* माझे ठाणे म्हाडा वसाहत येथील दुसरे घर मी एप्रिल २०१६ पासून ‘अकरा महिन्यांचे भाडे करार’ अंतर्गत एका कुटुंबास राहावयास दिलेले आहे. त्यांना आता रेशनकार्ड काढावयाचे आहे. त्यासाठी त्यांनी लागणारे अनुमती पत्र (NOC) माझ्याकडे मागीतले आहे ते मी त्यांना द्यावे की देऊ नये?
-सुनिल सारंग
* आपणास जे घर ‘अकरा महिन्याचे भाडे करार’ अंतर्गत ज्या कुटुंबास रहावयास दिले आहे त्यांना रेशनकार्ड काढण्याची अनुमती पत्र (NOC) देऊ नये. कारण जर तुम्ही त्यांना अनुमती देऊ केली तर पुढे जाऊन असेही होऊ शकते की, ते रेशनकार्डाच्या जोरावर राहत्या जागेवर आपला हक्क प्रस्थापित करू शकतात, असे होण्याची शक्यता टाळता येत नाही. जर तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असेल की ते वरीलप्रमाणे काहीही करणार नाहीत याची खात्री असल्यास तुम्ही त्यांना रेशनकार्ड काढण्याची अनुमती देऊ शकता.
* आमची मुंबई उपनगरात ४३ वर्षांपूर्वीची सहकारी गृहनिर्माण संस्था असून, ती आता १८ मजली टॉवरमध्ये पूर्ण होत आली आहे. कराराप्रमाणे बिल्डर आम्हाला १५० स्के. फूट (कार्पेट) ज्यादा जागा देत आहे. आमची आधी ५५० स्के. फूट (कार्पेट) जागा होती. नविन जागेचा (७०० स्के. फूट) करार नोंदणी करताना आम्हाला पूर्ण एरियावर मुद्रांक शुल्क भरावयास लागेल का की फक्त वाढीव एरियावर? व कोणत्या दराने?
– श्रीकांत अडकर
* आपण नवीन जागेचा नोंदणी करार करताना वाढीव एरिया म्हणजे १५० स्के. फूट (कार्पेट) यावरच मुद्रांक शुल्क भरावे लागेल. मात्र हे मुद्राक शुल्क कोणत्याही प्रकारच्या वाढीव क्षेत्रफळावर आपणाला भरावे लागेल. मग ते विकासकाने विनामोबदला दिलेले असो अथवा सभासदाने ज्यादा शुल्क भरून विकत घेतलेले असो. मुद्रांक शुल्क आपल्याला प्रचलित दराने भरावे लागेल. हा दर आपणाला संबंधित उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध होऊ शकेल.
* माझी बोरीवली येथे व्यवसायिक मालमत्ता आहे. सुरुवातीस ही मालमत्ता ९ गाळ्यांची होती. त्यानंतर बिल्डरने ती १ गाळाच्या सुधारीत नकाशाप्रमाणे बृहन्मुंबई पालिकेकडून मंजूर करून घेतली. माझा जो बिल्डर बरोबरचा करार झाला तो ही एक गाळा याप्रमाणेच झालेला असून, मेंटेनन्स ९ युनिटच्या प्रमाणे घेतला/ आकारला जातो आहे, हे कायदेशीर आही की नाही?
-सुभाष कुलकर्णी
* आपल्या म्हणण्यानुसार तुमची व्यवसायिक जागा जी बोरीवली येथे आहे त्या जागेचा मेंटेनन्स हा एक गाळा समजूनच भरावा, ९ गाळ्यावर भरण्याची आवश्यकता नाही. कारण विकासकाने नवीन मंजूर नकाशाप्रमाणे आपल्याला एकच वाणिज्य वापरायचा गाळा विकलेला आहे. पूर्वी जरी ते नऊ गाळे असले तरी नवीन मंजूर नकाशाप्रमाणे ती सर्व जागा ही एकच गाळा दाखवला आहे. त्यामुळे मंजूर नकाशात जेवढे गाळे असतील तेवढाच मेंटेनन्स आकारता येतो. तरीही जर संस्थेने ऐकले नाही तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल.
* काही दिवसांपूर्वी मी पारपत्रासाठी अर्ज केला होता तेव्हा पोलीस पडताळणीसाठी मला आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पत्र मागण्यात आले, त्यात फक्त मी या संस्थेत १४ वर्षे राहतो एवढेच म्हणण्यात आले होते. आमच्या गृहनिर्माण संस्थेचा असा कोणताही लिखित नियम नाही- ज्यात अशा दाखल्यासाठी काही ठराविक रक्कम आकारण्यात यावी. पण आमचे संस्थेचे अध्यक्ष व सरचिटणीस त्यासाठी रक्कम मागताहेत व त्यासाठी पद्धतशीर संस्थेची पावली देऊ म्हणतात. तर अशा दाखल्यासाठी १००० रुपये वगैरे संस्थेकडे जमा करावे का?
त्यांचे म्हणणे आहे की, ही रक्कम ते संस्थेचा उत्पन्न स्त्रोत आहे.
–सिद्धेश वेदांते
* आपण विचारलेला प्रश्न व त्या बरोबर दिलेली माहिती वाचता तुमच्या प्रश्नाबद्दल संदिग्धता दिसून येते. जर का संस्थेकडून आपणास रीतसर पावती मिळणार असेल, तर त्याबद्दलचा ठराव संस्थेकडे असण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात कोणताही ठराव संस्थेकडे आहे का याची खातरजमा करून घ्यावी व नंतरच पैसे भरावे.
* ‘आरजू स्वाभिमान नागरिक समिती’ म्हणजे काय? ही संस्था कायदेशीर स्थापन झाली आहे किंवा नाही? मला असे सांगण्यात आले आहे की या योजनेअंतर्गत गरीब लोकांसाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर घर बांधतात, परंतु मी योजने अंतर्गत कुणाला घर मिळाल्याचे पाहिले नाही, तरी याबाबत मार्गदर्शन करावे.
-विशाल चौगुले
* कोणत्याही संस्थेची सर्व कागदपत्रे पाहिल्याशिवाय तसेच त्याचे उद्देश, त्याचा उत्पन्नाचा स्त्रोत, काम करण्याची पद्धत या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आम्हाला याबद्दल मतप्रदर्शन करणे अशक्य आहे.
* मी निवृत्त सरकारी कर्मचारी आहे. माझा नवी मुंबई येथे १.८ कोटीचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट विकून त्यातून येणारा पैसा मला नवीन घरामध्ये गुंतवायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की, या गुंतवणुकीतून मला इन्कम टॅक्समध्ये काही फायदा मिळू शकेल का?
माधव खारकर
* तुम्हाला नवीन मालमत्ता ही एक वर्षांच्या आत विकत घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला २०% प्रमाणे कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. तुम्हाला जर जागेत गुंतवणूक करावयाची नसेल व टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्हाला सरकारच्या निर्देशित बॉन्डसमध्ये गुंतवावी लागेल.
ghaisas_asso@yahoo.com