सुचित्रा साठे
एखाद्याने रागारागाने डोळे मोठे करावेत तसं सूर्यदेवाचं होतं. पारा चढतच जातो. त्याचा ‘सोनेरी’ संताप सहन न होऊन त्याला तिथेच थोपविण्यासाठी घर आपली दारं खिडक्या बंद करून टाकतं. एसीचे दिवस सुरू होतात. घराघरातील गुबगुबीत सोफे, त्यात मनसोक्त सैलावलेली चिमणीपाखरं आणि नजर मोबाइल, टॅब, कॉम्प्युटर नाही तर टीव्हीच्या मोठय़ा पडद्यावर खिळलेली. असा गार खोलीतला हा वसंतोत्सव घराघरांतून साजरा होऊ लागतो.
‘रवीकिरणांची झारी, बाग शिंपितो सोनेरी, देव भाबडा माळी..’ ही कविकल्पना सत्यात उतरते आणि आसमंतात जणू सोनेरी पर्वच अवतरते. नीलिमा पसरवणाऱ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर पिवळे धमक तेजोनिधी लोहगोल.. आपली प्रभा क्षितिजापर्यंत पोहोचवतो. वारा नेहमीप्रमाणे घाईगडबडीत सगळ्या हिरव्या सृष्टीमधून ‘साई सुटय़ो’ करत धावत सुटतो. गरम झाले, क्षीण झाले तरी पाणी प्राप्त परिस्थितीतही तृप्त राहून झुळझुळत राहते. आपला स्वभाव सोडत नाही. जिच्या भक्कम आधारावरच निर्मितीचा खेळ रंगत असतो, ती धरणीमाता नवसृजनाच्या पालवीने मोहरलेली असते. ‘ऋतुनां कुसुमाकर’ अशा भगवंताच्या या वसंतलीला, पंचभूतांचे शक्तीदर्शन, तिथे लक्ष्मणरेषा थोडीच आखता येणार आहे! कळीचे फुलात रूपांतर व्हावे इतक्या सहजतेने ऋतूबदल होत असतो. चैत्राचं तोरण बांधून ‘गंधयुक्त तरीही उष्ण वात हे किती’ म्हणत रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या उत्सवामुळे उन्हाळा सुसह्य़ होतो. पण वैशाख डोकावतो आणि जणू वैशाख वणव्याचीच धग जाणवू लागते.
एखाद्याने रागारागाने डोळे मोठे करावेत तसं सूर्यदेवाचं होतं. पारा चढतच जातो. त्याचा ‘सोनेरी’ संताप सहन न होऊन त्याला तिथेच थोपविण्यासाठी घर आपली दारं खिडक्या बंद करून टाकतं. एसीचे दिवस सुरू होतात. सुदैवाने काही शाळकरी मुलांच्या परीक्षा उरकल्यामुळे, तर काहींच्या वरच्या वर्गात गेला असा निकाल गृहीत धरून नवीन वर्षांच्या शाळेचे मुहूर्त झाल्यामुळे ‘सुट्टी’चा वसंत त्यांच्यासाठी चालू झालेला असतो. घराघरातील गुबगुबीत सोफे- त्यात मनसोक्त सैलावलेली चिमणीपाखरं आणि नजर मोबाइल, टॅब, कॉम्प्युटर, नाहीतर टीव्हीच्या मोठय़ा पडद्यावर खिळलेली. असा गार खोलीतला हा वसंतोत्सव घराघरांतून साजरा होऊ लागतो. नाही म्हणायला घरातल्या ज्येष्ठांना हा वास्तवाचा चटका अस्वस्थ करत असतो. पण त्यांच्या हातात आता मोबाइलशिवाय काही राहिलेलं नसतं. परीक्षा, अभ्यास, गृहपाठ, शिकवणी या सगळ्या ताणतणावातून मात्र घर मोकळं झालेलं असतं आणि सुट्टीशी जोडलं गेलेलं असतं. वैशाखरंगी रंगू लागलेलं असतं.
सुट्टी म्हटली की घराला सेलिब्रेशनचे वेध लागलेले असतात. कोणी देशांतर्गत किंवा देशाच्या सीमा ओलांडून जाण्याचे बेत करतात. कोणी सोसायटीची पिकनिक ठरवलेली असते. घरातील लहानथोर त्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या तयारीत बुडून जातात. सुट्टी म्हणजे पर्यटन इतकंच समीकरण नसतं. तर अनेक गोष्टी अनेक रंग या सुट्टीवर विसंबून असतात.
काहींनी नवीन घर घेतलेलं असतं, तिथे गृहप्रवेश करायचा असतो. काही मुला-मुलींची लग्न ठरलेली असतात. त्यांना साखरपुडा करायचा असतो. एखाद्याला पुस्तक प्रकाशन करायचं असतं, तर एखाद्याला नवीन वाहन खरेदी करायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी निसर्गाने, कालगणनेने परिस्थितीने एक उत्तम पर्याय हातात दिलेला असतो. तो म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया, म्हणजेच अक्षय्यतृतीया- साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. मुलाबाळांसकट या सगळ्या गोष्टींमधला आनंद, उत्साह आपण उपभोगू शकतो ते केवळ मे महिन्यात येणाऱ्या या सणामुळे. शुभ दिवसामुळे वैशाखाच्या रंगकामाची सोनेरी सुरुवात होते.
‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, वारा नेई सोने वाटे वाहुनिया दूर’- वहात वहात हे पिवळं सोनं घरातही पाऊल टाकतं. चैत्र शुद्ध तृतियेला माहेरी आलेल्या गौरीचं अक्षय्यतृतीयेच्या दिवशीचं परतीचं तिकीट काढलेलं असतं. माहेरवाशिणीबरोबर सगळ्या घराचेही डोहाळे पुरवले जातात. अक्षय्यतृतीयेला तिला ‘टाटा’ करायचं म्हणून पिवळीधमक आंबाडाळ व थंडगार कैरीचे पन्हे करून तिला सेंडॉफ दिला जातो. एकीकडे आंबट असूनही जीभेवर रेंगाळणारी मोहात पाडणारी चविष्ट हिरवी कैरी तर दुसरीकडे अढी घातल्यामुळे हिरव्याचा पिवळा केशरी होऊन रंग गंध चवीने राजेपण मिरवणारा कोकणाचा राजा आंबा एकमेकांशी स्पर्धा करत पोटात शिरत असतात. आंब्याचा रस खाताना घरातली बच्चेकंपन्यांचे कपडे हेही ‘आंबामय’ होऊन जातात. घर कौतुकाने हा आंबामहोत्सव साजरा करत असते. त्यामुळे इतर गोडाधोडाचे पदार्थ जरा बाजूलाच पडतात. अक्षय्य सुखाने घर भरून जात असते. दिवस पुढे सरकतात.
ऊन रणरणत असतं. एसी, पंखे चोवीस तास ‘ऑन डय़ुटी’ असतात. कधी कधी वीजबाईंची सहनशक्ती संपते. ती अधेमधे डोळे मिचकावते. जीव घामाने मेटाकुटीला येतो. अशा वेळी तहानेने घशाला कोरड पडते. कितीही पाणी पिऊन समाधान होत नाही. फ्रिजमधल्या बाटल्या ‘गार’ होत नाहीत, म्हणजे भरून आत ठेवेपर्यंत त्या बाहेर काढल्या जातात. अशा वेळी एखाद्या घरातला माठ, त्यातील वाळा किंवा मोगऱ्याचं फूल टाकलेलं सुगंधित पाणी समाधानाचा अमृततुल्य घोट देऊन जातं. पाण्याचं, त्यातूनही वेगळाच गोडवा दाखवणाऱ्या माठातल्या पाण्याचं महत्त्व, उपयुक्तता मनावर ठसवून जातं. तसं तर घरी आलेल्यांना आपण कमीतकमी ‘पाणी’ तरी देतोच की! घरात जलसाक्षरता अभियान राबवले जाते. घोटभर हवं असेल तर तेवढंच पाणी भांडय़ात घ्यायचं. भांडी घासताना, कपडे धुताना, बादली वाहत नाही ना, याकडे लक्ष ठेवायचं. सकाळी किंवा केव्हाही घराबाहेर पाऊल टाकताना एक लिटर पाण्याची बाटली आठवणीने बरोबर न्यायची आणि परिसरातील कोणत्याही झाडाची निवड करून त्याला वैशाख वणव्याच्या झळीपासून वाचवायचे, हे आपल्याच भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवायचे. पाणी सर्वानाच अक्षय्य रूपात मिळणं महत्त्वाचं.
याच सुमारास ऊन मी म्हणत असतं. या उन्हामुळे रुजलेली वाळवण साठवण संस्कृती घरातून वाळत चालली असली तरी संघटितरीत्या कोणाच्या अंगणात किंवा गच्चीत ती बहरते आहे. आणि म्हणूनच पापड, कुरडया, बटाटय़ाचा कीस असे घरातल्यांचे जीभेचे चोचले पुरवले जात आहेत. या दिवसांचे औचित्य साधून घराघराला जिवंत ठेवणाऱ्या पिवळ्या उन्हाचे, पर्यायाने सूर्याचे मनोमन आभार मानायलाच हवेत. समर्थानी दासबोधात ‘सूर्यस्तवन’ करताना सूर्यापुढे आणिक दुसरे। कोण आणाने सामोरे। तेजोरासी निर्धारे। उपमेरहित।। असे म्हटले आहे. घरात येणाऱ्या उन्हाच्या तडाक्याचा उपयोग करून चिवडय़ासाठी पोहे वाळवणे, कैरीचा छुंदा करणे, टिकाऊपणा वाढवण्यासाठी एखादी गोष्ट उन्हात ठेवणे.. हे असं उन्हाचं कौतुक करायला घराला आवडते. त्या संस्कृतीचा भाग बनणं, त्या सोनेरी क्षणांचे सोबती होणं, ती संस्कृती टिकवणं म्हणजेच त्या उन्हाचं स्थान मनात अक्षय्य जपण्यासारखं आहे. घरात ऊन येत नसले की चुकल्या चुकल्यासारखं वाटत राहतं.
घराबाहेरची रंग सजावट करण्यात बहावा, पिवळा-पांढरा चाफा, लाल भडक काटेसावर, पळस, पांगारा आणि ऊत आल्यासारखा फुलणारा केशरी गुलमोहर आपापला वाटा उचलतात. घराचं अंतरंग रंगतं ते कलिंगडाच्या लालचुटुक फोडींनी, जांभळाच्या जांभळ्या रंगात रंगून वाकुल्या दाखवणाऱ्या जांभळ्या जीभांनी, कोकम सरबतांच्या, आंबा रंगाच्या आईस्क्रीमच्या फुटलेल्या मिशांनी. फारशी चव नसली तरी पाणीदार जाम फिकट रंगाचा डौल सांभाळतात. त्याक्षणी वैशाखरंगी रंगले घर हे असेच शब्द ओठांवर येतात.
suchitrasathe52@gmail.com