मागील भागात आपण ग्राम व नगररचनाशास्त्र किती उत्तम प्रकारे विकसित झाले होते ते पाहिले. आता आपण कौटिलीय अर्थशास्त्रातील नगररचनेचा विचार करणार आहोत. कौटिल्याने राजनीतीवर लिहिलेल्या ‘अर्थशास्त्रा’त एकूण पंधरा अधिकरणे आहेत. अर्थशास्त्राच्या दुसऱ्या अधिकरणातील पहिला अध्याय ‘जनपदनिवेश’ आहे. जनपदनिवेश म्हणजे गाव वसवणे. टाऊन प्लािनगचा जगातील हा कदाचित पहिला लिखित संदर्भ असावा.
जनपदाचे महत्त्व सांगताना कौटिल्य सांगतो ‘न ह्यजनो जनपदो राज्यमजनपदं वा भवतीति कौटिल्य:।’ (१३.४.५) म्हणजे लोकांशिवाय जनपद नाही व जनपदाशिवाय राष्ट्र नाही. स्वाभाविकच नवीन गाव कसे वसवावे, नगराची रचना, सोयी कशा असाव्यात याचा संपूर्ण विचार अर्थशास्त्रात येतो. नवीन गाव वसवताना पूर्वी गाव वसलेले असेल किंवा नसेल अशा दोन्ही ठिकाणी परदेशातून किंवा आपल्याच देशातील दाट लोकवस्तीच्या प्रदेशातील लोक हलवून नवीन जनपद वसवावे, असे कौटिल्याचे मत आहे. अशा प्रकारे आपल्या जनपदातील किंवा बाहेरील लोकांना आणून नवीन नगराची रचना करण्यास कौटिल्य जेव्हा सांगतो तेव्हा त्यामागे दोन कारणे असावीत असे वाटते :
१. आपल्या राज्यातील विस्तारित लोकसंख्येची सुयोग्य व्यवस्था करणे.
२. स्वत:चा विस्तार करणे.
आज मुंबईसारख्या मोठय़ा शहरांत बाहेरून लोकांचा लोंढा येतो आणि त्या शहरांची व्यवस्था संपूर्णपणे कोसळते, या पाश्र्वभूमीवर कौटिल्याची ही नवीन नगर वसवण्याची कल्पना मार्गदर्शक ठरते. अर्थात, लोकांना एका नवीन प्रदेशात नेऊन टाकल्यावर शासनाची जबाबदारी संपत नाही. त्या नगराचा सर्वार्थानी विकास कसा करावा याची मार्गदर्शक तत्त्वे अर्थशास्त्रात येतात.
अर्थशास्त्रातील वर्णनावरून जमीन चार प्रकारे विभागली आहे. १. राजाच्या मालकीची २. लोकांच्या व्यक्तिगत मालकीची ३. सामाईक जमीन ४. जंगलानी व्यापलेली जमीन (Arthasastra the science of wealth, Trautmann, Thomas R. Forword, pg xiii, 2012)
यातील राजाच्या मालकीच्या जमिनीवर नवीन जनपद वसवले जात होते. नवीन जनपदात कौटिल्य सर्वप्रथम शेतकऱ्यांचे स्थलांतर करण्यास सांगतो. त्याचे कारण जरी त्याने सांगितले नसेल तरी ते सहज लक्षात येण्याजोगे आहे. माणसाची प्रथम गरज अन्नाची आहे. नवीन ठिकाणी प्रत्येक वेळी बाहेरून अन्नपुरवठा करण्यापेक्षा जमीन कसायला शेतकरी प्रथम गेले म्हणजे या नवीन नगराचा भार राजकोठारावर पडणार नाही. हे शेतकरी शूर असले पाहिजेत असे स्पष्टपणे म्हटले आहे आणि ते योग्यही आहे. नवीन गाव वसवताना जंगली श्वापदे, चोर, लुटारूंचे भय असणार. त्यांचा प्रतिकार करायला बाहेरून कुमक पाठवण्याऐवजी लोकांच्यातील पराक्रमालाच उत्तेजन देण्याचा त्यामागील हेतू स्पष्ट होतो. गाढवाचा नांगर फिरवून उद्ध्वस्त केलेले पुणे वसवताना दादाजी कोंडदेवांनी अशाच प्रकारे जे कोणी वाघ-लांडग्यांचा बंदोबस्त करतील आणि त्यांच्या शेपटय़ा आणून दाखवतील त्यांना बक्षिसं दिली व बघता बघता पुणे उभे राहिले होते, हा इतिहास सर्वज्ञात आहे.
शेतकरी आले तरी संपूर्ण गाव वसला असे होत नाही. तिथे अठरापगड जातींची माणसे येणे गरजेचे आहे. यात विद्वज्जनांचे स्थान नेहमीच वरचे. त्यामुळे ऋत्विज, आचार्य, ब्राह्मण, पुरोहित, श्रोत्रिय अशा ब्राह्मणांना दंड व करापासून मुक्त अशी जमीन दान द्यावी. ती ‘अभिरूप दायदां’ना म्हणजे त्यांच्यासारख्याच वारसांना नंतर मिळावी. नगरनिर्मितीच्या प्राथमिक अवस्थेत गरज म्हणून या विद्वानांना करमुक्त जमिनी दान दिल्या तरी त्या त्या घराण्यांना कायमच्या देऊन टाकणे कौटिल्याला मान्य नव्हते. म्हणून नंतरच्या काळात त्या वंशातल्या ‘अभिरूप’ म्हणजे केवळ लायक व्यक्तींकडेच या जमिनी जातील असे स्पष्ट संकेत कौटिल्यांनी दिले आहेत. शेतकरी व विद्वानवर्गाबरोबर वेगवेगळ्या खात्यांचे अध्यक्ष, हिशेबनीस, गोप, हत्तींना-घोडय़ांना शिकवणारे, वैद्य, जासूद व गावात राहणारे इतर लोक अशा अनेक लोकांना आणून एक परिपूर्ण गाव कौटिल्य उभा करतो. या साऱ्या लोकांना जमीन शासनाकडून दिली गेली तरी ती विकण्याचा अधिकार दिला गेलेला दिसत नाही. त्याच्यावर नियंत्रण शासनाचेच राहत असे.
अठरापगड जातींच्या लोकांनी युक्त असलेले गाव स्वयंपूर्ण असते म्हणूनच अशा प्रकारच्या लोकांसह गाव वसवण्याविषयी स्पष्ट सूचना रामायण व महाभारतातदेखील आढळतात. महाभारतकार म्हणतात ‘नगरात विद्वान व कारागीर असावेत. अशा शूर, बुद्धिमान, जितेन्द्रिय, कार्यकुशल, अनेक विषयांचे ज्ञान असलेल्या अशा पुरुषांचा नगरात विशेष सन्मान करावा.’ (शान्ति ५६.१७).
शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी इतर अनेक उद्योगधंदे गरजेचे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आल्यावर खाणी, कारखाने, द्रव्योपयोगी जंगले, हत्ती-गुरांसाठी जंगले, व्यापारासाठी लागणारे जल, खुश्कीचे मार्ग, आणि बंदरे या साऱ्या गोष्टींचे व्यवस्थापन या अध्यायात केले आहे.
नवीन गाव वसवताना राजाने लोकांना तिथे आणलेले आहे. स्वाभाविकपणे त्यांना उपजीविकेसाठी लागणाऱ्या काही वस्तू राजाने पुरवाव्यात. यात धान्य, पशू व द्रव्याचाही समावेश केला आहे. अर्थात, यातील कोणतीही गोष्ट फुकट देण्यास कौटिल्य तयार नाही. सवडीनुसार लोकांनी त्या परत केल्या पाहिजेत. अशा प्रकारे गाव निर्माण करण्यासाठी आलेल्या या लोकांना करात सूट व मदत करावी, पण ही मदत म्हणजे पूर्णपणे फुकट देणे नव्हते. या सवलती देताना कोशात तूट येणार नाही अशा प्रकारे त्या द्याव्यात. शक्य असल्यास कोशात वृद्धी होईल अशा प्रकारे या सवलती द्याव्यात; कारण कोशात तूट आली म्हणजे राजा पुन्हा पुरवासी, जनपदवासी यांनाच पिळून काढतो आणि लोकांच्या रागाला ते मोठे कारण मिळते, असे सांगितले आहे.  
जमिनीची व्यवस्था : लागवडीस योग्य जमीन
सर्वप्रथम आलेल्या शेतकऱ्यांकडून जमिनी लागवडीस तयार करून घ्याव्यात व कर देण्यास तयार असलेल्यांना ते जिवंत असेपर्यंत कसायला द्याव्यात. लागवडीखालील जमीन जर ते कसणार नसतील तर मात्र त्यांच्याकडून ती काढून कसण्यास तयार असलेल्यांकडे किंवा ग्रामसेवक अथवा व्यापाऱ्यांना सुपूर्द कराव्यात. त्या विकण्याचा किंवा गहाण टाकण्याचा अधिकार त्यांना नाही. ते कसत नसतील तर पुन्हा त्याच्याकडून राजाने त्या काढून घ्याव्यात. थोडक्यात, कसण्यास योग्य अशी जमीन कोणत्याही परिस्थितीत पडीक राहू नये याची काळजी राजाने घेणे आवश्यक आहे.  
लागवडीस अयोग्य जमीन
लागवडीस योग्य अशा जमिनीची व्यवस्था झाल्यावर लागवडीस अयोग्य अशा जमिनीचीही व्यवस्था कशी लावावी याचे उत्तम मार्गदर्शन ‘भूमिच्छिद्रापिधानम्’ या २.२ अध्यायात येते. अध्यायाचे नावच अत्यंत समर्पक आहे. भूमीचे छिद्र म्हणजे तिचा दोष आणि तो दोष अपिधान म्हणजे झाकणारा अध्याय म्हणजे भूमिच्छिद्रापिधानम्!
 लागवडीस योग्य नसलेल्या जमिनीवर –
१. आजच्या काळात ज्याला ‘ग्रीनबेल्ट’ म्हटले जाते त्या गुरचराईच्या जागा निर्माण कराव्यात.
२. तपस्व्यांसाठी वेदाध्ययन व यज्ञयागाची व्यवस्था करावी आणि त्यांच्या स्थावर व जंगम संपत्तीचे रक्षण करावे.
३. वेदाध्ययनासाठी दिलेल्या क्षेत्रफळाइतकीच जमीन राजाच्या विहारासाठी मृगवन म्हणून तयार करावी.
४. त्या मृगवनाला लागून असलेली जमीन सर्व प्राण्यांना अतिथीप्रमाणे वागणूक मिळेल अशा मृगवनांसाठी राखावी. ही मृगवने म्हणजेच प्राचीन अभयारण्ये होत.
५. जंगलात उत्पन्न होणाऱ्या व उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक पदार्थासाठी एक एक द्रव्यवन निर्माण करून त्या पदार्थापासून वस्तू निर्माण करण्याचे कारखाने जवळच उभे करावेत. या द्रव्यवनांच्या रक्षणासाठी जंगली लोकांना तेथे वसवावे.
६. याशिवाय सरहद्दीवरील जंगलांत हत्तींसाठी संरक्षित हत्तीवन उभे करावे.
अशा प्रकारे लागवडीस अयोग्य जमिनीचा सुयोग्य वापर करण्यावर भर दिला आहे.

Story img Loader