’ मी ज्येष्ठ नागरिक आहे. मी चौथ्या मजल्यावर राहतो. ही चार माळ्यावरील सदनिका मी सुमारे २५ वर्षांपूर्वी विकत घेतली आहे. मला व माझ्या कुटुंबीयांना आता चार माळे चढणे झेपत नाही. आता पहिल्या मजल्यावर घर घेण्यासाठी मी काही करू शकत नाही या पाश्र्वभूमीवर माझा प्रश्न असा आहे की मी जास्त पैसे खर्च न करता माझा प्रश्न गृहनिर्माण संस्थेमार्फत सोडवू शकतो का? २) यासाठी महाराष्ट्र राज्याच्या घरासंबंधीच्या कुठल्या कायद्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही तरतुदी करण्यात आली आहे का? ३) मला ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे मुद्रांक शुल्कात काही सवलत मिळू शकेल का? ४) मी कोणतीही स्टॅम्प डय़ुटी न करता पहिल्या माळ्यावर जाऊ शकेन का? ५) त्याच गृहनिर्माण संस्थेत अथवा त्या भागातच मी दुसरी सदनिका विकत घेतली तर त्यावेळी मला मुद्रांक शुल्क भरण्यात काही सवलत मिळू शकेल का?
६) संस्था सुमारे २५ ते २८ वर्षे जुनी आहे. ती उद्वाहन (लिफ्ट) बसवू शकेल का?
– एक ज्येष्ठ नागरिक, ठाणे.
’ आपण दिलेली माहिती थोडी अपुरी वाटते. तरीसुद्धा त्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्या प्रश्नांना उत्तरे देत आहोत ती अशी-
१) आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देता येईल. मात्र त्यासाठी आपल्या गृहनिर्माण संस्थेमधील पहिल्या माळ्यावरील सदस्य तुमच्याशी सदनिकेची अदलाबदल करण्यास तयार असला पाहिजे व तरच संयुक्त अर्ज आपण संस्थेकडे दिला पाहिजे. सदनिकांच्या अदलाबदलीसाठीचा अर्ज करण्याची तरतूद उपविधीमधील कलम ४१ अंतर्गत केली आहे. आपण यासाठी गृहनिर्माण संस्थेमार्फत हाऊसिंग फेडरेशनकडे संपर्क साधावा. २) ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही वेगळी तरतूद घरासंबंधीच्या कायद्यात नाही. ३) ज्येष्ठ नागरिकांना मुद्रांक शुल्कात सूट दिलेली नाही. इमारतीच्या आयुष्यावर काही सूट मुद्रांक शुल्कामध्ये मिळते. ४) हो. उत्तर क्र. १ मध्ये दर्शविलेली परिस्थिती असेल तर. ५) अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही.
ghaisas_asso@yahoo.com