पूर्ण दक्षिण भारतात एकेकाळी प्रेक्षणीय वास्तू म्हणून प्रसिद्ध असलेला मदुराईतील नायक महाल हा दक्षिण भारताच्या सहलीवर जाणाऱ्या कित्येक पर्यटकांच्या खिजगणतीत नसावा, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तमिळनाडू राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मदुराई शहरातील खुणेची इमारत म्हणून मीनाक्षी मंदिराला मिळालेल्या भरपूर प्रसिद्धीमुळे नायक महाल झाकोळला गेला आहे. तो पाहण्याचे खूपशा लोकांच्या लक्षात येत नाही, हे खरे आहे. मीनाक्षी मंदिराला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की मदुराईतील कोणत्याही स्थळाचे स्थान वा दिशा सांगताना ते स्थळ मीनाक्षी मंदिरापासून किती दूर आहे हे सांगितले जाते. असं म्हणतात की नायक महालाइतकी सुंदर आणि भव्य इमारत संपूर्ण दक्षिण िहदुस्थानात सापडणार नाही. एकेकाळी जवळजवळ पूर्ण दक्षिण िहदुस्तान व्यापणाऱ्या विजयनगरची बलाढय़ िहदू राजसत्ता तालिकोटच्या इ. स. १५६५च्या युद्धानंतर संपुष्टात आली. त्यानंतर विजयनगरच्या मांडलिक राजांनी वा त्याच्या सरदारांनी, म्हणजे केलाडी, मदुराई, जिंजी, तंजावूर, काळहस्ती, चित्रदुगे, वेलूरच्या नायकांनी आपापली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. या सर्व नायक राजांमध्ये विशेष प्रसिद्ध पावले ते मात्र मदुराईचे नायक होय. तमिळनाडूचा बहुतांश प्रदेश आणि त्रावणकोर राज्याचा बराचसा प्रदेश अंकित करणाऱ्या, मदुराई ही राजधानी करणाऱ्या नायकांनी १५२९ ते १७३६ पर्यंत राज्य केले. या घराण्यात १३ राजे होऊन गेले. नायक घराण्यातील तेरा राज्यकर्त्यांपकी तिरुमल नायक या इ.स. १६२३ ते १६५९ ‘दरम्यान राज्य करणाऱ्या या राजाची कामगिरी उल्लेखनीय म्हटली जाते. वास्तविक हा राजा दिल्ली आणि शेजारील मुस्लीम राजांकडून होणाऱ्या आक्रमणाच्या सावटाखाली सतत होता, तरीही त्याने त्या हल्ल्यांचा सामना केला वा ते परतवून लावून प्रजेच्या हिताकडे लक्ष दिले. या राजांच्या कारकिर्दीत कला आणि संस्कृतीला उत्तेजन मिळाले, राज्याची नव्याने घडी बसविली गेली आणि दिल्लीच्या सुलतानांकडून देवळांची जी नासधूस झाली होती तिची पुनर्रचना करण्यात आली. हा राजा कलेचा मोठा भोक्ता होता. त्याने स्थापत्यशास्त्राला उत्तेजन दिले. पांडय़ राजांच्या काळातील मोडकळीस आलेल्या बऱ्याचशा देवळांचीही त्याने दुरुस्ती केली.
तिरुमल नायक या राजाने मदुराईतील हा नायक महाल म्हणून प्रसिद्ध असलेला सुंदर महाल इ.स.१६३९ मध्ये इटालियन आíकटेक्टच्या संकल्पनेनुसार बांधला. राजा स्वत: येथे राहात असे आणि आपला दरबारही इथेच भरवीत असे. रंगमंच, राजाचे खास मंदिर, शस्त्रागार कक्ष, पालखीची खोली, नोकरा-चाकरांची जागा, जनानखाना, शाही संगीतकक्ष, यांच्यासाठी प्रासादात सोय केली होती. कमळांनी व फुलांनी भरलेले सरोवर या महालाची शोभा वाढवीत असे. सध्या फक्त स्वर्ग विलासम आणि त्या लगतची काही दालनं दिसत असली तरी हा महाल दिसतो त्यापेक्षा मुळांत चौपट मोठा होता, असे म्हणतात. पण तिरुमल नायकाचा नातू, चोक्कनाथ नायक याने आपल्या स्वत:च्या त्रिची येथील महाल सजविण्यासाठी, त्याच्या राजवाडय़ाला जोडण्यासाठी यातील बऱ्याचशा रत्नजडित वस्तू, लाकडातील कलाकुसर आदी काही भाग उचलून नेले, तर प्रासादातील काही भाग तोडले. इतकं झालं तरी या महालाचे सौंदर्य अद्यापही चांगले टिकून आहे. महालाच्या दालनांना भरपूर उंची दिली आहे. घुमटातून असलेल्या खिडक्यांतून अंतर्भागात पुरेसा उजेड मिळाला आहे. तक्तपोशीला आणि कमानींच्या कडेने केलेले गिलाव्यामधील फुला-पानांचे नक्षीकाम अतिशय सुरेख दिसते. बांधकामात योजलेल्या घुमटांमुळे महालाच्या भपकेपणात भर पडली आहे. पुढे १८६६ ते १८७२ च्या दरम्यान या महालाचे महत्त्व आणि सौंदर्य लक्षात घेऊन मद्रासचे गव्हर्नर असलेल्या लॉर्ड नेपियर यांनी या महालाची बरीचशी डागडुजी केली. असं असलं तरी आता अस्तित्वात असलेल्या महालाच्या स्तंभांवरून आणि नक्षीदार कमानींवरून महालाच्या एकूण भव्यतेची आपल्याला कल्पना येते. यातील एकेका स्तंभाचा व्यास पाच फूट आहे, यावरून या महालाच्या भव्यतेची कल्पना यावी.
आज आपल्याला प्रवेशद्वार, मुख्य हॉल आणि नृत्यशाला दिसते. तिरुमल नायक याच्या मनात मात्र हा महाल दक्षिण भारतातील एक लक्षणीय महाल व्हावा असे होते. आयताकृती चौक मध्यभागी सुरुवातीला आपल्याला दिसतो. समोर सुस्पष्ट खोदकामातील नक्षीने युक्त, चाळीस फूट उंच स्तंभांवर तोलल्या गेलेल्या कमानी असलेले असे दोन दिवाणखाने या चौकाच्या दुतर्फा दिसतात. या चौकात पर्यटकांची बसण्याची व्यवस्था करून सध्या तिथे ‘लाइट अँड साऊंड’ हा कार्यक्रम दोन भाषांत दाखविला जातो. विशेष प्रकारच्या विटांनी हे बांधकाम झाले आहे, तर पृष्ठभागावरील नाजूक कलाकुसरीचा तपशील चुना व अंडय़ातील पांढरा भाग याने पूर्ण केला आहे. आतील लांब, रुंद दालनांना बाहेरून पुरेसा प्रकाश मिळणे कठीण होईल हे ओळखून, घुमटालाच झरोक्याची सोय करून ‘टॉप लाइट’ ची छान सोय केलेली दिसते. आम्ही तेथे पोहोचल्यावर महालाचा अधिक तपशील मिळावा म्हणून मी गाइडच्या शोधात होतो, पण तेथे पर्यटकांसाठी गाइड मिळत नसल्याचे तेथील अधिकाऱ्याकडून ऐकून काहीसे हिरमुसलो. मात्र प्रकर्षांने आठवण आली ती ही की शेजारच्याच केरळ राज्यामध्ये प्रत्येक मोठय़ा इमारतीत सरकारतर्फेच नि:शुल्क गाइड उपलब्ध करून दिला जातो.
सुरुवातीचे प्रवेशद्वार गेल्या शतकात दुरुस्त केले गेले आहे. स्वातंत्र्यानंतर हा महाल राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
मदुराईचा भव्य, देखणा नायक महाल
पूर्ण दक्षिण भारतात एकेकाळी प्रेक्षणीय वास्तू म्हणून प्रसिद्ध असलेला मदुराईतील नायक महाल हा दक्षिण भारताच्या सहलीवर जाणाऱ्या कित्येक पर्यटकांच्या खिजगणतीत नसावा, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तमिळनाडू राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मदुराई शहरातील खुणेची इमारत म्हणून मीनाक्षी मंदिराला …

First published on: 21-12-2013 at 08:27 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirumalai nayakar mahal of madurai