दिवाळीत ग्राहकांनी घरखरेदीत उत्साह दाखवावा यासाठी अनेक विकासकांनी नामी युक्त्या केल्या आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अनेक भेटवस्तूंची खरात विकासकांनी केली आहे.
मुंबईतील दुसरे नरिमन पॉइंट म्हणून कॉर्पोरेट क्षेत्राच्या पसंतीची पावती मिळालेल्या बांद्रा – कुर्ला कॉम्प्लॅक्सच्या मैदानावर दसऱ्याला लागून आलेल्या चार दिवसांच्या सुटीच्या कालावधीत जवळपास १ लाख घर खरेदीदारांनी उत्सुकता दर्शविली. प्रदर्शनाला बघ्यांची गर्दी तशी नवी नसते. पण एकूण प्रदर्शनातील घरांची विक्रीसंख्या आणि झालेल्या व्यवहारांचे आकडे हे खुद्द विकासकांचे डोळे पांढरे करणारे ठरले.
भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्र गेल्या दोन वर्षांपासून बिकट स्थितीत होते. यंदाच्या मेमध्ये ते पूर्वपदावर येताना दिसत होते. तर परवाच्या दसऱ्याला घर खरेदीचा वेग वाढताना दिसला. आता दिवाळीलाही हाच ट्रेण्ड राहण्यासाठी  विकासकांनी घर खरेदीच्या जोडीला सूट, सवलतींची मात्र बरसात केली आहे. ऑफरच्या विळख्यात अडकलेल्या ग्राहकराजाच्या ई-कॉमर्सवर पडलेल्या उडय़ाच हे पटवून देतात.
घराबरोबर गार्डन, जिम, पार्किंग असे यापूर्वी जोडीला विकासकांकडून दिले जाई. यानंतर रेडिमेड किचन कॅबिनेट, डायनिंग टेबल सेट, बेट-वॉर्डरोब, एसी-फ्रिज, सोफा-दिवाणचे फॅड आले. आता आतापर्यंत स्टॅम्प डय़ुटी, रजिस्ट्रेशन फी स्वत: भरण्याची  तयारी दाखविणारे विकासक आता पार्किंगबरोबरच कर्जाचे काही हप्तेही देण्याची तयारी दर्शवितात. मुंबईसारख्या (खरे म्हणजे कल्याण, बोरिवलीपुढील नवी उपनगरे) ठिकाणी नव्या घराची किमान किंमत २५ लाखांपुढेच आहे. अशा वेळी विकासकांकडून दिली जाणारी सवलत ही घराच्या एकूण रकमेच्या थेट १० टक्क्यांपर्यंतही जाते.
सवलतीच्या दरात गृहकर्ज देणाऱ्या बँकांनी कर्जावरील प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेशन फी यापूर्वीच रद्द केली आहे. तर मागणीनुरूप फर्निचर तयार करणारे त्यांचे साइट व्हिजिट शुल्क न घेणे पसंत करतात. घर म्हटले की गाडी येतेच, ही मानसिकता हेरून विकासकही वाहन कंपन्या, वितरक यांच्याबरोबर सहकार्य करत आपल्या ग्राहकाला सवलतीच्या दरात अथवा अनेकदा मोफतही निदान दुचाकी तरी उपलब्ध करून देतात. घराला ऑफरची जोड असतानाच बुकिंग रक्कम, प्रि-पेमेन्ट असे सोबतीने येणारे शुल्कही विकासकांकडून माफक केले जाते. विकासकांना भरावा लागणारा व्हॅट अथवा सव्‍‌र्हिस टॅक्स, सोसायटी मेंबरशीप अथवा अनेकदा काही मेंटेनन्सचे हप्ते या सवलतीही दिल्या आहेत.
दिवाळीचे निमित्त हीच व्यवसायाची हीच खरी वेळ हे आता विकासकांनीही जाणले आहे. म्हणूनच भरघोस सवलतींचे गाजर पुढे केले आहे. घर विक्रीतून व्हॅल्यू कधीच कमी मिळत नसते. मग व्हॉल्यूम वाढवून लाभ पदरात पाडण्याची किमया साधली जाते. न जाणो मंदीचे सर्कल पुन्हा कधी येईल? विकासकांचा बांधकाम खर्च तसाही निघतच असतो. फक्त मंदीच्या कालावधीत गुंतवणूक अडकून पडते तेवढीच चिंता. आणि निधी उभारणीवर भराव्या लागणाऱ्या व्याजाचा मुलामा अधिक गडद न होण्यासाठी मग सवलतींच्या जोडीशिवाय अधिक घरांची विक्री शक्य नाही, हेही खरेच.    

स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी ग्राहक अनेक सोयी-सुविधांवर भर देतो. आता तर त्याच्या जोडीला भरघोस सूट-सवलती आल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांनी हुरळून गेलेच पाहिजे असे नाही; मात्र मोठय़ा रकमेच्या खरेदीच्या तणावातून घर खरेदीदारांना या बाबी काहीशा सुखावून जातात. कमीत कमी खर्चात अधिकाधिक फायदा हा ग्राहक-मालक यांचा मूलभूत अधिकारच आहे.
– ए. हरिकेश, वरिष्ठ उपाध्यक्ष,
टाटा हाउसिंग डेव्हलपमेन्ट कंपनी लिमिटेड.

Story img Loader