कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण करण्याकरिता नोंदणीकृत करार बंधनकारक आहे आणि बहुतांश वेळेस विकासक आणि खरेदीदार ग्राहक यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकारासंबंधी महत्त्वाच्या तरतुदी या करारात असतात. घरखरेदी ही एक अभिमानाची आणि आनंदाची बाब असते आणि या आनंदावर विरजण पडू नये म्हणून आपण घरखरेदीचा करार तपासून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण करण्याकरिता नोंदणीकृत करार बंधनकारक आहे आणि बहुतांश वेळेस विकासक आणि खरेदीदार ग्राहक यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकारासंबंधी महत्त्वाच्या तरतुदी या करारात असतात.
करारातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे क्षेत्रफळ. मालमत्ता बाजारात बिल्टअप, सुपर बिल्टअप, युजेबल असे अनेकानेक शब्द वापरात आहेत, मात्र ते सर्व शाब्दिक बुडबुडे आहेत. रेरा कायदा लागू झाल्यापासून करार आणि त्याची नोंदणी होताना घराचे कारपेट (चटईक्षेत्र) क्षेत्रफळ लिहिणे बंधनकारक आहे. आणि जे क्षेत्रफळ करारात लिहिलेले असेल तेवढेच मिळण्याचा ग्राहकास अधिकार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगितलेले क्षेत्रफळ आणि करारात लिहिलेले क्षेत्रफळ यात तफावत असता कामा नये; आणि अशी तफावत असेल तर करारातील क्षेत्रफळापलीकडे आपल्याला काही मिळणे अगदी अशक्य नसले तरी कठीण नक्की आहे.
रेरा कायद्याअगोदर कारपेट क्षेत्रफळाची व्याख्या नव्हती, आता रेरामुळे कारपेटची व्याख्या आहे. काही वेळेस असे होते की घराच्या क्षेत्रफळापैकी काही क्षेत्रफळ कारपेट व्याख्येत बसत नाही, त्यामुळे तुमच्या करारात लिहिता येत नाही असे सांगण्यात येते. हे अर्धसत्य आहे. घराच्या क्षेत्रफळात कारपेट आणि इतर क्षेत्रफळ असू शकते. मात्र, ते तसे स्वतंत्र करारात लिहिता येते त्यात काहीच अडचण नाही. याचा मुख्य फरक तुम्हाला कर्ज घेताना किंवा विकताना लक्षात येतो. समजा तुमच्या वापरात असलेले क्षेत्र १००० चौरस फूट आहे, मात्र करारात केवळ कारपेट क्षेत्रफळ ८०० चौरस फूटच लिहिले असेल, तर तुमची कर्जाची आणि विक्रीची सगळी गणिते त्या ८०० चौरस फुटावरतीच होणार, १००० चौरस फुटावर नाही. कारण वरच्या २०० फुटांची मालकी रीतसर तुमच्याकडे आल्याचा कागदोपत्री पुरावाच नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पार्किंगचा. रेरा कायद्याने पार्किंग विक्रीला मोकळीक दिलेली असल्याने आता पार्किंग खरेदी-विक्री करता येते. तरीसुद्धा बरेचदा आणि विशेषत: पुनर्विकास प्रकल्पातील मूळ सदस्यांना पार्किंग देताना ते करारात लिहिले जात नाही, तर त्याकरिता अॅलॉटमेंट लेटर किंवा तत्सम कागदपत्र केली जातात. वरच्या क्षेत्रफळाच्या उदाहरणाप्रमाणेच जी गोष्ट कराराद्वारे तुमच्याकडे आलेली नाहीत, ती तुम्हाला विकता येत नाही, त्याचा व्यवहार करताना अडचणी येतातच. तुम्ही पार्किंग विकत घेतलेले नसल्याने त्यावर सहकारी गृहनिर्माण संस्थादेखील दावा आणि मागणी करू शकते. समजा, विकासकाने तेच पार्किंग इतर व्यक्तीस कराराने विकल्यास त्याला मालकी सिद्ध करणे जास्त सोपे जाते. म्हणूनच घर खरेदी करताना, त्याचा करार करताना, आपल्याला नक्की काय कबूल करण्यात आले आहे? कबूल केल्याप्रमाणेच करारात लिहिण्यात आलेले आहे का? कबुली आणि करारात तफावत नाही ना? असेल तर का आहे? हे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधली पाहिजेत, जाणून घेतली पाहिजेत. जेणेकरून भविष्यात वादविवाद आणि पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही.
tanmayketkar@gmail.com