भा. द. साठे

फ्रँक लॉइड राईट यांची धारणा अशी होती, की वास्तूची रचना नैसर्गिक वातावरणाला साजेशा नैसर्गिक आकारावर बेतलेली असावी. त्यांच्या बहुतांश सर्व वास्तू त्यांनी अशा प्रकारे डिझाईन केल्या आहेत. नव्या संकल्पित गुगनहाइम म्युझिअमची रचना शुद्ध नैसर्गिक अशा वर्तुळाकारावर करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. मेसापोटेमियात चौकोनी झिगुरट (स्टोन स्ट्रक्चर) असते. ते म्हणजे शंकूच्या आकारासारखे (थोडक्यात पिरॅमिडसारखे पायऱ्यांचे मंदिर) दिसणारे. पण त्यांना हे झिगुरट उलटे हवे होते; उलटय़ा पिरॅमिडसारखे. खाली निमुळते नि वर पसरट आणि गोलाकार. म्हणजे चक्राकार झिगुरट. नवीन म्युझिअमच्या रचनेसाठी ही झाली मूळ संकल्पना.

important research for army fighter mig 29 aircraft
लष्कराच्या लढाऊ ‘मिग २९’ विमानासाठी महत्त्वपूर्ण संशोधन… पुण्यातील ‘एनसीएल’कडून नवी प्रणाली विकसित!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Smart Bomb Israel Used to Flatten Buildings in Lebanon
Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब?
home decoration on diwali diwali decoration ideas diwali decoration ideas for home
घर सजवण्याची वेळ झाली…
Residents of Nagpur are upset because of the no right turn activity
नागपूर: ‘नो राईट टर्न’मुळे नागपूरकर हैराण
Nagpur 63 tall building around airport
धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…
Dr Richard Chang, founder of SMIC
चीनच्या मदतीला(ही) चँग!
maharashtra government allots 13 crore land free to shri saibaba sansthan
१३ कोटींची जमीन शिर्डी संस्थानला मोफत; वित्त विभागाचा विरोध डावलून सरकारचा निर्णय, क्रीडा संकुल उभारणीचा प्रस्ताव

वास्तुशिल्प निर्मितीच्या क्षेत्रात गेल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये दोन अविस्मरणीय आणि अतिसुंदर वास्तूंची रचना झाली. पहिली- अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात, दुसरी युरोपात स्पेन देशामधील बिलबाव नगरात. दोन्ही वास्तूंचा वापर कला वस्तुसंग्रहालय म्हणून. खासकरून पेंटिंग्ज् आणि स्कल्पचर्स यांचा प्रामुख्याने समावेश त्यामध्ये. या दोन्ही वास्तूंचे यजमान प्रायोजक सॉलोमन आर गुगनहाइम फाऊंडेशन. न्यूयॉर्कच्या गुगनहाइम म्युझिअमचा वास्तुशिल्पकार म्हणजेच आर्किटेक्ट होता फ्रँक लॉईड राईट तर बिलबावच्या म्युझिअमचा होता फ्रँक गेहरी. योगायोगाने दोघांचीही पहिल्या नावाने ओळख फ्रँक अशी.

सॉलोमन गुगनहाइम यांचे वडील अमेरिकेत पुढारलेले खाणकाम व्यावसायिक. गडगंज संपत्तीचे मालक. अलास्कामध्ये त्यांची प्रसिद्ध युकॉन गोल्ड कंपनी होती. सात भावंडांपैकी एक सॉलोमन. त्यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे झाला दोन फेब्रुवारी १८६१ रोजी. एकोणिसशे वीस सालाच्या सुमारास व्यवसायातून निवृत्त झाल्यावर कलासक्त सॉलोमन यांनी आपला कलासंग्रह वाढवायला आरंभ केला. एकोणिसाव्या शतकातील नावाजलेल्या कलाकारांच्या कलाकृतींबरोबरच त्यावेळच्या कँडिन्स्की, माँड्रेन, पॉल क्ली, पाब्लो पिकास्को, मॉडिग्लिओनी, मार्क शगाल अशा मातबर पेंटर्सची पेंटिंग्ज् तसेच हेन्री मोर, ब्रांकुशी, बार्बारा हेपवर्थ अशा नावाजलेल्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या शिल्पाकृती त्यांच्या संग्रहात जमा झाल्या. वाढत वाढत हा अमोल आणि देखणा संग्रह एवढा मोठा झाला, की त्याची देखभाल कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला. त्यातून मग १९३९ साली सॉलोमन आर गुगनहाइम फाऊंडेशनची स्थापना झाली. न्यूयॉर्क शहरात भाडय़ाच्या एका प्रशस्त जागेत त्या कलासंग्रहाची मांडणी करून कलाप्रेमींना बघण्यासाठी खुला केला.

कालांतराने कलासंग्रहाची सल्लागार हिला वॉनरेबे – एरनवाइझन हिने सॉलोमन यांना सुचविले, ‘हा सर्व संग्रह एका संस्मरणीय, कलात्मक वास्तूमध्ये कायमचा प्रदर्शित करू या.’ सॉलोमन यांना ही कल्पना खूपच आवडली. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागातील सेंट्रल पार्कच्या पूर्वेला सुप्रसिद्ध मेट्रोपॉलिटन म्युझिअम आहे. तेथून हाकेच्या अंतरावर फिफ्थ अवेन्यू आणि एटीननाईन्थ स्ट्रीटच्या कोपऱ्यावरील भूखंडाची निवड गुगनहाइम म्युझिअमच्या स्वत:च्या वास्तूसाठी निश्चित केली आणि वास्तुशिल्पकार म्हणून त्याकाळचे जगप्रसिद्ध असे फ्रँक लॉइड राईट यांची नियुक्ती झाली. त्यांच्यामते, हे म्युझिअम सेंट्रल पार्कमध्ये असलेल्या विशाल सरोवरासमीप असायला हवे होते. तसे काही झाले नाही. पण जर झाले असते तर असे वाटते, की म्युझिअमच्या वास्तूची आणि त्या परिसराची कलात्मक गुणवत्ता निश्चितच उंचावली असती. असो.

फ्रँक लॉइड राईट यांची धारणा अशी होती, की वास्तूची रचना नैसर्गिक वातावरणाला साजेशा नैसर्गिक आकारावर बेतलेली असावी. त्यांच्या बहुतांश सर्व वास्तू त्यांनी अशा प्रकारे डिझाईन केल्या आहेत. नव्या संकल्पित गुगनहाइम म्युझिअमची रचना शुद्ध नैसर्गिक अशा वर्तुळाकारावर करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. मेसापोटेमियात चौकोनी झिगुरट (स्टोन स्ट्रक्चर) असते. ते म्हणजे शंकूच्या आकारासारखे (थोडक्यात पिरॅमिडसारखे पायऱ्यांचे मंदिर) दिसणारे. पण त्यांना हे झिगुरट उलटे हवे होते; उलटय़ा पिरॅमिडसारखे. खाली निमुळते नि वर पसरट आणि गोलाकार. म्हणजे चक्राकार झिगुरट. नवीन म्युझिअमच्या रचनेसाठी ही झाली मूळ संकल्पना.

कलासंग्रहालयाची सामान्यपणे नेहमीची पारंपरिक रचना सर्वाना परिचयाची आहे. प्रेक्षणीय कलाकृती वेगळ्यावेगळ्या दालनामध्ये प्रदर्शित केलेल्या असतात. आपण प्रेक्षक एका दालनामधून दुसऱ्या दालनामध्ये, तेथून तिसऱ्या दालनामध्ये, मग चौथ्या दालनात; अशा पद्धतीने फिरतो आणि कलाकृती पाहतो. ही पारंपरिक पद्धती फ्रँक लॉइडनी संकल्पित म्युझिअममध्ये झुगारून दिली. वेगवेगळी स्वतंत्र दालने न ठेवता एकच सलग चक्राकार दालन. वरवर चढणारा गोलाकार चढाव म्हणजे रँप. काही जुन्या रेल्वे फलाटांवर असतात तशापैकी. हा गोलाकार चढाव गोलाकार वास्तूच्या परिघावर ठेवला आहे. चढावाची एक बाजू परिघावरच्या भिंतीला चिकटून आहे. त्या भिंतीवर प्रेक्षणीय कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. त्यांचा आस्वाद घेत घेत प्रेक्षक आस्ते आस्ते नकळत वर जात असतात. हळूहळू रुंदावत जाणाऱ्या ४०० मीटर्स लांबीच्या रँपच्या स्वरूपातले हे सलग दालन अखेरीस एका भल्या मोठय़ा घुमटाखाली येते. त्या घुमटाचे छत दिसते कोळ्याच्या जाळ्यासारखे; पण काचेने मढवलेले. त्यातून झिरपणारा दिवसाचा मंद प्रकाश या अप्रतिम वास्तूचा अवकाश भारून टाकतो. आणि सॉलेमन गुगनहाइमचा कलासंग्रह प्रदर्शित करणारी वास्तू स्वत:च एक प्रदर्शनीय आणि प्रेक्षणीय शिल्पाकृती होऊन जाते.

सन १९४३ साली फ्रँक लॉइड राईट यांनी या वास्तूचे आराखडे तयार केले. त्यामध्ये काही फेरफार करून बांधकामासाठी आवश्यक असे आराखडे बनवणे चालू होते. त्यावेळी दुसरे जागतिक युद्ध युरोपात चालू होते. १९४४ साली अमेरिका युद्धात सामील झाली. या धामधुमीत कलासंग्रहालयाच्या वास्तूचे बांधकाम जागेवर सुरू होऊ शकले नाही. १९४९ साली सॉलोमन गुगनहाइम यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १९५६ सालात वास्तूचे बांधकाम सुरू झाले.

रिएन्फोर्सड् काँक्रीटचा एक खास गुणधर्म आहे. त्याला कसाही कोणताही आकार देता येतो. याचा पुरेपूर फायदा राईटने घेतला. सुमारे अडतीस मीटर्स म्हणजे १२० फूट  व्यासाच्या आणि तेवढय़ाच उंचीचा विशाल घनाकार. कुठेही मधे आधारासाठी खांब नाहीत, तुळया नाहीत. अडथळ्याविना एक सलग गोल घनाकार जोवर पाच मजले रुंदावत जाणारा. अशी अनोखी इमारत बांधायला कोणी कंत्राटदार काही महिने मिळत नव्हता. कोणी हे धाडस करायला धजत नव्हता. १९५९ साली जून महिन्यात या अनोख्या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले आणि म्युझिअम आम जनतेसाठी खुले झाले. पण त्याआधी काही महिने दुर्दैवाने फ्रँक लॉईड राईट यांचा मृत्यू झाला.

त्यांनी डिझाईन केलेल्या या अत्याधुनिक कलासंग्रहालयात शिरल्यापासून बाहेर येईपर्यंत किंबहुना त्यानंरदेखील कितीतरी काळ प्रेक्षक कलास्वादाच्या धुंदीत असतो. या अपूर्व वास्तूचे अंतरंग त्याच्या दृक् संवेदना भारावून टाकते. आधी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वतंत्र दालनामधून त्यांना कलाकृती पाहायला फिरावे लागत नाही. घुमटाकडे रुंदावत जाणाऱ्या चक्राकार रँपवरच्या बाहेरील बाजूकडच्या भिंतीवर लावलेल्या कलाकृती प्रेक्षकांना न्याहाळता येतात. तर आतल्या बाजूच्या कठडय़ावरून समोरच्या रँपवरील चालणारे प्रेक्षक नि कलाकृती दिसतात. काही प्रेक्षक एलिवेटरने सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन रँपवरून खाली उतरत येतात. मुळात राईट यांना हेच अपेक्षित होते.

कलत्या भिंतीवर प्रदर्शित केलेल्या कलाकृतींचा रसास्वाद उतारावर उभे राहून रसिक प्रेक्षक कितपत सहजतेने घेत असतील अशी रास्त शंका काही टीकाकार अवश्य घेतात. पण या अद्वितीय वास्तूचे आरेखन करीत असताना राईट यांचा हेतू होता रसिक, कलाकृती आणि त्यांना सामावून घेणारा अवकाश या त्रयीमधून एक अपूर्व कलाविष्कार साधण्याचा. तो त्यांचा हेतू नि:संशय साधला गेला.

( वास्तुशिल्पकार)