या लेखांपासून प्रेरणा घेऊन किंवा तुमच्या अंत:प्रेरणेने तुम्ही तुमच्या घराला अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न करत असाल. त्यासाठी जागरूकपणे आणि माहितीपूर्वक अधिकाधिक पर्यावरणपूरक पर्यायांची निवड करण्याची सवय लावून घ्याल. मात्र, अनेकदा आपले निर्णय चुकले ही बोचरी जाणीव या प्रवासात तुम्हाला पदोपदी अनुभवायला मिळेल. आपले नेमके काय चुकले हे कळेपर्यंत आपल्या हातून एखादी चूक पुन:पुन्हा करून घ्यायचं कसब आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खुल्या अर्थव्यवस्थेने अचूक साधलेलं आहे.
प्रदूषण- वायूचे की जमिनीचे?
गेल्या काही वर्षांपासून भारतात जवळजवळ सगळीकडेच विजेची टंचाई जाणवते आहे. भारतातली अधिकाधिक राज्य वीजटंचाईच्या या प्रश्नाला सामोरी जात आहेत. यावर एक नामांकित उपाय काही वर्षांपूर्वी सामोरा आला- नेहमीचे बल्ब बदलून त्याजागी सीएफएल दिवे वापरायला लागायचे. खरोखरीच हे नवं तंत्रज्ञान विजेचा वापर कमी करतं. हे सीएफएल दिवे नेहमीच्या बल्बपेक्षा थोडे महाग असले तरी अधिक वेळ चालतात, शिवाय कमी वीज वापरतात तेव्हा सुरुवातीला गुंतवलेली थोडी अधिक रक्कम या दीर्घकाळ बचतीत फायद्यात पडते, असं गणित ग्राहक राजाला समजावलं गेलं. अधिकाधिक सीएफएल दिवे वापरायला आपण सर्वानीच पसंती दिली. जसजसे हे दिवे अधिकाधिक वापरात यायला लागले आणि आयुष्य संपून कचऱ्यात जमायला लागले तेव्हा या नव्या दिव्यांच्या बचतीमागे दडलेली छुपी आतबट्टय़ातली गणितं सामोरी यायला लागली. हे दिवे मार्केटिंग आणि उत्तम विपणन व्यवस्थेच्या माध्यमांतून आज खेड्डय़ापाडय़ांत उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. मात्र या दिव्यांच्या वापरानंतरची विल्हेवाट लावण्याची कोणतीच व्यवस्था हे दिवे बनवणाऱ्या किंवा विकणाऱ्या कंपन्यांनी बनवलेली नाही. मोठय़ा प्रमाणात वापरले गेल्याने हे दिवे नेहमीच्या बल्बपेक्षा अधिक कार्यक्षम ठरले आणि वीजबचत झाली. मात्र तितक्याच मोठय़ा प्रमाणात गावा-शहरांतून कचऱ्यात हे दिवे फेकले गेल्याने साऱ्या ठिकाणी या दिव्यात वापरले गेलेले पाऱ्यासारखे घातक धातू जमिनींत, भूजलसाठय़ांत मिसळले, ही वस्तुस्थिती आहे.
या दिव्यांच्या भारतातल्या विक्री मोहिमेच्या वेळेस अधिक कार्यकुशल, सोपा, आणि स्वस्त पर्याय अनेक कंपन्यांनी दडवून ठेवला. आज आपल्या अवतीभोवती असणाऱ्या एलईडी दिव्यांचा पर्याय अधिक वीज वाचवतो. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी देखील एक यंत्रणा लागेल. मात्र ती यंत्रणा भारतात विकसित होत आहे, अस्तित्वात आहे आणि अगदी कचऱ्यात फेकले गेले तरी या दिव्यांमुळे कोणतेही घातक धातू जमिनीचं आणि भूजल साठय़ांचं प्रदूषण करत नाहीत, असं समोर येतं आहे.
जपून चाल..
पर्यावरण प्रेमाची कास धरताना, आपल्या वास्तूत अनेक पर्यावरणपूरक बदल घडवताना एक ग्राहक म्हणून किती सजग राहायला हवं याची ही एक फक्त झलक. आपल्या आजूबाजूला अनेक बदल घडताहेत, ज्यात आपल्या मताचा विचार कोणी करत नाही. त्या बदलांच्या प्रक्रियेत आपल्याला स्थानच नाही. अशा वेळी आपल्या घरात आपण अधिकाधिक पर्यावरणपूरक जीवनशैली कशी काय राबवायची? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
सगळ्यात पहिली गोष्ट आपण साऱ्यांनी केली पाहिजे ती म्हणजे, आपल्या घरात अशाच गोष्टींना प्रवेश द्यायचा ज्या आपल्याला दीर्घकाळ उपयोगी पडतील. उदाहरणार्थ- प्लॅस्टिकच्या बादलीऐवजी आपण जुन्या पद्धतीचं घंगाळं किंवा धातूची बादली वापरू शकतो का? याचा विचार व्हायला हवा. नव्या गोष्टी विकत घेताना टिकाऊपणा हा गुण जमेस धरून दूरदृष्टीने खरेदी व्हायला हवी.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात उपलब्ध गोष्टींच्या पर्यावरण अनुकूलतेचा अधिक समग्रपणे आपणच विचार करायला हवा. साधं उदाहरण देतो. नव्या घरासाठी जेव्हा पंखे विकत घ्यायचा विचार झाला तेव्हा मी चार दुकानं फिरण्याऐवजी महाजालावरून विविध कंपन्यांच्या पंख्यांच्या उपलब्ध पर्यायांचा बारकाईने अभ्यास केला. दोन-चार कंपन्यांनी दिलेले पर्याय तपासले. जास्तीत जास्त पंखे साधारण ७० ते ८० वॅट वीज खर्ची घालत असताना काही इको फ्रेंडली पंखे मात्र ४०-५० वॅटवर चालणारे असे होते. किमतीत फारसा फरक नव्हता, आणि सहाजिकच हे पंखे फार मागणीत नसल्याने खरेदी करताना विक्री किमतीवर मी घासाघीस करत उत्तम किमतीत हे नवे पंखे पदरी पाडून घेतले. दिवसाला ८ तास पंखा वापरला असं गृहीत धरलं तर माझ्या एका पंख्याची बचतीची वीज वर्षांला साधारण २८०० वॅट होते.
तिसरी गोष्ट म्हणजे आपण बहुआयामी, बहुपयोगी वस्तू निवडण्याकडे भर देतो का, हे पाहायला हवं. नव्या जमान्यात अनेक गोष्टी अशा मिळतात ज्या एकाऐवजी अनेक कामं किंवा जबाबदारी निभावू शकतात. अशा वस्तूंच्या निवडीमुळे आपल्या गरजा भागतात, जागेची
बचत होते. शिवाय पशाचीदेखील बचत होते. मुंबईत सर्रास आढळणारी गोष्ट म्हणजे सोफा-
कम-बेड किंवा जेवणाचं टेबल मुलांच्या अभ्यासासाठी वापरणं. इतरही अनेक गोष्टी आपल्याला सहज करता येतील. मोठे एलसीडी दूरचित्रवाणी संच आजकाल संगणकाच्या पडद्यातही रूपांतरीत करता येतात. किंवा संगणकाच्या पडद्याला दूरचित्रवाणी-संच जोडण्याची सोय करता येईल का?
गोधडी ग्लोबल होते तेव्हा..
आपल्या घरात केलेले छोटे छोटे बदल आपल्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांना नक्कीच लक्षात राहतात. त्यांच्यातलं कुतूहल जागवतात. ते बदल आत्मसात करण्याकरता प्रोत्साहित करतात. आपण चालत असलेल्या वाटेवर नवे वाटसरू मिळवले तरच त्या पायवाटेची वहिवाट होईल, हे ध्यानात घेऊनच आपण आपल्या वाटेवर हिकमतीने चालायला हवं. हे आपल्या परीने आपण केलेलं धाडसच असतं की. माझ्या घरी भांडी घासण्याआधी साध्या पाण्याने विसळली जातात आणि ते पाणी झाडांना, बगीचाला घातलं जातं. ही आमच्या आईची पद्धत. मीदेखील ती पाळायला लागलो आहे. कारण तिने नेटाने अनेक र्वष ही पद्धत माझ्यासमोर पाळलेली आहे. माझ्या सुरुवातीच्या हेटाळणीला, थट्टेला न जुमानता ती हे करत राहिली आणि माझ्यावर नकळत संस्कार होत राहिले.
आज मी घरात जागरूकपणे पर्यावरणपूरक गोष्टी आणतो. कटाक्षाने त्यांचाच अधिकाधिक वापर करतो. मला पाहून माझे अनेक मित्र, नातेवाईक आणि स्नेही प्रभावित होतात. पण मी त्यांना एक गोष्ट आवर्जून सांगतो. पर्यावरण प्रेमाचे खरे संस्कार मला घरीच मिळाले, जसे तुम्हा सगळ्यांनादेखील ते कदाचित मिळाले असतील. लहानपणापासून मला आजीच्या उबदार गोधडीची साथ मिळालेली आहे. तिची निगुतीने वापरलेली पातळं थोडी जुनी झाली म्हणजे त्यांच्या उबदार मऊ गोधढय़ा ती शिवायची. त्या पांघरुणात झोपताना मायेच्या संस्कारांसोबतच आपल्याकडे उपलब्ध रिसोर्स अधिक कार्यकुशलतेने वापरायचे, पुन:पुन्हा नवनव्या रूपात वापरायचे संस्कार मिळाले. माझी आजी या सगळ्याला काटकसरीचा संसार म्हणायची, आधुनिक भाषेत आम्ही याला कार्यकुशल निवडीचं शास्त्र म्हणतो. दररोज गोधडी पांघरून झोपताना या गोष्टीची राहून राहून गंमत वाटते, की आजीच्या काटकसरीच्या संसारात आजच्या भांडवलवादी जागतिक अर्थव्यवस्थेच्या रेटय़ाला माझ्या घराच्या उंबऱ्याबाहेर थोपवायची ताकद आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा