दहा वर्षांपूर्वी महिलांनी स्वत:च्या मालकीचं घर घेण्याचा ट्रेंड आला आणि गेल्या पाच वर्षांमध्ये तो चांगलाच रुजलाही. लग्नापूर्वीच आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं असं स्त्रियांनाही आज वाटू लागलंय. ८ मार्च या महिलादिनानिमित्त..
‘अस्सं सासर सुरेख बाई.. अस्सं माहेर सुरेख बाई..’ भोंडल्यात सासर-माहेरच्या घराचे गोडवे गाताना मनात एक अनामिक ओढ दाटून येते कारण ती या दोन्ही घरांवर नितांत प्रेम करते, अगदी जिवापाड. घरातल्या माणसांसाठी त्यांच्या सुखासाठी ती अविरत राबते. खरं तर तिच्याच पंखांवर तिने संपूर्ण घर पेललेलं असतं, लग्नाआधी आणि लग्नानंतर..
परंपरेने तिला गृहस्वामिनी असा किताबही बहाल केला, पण तो केवळ मिरविण्यापुरताच. खऱ्या अर्थाने तिचा माहेर वा सासर या दोन्ही घरांवर तसा कोणताही हक्क नाही. उलट घराच्या स्वामित्वहक्कावषयी तिचं मन नेहमीच साशंक राहिलंय. दुर्दैवाने एखाद्या बाका प्रसंग आला की ही दोन्ही घरं आपल्याला थारा देणार नाहीत, याची खूणगाठच तिने बांधलेली.. दोन घर तरीही तिच्या डोक्यावर हक्काचं छप्पर नाहीच..
भारतीय समाजापुरता विचार करता स्त्री आणि तिचं हक्काचं घर यांच्यात नेहमीच अंतर राहिलेलं. त्याला अनेक सामाजिक कारणं, पारंपरिक संस्कारातून तिच्या मनाने स्वीकारलेली मानसिक गुलामगिरी अशी अनेक कारण..
काळाच्या ओघात स्त्रियांना शिक्षणाचं दालन खुलं झालं. ती शिक्षित झाली त्या जोरावर तिने आíथक बळ प्राप्त केलं आणि तिनं तिच्या घरातलं स्थान खऱ्या अर्थाने निर्माण केलं आणि आता स्वत:चं हक्काचं घरही ती उभं करू लागली आहे, स्वत:च्या ताकदीवर. पैशावर. एकटीनेच..
गेल्या दहा वर्षांमध्ये महिलांनी स्वत:चं घर घेण्याचा ट्रेंड आला आणि गेल्या काही वर्षांमध्ये तो चांगलाच रुजला, आता त्यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. लग्नापूर्वीच आपलं स्वत:चं घर असावं असं अनेक महिलांना वाटू लागलंय. अर्थात, हे सामाजिक बदलांचे परिमाण आहे. आपलं जगणं अधिक सुरक्षित करायचं असेल तर स्वत:चं घर असलं पाहिले, ही जाणीव जेव्हा तिला झाली तेव्हाच तिनं स्वत:चं हक्काचं घर, ज्या घरावर तिच्याच नावाची पाटी असेल हे विचार तिच्या मनात तरळू लागलं आणि तिनेही िहमत करून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात आणलंही..
बदलत्या सामाजिक परिमाणांमुळे महिलांना घरातही विचारांची मोकळीक मिळाली. उच्च शिक्षणाच्या जोरावर त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आणि मिळालेल्या पैशाची गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्याही मिळाले. मग छोटय़ा छोटय़ा गुंतवणूक करतानाच घरामध्येही गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. शहरात घरांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांची टक्केवारी तीस इतकी आहे. आणि विशेष म्हणजे येत्या काही वर्षांमध्ये ही टक्केवारी वाढण्याचीच चिन्हे आहेत. घराची गुंतवणूक ही टॅक्सचे फायदे मिळविण्यासाठी मोठीच फलदायी ठरते, हे त्यामागचे एक प्रमुख कारण आहे. दुसरं सामाजिक कारण म्हणजे त्यांना स्वत:चं हक्काचं घर मिळतं; जिथे त्यांना कोणाच्याही मालकीहक्काप्रमाणे वागावं लागत नाही. तिच्या मनाप्रमाणे ती जगू शकते. स्वातंत्र्य अनुभवू शकते.
एका विमा कंपनीत काम करणारी संगीता नेहमीच आईवडील व भावंडांसाठी आधार ठरली. संगीतानं स्वत:च्या हक्काचं घर घेतलं ते वयाच्या पस्तिसाव्या वर्षी. अर्थात ते तिच्या एकटीसाठी नव्हतं तर आईवडील आणि चार भावंडांनाही त्यात आसरा होता. स्वत:च्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करून ती गप्प बसली नाही, तर भावंडांच्या घरासाठीही तिने आर्थिक आणि मानसिक बळ पुरवलं. अमेरिकेत असलेल्या भावाच्या घरासाठीचे सर्व व्यवहार तिनेच एकहाती सांभाळले.
अभिनेत्री अनुपमा ताकमोगेने आयुष्यातील एका बॅड पॅचमध्ये घराचं महत्त्व जाणलं. नाटक, सिनेमांमधून काम करतानाच दुसरीकडे डिबगचं काम जोरात सुरू होतं. हातात चांगले पसे येत होते. तेव्हाच तिच्या वडिलांनी तिला घर घेण्याचा सल्ला दिला होता. पण त्याकडे तिने फारसं लक्ष दिलं नाही. तेव्हा तिला आपण घर घेऊ याबाबत आत्मविश्वासच नव्हता. पण आयुष्यात एका वळणावर एका बॅड पॅचला सामोरं जावं लागलं आणि तिची स्वत:चं हक्काचं घर घेण्याची इच्छा बळावली. आणि मग घराचा शोध सुरू झाला. सुमारे अडीच वर्ष अथक परिश्रमानंतर तिच्या मनासारखं घर मिळालं. तिचा घरासाठीचा शोध तिच्या एकटीचाच होता.
अभिनय क्षेत्रात असल्याने तिच्याकडे सॅलरी स्लीप वगरे काहीही नव्हतं. त्यामुळे लोनही मिळणं कठीण होतं. पण वडिलांच्या सांगण्यावरून तिने गुंतवणूक आणि टीडीएसच्या कागदपत्रांचं व्यवस्थित फायिलग केलं हेातं. त्याचा फायदा तिला घसासाठी कर्ज घेताना झाला. घर शोधण्याचा आणि घेण्याचा काळ खूपच निराशेचा होता; परंतु तिने कच खाल्ली नाही. आज मागे वळून पाहताना तिला जाणवतं की, हा अडीच वर्षांचा काळ तिला खूप काही शिकवून गेला.
स्वत:च्या क्षमतांची जाणीव तिला करून दिली ती याच काळाने. म्हणून तिला तिचं हे घर खूप मोलाचं वाटतं. आज तिला तिच्या दारावर तिच्या नावाची पाटी पाहून खूप समाधान वाटतं. तिच्या मते, प्रत्येक बाईचं स्वत:चं दहा बाय दहाचं घर असावंच. तिने घर घेतल्यावर तिच्या एका मित्राने तिला दिलेली कौतुकाची थाप तिला खूप मोलाची वाटते. तो म्हणाला, ‘लग्न प्रत्येक बाई करतेच, पण घर फार कमी बायका घेतात. त्यामुळे तुझं खास अभिनंदन’
मेधा वैद्य यांनी १९९२ साली स्वत:चं हक्काचं घर घेतलं. घरात मोकळं वातावरण. स्वत:च्या क्षमतांना, विचारांना वाव देण्याइतपत आईवडिलांनी स्वातंत्र्य दिलं होतं. आपल्या आवडत्या छंदांमध्ये त्या रमून जात. लग्न करावं हा विचार मनात फारसा डोकावला नाही. पण स्वत:चं हक्काचं घर असावं असं पक्कं ठरवलं होतं. आणि त्यांच्या धाडसीवृत्तीमुळे घर घेण्याची कल्पना त्यांनी पूर्णत्वास आणली. आपण कुणावर अवलंबून राहू नये, हा घर घेण्यामागचा विचार होता. बीएआरसीमध्ये नोकरी करताना ते त्यांना सहज शक्यही झालं. मुख्य म्हणजे त्यांच्या निर्णयाला आईवडिलांचा पाठिंबा होताच.
पूर्वी एखादी बाई घर घ्यायचं आहे म्हणून कोण्या विकासकाकडे गेली की तो जरा पूर्वग्रहदूषित नजरेनेच पाहायचा. कारण एखादी स्त्री स्वत:च्या बळावर घर घेऊ शकणार नाही, अशीच त्यांची धारणा होती. नेमकी हीच भूमिका लोन देणाऱ्या बँकांचीही होती; परंतु आता ही परिस्थिती बदलली आहे. बांधकाम व्यावसायिकांनीही या बदलाविषयीची निरीक्षणं नोंदविली.
प्रांजी ग्रुपचे प्रकाश शर्मा म्हणाले की, एकटय़ा महिलेने घर घेण्याचा ट्रेंड गेल्या आठदहा वर्षांत चांगलाच रुजला आहे. उच्चशिक्षणामुळे महिलांच्या हातात चांगले पैसे येऊ लागले आहेत. पैशांचं नियोजन करताना त्या घर खरेदीला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. लग्नापूर्वी आपलं स्वत:चं घर असावं असं त्यांना वाटू लागलं आहे. कर सवलत, स्वत:ला सुरक्षित करणं आणि स्वत:चं हक्काचं घर या तीन गोष्टींमुळे महिला स्वत:च्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहात आहेत आणि ते सत्यात आणण्यासाठी त्यांचं प्लॅनिंगही व्यवस्थित असतं. मला असा अनुभव आहे की, घर घेताना पुरुषांपेक्षा महिला अधिक जागरूक असतात. महिला ग्राहकांनी पैशाचं उत्तम नियोजन केलेलं दिसून येतं. त्या घर खरेदी करताना खूपच काळजीपूर्वक निर्णय घेताना दिसतात.
पुराणिक बिल्डर्सचे शैलेश पुराणिक यांच्या मते, महिला उद्योजक, उच्चपदांवर काम करू लागल्याने त्यांच्या हाती चांगला पैसा येऊ लागला आहे. त्या स्वत:साठी गाडी घेऊ लागल्या आणि त्याचबरोबर स्वत:साठी घरही. अनेक आर्थिक आणि सामाजिक बदलांचा हा परिणाम म्हणता येईल. गेल्या दहा वर्षांमध्ये महिलांनी स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचा ट्रेंड आला आणि गेल्या पाच वर्षांत तो चांगलाच स्थिरावल्याचे निरीक्षण पुराणिक यांनी नोंदविले.
पूर्वापार स्त्रिया आपल्याच घरातील स्थानाविषयी साशंक असत, हे आपल्याकडी लोकगीतांमधून प्रकार्षांने जाणवतं. ‘हम भईया मिली एक कोख जनमल
पियली सोरहीया का दूध रे
भईया के लिखइन एहो चौपरिया
हमरो लिखल परदेस हे’
आपण एकाच कुशीतून जन्मलो. एकाच आईच्या दुधावर दोघेही पोसलो. पण तुला हे घर, हा परिसर लाभला आणि माझ्या नशिबी मात्र स्थलांतर..
स्त्री म्हणून आपल्या वाटय़ाला आलेलं अवहेलनेचं दु:ख शब्दांकित करणारं हे लोकगीत असो वा परदेशातल्या सिमॉन द बोआ हीने स्त्रियांना घरातील स्थानाविषयी व्यक्त केलेली खंत असो. किंवा लेखिका अमृता प्रीतमने स्त्रियांना घरात हक्काचा मागितलेला चौथा कमरा असो.. आपल्याच घरातील दुय्यम स्थानाविषयी स्त्रियांनी नेहमीच आपल्या मनातील खंत व्यक्त केली; पण आता खंतावणारं मन थोडं सावरलं आहे. तिने स्वत:च्या क्षमतांना विस्तारत आपलं आभाळ, आपलं अवकाश स्वत:च्या बळावर निर्माण केलं आहे, स्वत:च..
गृह ‘स्वामिनी’
दहा वर्षांपूर्वी महिलांनी स्वत:च्या मालकीचं घर घेण्याचा ट्रेंड आला आणि गेल्या पाच वर्षांमध्ये तो चांगलाच रुजलाही. लग्नापूर्वीच आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं असं स्त्रियांनाही आज वाटू लागलंय. ८ मार्च या महिलादिनानिमित्त..
आणखी वाचा
First published on: 02-03-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trend of female homeowners