आमच्या लहानपणी शालेय पाठय़पुस्तकात आरोग्यासंबंधीच्या धडय़ामध्ये आजारी व्यक्तीची सुश्रूषा करताना काय आणि कशी काळजी घ्यावी यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना करून दिलेली असे. त्यात आजारी व्यक्तीला घरात स्वतंत्र खोलीत निजवावे. त्या खोलीत भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असावी आणि इतर बऱ्याच गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिलेला असे. खोलीतील खेळती हवा म्हणजे त्या खोलीत चांगले वायुवीजन असावे असेही म्हटलेले असे. त्यासाठी एका चित्रात आजारी व्यक्ती एका खोलीत झोपली आहे. त्या खोलीला असलेल्या खिडकीतून बाहेरील हवा खोलीत येत असून, खोलीतील हवा समोरच्या खिडकीतून किंवा दरवाजातून बाहेर जात आहे असे सूचित करणारे चित्र काढलेले असे. त्याकाळी बरेचसे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्यामुळे, चाळीत डबल किंवा सिंगल खोलीत राहणारे होते. एकेका कुटुंबात सात सात-आठ आठ व्यक्ती कशातरी दाटीवाटीने रहात असल्यामुळे आजारी व्यक्तीला स्वतंत्र खोली वैगैरे शक्यच नव्हते. भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा हेदेखील अशक्यप्राय दृश्य होते. त्यामुळे पाठय़पुस्तकातील सगळ्याच गोष्टी फार मनावर घ्यायच्या नसतात, हे एकंदरीत आम्हा विद्यार्थ्यांचे त्या काळातले धोरण असल्यामुळे स्वतंत्र खोली, भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा या बाबीही आम्ही इतर बाबींबरोबर मनावर घेतलेल्या नव्हत्या; ते फक्त परीक्षेत तसाच प्रश्न आला तर योग्य उत्तर म्हणून माहीत असावे इतकाच त्या माहितीचा आम्हाला त्याकाळी उपयोग होता. पण आज इतक्यावर्षांनी म्हणजे जवळ जवळ पन्नास एक वर्षांनंतर मी माझ्या स्मृतींना ताण देऊन त्या काळातील चाळीतील डबल किवा सिंगल रूमचे चित्र डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. किंवा त्यातल्या आजही तग धरून उभ्या आहेत अशा चाळींतून जाण्याचा योग मला येतो. त्यावेळी मला बऱ्याच ठिकाणी त्या काळी अगदी त्या लहान आकाराच्या खोल्यांतून, त्या बांधताना वायुविजन होऊ शकेल अशी काळजी घेतलेली दिसून येते. डबलरुमच्या एका बाजूला दरवाजा आणि त्याच्या बरोबर समोरच्या भिंतीला मोठी गजांची खिडकी, शिवाय दरवाजा बंद झाल्यानंतर किंवा खडकी बंद केल्यानंतरही वायुविजन सुरू रहावे म्हणून त्या दरवाजा आणि खिडकीच्या वर एक लहान झडपेची योजना केलेली असे. काही कारणाने समोर खिडकी ठेवणे शक्य नसेल तर त्या ठिकाणी वरच्या बाजूला म्हणजे छताखाली भिंतीत एक झरोका हमखास ठेवलेला पाहायला मिळतो. त्या काळी स्थापत्य शास्त्र आजच्यासारखे विकसित झालेले नव्हते. पण घरे बांधणाऱ्यांना एक माहीत होते, की येथे राहायला येणारी माणसे परिस्थितीने गरीब असली तरी त्यांना घरात खेळत्या हवेची गरज भासणार आहे, त्याची काळजी इमारत बांधतानाच घ्यायला हवी. साधा विजेवर चालणारा पंखा देखील नसायचा तेथे वातानुकूल यंत्र तर स्वप्नवत गोष्ट होती. मध्यंतरीच्या काळात स्थापत्यशास्त्र किती तरी विकसित झाले आणि अतिशय आकर्षक रंग-रूपाच्या, अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती उभ्या रहात आहेत. पुढच्या काळात अजून कितीतरी सुधारणा होत जाणार आहेत. प्रत्येक खोलीत पंख्याव्यतिरिक्त वातानुकूलित यंत्रणा असणे आता जणू काही नियमच होऊन बसला आहे. पण नैसर्गिक वायुविजन प्रत्येक खोलीत होत राहील अशी तरतूद बांधकाम करताना केलेली फार क्वचितच दिसून येते. खूप मोठमोठय़ा खिडक्याही सर्व घराच्या एकाच बाजूला, डासांना प्रवेश बंदीसाठी जाळीच्या खिडकीची सोय केलेली असेल तर ठीक; नाहीतर मोठमोठय़ा काचेच्या खिडक्या एकदा लावून घेतल्या की बाहेरच्या हवेची एखादी बारीकशी झुळूकदेखील घरात येणे शक्य नाही. सगळे घर हवाबंद. समोरासमोर खिडक्या किंवा दरवाजे- ज्यातून नैसर्गिक वायुवीजन होत राहील असे जवळ जवळ नाहीतच. मग तुम्ही कितीही मोठी रक्कम, म्हणजे अगदी कोटय़वधी रुपये खर्चून घर घेतले तरीही नैसर्गिक वायुविजन किंवा खेळत्या हवेची आशाच करू नका. त्याकाळी आम्हा गरीब कुटुंबातल्या मुलांना, आजारी व्यक्तीसाठी स्वतंत्र खोली आणि भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असणारी जागा म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट वाटत असे. आता श्रीमंत घरातील मुलांना, आजारी व्यक्तीसाठी स्वतंत्र खोली असणे यात काहीच विशेष वाटणार नाही, तशी एखादी स्वतंत्र रूम आजारी माणसासाठी त्यांच्या घरात असेलही. पण नैसर्गिक वायुविजन होणारे घर कसे असते आणि त्याची आवश्यकता, याबद्दल मात्र लहान मुलेच कशाला अगदी घरातील मोठी माणसे देखील अनभिज्ञच असतील. कारण आता तशी घरे फार क्वचितच पाहायला किंवा राहायला मिळतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा