जगजित सिंग यांनी गायलेले एक जुने गाणे मला खूप आवडले होते. अनेकांना ते आजही मुखोद्गत असेल.
‘‘यह दौलत भी ले लो, यह शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो, बचपन का सावन
वह कागज की कश्ती वह बारीश का पानी’’
गाण्यात वर्णन केलेलं संथ जीवन आणि रेंगाळत गेलेलं बालपण ज्यांनी अनुभवलं नसेल त्यांनादेखील हे गाणं भुरळ घालतं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणत दिवसाचे चोवीस तास आणि वर्षांचे बारा महिने पायांना चक्र लावून धावपळ आणि ताणतणाव जगताना एखाद्या काल्पनिक शांत खेडय़ातल्या डोंगर, नदी, झाडांच्या कुशीत विसावलेल्या घराचं काल्पनिक चित्र बघूनच समाधान वाटतं. त्यातून सेकंड होम, फार्म हाऊससारख्या गोजिरवाण्या संकल्पना खुणावू लागतात. जगजित सिंग यांचं गाणं अशाच साऱ्या भावनांना वाट करून देत मनाला सुखावतं.
‘‘मोहल्ले की सबसे निशानी पुरानी
वह बुढिया जिसे बच्चे कहते थे नानी
वह नानी की बातों में परियों का डेरा
वह चेहरे की र्झुीयों में सदियों का फेरा’’
लहानपणी जे पाहिलं, अनुभवलं ते हरवल्यावर व्याकूळ होणं साहजिक आहे, पण जे कधीच पाहिलेलं नाही, जे फक्त ऐकून होतो, ते आता बघायला मिळणार नाही म्हणूनदेखील माणसं हळहळतात. अगदी लहानपणी एका धडय़ात पुलंनी केलेलं ट्रामचं वर्णन वाचलं होतं. ट्राम पाहिली नव्हती आणि एकदम मुंबईतली ट्राम बंद झाल्याची बातमी वाचून त्या वेळी मला वाटलं, की आता आपल्याला ट्राम म्हणजे काय ते कधीच पाहायला मिळणार नाही. झोपेतदेखील पुस्तकातलं ट्रामचं चित्र दिसत असे. आता मोठेपणी ट्रामचे फोटो बघतो तेव्हा ते सारं आठवून मौज वाटते.
थोडी वय वाढलेली माणसं नॉस्टेल्जिक झाली की तरुण त्यांना हसतात. हा निसर्गनियम आहे. एकेकाळी मीदेखील हसायचो. पण प्रत्येक संवेदनाशील तरुण पुढे केव्हा तरी गतस्मृतींनी व्याकूळ होणारच असतो. गंमत म्हणजे ज्या बॉलिवूडला लोक हसतात त्याच बॉलिवूडने ही भावना ‘निकाह’ सिनेमात एका सुंदर गाण्यातून मांडली आहे. त्या सिनेमात गुलाम अली आणि सलमा आगाच्या देखील आवाजातील गजल आहेत. कॉलेजमध्ये शेवटच्या दिवशी नायक आपल्या भावना व्यक्त करतो. महेंद्र कपूरच्या आवाजातील हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं.
‘‘अभी अलविदा दोस्तों मत कहो
न जाने कहां फिर मुलाकात हो
बीते हुये लम्हों की कसक साथ होगी
ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी
यह साथ गुजारे हुए लम्हों की दौलत
जजबात की दौलत यह खयालात की दौलत
कुछ पास न हो पास यह सौगात तो होगी
ख्वाबों ही में हो चाहे मुलाकात तो होगी’’
पण आता शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलगा किंवा मुलगी गावातच राहील, दिवसभर नोकरी करून संध्याकाळी घरी येईल आणि आईवडिलांना ऑफिसमधल्या गमती सांगेल, ‘छोटीसी बात’मध्ये बसच्या रांगेत अरुण आणि प्रभा यांचं प्रेम आणि लग्न जमतं, हे कथानक आता इतक्या सरळ वळणात जाणार नाही.
‘‘जानेमन जानेमन तेरे दो नयन
चोरी चोरी लेकर गए देखो मेरा मन’’
म्हणताना अरुणला लाजून किंवा बुजून चालणार नाही. आता कॉल सेंटरमध्ये किंवा त्या पूर्वी कुठे मत्री आणि प्रेम जमेल, पण लग्न होण्याआधी प्रेमाला अनेक कसोटय़ांतून जावं लागेल.
‘‘चांद मध्धम है आसमां चूप है
नींद की गोद में जहां चूप है
दूर वादी में दुधिया बादल
झुक के पर्बत को प्यार करते हैं
दिल में नाकाम हसरतें लेकर
हम तेरा इंतजार करते है’’
म्हणत आळवणारी प्रणयिनी आता नाही आणि प्रेयसीची वाट पाहात रात्र ढळली म्हणून अश्रू ढाळणारा प्रियकर आता
‘‘सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे
जहां की ऋत बदल चुकी ना जाने तुम कब आओगे’’
असं विरहगीत आळवणार नाही. पण फेसबुकवर या आशयाची गाणी एकमेकांसाठी नक्की अपलोड करतील किंवा परस्परांना व्याकूळ संदेश पाठवतील. त्यात उत्कटता असेलच, पण जुन्या पिढीला अभिप्रेत असलेली तरल प्रायव्हसी नसेल. पारंपरिक अर्थाने घर उभारणे, संसाराला लागणे हे सारे गुंतागुंतीचे होत चालले आहे. मागच्या पिढीला हे सारे समजून घेताना आणि त्याच्याशी समरस होताना धाप लागावी अशी गुंतागुंत वाढते आहे. तिला मागणी घातल्यावर ती सारासार विचार करून स्वत:चे देखील मूल्यमापन करते आणि प्रतिसाद द्यायचा की नाही हे डोळसपणे ठरवते.
‘‘ढूंढोंगे अगर मुल्कों मुल्कों
मिलने के नहीं नायाब हैं हम’’
हे तिला ठाऊक आहे.
टेनिसनच्या एका कवितेत म्हटलं आहे,
Old oder changes, yielding place to the new. पण या बदलांचा वेग फार सुसाट आहे.
अगदी कालपरवापर्यंत नव्या पिढीचा वाटणारा अभिजित सावंत इंडियन आयडॉल झाला तेव्हा समारोपाच्या प्रसंगी कोरससह गायला होता.
‘‘रहे या न रहे कल, कल याद आएगे ये पल
पल ये हैं प्यार के पल, चल आ मेरे संग चल
चल, सोचे क्या, छोटीसी है जिंदगी
कल मिल जाये तो होगी खुशनसीबी
हम रहे या न रहे कल, कल याद आएगे ये पल’’
तर या तरुणांनादेखील कुठल्या तरी स्मरणरंजनाचे रेशीमधागे नंतर जखडणार आहेत. आज आपल्याला ग्रामोफोन रेकॉर्डचा फोटो पाहिल्यावर जे वाटतं ते त्यांना कदाचित जुने एसएमएस आठवून वाटेल किंवा मोबाईल आणि इंटरनेट पहिल्यांदा जोडले गेले तेव्हाचा थरार आठवून वाटेल. तेव्हाची घरे कशी असतील कोण जाणे! घरे असतील. ती उभारण्याची आसदेखील असेल, पण त्या घरांचे चेहरे, िभती कदाचित खूप खूप निराळय़ा असतील.
आणि दोघे नोकरीसाठी परदेशी असतील तर तिथे तनहाई, भीगी रात, मध्धम चांद कुठला. तिथे कदाचित एकाकी रात्र घराच्या बंद काचेतून हिमवर्षांव दिसेल. एका इंग्रजी लोकगीतात डिसेंबर महिन्यातल्या सूर्याचं वर्णन करताना म्हटलंय की आज तो माथ्यावर आला तेव्हाच थकून चंद्रासारखा मलूल दिसत होता. देश बदलला की प्रेमाचे संकेत थोडेतरी बदलतात. आणखी एका इंग्रजी कवितेत रात्रीचे नीरव नृत्य, आसमंतात दरवळलेला अनाघ्रात हिमगंध आणि त्या मऊ हिमफुलांत उमटत जाणारी प्रेयसीची नाजूक पावले वर्णिली आहेत.
विल्यम वर्डसवर्थने ल्युसी ग्रे नावाच्या मुलीवर एक सुंदर कविता लिहिली आहे. ल्युसीची आई कामावर गेली आहे. रात्र झाली आहे. बाहेर हिमवादळ सुरू झाले आहे. लहानगी ल्युसी कंदील घेऊन आईला शोधायला निघते आणि वादळात वाट चुकते. नंतर आईवडील तिला रात्रभर शोधतात. ती सापडत नाही. शेवटी एका सुळक्यापाशी तिच्या पावलांचे ठसे पाहून आईबाप आक्रोश करतात की लाडके आता आपण स्वर्गातच एकत्र भेटू-
And now they homeward turned and cried
”In Heaven we shall all meet,”
When in the snow the mother spied
The print of Lucy’s feet.
पुलंच्या एका लेखात म्हटलं आहे, ‘‘दगडविटांच्या घरापेक्षा मला जुनं घरच अधिक आवडतं. दगडाविटांच्या घरालाही चार पावसाळय़ाचं पानी पचवल्याखेरीज पालवी फुटत नाही.. बरेवाईट कौटुंबिक आघात झाल्याखेरीज घराला घरपण येत नाही. एकदा ते असं सजीव झालं, की मग त्या घराला स्वभाव येतो, गुणधर्म येतो, खोडी येतात..’’ पण आता नव्या पिढीला एका घरात असं काही दशकं पाय रोवून राहायची फुरसत असेल की नाही. त्यांना त्यांची नवी घरे, नवे चेहरे निर्माण करावे लागतील.
प्राचीन काळचा शिकारीवर जगणारा नि पाठीवर बिऱ्हाड घेऊन भ्रमंती करणारा मानव गुहेतबिहेत राहात असेल. पण तो ‘घरात’ गुंतला नसेल. जेव्हा त्याला स्वत:ची स्त्री असण्याची भावनिक गरज भासली असेल तेव्हा ‘घर’ जन्माला आलं असेल. ते घर ती स्त्री सांभाळू लागली असेल. मधल्या काळात केव्हा तरी शेती, व्यापार, सरकारी नोकरी वगरेतून स्थिर, शांत, समृद्ध, जीवन जगता जगता पुन्हा आधुनिक जगाच्या रेटय़ांनी त्याला टोळीवाल्याच्या काळात ढकलले आहे की काय? आता अविकसित मजुरांच्या लोंढय़ांपासून उच्चशिक्षितांच्या लोंढय़ांनादेखील देशोदेशीची भ्रमंती अटळ आहे. पाठीवर बिऱ्हाड आहे. रोज नवे घर आहे. फरक इतकाच, की आता घरातील स्त्रीदेखील त्याच्या बरोबर घराबाहेर पडणं ही अपरिहार्यता आहे. दोघे आपापल्या सवडीने घरात येतील. कधी एकत्र, कधी वेगवेगळे. मग सेक्सपासून, साध्या सहवासासाठी देखील केव्हातरी सुटी काढून त्यांना सेकंड होमचा, फार्म हाऊसचा आसरा घ्यावा लागेल.
”Home wasn’t a set house, or a single town on a map. It was wherever the people who loved you were, whenever you together. Not a place, but a moment, and then another, building on each other like bricks to create solid shelter that you take with you for your entire life, wherever you may go.”
-Sara Dessen (What happened to Goodbye)