगळं जग, पण माणसं त्यांच्या भाव-भावना, त्यांची सुख-दु:ख, माया-मोह सर्व तेच. अनुभव वेगळा, पण त्याचं फलित इथलंच. (उत्तरार्ध)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा